"मराठी भाषा दिवस : माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई - भरत.

Submitted by भरत. on 3 March, 2022 - 01:20

माझी पहिली शाळा घाटकोपर , पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेची मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल - इन्ग्लिश मिडियम.
माझी पहिली इयत्ता झाली आणि आम्ही बोरिवलीला राहायला आलो. इथे मला जवळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे सुविद्या प्रसारक संघाच्या सुविद्यालयात प्रवेश घेतला.
घाटकोपरला असतानाच मी घरीच मराठी लिहायला वाचायला शिकलो होतो, त्यामुळे इथे दुसरीत प्रवेश घेता आला. आता आठवत नाही, पण मराठी लिहायला वाचायला मला माझ्या बहिणीने शिकवले असणार. ती माझ्यापेक्षा दहा वर्षे मोठी. ती मराठी माध्यमातूनच शिकलेली.
मोडी लिपीची अक्षरेही गिरवलेली आठवतात.

आई तिच्या लग्नाआधी दोघा भावांनी वाचनालयातून आणलेली पुस्तके रात्री उशिरापर्यंत वाचत असे. किराणा बांधून आलेला कागदही तिने कधी वाचल्याशिवाय टाकला नाही. बाबा स्वतः कधी पुस्तक वाचताना दिसले नाहीत. पण आमच्यासाठी आधी चांदोबा आणि मग किशोर आणायचे. चंपक, ठकठक हे प्रकार तेव्हा होते का माहीत नाहीत. पण कधी पाहिले नाहीत. बोरिवलीला एकदा शेजारी मित्रांबरोबर मुलांसाठीच्या एका घरगुती वाचनालयात गेलो तेव्हा कॉमिक्स हा प्रकार पाहिला. पण तेव्हा माझं वाचन कॉमिक्सच्या खूपच पुढे गेलं होतं.

घरी 'गोष्टीची पुस्तकं' फार नव्हती. श्यामची आई हे पुस्तक माझ्या जन्माच्या आधीपासूनच घरात होतं. पुढे बाबांनी साने गुरुजींच्या गोड गोष्टी हा दहा पुस्तकांचा संच आणला होता. यातल्या सगळ्याच गोष्टी गोड होत्या, असं मात्र नाही. Victor Hugo च्या Les Miserables चा दु:खी या नावाने केलेला अनुवाद त्यात होता. एका पुस्तकाचं नाव होतं - करुणा. नावप्रमाणेच ती करुण रसात बुडलेली होती. ती पुस्तकं वाचायचं माझं वय निघून गेल्यावर बाबांनी ती त्यांच्या गावच्या शाळेच्या वाचनालयाला भेट दिली.
गोग्रामचा चितार हे पुस्तक ताईने आणलं होतं. तेही कितीतरी वेळा वाचलं असेल. लेखक नारायण धारप , हे तेव्हा माहीत करून घेतलं नव्हतं.
याशिवाय ताईची मराठीची पाठ्यपुस्तकं माझ्यासाठी गोष्टीची पुस्तकंच होती. तिचं अकरावी एसेसी. तिच्या पुस्तकातलं चितळे मास्तर अनेकदा वाचलेलं आठवतंय. मग पुढे ती कॉलेजात जाऊ लागली तेव्हा लायब्ररीतून पुस्तकं आणायची तीही क्वचित वाचली. ती माझ्या वयाला योग्य नव्हती याने काही फरक पडला नाही.
आई कायम प्रमाण मराठीत बोलायची. तिचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असलं तरी तिचे काका मालवणच्या भंडारी हायस्कूलचे प्रिन्सिपल, त्यामुळे तसंच आईवडील दोघेही लवकर गेल्याने ही सगळी भावंड लवकर मुंबईत आल्याने माझे सगळे मामा- मावश्या प्रमाण मराठी बोलणारे. बाबांच्या तोंडी मात्र मालवणी शब्द असायचे. त्यांच्याकडच्या नातलगांशी, गाववाल्यांशी ते मालवणीतून बोलायचे. त्यामुळे मला बोलता आलं नाही तरी मा लवणी कळतं. पण आता त्यांच्या पिढीतलेही मुंबईत राहिलेले लोक प्रमाण मराठीतच अधिक बोलतात.
मला वाचायला कसलीही पुस्तकं चालत. मग ती देव्हार्‍याखालच्या खणातली गणेश पुराण, शिवलीलामृत, नवनाथकथासार असोत , बाबांनी स्वतःसाठी आणलेली पण कधी न वाचलेली आजारपणाचं मानसशास्त्र, संमोहनशास्त्र, तुमची झोप तुमच्या हाती, आजीबाईचा बटवा वनौषधींतून घरगुती उपचार किंवा ताईचं होम सायन्सचं पाठ्यपुस्तक.
याशिवाय मराठीचे दोन महत्त्वाचे शिक्षक लोकसत्ता आणि आकाशवाणी मुंबई.
या सगळयांकडून माझं मराठी शिकणं आपसूक होत होतं.

शाळेतल्या शिक्षकांपैकी मुख्याध्यापक शं ना दीक्षित आम्हाला एक वर्ष हिंदी आणि नववी दहावीला संस्कृत शिकवायला होते. ते म्हणत - मी धडा शिकवणार नाही, भाषा शिकवतो. खरी मजा ऑफ पिरियडला येत आणि मराठीचं किंवा कधी कसलंही पुस्तक न घेता जे काही शिकवत त्यात असे. त्यावेळी त्यांनी केलेलं एक निरीक्षण अजून आठवतंय . "मी आली" असल्या प्रकाराची तेव्हा सुरुवातच होत असावी. खास मराठीचे असे कोणी शिक्षक होते का आठवत नाही. एकतर आमची शाळा नवीन आणि लहान होती. दहावीला बसणारी आमची चौथी बॅच. प्रत्येक इयत्तेच्या फक्त दोन तुकड्या. मी सहावीत असताना एक शिक्षक त्याच वर्षी रुजू झाले. ते आमचे वर्गशिक्षक आणि मराठीही शिकवत. पुढे त्यांचा विषय शारीरिक शिक्षण हा होता, असं कळलं. दोन शिक्षिका मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा शिकवत.

दहावीनंतर पार्ल्याच्या म.ल. डहाणुकर वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला . अकरावीच्या आमच्या वर्गात निम्म्यापेक्षा अधिक मुलं ,खरं तर मुली ( वर्गात ७०-८० मुली आणि २०-३० मुलगे) पार्ले टिळकच्या. कॉलेजच्या पहिल्या दिवशी मराठीच्या तासाला एक सर वर्गावर आले आणि मुलींमधून निराशेचा व्यवस्थित ऐकू येईल असा सूर उमटला. पार्ले टिळकच्या मुलांना कॉलेजची आणि शिक्षकांची बरीच माहिती होती आणि मराठीला प्रा मृणालिनी जोगळेकर आहेत , हे माहीत होतं. त्या तेव्हा दूरदर्शनवरच्या सुंदर माझं घर या कार्यक्रमाचं संचालन करीत ( रोज वेगवेगळे विषय आणि त्यानुरूप वेगवेगळ्या संचालिका. मोहिनी निमकर हे एक नाव आठवतंय. दर पंधरा दिवसांतून एकदा साहित्याबद्दलचाच कार्यक्रम त्या करीत. नंतर एकदा प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रमही केला होता) तर जोग ( प्रा. वि रा जोग) सराना पाहून मुलींचा अपेक्षाभंग झाला होता. पण सरांनी मी आजच्यापुरताच तुमच्या वर्गावर आलो आहे. तुम्हाला मराठीला जोगळेकर मॅडमच आहेत, असं सांगितलं.
आज तो प्रसंग आठवून जरा विचित्र वाटतं आणि जोग सरांच्या खिलाडू वृत्तीबद्दल आदरही.

तर जोगळेकर बाई आम्हांला मराठी शिकवताना वेगवेगळ्या विषयांवरही बोलतं करीत. तेही जागेवरून नाही. वर्गासमोर येऊन - अगदी चारपाच वाक्यं का होईना, पण काहीतरी बोलायला सांगत .
चाचणी परीक्षेत अमुक प्रसंगी लेखिकेला काय वाटतं अशा एका प्रश्नाच्या उत्तरात मी एक भाववाचक नाम वापरलं होतं. बाईंनी नंतर चर्चा करताना मी वापरलेला तो शब्द तिथे कसा चुकीचा आहे हे सांगितलं. अर्थात तेव्हा त्या मला उद्देशून किंवा मी तो शब्द वापरला आहे हे लक्षात ठेवून बोलत नव्हत्या. इतक्या बारकाईने त्या पेपर तपासत . शब्दार्थांच्या छटा - त्यांचा उचित वापर याचं महत्त्व तेव्हा कळलं. जोग सरांनी पाठ शिकवताना सांगितलेला एक मुद्दा आम्हां सगळ्यांच्या उत्तरांत आला होता. हे तुम्ही सगळ्यांनी कोणत्या गाइडमध्ये वाचून लिहिलंय का असं बाईंनी विचारलं होतं. बारावीत गेल्यावर मी काही विषयांवर लिहिलेले लेख (तेव्हा त्याला निबंध म्हणत) त्यांना वाचायला दिले आणि त्यांनी ते वाचून अभिप्राय दिला होता. स्थूलवाचनासाठीचे पाठ (एका वर्षी कथा, दुसर्‍या वर्षी एकांकिका) ट्युटोरियलमध्ये छोट्या बॅचेसमध्ये घेतले जात. बाई हे पाठ आमच्याकडूनच मोठ्याने वाचून घेत. तसंच त्या कथा - एकांकिकांमधले दोष , त्यांचं साहित्यमूल्यही सांगत.
पदवीच्या वर्गाला गेल्यावर मराठीशी संबंध सुटला. पण मराठी वाड्मय मंडळाच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचो. क्वचित स्पर्धेत भाग घेतला. आम्ही तिसर्‍या वर्षाला असताना म.वा. मं चं प्रमुखपद जोग सरांकडून बाईंकडे गेलं आणि आमच्या बॅचच्या सहासात जणांबरोबर ही मवामंचा सभासद झालो. शलाका या वाड्मयीन भित्तीपत्रकाचं संपादन माझ्याकडे आलं. मुलांकडून आलेलं साहित्य निवडून चांगल्या अक्षरांत लिहून घेऊन ते कागद शोकेसमध्ये लावणं एवढं काम. पण मी त्या वर्षी संपादकीय लिहायला सुरुवात केली. प्रसंगानुरूप लेखनही केलं. कवयित्री महादेवी वर्मा गेल्या तेव्हा त्यांच्या एका कवितेचा मराठीत अनुवाद करून त्यांना शलाका'त श्रद्धांजली वाहिलेली आठवते.
मवामंतर्फे दर शनिवारी चर्चांचा अनौपचारिक कार्यक्रम शनिवार गप्पा म्हणून चाले. त्यात विषय निवडण्यापासून काही वेळा चर्चेला सुरुवात करून देण्याचं काम मवामंचे सदस्य वाटून घेत. त्या वर्षी प्राध्यापका महिनाभर संपावर गेले होते आणि शनिवार गप्पांची सुरुवात याच विषयाने झाली. मराठीखेरीज इतर विषयाचे प्राध्यापकी त्यात सहभागी झाले होते. रूपकुंवर सती प्रकरण, दूरदर्शनवर तेव्हा लोकप्रिय झालेल्या पौराणिक मालिका हेही विषय होते. (तेव्हाही आम्ही शिंग फुटलेली पोरं भक्तिभाव बाजूला ठेवून मालिकांची पिसं काढत होतो).
बाईंनी त्या वर्षी नवे उपक्रमही सुरू आले. मुलांची उत्स्फूर्त सृजनशील लेखनस्पर्धा घेतली. ही स्पर्धा गटांमध्ये होती. समस्यापूर्ती, विडंबन, जाहिरात लेखन , शब्दांची मजेशीर उत्पत्ती /फोड , गटातल्या पाच जणांनी एकेक वाक्य सांगून दहा वाक्यांत कथा पूर्ण करणे ( तेव्हा त्याला STY म्हणतात हे माहीत नव्हते). असे प्रकार त्यात होते. स्पर्धेनंतर बाईंनी परीक्षक म्हणून बोलावलेल्या कवयित्री पद्मिनी बिनीवालेंशी ओळख करून माझ्या कवितालेखनाबद्दल सांगितलं आणि त्यावर काय बोलायचं हे अजिबात कळलं नव्हतं हे लक्षात आहे.
तर अशा प्रकारे बाई आमचं मराठी, साहित्याबद्दलची ओढच नव्हे तर कार्यक्रम आयोजित करणं , आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं (प्रा. कवी शंकर वैद्यांचं कॉलेजच्या फाटकाशी स्वागत करून त्यांना प्राचार्यांच्या कक्षात नेऊन बसवायची जबाबदारी एकदा मला मिळाली, कारण ते कसे दिसतात हे (टीव्हीवर पाहून) फक्त मलाच माहीत होतं.) अशी कामं देऊन त्या आमच्यात आयोजकत्वाची कौशल्यंही विकसित करत होत्या.
त्यांच्या पहिल्या पुस्तकाला त्या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचं लेखकाच्या प्रथम पुस्तकाला असलेलं पारितोषिक जाहीर झालं.

बाईंनी ऋचा या अनियतकालिकाचा हायकू विशेषांक मला वाचायला दिला आणि तिथून मलाही कविता लिहाव्याशा वाटू लागल्या. सुरुवात हायकूंनीच झाली. माझ्या कवितांची वही मी त्यांना वाचायला दिली. त्यांनी ती वाचलीच , इतर प्राध्यापकांनाही वाचायला दिली . अगदी मॅथ्सच्या खडूस , सदागंभीर प्रोफेसर मॅडमनीही मी तुझ्या कविता वाचल्या , चांगलं लिहितोस, असं सांगितलं तेव्हा सुखद धक्का बसला होता.
mrunalini_0001.jpg

प्रा जोगही आकाशवाणीवर पुस्तक परीक्षण करायचे. त्यांनीही माझ्या कवितांचं कौतुक केलं. शुद्धलेखन . शब्दार्थ , व्याकरणाचे नियम यांवरून कीस काढायची माझी सवय तेव्हापासून. तर जोग सरांनी एकदा माझ्या श्रमध्ये आणखी एक रफार असतो हे मला दाखवलं होतं.
आम्ही कॉलेज संपवून बाहेर पडलो आणि दोन वर्षांनी जोगळेकर बाई निवृत्त झाल्या. त्या कार्यक्रमाला ऑफिसातून सुटी घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांचा पत्ता लिहून घेतला. त्यांना पाठवलेल्या दिवाळी शुभेच्छापत्राला त्या उत्तर पाठवीत. त्यात "तुम्ही विद्यार्थ्यांनी आम्हांलाच किती काय काय दिलं आहे!" असं वाक्य होतं.
दीक्षित सर , जोगळेकर मॅडम, जोग सर हे तिघेही आज हयात नाहीत. या लेखाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल लिहिता आलं .

मायबोलीवर आल्यावर इथल्या उपक्रमांसाठी मी पडद्यामागे जाऊन क्वचित काही केलं असेल. पण हितगुज दिवाळी अंकासाठी एके वर्षी भीत भीत मुद्रितशोधनासाठी नाव दिलं. त्यात मजा आल्यावर आणखीही एक वर्षं हे काम केलं . तिथे चिनूक्स यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं. आम्ही, तुम्ही यांच्या सामान्यरूपावर अनुस्वार असतो हे तोवर मला माहीत नव्हतं.
कवितेचा अर्थ, तिचं सौंदर्य कवितेइतक्याच सुंदर शब्दांत उलगडायची स्वाती आंबोळेंची कला शिकता आली तर हवी आहे.

आठवणींत गुंतल्याने लेख खूपच मोठा झालाय. पण आता काटछाट करत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख अजीबात मोठा नाहीये.
उलट तुम्ही अजूनही लिहायला हवे होते असे वाटायला लावणारा आहे.
आवडला हेवेसांनल

लेख अजीबात मोठा नाहीये.
उलट तुम्ही अजूनही लिहायला हवे होते असे वाटायला लावणारा आहे.
आवडला हेवेसांनल+१

छान आहे लेख आणी तुमच्या आठवणी देखील. काटछाट करायची गरज नाही, उलट असे अनूभव लिहीत जा. दै जीवनातल्या पळापळीत अशा निवांत आठवणी थकवा घालवुन टाकतात.

सुंदर लेख.
तुमचं असं स्वानुभव लेखन वाचलेलं जास्त आठवण नाही. कविता जमल्यास टाका इथे.

राजकीय धाग्यावर एकदम आवेशात असणारे भरतजी मराठी विषयक लेखनात वेगळेच भासतात . मात्र दोन्हीकडे विषयावर पकड पक्की आहे हे दिसतं Happy
खरंतर अजून विस्ताराने लिहायला हवं होतं. असे स्मरणरंजक लेख वाचायला आवडतात. कारण त्यात नुसत्या घटना नसून काही रोचक किस्से असतात जे त्या काळच यथार्थ चित्रण करतात

तर अजून लिहा.

छान लेख आहे. डहाणूकरला कॉमर्स साईडला पण मराठीसाठी इतका वाव दिला गेला , उपक्रम होत असत म्हणजे ग्रेटच होते शिक्षक. अन्यथा सायन्स कॉमर्सला भाषा विषयाला काही महत्व रहात नाही.

राजकारणापासून वेळ काढून असं ललित जास्त लिहीत जा , वाचायला आवडेल. Happy

मस्त लिहिलंय. Happy
>>> आमचे वर्गशिक्षक आणि मराठीही शिकवत. पुढे त्यांचा विषय शारीरिक शिक्षण हा होता, असं कळलं.
हे वाचून एकदम हसू आलं - तुम्ही बहुधा सहजच नोंदवलं आहात. Happy

कविता गुलदस्त्यात का ठेवल्या आहेत?
त्या लवकरात लवकर प्रकाशित करणेचे करावे. हुकुमावरून!

अवांतर :
मला 'सुंदर माझं घर' म्हटलं की सुहासिनी मुळगावंकरच आठवतात. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी होत्या त्या.

मस्त लेख हा ही !!

राजकारणापासून वेळ काढून असं ललित जास्त लिहीत जा , वाचायला आवडेल.  >>>>> अनुमोदन Happy

छान लेख. मला आमच्या बी एम सी सी ची आठवण आली. कॉमर्स कॉलेज असून सुद्धा आमचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे ह्यांनी मराठीसाठी वादसंवाद मंडळ स्थापन केले होते, ज्यात काय चांगले मराठी वाचले ह्यावर चर्चा होत असे. मजा येत असे. सगळे आठवले ह्या सुंदर आठवणी वाचून.

वाह, फार सुरेख ओघवतं लेखन. अजून सविस्तर वाचायला आवडलं असतं.

आपल्या कविता पण येऊद्या >>> अगदी अगदी.