‘शब्द’ ब्रम्हाचा किमयागार

Submitted by shabdamitra on 15 March, 2022 - 01:42

संस्कृतात ‘शब्द’ म्हणजे ध्वनि, आवाज असा अर्थ आहे. डॉल्बी पद्धतीमुळे सर्व सामान्य माणसांना या शब्दब्रम्हाचा साक्षात्कार होऊ शकतो याचे श्रेय रे डॉल्बी या ‘शब्दब्रम्हाच्या किमयागाराला ‘ आहे.

मला डॉल्बी म्हणजे काय हे बरेच दिवस माहित नव्हते. चार पाच शब्ब्दांची पहिली अक्षरे घेऊन हा शब्द झाला असावा असे वाटे .नंतर डॉल्बी साउण्ड, डॉल्बी Surround, Dolby Atoms हेही फक्त ऐकून, वाचून माहित झाले. पण म्हणजे नेमके काय ते लक्षात येत नव्हते. डॉल्बी म्हणजे Dolby Sound System आहे आणि रे डॉल्बी हा तिचा जनक!

गुरुवारी १३ सप्टेंबर २०१३ रोजी रे डॉल्बी यांचे निधन झाले.

गेल्या काही दशकापासून चित्रपटातच नव्हे तर सर्व ध्वनि साधनांत Dolby ध्वनि तंत्रच वापरले जाते. डॉल्बीच्या यशाला सीमा नाहीत. डॉल्बी तंत्र आज ७.४ बिलियन्स इलेक्ट्रिक साधनांत वापरले जात आहे !

जे ऐकून, वाचून माहित होते ते, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिल्यावर डॉल्बी ही काय चीज आहे ते जाणवले. डॉल्बी म्हणजे आवाज स्पष्टापेक्षाही सुस्पष्ट करणारी, आवाज निर्भेळ स्वरूपात ऐकायला देणारी डॉल्बी सिस्टिम. म्हणजे ध्वनि-पद्धती. पण हे भाषांतर झाले. चित्रपट पहाताना आवाजातून उमटणाऱ्या भाव-भावना आणि अभिनयही जाणवू लागल्यावर डॉल्बी साउण्ड सिस्टीम ही केवळ ध्वनि -पद्धत नसून शरीरातील मज्जा-संस्था, श्वसन-संस्थेसारखीच ती आपल्या देहातील ध्वनि संस्थाच झालेली असते ! परवाच Gravity हा चित्रपट पाहिला तेव्हा आवाजाच्या सामर्थ्याचा पुन:प्रत्यय आला .

डॉल्बीने आवाजातील धिस्स, हिस्स , खर्र खर्र वगैरे गोंगाट (chaos, static sound) असतात ते पूर्णतया काढून टाकले. एवढेच नव्हे तर ध्वनीच्या सर्व लहान मोठया, परमाणु इतक्या सूक्ष्म पैलूंचा विचार करून ध्वनीला नियमित, नियंत्रित करता येणे त्याने आपल्या तंत्राने शक्य केले. डॉल्बी तंत्रामुळे आवाजाचा हवा तो नेमका परिणाम साधता येतो. एका अर्थाने डॉल्बी तंत्राने ध्वनीला सगुण मूर्त रूप दिले! विश्वास बसणार नाही पण गेल्या २५-३० वर्षांपासून डॉल्बी तंत्राने आणलेल्या नित्य नव्या शोधांनी आपण ऐकावे कसे हे ठरवून दिले! सिनेमा नाटकाचे प्रेक्षकच नाही तर इतर अनेक गोष्टींचे श्रोते ऐकणाऱ्या विषयाशी केवळ आवाजामुळे समरस होतात. म्हणूनच Star Warsचा जनक जॉर्ज ल्युकास डॉल्बी पद्धतीचा आणि तिचा निर्माता रे डॉल्बीचा गौरव करताना म्हणतो, “Star Warsशी प्रेक्षक इतके तन्मय होतात त्याचे रहस्य डॉल्बीच्या आवाजाच्या शक्तीत आहे ! रे डॉल्बी आवाजाशीच पूर्णपणे मिसळून जातो इतकी त्याला ध्वनी या विषयाची तीव्र आवड आहे. नुसती आवडच नव्हे तर ध्वनी विज्ञानाचा एकूणच तो एकदम ‘दादा’ आहे; ‘बापमाणूस’ आहे तो!’

रे डॉल्बी रेडवूडसिटी मधील सिकोइया हायस्कूलमध्ये शिकला. ८-९वीत असल्यापासून त्याने संगीताच्या चुंबकीय फितीवर होणाऱ्या ध्वनि मुद्रणात सुधारणा करण्यास सुरुवात केली .हायस्कूलमध्ये असतानाच रेडवूड सिटी इथल्याच Ampex कंपनीत तो तंत्रज्ञ म्हणून काम करत होत. मग त्याने स्टन्फ़र्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला . त्या काळात तो Ampex कंपनीत Chief Designing Engineer या पदावर पोचला होता.! १९५७ साली तो Stanford University तून इले. इंजिनिअर होऊन बाहेर पडला. पण त्याआधीच १९५६ साली बाजारात आलेल्या Video audio Recorder मधील सर्व इलेक्ट्रोनिक भागांची आखणी आणि रचना रे डॉल्बीनेच केली होती. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या केम्ब्रिजमधून क्ष-किरणांच्या दीर्घ लहरींचे सूक्ष्म विश्लेषण यावर डॉक्टरेट मिळवली. १९६३ ते १९६५ तो हिंदुस्थानात सरकारचा तंत्रज्ञान विज्ञानाचा सल्लागार होता.

डॉल्बीने आपली कंपनी स्थापन केली. Dolby, In Dolby, Dolby Surround , किंवा अगदी अलीकडे Dolby Atoms अशी अक्षरे दिसली की प्रेक्षकांना आपल्याला आज काही तरी जबरदस्त ऐकायला मिळणार याची खात्री असते. “आज सिलिकॉन व्हॅली हे नाव सर्वतोमुखी आहे. पण त्या अगोदर कितीतरी वर्षे सर्व जगाला Digitalचा अनुभव, आनंद डॉल्बी देत होता” असे ज्याच्या Right Stuff या चित्रपटाला चार ऑस्कर मिळाली तो, १३ चित्रपटांचा दिग्दर्शक फिलिप कॉफमन म्हणतो ते निर्विवाद सत्य आहे. रे डॉल्बीचे मोठेपण यात आहे.

Invasion of the Body Snatchers चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर “डॉल्बी आवाज” हाच एका दृश्याचा प्राण कल्पून; “आवाज” हेच मुख्य पात्र कल्पून त्या संपूर्ण दृश्याचे चित्रण केले.

ब्रॉडवेच्या बोगद्यातून मोटार-सायकली आणि मोटारी जात आहेत असे ते दृश्य होते प्रेक्षकांना ते ‘ दृश्य’ ऐकून’ आपण बोगद्यातच आहोत; आपल्या पुढून, मागून ,आजूबाजूने मोटारी, मोटार-सायकली रोंरावत,घोंघावत भरधाव वेगाने जात आहेत असे वाटत होते.

‘डॉल्बी’च्या चित्रपटात प्रेक्षक ‘प्रेक्षक’ न राहता ‘श्रवणकुमारच’ होतात. डॉल्बीने आपण पूर्ण वेढलेले असतो. व्याप्त झालेले असतो. डॉल्बी आवाज काना पुरताच मर्यादित नसतो. सर्वांगाला व्यापून टाकतो. हृदयाचे ठोके चुकतात. छाती धडधडते. थिएटरभर डॉल्बीची हुकमत असते.’ डॉल्बी’ कानातच नसतो. शरीरात संचारत असतो. इतर आवाज श्रुती, तर ‘डॉल्बी’ अनुभूती असते!

ह्याच फिलिप कॉफमनने डॉल्बी धडाक्याचा एक गंमतीदार किस्सा सांगितला. ” Right Stuffचा खेळ सुरु होण्यापूर्वी मी ऑपरेटरला जाऊन सांगितले आज माझ्या शेजारी हेन्री किसिंजर (हे अमेरिकेचे गाजलेले परराष्ट्र मंत्री) आहेत. रॉकेट सोडण्याचे दृश्य पहाताना किसिंजरना घाम फुटला पहिजे.त्यांचा चेहरा हनुवटीसकट थरथरला पाहिजे”. आणि ऑपरेटरनेही त्याच धडाक्याने रॉकेटस सोडली!

रे डॉल्बी केवळ बुद्धिवान संशोधक, यशस्वी उद्योजक नव्हता. मोठा हौशी होता. त्याने जगण्याचा चौफेर आनंद घेतला.

डॉल्बीला मोटर आणि मोटार सायकलीची फार आवड होती. इंग्लंडमध्ये असताना त्याने मोटरसायकलीवरून बरेच वेळा युरोप पालथा घातला होता. हिंदुस्तानातील आपला कार्यकाळ आटोपल्यावर तो इंग्लंडमध्ये आला. तेव्हा बायकोला बरोबर घेऊन त्याने मोटारीतून युरोपची सफर केली. मोटरच काय डॉल्बी विमानही चालवायचा. त्याचे स्वत:चे सेसना-सायटेशन १२ विमान होते. हा बहाद्दर अमेरिकेतल्या पन्नास राज्यात आणि तीस देशात हे विमान स्वत: चालवून गेला अहे. सतरा वेळा स्वत: विमान चालवत अटलन्टिक महासागर ओलांडला आहे!

Rock Bandची बस असते तशी रंगीबेरंगी चाळीस फुटी बस त्याने करवून घेतली. ह्या बसमधून बायको मुले नातवंडांसह सहली-प्रवासाचा आनंद उपभोगला.

डॉल्बी इंग्लंडमध्ये असताना तिथेच भेटलेली विद्यार्थिनी Dagmarशी त्याचे लग्न झले.त्या दिवसांपासून ही दोघे सदैव जोडीनेच राहिली. कुठल्याही सभा-संमेलनाला, सिनेमा-नाटकाला किंवा पार्ट्या-उत्सवाला दोघेही एकत्रच असायचे. त्यांना लोकांनी कधी एकेकटे असे पाहिलेच नाही. दोघे असूनही त्यांची एकच सावली पडायची!

प्रत्येकाला आपले आयुष्य जसे असावे, लाभावे असे वाटते तसे आयुष्य रे डॉल्बी यांना लाभले.

१९९७ साली रे डॉल्बी यांना त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते National Medal of Technology and Innovation हे मानाचे पदक मिळाले. त्यावेळी डॉल्बी यांनी अत्यंत साध्या शब्दांत जे सांगितले ते लाख मोलाचे आहे. त्यांत त्यांची शालीनातही दिसून येते. ते म्हणतात , “आयुष्याचा पहिला भाग शिक्षणाचा, शिकण्याचा असतो. दुसरा भाग कष्ट आणि मेहनतीचा असतो. आणि मग मग तुम्ही लोकांसमोर येता. आणि लोक तुम्हाला मान-सन्मानाची पदके देऊ लागतात.”

चित्रपटाचे प्रेक्षक संगीतासाठी, कधी आपल्या हृदयाची धडकन असणाऱ्या नटीसाठी, आवडत्या नायकासाठी चित्रपट पहायला गर्दी करतात. पण ‘जिवंत’ आवाजाने घाबरण्यासाठी, चित्त थरारण्यासाठी, हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या भरधाव वाहनांच्या आवाजासाठी, पानांची सळसळ ऐकताना कावरेबावरे होण्यासाठी, चालताना पाचोळ्याचा आवाज ऐकताच एकदम मागे वळून पाहण्यासाठी, मध्येच पक्षी चित्कारत गेला की… पुढे काय… अशा उत्कन्ठ्तेने प्राण कंठात आणणाऱ्या अनुभवासाठी लोकांना चित्रपटाला खेचून आणणाऱ्या ‘डॉल्बी आवाजाला’ तेव्हढ्याच ताकदीचा ‘प्रमुख कलाकार’ बनविणाऱ्या रे डॉल्बीने आवाजाच्या प्रदेशात क्रांती केली यात शंका नाही.

आयुष्यात सर्व राजयोग लाभलेल्या रे डॉल्बी नावाच्या एका बुद्धिमान कुटुंबवत्सल यशस्वी उद्योजकाच्या आयुष्याची कहाणी गुरुवार ता. १३ सप्टेंबर २०१३ रोजी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दमित्र, एकदम सुरेख परिचय करुन दिलात रे डॉल्बी व डॉल्बी टेक्नॉलॉजीबद्दल!

आपण जे चित्रपट पाहतो ते आपल्याला आवडण्यामागे कथा, अभिनय, चित्रिकरण, दिग्दर्शन या बरोबरच ध्वनीमुद्रण( साउंड इफेक्ट) याचाही तितकाच सिंहाचा वाटा असतो. म्हणुन मग स्टार वॉर्स, राइट स्टफ असे तुम्ही नमुद केलेले असंख्य चित्रपट आपल्या मनात घर करुन बसतात.

नुसते चित्रपटच नाहीत तर काही काही डॉक्युमेंटरीजही या डॉल्बी टेक्नॉलॉजीमुळे अतिशय परिणामकारक होउन जातात. “ रॉकी माउंटन एक्स्प्रेस” ही अशीच एक आयमॅक्स मधे चित्रीत केलेली एक डॉक्युमेंटरी आहे. त्यात एका जुन्या अजस्त्र स्टिम इंजीनचे नुतनीकरण करुन त्या इंजिनचा व्हँकुव्हर ते टोरांटो प्रवास दाखवला आहे. त्यात मग व्हँकुव्हर ते टोरांटो रेलरोड १८८० मधे कसा बांधला याची गोष्ट आहे. दुर्गम अश्या कॅनेडिअन रॉकीज मधे डोंगरदर्यातुन रेलमार्ग बांधताना कसे प्रयास पडले याचबरोबर स्वर्गिय सुंदर अश्या फ्रेझर रिव्हर व फ्रेझर व्हॅली, सल्कर्क्स माउंटन्स, बँफ व सबंध कॅनेडिअन रॉकीजची सुंदरताही या डॉक्युमेंटरीमधे चित्रित केलेली आहे. पण या सगळ्याला चार चांद लावले आहेत ते या डॉक्युमेंटरीमधे वापरलेल्या डॉल्बी ऑडियोने! इंजिन चालु होताना, इंजिन्सचे अजस्त्र पिस्टन्स पुढे मागे होताना, इंजिन व गाडी डोंगरदर्यातुन , फ्रेझर रिव्हरच्या बाजुबाजुने, बोगद्यांमधुन , पुलांवरुन जाताना जे आवाजाचे ध्वनिमुद्रण आहे यात त्याला तोड नाही! अर्थात त्याचे श्रेय रे डॉल्बी यांनी शोधुन काढलेल्या टेक्नॉलॉजीलाच जाते!

शब्दमित्र व इतर , तुम्हाला जर डॉल्बी टेक्नॉलॉजीला एका सुंदर कलाकृतीसकट अनुभवयाचे असेल तर “ रॉकी माउंटन एक्स्प्रेस” ही डॉक्युमेंटरी एकदा तरी बघाच! (अर्थात तुमच्याकडे प्रभावी रिसिव्हर/ अँप्लिफायर व तितकेच् पॉवरफुल हाय फिडॅलिटीचे स्पिकर्स हवेत हेही तितकेच महत्वाचे आहे हे सांगणे नलगे!)

@मुकुंद - तुमचा सविस्तर अभिप्राय वाचून आनंद झाला. शब्दब्रम्हाचा किमयगार डॅाल्बी संबंधीच्या लेखामुळे सिनेमा अगर श्रवणानुभवाचे इतर कार्यक्रम ऐकताना ‘ध्वनि’ आवाजही किती समर्थ भूमिका वठवतो ; त्यासंबंधीचे तुमचेही चित्त थरारक अनुभव तुम्हाला आठवले व ते वाचायला मिळाले ह्याचाही आनंद झाला. तुम्ही सुचवलेली डॅाक्युमेंटरी मी पाहीन. पुन्हा एकदा आपले आभार.