उमलायाचे धाडस केले

Submitted by निशिकांत on 11 March, 2022 - 08:43

( जागतिक महिला दिनानिमित्त तिसरी रचना पण गझल स्वरुपातील पहिली-- पेश करतोय.)

नको नकोशी जरी जगाला जन्मायाचे धाडस केले
मुग्ध कळीने काट्यामध्ये उमलायाचे धाडस केले

खाचा खळगे खूप जीवनी पायवाटही अरूंद होती
तोल सावरत ध्येय दिशेने चालायचे धाडस केले

जरी विषारी नजरा होत्या सभोवताली सहकार्‍यांचा
सन्मानाने जगण्यासाठी कमवायाचे धाडस केले

पतंग आले तिला विझवण्या गटागटाने,पण ज्योतीने
निश्चय करुनी प्रकाश देण्या तेवायाचे धाडस केले

पीठ कोणत्या चक्कीचे ती खात असावी कधी न कळले
अन्यायांना पदराखाली झाकायाचे धाडस केले

उपभोगाचे साधन केले तिला तरीही देवापुढती
सात जन्म त्या पतीस जुलुमी, मागायाचे धाडस केले

तोंड दाबुनी मार खातसे बुक्क्यांचा ती उठता बसता
असह्य होता चार आसवे गाळायाचे धाडस केले

स्त्री जन्माची उंच लक्तरे टांगत टांगत कूस उजवता
तिने जिजाऊ नाव मुलीचे ठेवायाचे धाडस केले

"निशिकांता" चल काळे फासुन शेजार्‍यांना प्रश्न करू, का
गाप्प राहिले? तिने स्वतःला जाळायाचे धाडस केले

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users