तुम मुझे यूं भूला ना पाओगे

Submitted by शांत प्राणी on 3 March, 2022 - 00:16

(हा लेख मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिवाचन या उपक्रमासाठी दिलेल्या प्रवेशिकेसाठी आहे. या आधी या विषयावर लिहीण्याचे अनेकदा ठरवले होते. पण ते पूर्णत्वास गेले नाही. मायबोलीवर टाईप करून पोस्ट करताना ओळी तुटतात, अक्षरे तुटतात. नंतर एडीट करताना पुन्हा अंदाज येत नाही. कृपया या त्रुटींबाबत सहकार्य करावे ही विनंती. )

पुणे रेल्वे स्टेशन परीसरातल्या आमीर हॉटेलच्या हॉलमधे एक भव्य स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेसाठी अन्नु कपूर आले असताना त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट घेण्याचा योग आला होता. स्पर्धेत मी भाग घेतला होता. अन्नुजी परीक्षक होते. स्पर्धेनंतर त्यांच्याशी चांगली मैत्री जमली. अन्नु कपूर खूप गप्पिष्ट आहेत. त्यांच्या पोतडीत एक से एक किस्से असतात आणि सांगण्याची विलक्षण कला त्यांच्याकडे होती. क्वीन्स गार्डन परीसरात त्या वेळी आमचा घरचा व्यवसाय होता. तिथे चित्रपटसृष्टीतले एक व्यक्तिमत्व रहात असत. त्यांच्याबद्दल अन्नुजींना सांगितले. अन्नुजींनी मला त्यांच्याकडचा एक किस्सा (जो त्या वेळी टाईपरायटर टाईप केला होता) वाचायला दिला. तो जसाच्या तसा देतोय. नुकताच हा किस्सा त्यांनी एका रेडीवरच्या कार्यक्रमात ऐकवल्याने आठवण झाली.

***

सतत आजारी असणार्‍या आपल्या आईकडे पाहून पाचवीत जाणार्‍या त्या छोट्या , हुषार आणि चुणचुणीत मुलाने आईला आराम मिळावा म्हणून स्वतः काम करण्याचे ठरवले. लहान मुलांकडून काम करवून घेणार्‍या एका कारखान्यात त्याच्या मित्राने त्याच्याबद्दल सांगितले होते. आज त्याने आपल्या अम्मीकडे पाहिले. औषधोपचारांनाही पैसे नव्हते. तिला बरं करून घराची जबाबदारी उचलली पाहीजे म्हणून त्याने शाळेचे दप्तर ठेवून दिले आणि तो कामाला निघाला. या कामाचे त्याला तीन रूपये मिळणार होते. त्या तीन रूपयांसाठी त्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच्या खांद्यावर हात पडला. आई होती. कशीबशी उठून ती त्याच्या मागे आली होती.
तिला कशी कोण जाणे पण भनक लागली होती.
" स्कूल छोडना चाहता है ? काम करना चाहता है ? किसलिए ?? "
" आम्मी, अगर मै काम पर नही गया तो आपको जाना पडेगा. आप बीमार रहती हो. मै आपको खोना नही चाहता अम्मा "
" लेकीन बेटा, काम करके कितने पैसे कमाएगा तू ?"
" तीन रूपये "
" बेटा , आज अगर स्कूल छोडकर तूने तीन रूपये कमाए, तो जिंदगी भर तेरी औकात तीन रूपए की ही रहेगी. फिर कभी भी इस हालात से बाहर नही आ सकेगा तू. आज तू काम कर रहा है. कल तेरा बेटा उसके अम्मी के लिए काम करेगा. ये कभी खत्न नही होगा बेटा. इसलिए तू पढ. सिर्फ पढनेसेही तू इस सिलसिले को रोक सकता है मेरे लाल. जो काम करना है, मै करुंगी. तू बस पढाई कर. तुझे मेरी कसम है ! "

त्या छोट्या मुलाला आपल्या अम्मीचे म्हणणे पटले.
त्यानंतर त्याने कधीही शाळा बुडवली नाही. तो मिळेल ती पुस्तके वाचत गेला. इतकं वाचत गेला कि कॉलेजला पोहोचेपर्यंत त्याने हिंदी, उर्दू मधले अनेक साहीत्यिक वाचले होते. पुढे कॉलेजला त्याचे गुण हेरून शिक्षकांनी त्याला वाचनालयातून उत्तमोत्तम पुस्तके वाचायला दिली. युसूफ कॉलेजमधून इंजिनियरिंगची पदवी घेऊन त्याने नंतर पदव्युत्तरचा अभ्यास चालू ठेवला. पण साहीत्याकडे त्याची ओढ कायम होती. दरम्यान त्याला एम एस साबू स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे अध्यापक म्हणून नोकरी लागली. आता तीन रूपयांपेक्षा त्याची औकात खूप वाढली होती. परिस्थितीचे दुष्टचक्र त्याने तोडले होते. मात्र वाचनाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचे वाचन चालूच होते. आता त्याला नाटक, सिनेमा याचीही गोडी लागली.

तो लिहीत होता. कॉलेजसाठी त्याने लिहीलेल्या एकांकिका, नाटकांना पुरस्कार मिळाले. त्याची किर्ती होऊ लागली. हळू हळू तो नाटकं लिहू लागला. ताश के पत्ते या स्वतः लिहीलेल्या नाटकात तो अभिनय देखील करायचा. एक दिवस त्याचा प्रयोग पहायला सुप्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल आणि विनोदी अभिनेते सलील आगा आले होते. एक प्रसिद्ध निर्मातेही त्या शो ला होते. त्या मुलाचे लिखाण आणि अभिनय यामुळे ते खूपच प्रभावित झाले.
त्या तिघांनीही त्या मुलाला विचारले " फिल्मों मे क्युं नही आते ?"

त्या मुलालाही आवड होतीच. त्यांनी त्याची गाठ प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी घालून दिली. दिलीपकुमार त्या वेळी पुनरागमन करत होते. या मुलाची नाटकं वाचून ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी त्याला आपल्या आगामी सगिना आणि बैराग या चित्रपटात काम मिळवून दिले. त्यानंतर त्या मुलाने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक चित्रपट लिहीले, संवाद लिहीले. विनोदी आणि खलनायकी भूमिका केल्या.

त्या मुलाचे नाव होते कादर खान !!
*********

हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. ते (कादर खान) कोरेगाव पार्कला रहायचे. आम्हाला त्यांच्याबद्दल इतकी माहिती नव्हती. फारशी ओळख पण नव्हती. भाऊ दुकानात बसायचा त्या वेळी मी कॉलेजवरून यायचो. कधी कधी ते भावाशी गप्पा मारत असायचे.

अन्नुजी हसले म्हणाले " क्या कभी उन्होंने एक सिंगर कि कहानी सुनाई आप को ?"
मी म्हणालो " इतनी पहचान भी नही है. और डर भी लगता है"
अन्नुजी हसले. " अच्छे इन्सान है वह ... कभी सुन लिजीए उनकी जुबां से, मुझ से बेहतर सुनाएंगे"

आणि एक दिवस हा योग आला. अन्नुजींचा संदर्भ देऊन आम्ही कादरखान यांना तो किस्सा विचारला.
ते म्हणाले "सिंगर का ? ऐसी कोई कहानी नही मेरे पास"
मग विचार करून म्हणाले " अरे हां याद आया .अन्नु को सुनाया था. सच्ची कहानी है "
मग हा किस्सा त्यांनी ऐकवला.

*****

मुंबईच्या रस्त्यावरून एक राजबिंडा इसम रागारागाने चालला होता. केव्हढा तरी संताप होता त्याच्या चेहर्‍यावर.
स्टुडीओत एच एस रावेल हे प्रसिद्ध दिग्दर्शक त्या इसमाची वाट बघत होते. आता आलेला इसम एक संगीतकार होता.
रावेल साहेब त्या संगीतकाराला समजावून सांगत होते " तुमच्या संगीतावर चित्रपट सुपरहीट झाले आहेत. यात मला संशय नाही. पण माझे म्हणणे समजून घ्या. हा एका प्रेमकथेवरचा चित्रपट आहे. आमचा हिरो एक कोवळा विशीतला मुलगा आहे. तुम्ही म्हणता त्या गायकाचा आवाज त्याला कसा सूट होईल ?"
" का नाही होणार ?"
" त्यांचे आता वय झाले आहे. पन्नाशीच्या गायकाचा आवाज विशीतल्या मुलाला कसा देणार ?"
" मला असं वाटतं कि मला संगीत कळतं. आवाज कळतो. हा आवाज दैवी देणगी आहे. तो कधीच थकलेला वाटणार नाही. "
" आता तर त्यांच्या कारकिर्दीला पण उतरती कळा लागली आहे"
" अशा महान गायकाच्या कारकिर्दीला कधीच उतरती कळा लागत नसते. जर तुम्हाला दुसरा कुणी गायक हवा असेल तर मी हा चित्रपट सोडतो "
दिग्दर्शक रावेल चपापले.
" इतका टोकाचा निर्णय ? आपण रात्री उशिरा बोलूयात का ? मी फोन करतो तुम्हाला "
" माझा निर्णय पक्का आहे. जर या सिनेमाचं संगीत माझ्याकडून हवं असेल , माझी गाणी हवी असतील, तर माझा हट्ट पुरवावाच लागेल. नाहीतर तुम्ही दुसरा संगीतकार घेऊ शकता "
ती मिटींग खूपच वादळी ठरली होती. एस एस रावेल विचारात पडले होते

ज्याच्या वरून हे वादळ उठले होते तो पन्नाशीचा गायक महेंद्र कपूरच्या घरी बसला होता.
गेली काही वर्षे काम कमी झाले होते. गाणी मिळत होती, पण पूर्वीसारखी नाही. खास त्यांच्यासाठी गाणी बनत नव्हती. सध्याच्या लोकप्रिय गायकांना गाणे अडचणीचे वाटले की मग बोलावणे येई. रडकी गाणी म्हणायला त्यांची आठवण होई. त्यांच्यासाठी खास करून कुणी काही करत नव्हते. हिट गाणी त्यांना मिळत नव्हती. लोक म्हणत होते तो संपला आहे.
त्याच्या कानावर पडत होतं. नेहमी हसर्‍या चेहर्‍यावर अलिकडे उदासी दिसायची.
हसर्‍या चेहर्‍यामागे एक खिन्नता दडलेली असायची.
चेहर्‍यावरचं हास्य कायम असलं तरी डोळ्यातून ती खिन्नता डोकावत असे.

महेंद्र कपूर त्यांना गुरू मानत होते.
गप्पांच्या ओघात तो पन्नाशीचा गायक म्हणाला " यार महिंदे, क्या मुझमे गाना नही रहा ? क्या मै अब पहले जैसा नही गा सकता हूं ? क्या मै खत्म हो चुका हूं ?" खर्जातल्या आवाजात विषाद दाटलेला होता.
हे ऐकताच महेंद्रकपूरच्या डोळ्यात पाणी तरारले. दोन्ही हात हातात घेऊन ते हुंदके देऊ लागले. दोघेही बराच काळ मग शांत बसून होते.

अशाच परिस्थितीत आज तो गायक एका स्टुडीओच्या बाहेर उभा होता.
दारावरचा दरवान नवा होता. त्याने ओळखले नाही. नाव , गाव , काम विचारले.
तेव्हां दारातून आत दिसणार्‍या एका म्हातार्‍या , पांढर्‍या केसाच्या जुन्या संगीतकाराकडे त्याने बोट दाखवले.
"त्यांनी बोलवले आहे "

दरवान विचारून आला आणि न ओळखल्याबद्दल क्षमा मागत आत सोडले.

गायक त्या संगीतकाराजवळ जाऊन उभा राहिला. इथे हा संगीतकार त्याचा गुरू होता. जोपर्यंत गुरू बस म्हणत नाही तोपर्यंत बसायचे नाही असा दंडक असण्याचा काळ तो. ख्याली खुशाली विचारणे चालूच होते इतक्यात ज्या नवीन संगीतकाराला भेटायला हा तपस्वी संगीतकार येऊन बसला होता त्याचे काम संपले. रेकॉर्डिंग संपून त्याचा मदतनीस लगबगीने खाली आला. येताना रस्त्यात उभ्या असलेल्या गायकाशी त्याची धडकच होणार होती ती टळली.

मदतनीस नवा होता. रस्त्यात उभ्या असलेल्ञा गायकावर तो डाफरला. त्याचा अपमान केला.
हा गायक तसाच शांत होता. हास्य तसेच असले तरी त्यात विषाद दाटून आला होता. पण तो काहीही बोलला नाही.

म्हातारा संगीतकार ताडकन उठला. ज्या कामासाठी तो आला होता त्यासाठी न थांबता त्याने या गायकाला हाताला धरून बाहेर आणले. गाडीत बसवले. दोघे मरीन लाईन्सला समुद्राकाठी येऊन बसले होते.

खवळलेल्या समुद्राच्या लाटांचे तुषार अंगावर येत होते.
संगीतकार अजूनही संतापाने थरथरत होते.

" उसकी हिम्मत कैसे हुई आपसे इस तरह से बात करने की ? क्या आप को नही पहचानता वो ?"
" जाने दीजिए, होता है "
" अरे क्या होता है ? खुदा मत बनिये. आपने उसे बताना चाहिए था अप कौन हो "
" छोडिए ना, अब मेरा वख्त नही रहा साहब "
" आपका वख्त नही रहा ? ये आपने क्या कह दिया ?"
" जी, शायद अब मुझमे वह बात नही रही. शायद मेरा गाना खत्म हो गया है "
" यह बात मुझसे फिर कभी ना कहना. मै जानता हुं , आप जैसे महान गायक को किन हालातों से गुजरना पड रहा है . लेकीन मत भूलो कि आप ... मोहम्मद रफी हो. रफी होना कोई मामुली बात नही है. आपका जमाना कल भी था, आज भी है और कल भी रहेगा. आप गाना खुदा से लकर आए है, खुद भगवान ने आपकी आवाज बनायी है . वह खत्म कैसे हो सकता है ? आपने जो बात कही वह सुनके मेरा दिल रो रहा है.. मेरी बात लिख लीजिए, बस एक हित की जरूरत है, और आखरी सांस तक फिर आपका ही वख्त होगा "
रफी हसले. त्यांच्यात ऊर्जा आली.
" नौशाद साहब, संभालो अपने आपको "

त्या वेळी मोहम्मद रफींनाही माहिती नव्हतं कि ज्यांना त्यांनी गुरू मानले होते त्या नौशाद यांची भविष्यवाणी खूप लवकर खरी होणार होती.
नौशाद त्यांना रफी मॅन्शन वर सोडून गेले.

रफीसाहेब रियाज करायला बसले होते. इतक्यात सौ रफी आल्या.
" फोन है आपके लिए "
" किसका ?"
" मदन मोहन साहब का "
फोनवर मदन मोहन सांगत होते कि एच एस रावेल साहेबांनी त्यांचा हट्ट मान्य केला होता.
त्यांच्या आगामी लैला मजनू या चित्रपटात ऋषी कपूरसाठी मोहम्मद रफींचा आवाज त्यांनी मान्य केला होता.

रेकॉर्डिंगच्या दिवशी रफी नेहमीप्रमाणे वेळेत पोहोचले.
" मदनजी शुक्रिया आपका. आपकी वजह से मुझे फिरसे इज्जत मिल रही है "
" शुक्रिया तो हमे कहना चाहिए, भगवान की आवाज ने हमारे लिए गाना कबूल किया है " असे म्हणत मदनमोहन खळखळून हसले.
" जाईए रफीसाहब, माईक आपला इंतजार कर रहा है "

आणि माईक बघताच रफी साहेब सगळं विसरून तल्लीन होऊन गाऊ लागले.
लैला मजनूच्या गाण्यांनी असा इतिहास रचला की रफी हे नाव नव्या पिढीच्याही मुखी रूळले. ज्या ऋषी कपूरसाठी त्यांचा आवाज नको जोता त्या च्यासाठी पुढे रफी आवाज बनले.

अगदी पर्दा है पर्दा ते दर्दै ए दिल , दर्द्रे ए जिगरपर्यंत.
ऋषी जसा चिरतरूण राहिला, तसाच रफींचा आवाजही.

त्यांच्या अखेरच्या रेकॉर्डिंगपर्यंत रफींचं युग मग कधीच संपलं नाही. ते आजही संपलेलं नाही. उद्याही ते तसेच असेल.
जगाच्या अंतापर्यंत रफींबद्दल इतकेच म्हणावे लागेल

"तुम मुझे यूं भूला ना पाओगे , जब कभी भी सुनोगे गीत मेरे , संग संग मेरे..... !!!""

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुत खूब !

दोन्ही प्रसंग मनाला उभारी देणारे.

छान आठवणी...
किस्से डोळ्यांसमोर उभे केलेत..
तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल लेख...!

छान आहेत दोन्ही किस्से. कादर खान पुण्यात रहतात/ रहायचे हे माहित नव्हते!
रफीला एके काळी गाणी मिळणे, लोकांनी ओळखणे बंद झाले होते हे ऐकून खरंच विश्वास बसला नाही.

दोन्ही हृद्य आहेत आठवणी, दुसरी वाचताना रफीच असणार असे वाटले होते. अन्नू कपूरचा सुहाना सफर म्हणून बिग एफ एम वर शनिवारी सकाळी एक कार्यक्रम येतो त्यात असे जुने किस्से असतात, फारच मस्त आहे तो प्रोग्रॅम.. त्यात रफीच्या पडत्या काळातले किस्से सांगतो तो कधी कधी. तुम्ही लिहिले आहे साधारण त्याच धाटणीचे निवेदन असते, अशा गोष्टींचा खजिना आहे त्याच्याकडे, पूर्वी एका म्युझिक चॅनेल वर पण असा प्रोग्रॅम येई अन्नू कपूरचा. काय मखमली आवाज आहे रफीचा. कुठे किशोर कुमार आणि कुठे रफी. नशीब एकेकाचे. पडद्यावरच्या हिरोची इमेज बदलली आणि रफीची मागणी कमी झाली बहुदा.. मस्तच लेख.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हा लेख घाईत लिहीला आहे याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. संयोजक मंडळाच्या नियमाप्रमाणे लेख लिहीलेला आवश्यक असल्याने त्याची पूर्तता हे उद्दीष्ट होते. नाहीतर खूप वेळ लागतो आणि पूर्णच होत नाही हा अनुभव आहे. Proud

मोहम्मद रफी यांना ७० च्या दशकात सुरूवातीला पडत्या काळाचा सामना करावा लागला. युट्यूबवर असंख्य व्हिडीओज आहेत. महेंद्र कपूर आणि रोहन कपूर (त्यांचा मुलगा) यांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. रफींबाबत अधिकृतपणे माहिती प्रसारीत करणारे काही चॅनेल्स आहेत. तिसरी मंझिल किंवा पर्दा है पर्दा अशी गाणी म्हणणार्‍या रफींना काम मिळत नव्हते. नफरत कि दुनिया को छोडके सारखी गाणी वरच्या पट्टीत असल्याने किशोरकुमारने नकार दिल्याने त्यांच्या वाट्याला यायची. नौशाद यांचा किस्सा कादरखान यांच्यामुळेच (बहुधा) फेमस झाला आहे. आता अनेक व्हिडीओजमधे तो ऐकायला मिळतो. हा किस्सा अन्नु कपूर यांनी सांगितला असेल तर माहिती नाही.

अभिवाचन करताना बर्‍याच चुका झाल्या आहेत. त्यामुळे जर संयोजकांनी प्रकाशित केले तर अपेक्षा न ठेवता ऐकावे ही नम्र विनंती. Proud
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

छान आहेत किस्से आणि दुसरा कोण याचा अंदाज लेखाच्या शीर्षकावरून येतो आहे.. पण हि काही सस्पेन्स कथा नाही कि विरस व्हावा- त्यामुळे माहित असूनही वाचताना खूप छान वाटले...

छान

बापरे ! स्व. मोहम्मद रफी यांच्या सारख्या देव माणसाला असे दिवस आले होते याचा विश्वासच बसत नाही, आणी त्या लोकांचा पण राग आला की जे त्यांना विसरले. माणुस मस्तीच्या भरात काय करेल ते सांगता येत नाही.

कादर खान माझा आवडता चरीत्र अभिनेता. एकदम व्हर्सटाईल माणुस. कुली मधला वहिदाला पळवुन नेणारा बेरकी व्हिलन असो वा कधी सासरा तर कधी आजोबा ही भूमिका असो, कादर खान ती सहजासहजी निभावुन नेत असे. काही असो. कादर खान जर पिक्चर मध्ये असेल तर हमखास मनोरंजन. नसीब, कुली, गिरफ्तार आणी बाकी विनोदी सिनेमाची जंत्री तर विचारायलाच नको.

शांमा धन्यवाद !

छान लेख आणि किस्सेही. कादर खान पुण्यात राहायचा हे अजिबात माहीत नव्हते. जबरी होता तो.

आणि रफीबद्दल खरोखरच वाईट वाटले. ७० च्या दशकात किशोर हा फेवरिट झाला होता हे ऐकले आहे. रफीला पूर्वीसारखी गाणी मिळत नसत - आणि गाण्यांची स्टाइलही बदलल्याने ती रफीला सूट होत नसत इतपत माहीत होते. पण इतकी अवस्था होती याची अजिबात कल्पना नव्हती.

बाय द वे - वरती "जलाल आगा" म्हणायचे होते का?

नवीन प्रतिसादकांचे आभार.

@फारएण्ड बाय द वे - वरती "जलाल आगा" म्हणायचे होते का? >> सलील आगा हे जलील आगांचे वडील. आगा म्हणून मागची पिढी ज्यांना ओळखते तेच हे. जलाल आगा शोले मधला.

आगा, पडोसन मध्ये सायराबानूचे पप्पा होते की. आणी अच्छा जी मै हारी चलो या गाण्यात नाही का, आगा, मुकरी वगैरे देव आणी मधुबालाचा पाठलाग करत असतात.

सलील आगा हे जलील आगांचे वडील. आगा म्हणून मागची पिढी ज्यांना ओळखते तेच हे. जलाल आगा शोले मधला. >>> ओह म्हणजे नुसते "आगा" म्हणून ज्यांचा उल्लेख नामावलीत व्हायचा ते दिसतात. आधी मला तीच शंका आली होती म्हणून शोधले पण सलील असे नाव दिसले नाही. त्यामुळे वाटले की टायपो आहे की काय. धन्यवाद माहितीबद्दल.

छान झाला आहे लेख!!

कादर खान पुण्यात रहतात/ रहायचे हे माहित नव्हते! रफीला एके काळी गाणी मिळणे, लोकांनी ओळखणे बंद झाले होते हे ऐकून खरंच विश्वास बसला नाही. >>> +१

बापरे ! स्व. मोहम्मद रफी यांच्या सारख्या देव माणसाला असे दिवस आले होते याचा विश्वासच बसत नाही, >>>>>> खरच .
वाचूनच अंगावर सर्रकन काटा आला। आताच्या कच्चा बदाम आणि बचपण का प्यार वाल्या जमान्यातही रफी ची गाणी टिकून आहे हे खरंच दैवीच आहे

छान लिहिलं आहे शांमा. रफींचा डाऊनटाईम होता हे ऐकून होतो. पण त्याबाबतचा ठराविक किस्सा असा माहित नव्हता. या लेखामुळे कळले. रफी फार फार साधे व अगदी विनयशील असे व्यक्तीमत होते. त्यांच्याविषयी खूप वाचले आहे. त्यामुळे या लेखातला किस्सा कसा घडला असेल तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. अशा मोठ्या व विनयशील लोकांच्या आयुष्यातले डाऊनटाईम खूप काही शिकवून जातात. इतका मोठा कलाकार, त्यामानाने आपले छोटेमोठे डाऊनटाईम म्हणजे काहीच नव्हेत. असो. पण मला लैला-मजनू म्हटले कि लता मंगेशकरांचे "हुस्न हाजीर है" हे एकच गाणे आठवते. प्रचंड आवडते गाणे आहे ते. बाकी, हाती मेरे साथी मधले "नफरत कि दुनिया" रफी यांच्या शिवाय अजून कुणी गायले असते तर? अशी आज कल्पना सुद्धा करता येत नाही.

>> "बेटा , आज अगर स्कूल छोडकर तूने तीन रूपये कमाए, तो जिंदगी भर तेरी औकात तीन रूपए की ही रहेगी. फिर कभी भी इस हालात से बाहर नही आ सकेगा तू........ इसलिए तू पढ. सिर्फ पढनेसेही तू इस सिलसिले को रोक सकता है"

हे फ्रेम करून ठेवण्यासारखे आहे. कारण हे आपल्याला सुद्धा लागू पडते. रोजचे ऑफिसचे घिसेपिटे काम करून पगार मिळेल, पण आपली औकात तितकीच राहते. जे काही आपल्याकडून नवीन शिकले वा आत्मसात केले जाते केवळ तेच पुढच्या करीयरच्या दृष्टीने उपयोगी पडते.

खूप सुंदर व माहितीप्रचुर लेख. धन्यवाद शांमा.

रफींजींचे खूप किस्से आहेत. ते मक्का मदिनाला गेले होते तिथे एका मौलवीने त्यांना गाणे खुदाला मंजुर नाही सांगितले आणि तेव्हा रफीजीने गाणे सोडून दिले होते पण त्यांच्यावर कुटुंबाचा भर होता आणि पैशाची तंगी सुरू झाली म्हणून त्यांनी गाणे पुन्हा सुरू केले.