हरवलेले गवसेल काय? ४

Submitted by संजय पाटिल on 13 March, 2022 - 01:01

त्याची प्रतिक्रिया बघून मी थोडासा घाबरलो. थेट विचारून चूक तर केली नाहीना? असे वाटू लागले. समजा यांच्या कडे नसल्या तर आम्ही खोटा आळ घेतोय असं समजून हा भडकून बोलायला लागला तर काय करायचं? असा विचार करू लागलो.
तो पर्यंत त्याचा मुलगा चहाचे कप घेउन हजर झाला.

" बेटा, अम्मी को बुलाना जरा" त्याच्या हातातून कप घेऊन आमच्या हातात देत तो गंभीर होत म्हणला.. " घ्या, चाय घ्या."
मुलगा अम्मीला बोलवायला आत गेला आणि लगोलग दोघे बाहेर हजर झाले.

" बेगम, ये लोग बोल रहे है कि इन्होने जो पुराने गद्दे दिये थे उसमे सोनेके कंगन थे. हमे मिले है क्या पुछ रहे है, और ये इनके पिताजी है." असे म्हणत त्याने वडिलांची ओळख करून दिली.
" सलाम भाइसाहब," म्हणत तिने वडिलांना सलाम केला.
" सलाम." वडिलांनी पण सलाम केला.
" बेटा, कैसे कंगन थे? कितनेके थे? और कंगन गद्देमे कहासे आयेंगे?" हे बोलत असताना तिची नवर्‍या बरोबर काहीतरी नेत्रपल्लवी झालेली मला जाणवली.

बाकीचे कामगार पण आता काम थांबवून आमच्या कडे बघु लागलेत हे पण मला जाणवलं. मुलगा पण सिरीयस होउन आमच्या जवळ येऊन ऊभा राहिला. बहुतेक प्रकरण आता काहितरी गंभ्रीर वळण घेणार असे वाटु लागले.
"छे, उगाच आगावपणा केला. वडलांचं ऐकायला पाहिजे होतं. कोणाला तरी सोबत आणायला पाहिजे होतं " मी मनात विचार करत होतो.

" बेटा, कुणाच्या बांगड्या होत्या? तुझ्या बायकोच्या काय?" तीनं मला विचारलं.
" नाहीहो चाची, माझ्या आईच्या होत्या." मी उत्तरलो.
" कितीच्या ( तोळ्याच्या असं म्हणायचं असावं बहुतेक) होत्या?"
" चार तोळ्याच्या"
" आणि चार तोळ्याच्या बांगड्या गादीत कशा जातील?" हे विचारताना तिचा आवाज जरा जास्तच कडक झाल्यासारखा वाटला.

" अहो त्याचं काय झालं.." असं म्हणत मी घाबरत घाबरत सगळा प्रकार ( गादी-२) त्याना ऐकवला.
त्यांना ते कितपत पटलं काही अंदाज येइना. कारण ते सगळे गंभीर चेहर्‍याने आणि संशयाने आमच्या कडे बघत होते.

" हे बघा, आमच्या पाटल्या तुम्हाला सापडल्या असतील तर सांगा. नसतील तर तसं सांगा. आमचं काहिही म्हणनं नाही." वडिल बोलले.

" अच्छा, म्हणजे पाटल्या होत्या होय? मला वाटलं बिलवर होते" चाची.

हे ऐकल्यावर आम्हि दोघांनी एकमेकाकडे बघीतलं. मी विचार करत होतो कि एकतर यांना काय पाटल्या मिळालेल्या नसाव्यात, किंवा मिळाल्या असल्या तरी हे काही कबुल करणार नाहीत.

" पाटल्याच होत्या. चार तोळ्यांच्या! " बाबा बोलले.
" चला, बाबा निघुया आपण. बघु दुसरीकडे कुठेतरी शोधुया." असं म्हणत मी ऊठलो. बाबा पण उठले.

" अहो बसा, मिळतील तुमच्या पाटल्या, बघुया आपण काहितरी करुया." असं म्हणत चाचाने बाबाना हाताला धरून पुन्हा खालि बसवलं.

" बेटा, बैठो तुमभी. आणि आता दुसरीकडे कुठे बघायला जाणार? " त्यानं मला विचारलं.

आता मी पण जरा सामान्य परीस्थितीला आलो होतो. कारण एक तर ते लोक चिडुन भांडत वगैरे नव्हते. वरतुन पाटल्या शोधायला मदत करायला तयार झाले होते. जर त्यांच्या कामगारांपैकि कोणाकडे असतील तर त्या केस मधे यांचा मला उपयोगच होणार होता.

" काहीच समजत नाही चाचा. मला वाटलं होतं तुमच्या हातात पडल्या असतिल तर सुरक्षित हातात आहेत. पण आता नाही वाटत मिळतील असं" मी हताश स्वरात बोललो.

" कश्या होत्या पाटल्या? जरा नीट सांग बरं " चाची बोलली
" मी कधी बारकाईने बघितल्या नव्हत्या. फक्त चार तोळ्यांच्या होत्या एवढं आजच बायको बोलली म्हणुन कळलं" मी उत्तरलो.

" आम्ही दोघेच गेलो होतो सोनाराकडे पाटल्या करायला देताना. आणी आणल्या पण मीच होत्या त्यामुळे माझ्या चांगल्याच लक्षांत आहेत त्यां" हे बाबा बोलले.

" संपुर्ण गोलाइ वर छोटे छोटे चौकोन आणि प्रत्येक चौकोनात एक चार पाकळ्यांचं फुल असं डिझाइन होतंं"

" ठीक है. देखते है अब क्या करना है." चाचा असं बोलताच चाची वळुन आत निघुन गेली.

" आणि तुम्हाला गंमत वाटेल, काल पण एक जोडपं आलं होतं असंच बांगड्या बद्दल विचारत." बराच वेळ शांत उभा असलेला त्याचा मुलगा बोलला.

*********************************************************************************

मी हा जो अनुभव सांगतोय ती एक सत्य घटना आहे. माझ्या एका अगदी जवळ्च्या मित्राच्याबाबतीत घडलेली. प्रत्यक्षांत घडलेली घटना याहुन कितीतरी रोचक होती. आज तो मित्र संपर्कात नसल्यामुळे त्याची परवानगी न घेता लिहीत असल्यामुळे सर्व पात्रांची नांवे टाळ्ली आहेत. फक्त आम्हां दोघांचे आडनांव पाटिल असल्यामुळे त्याच्या जागी स्वतःला ठेउन लिहीत आहे.
यपुढचा भाग चाचा कडून ऐकणं रोचक वाटेल म्हणुन त्याच्याच तोंडून ऐका....

*********************************************************************************

आज काम जरा जास्तच होतं. कामगाराना संध्याकाळी दोन तास जास्त काम करायला सांगावं काय असा विचार करत होतो. दोन पुरूष होते त्यांचा काही प्रश्न नव्हता. पण बायका थांबायला तयार नसतात. त्यांचं पण बरोबरच आहे, घरी जाऊन पुन्हा खाना बनवणं, आणि घरची कामं पण असतात. त्यामुळे बायकांना जायला सांगीतलं.

दोघांना सांगीतलं कि जेवढ्या जुन्या गाद्या आहेत त्यातला कापुस सगळा आज पिंजून ठेवा म्हणजे उध्या सकाळी आल्या आल्या नवीन गाद्या भरता येतील. आणि मग दुपार पासुन डिलीव्हरी पठवायला सुरू. म्हणजे संध्याकाळ पर्यंत उध्याच्या ऑर्डर पुर्ण करता येतील.

दोघांनी जुन्या गाद्या उचलायच्या, त्याचं कापड फारच जुनं असेल तर टराटरा हातानेच फाडायचं, नाहीतर कात्रीने कापायचं आणि कापुस उचलुन मशीन मधे टाकायचा असा सपाटा लावला होता. त्यांचा कामाचा वेग बघुन मी पण खुश होतो. अर्थात त्यानां पण घरी जण्याची गडबड असणार त्यामुळे हा वेग होता हे मला पण माहीत होतं.

अचनक मशीन मधुन खाड खाड असा आवाज येउ लागला. म्हंटलं ही काय नवी पीडा?
" अरे बंद कर जल्दी, मशीन बंद कर!" असं म्हणत मी मशीन कडे धावलो

एकाने मशीन बंद केली. " काय रे? काय टाकलंस त्यात? " मी विचारलं

" कापुसच टाकलाकी, आजुन काय टाकू? हां, आता कापसातनं काय मोळा खिळा आला आसल तर काय म्हाइत." म्हणत त्यानं मशीनचं साईड्चं कव्हर खोलायला सुरवात केली.

" क्या हूवा? " आवाज ऐकुण बाहेर येत बेगम विचारु लागली.

"मशीन मे कुछतो लोखंड गीरा है. अभी खोलके देखना पडेगा" मी बोललो.

" भय्या चाय लोगे?" उशीरा कमगार थांबले तर त्याना चहा लागतो हे माहीत असल्याने बेगमने विचारलं

" हां पीलादो सबको. अभी इस लोखंड्की वजहसे और देर हो जायेगी." मी म्हंटलं तशी बेगम चाय बनवायला आत गेली.

तसं पण गादीच्या कापसातून एखादी वस्तू जसं की हेअर पीन, गोट्या, लहान लहान खडे, एखादं प्लास्टिकचं खेळणं अश्या वस्तू नेहमी सापडायच्या. त्यामुळे कांही वेगळं वाटलं नाही.

हां आता अश्या प्रकारामुळे वेळ मात्रं वाया जायचा.

एकानं मशीनचं कव्हर काढुन आत हात घालुन आतला कापूस कढायला सुरवात केली. जवळ जवळ सगळा कापूस काढला तरी काही सापडत नव्हतं. शेवटी बराच आत पर्यंत हात घालून चाचपडल्यावर त्याच्या हाताला काहीं तरी लागले. ते त्यानं बाहेर काढलं.

" हे बगा काय हाय" असं म्हणत हात माझ्या पूढे केला.
ती एक वाकडी तिकडी झालेली बांगडी होती!
मी ती हातात घेतली. बरीच जड लागली.
" क्या मिला? लो भैय्या चाय लो." बेगम बोलली.

" ये देखो, ये मिला इसके अंदर" असं म्हणत मी ती बांगडी बेगम पुढे धरली. ती तीने हातात घेउन उलट सुलट करून बघितली आणि " अल्ला! ये तो सोनेकी है!" म्हणत मझ्याकडे डोळे फाडून बघू लगली.

" सोनेकी? लाना इधर जरा?" म्हणत मी ती हातात घेउन परत नीट बघितली. होय सोन्याचीच होती. नक्की.
" अरे जरा नीट बघ अजून काय आहे काय." मी म्हंटलं

सोन्याची बांगडी म्हंटल्यावर दोघे पण मशीन वर पुन्हा तुटून पढले. दोन्ही बाजूची कव्हर काढून सगळा कापूस बाहेर काढल्यावर अजून एक बांगडी सापडली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय त्रास आहे हा!
काकुंच्या पाटल्या कधी मिळतात असं वाटु लागलंय आणि तुम्ही क्रमशः क्रमशः चालवलंय. लिहा पटकन! Happy
छान लिहिताय. उत्कंठा वाढतेय.

"कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा " या नॅशनल प्रश्नापेक्षा "आईंच्या पाटल्या मिळाल्या का ??????" हा प्रश्न संसदेत विचारावा असा झाला आहे। प्लिज जास्त ताणू नका नाहीतर उत्कंठा डायव्हर्ट होईल .