" मेनका " मार्च २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी लिहिलेली कथा निष्ठा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 2 March, 2022 - 05:43

निष्ठा

दिवसभर बोलून बोलून प्रत्यय थकून गेले होते . खर तर मुळचा त्यांचा स्वभाव काहीसा मितभाषी. आणि आता पन्नाशी ओलांडल्यावर तो अधिकच मितभाषी झाला होता. पण गेले दोन दिवस घरी आलेल्या प्रत्येक माणसाशी त्याना काही ना काही बोलावंच लागत होत. वर्तमान पत्र, टी व्ही , रेडीओ वर ती बातमी आली आणि घरी येणाऱ्या माणसांचा लोंढा वाढत गेला. समोर पडलेल्या पेपरवर त्यानि नजर टाकली. दिवसभरात ती बातमी त्यानि अनेकदा वाचली होती पण तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तो पेपर हातात घेतलाच जायचा. “ सुप्रसिद्ध लेखक आण्णा चिटणीस यांचे दु:खद निधन”. या पेपरने तर आण्णाच्या निधनानंतर खास पुरवणी काढली होती. अनेक समकालीन मान्यवरांचे लेख, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, वाचकांनी केलेलं कौतुक बरेच काही. आपल्या वडिलांचा प्रत्ययना अभिमान वाटू लागला.

दिवसभर एकाच जागी बसून त्याचे पाय अवघडले होते. समोर असणार्या पुस्तकाच्या कपाटाकडे त्याची नजर गेली. फक्त एक कपाट अण्णांच्या पुस्तकाने भरलेले होते. आणि बाकी कपाट जगभरच्या नामांकित लेखकांनी/ रात्र न दिवस किती लिहायचे आण्णा ! आपल्याला साधा मोबाईल वर मेसेज टाईप करताना कंटाळा येतो. पण आण्णाना कधी थकलेले बघितलेच नाही. समोरच टेबलवर पडलेल्या पुस्तकाकडे त्याची नजर गेली. “निष्ठा” आणांचे सर्वाधिक खपाचे पुस्तक. याच ग्रंथासाठी राज्य शासनाचा त्यांना विशेष सन्मान मिळाला होता. प्रत्ययने ते पुस्तक हातात घेतले. चारशे पानाचा तो जाडजूड ग्रंथ. ज्या पुस्तकासाठी त्यांना सन्मान मिळाला होता तो आपण चाळला सुद्धा नाही. का आपल्याला चाळावा वाटला नाही? प्रत्ययच्या मनात विचार चमकून गेला

किती तीस पस्तीस वर्षे झाली असतील या ग्रंथाला ना ? आपण अवघे दहा अकरा वर्षाचे असू त्यावेळी. घरी त्यावेळी एकच जल्लोष झाला होता. आण्णाच्या वर अभिनंदनाचा वर्षाव सुरु होता. आण्णानि लिहिलेल्या “ निष्ठा” पुस्तकाला बक्षीस मिळाले आहे व घरातील सर्व आनंदात आहेत इतकेच आपल्याला जाणवले होते. पण त्यावेळी आपल्याला अजुनी एक कोडे पडले होते. आण्णा सरकारी कार्यालयात मोठे साहेब आहेत तर इतकि मोठी पुस्तके लिहायला त्यांना वेळ कसा मिळाला ? आपल्याला शाळा करून अभ्यास करायचा कंटाळा येतो आण्णाना कसा कंटाळा येत नाही ? आणि हे निष्ठा म्हणजे काय? एका कोपऱ्यात आई उभी होती. आण्णाच्या बाबतचे कौतुक तिच्या डोळ्यात मावत नव्हते. खर तर अण्णांना जाऊन आपल्याला विचारायचे होत निष्टा म्हणजे काय ? पण धाडस होत नव्हत. मग आपण आईला विचारल “ आई, निष्ठा म्हणजे काय?” आई आणि तिच्या शेजारी असणार्या बायका हसू लागल्या. आई हसतच म्हाणाली “ मी कस सांगू तुला? निष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा. आपण जे करतो त्याच्याशी प्रामाणिक राहण” आपल्याला फारस काही कळाल नव्हत. आईने मग आपल्यला समजावलं “ सध्या तू इतकच लक्षात ठेव. निष्ठा म्हणजे अभ्यास करण. चांगले मार्क्स पाडण आणि नेहमी खर बोलण”
त्या रात्री आपण बराच वेळ जागे होतो. डोळ्यसमोर दिवसभर घरात आलेली माणसे डोळ्यासमोर दिसत होती. आई म्हणते निष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा. पण मग त्या दिवशी आण्णा त्या माणसाशी ... तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून जात नव्हता .. आपल्या वडिलांचं काहीतरी चुकत आहे अस जाणवत होत.
तो माणूस आण्णाच्या पुढे हात जोडून उभा होता. “ साहेब, माझ्या मुलाच्या नोकरीच काम करा. हुशार आहे तो. तुमच्या शिफारशी शिवाय सगळ आडून बसल आहे?” तो रडवेला झाला होता.
“ हे माहित आहे ना तुला? मग मला पन्नास हजार रुपये दे. मी काम करतो” आण्णा दरडावणीच्या स्वरात म्हणाले.
“ मी गरीब माणूस. मुलाला काबाडकष्ट करून इतपर्यंत आणंल. कुठून आणू पन्नास हजार रुपये?” तो गरीब गयावया करत होता आणि आण्णा कठोरपणे त्याला उत्तर देत होते. आई तर म्हणाली खरे वागणे, चांगले वागणे म्हणजे निष्ठा. मग आण्णा त्या माणसाशी अस का वागले?ते पैसे का मागत होते? तो माणूस रडत का होता? आण्णा त्याला रागावत का होते?
तीस वर्षापूर्वीचा काळ प्रत्ययच्या डोळ्यासमोरून जात होता. त्या गरीब मुलाच पुढ काय झाल कुणास ठाऊक? पण आण्णा त्या गरीबाशी प्रामाणिकपणे वागले का ?
प्रत्यय अस्वस्थ झाले. हातात घेतलेल्या निष्ठा पुस्तकाची पाने ते पुन्हा चाळू लागले. टेबलवर हार घातलेला आण्णाचा फोटो आणि त्याच शेजारी आईचा फोटो. दोन वर्षापूर्वीच आई वारली. सुटली बिचारी! सुटली? असा विचार का आपल्या मनात आला? आईला तर मृत्यू समयी काहीच त्रास झाला नाही? तरीही सुटली? सुटलीच नाही तर काय? आपण आण्णाना घाबरायचो तस आईपण घाबरत असेल का? होतीच घाबरत. कधी त्या दोघांना आपण एकत्र बोललेलं बघितलच नाही? आण्णा मोठे लेखक होते हि गोष्ट खरी आहे म्हणून बायकोशी बोलायचे नाही ? आणि इतर गोष्टी चालतात ते .. मनात आलेल्या विचारानेच प्रत्यय दचकले. आपल्या मनात कुठे हा विचार येता कामा नये. चुकून कुठेतरी आपण बोलायचो आणि आण्णाच्या प्रतिष्ठेला धक्का बसायचा. पण तरीही त्या दिवशीचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता...

आपले कॉलेजचे शिक्षण संपले होते. सर्विसचा प्रयन्त सुरु होता. दिवसभर कुठे ना कुठे इंटरव्ह्यू द्यायचे, बँकांच्या परीक्षेचा अभ्यास करायचा असा दिनक्रम ठरलेला असे. त्या दिवशी संध्याकाळी आपण असेच बाहेरून आलो होतो. आई देवापुढे करुणाष्टक म्हणत होती. आईचा आवाज आपल्याला आवडायचा. करूण .. भावस्पर्शी. आईला खर तर कोणतेच दु:ख नव्हते. आण्णाच्या सारखा प्रसिद्ध नवरा ... आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होती .. आणि आपल्याला चांगली नोकरी लागली असती. तरी आई मात्र मला बऱ्याचदा दीनवाणी का वाटायची. त्या दिवशी करुणाष्टक म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी येत होते. ती सारखे डोळे पुसत होती. मी खोलीच्या बाहेर उभा होतो हे कदाचित तिला माहित नसावे. करुणाष्टक संपले आणि ती शांतपणे डोळे मिटून बसली. मी आईला विचारले,
“ आई, का रडते आहेस? “ आई रडते आहे बघून आपलाही आवाज रडवेला झाला होता.
“ काही नाही रे. असच डोळ्यात पाणी आल”
“ आण्णा, दोन दिवस बाहेर गेलेत. तुला त्यांची काळजी वाटते का?”
“ नाही रे.” अस म्हणत असताना तिचा आवाज गद्गदला होता. आईला काहीतरी करून आपल्याला बोलते करायचे होते. आपण दरडावणीच्या स्वरात तिला म्हणालो,
“ आई खर सांग.” आपण आईला वारंवार विचारात होतो. आईच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही.
रात्री घरातील स्रर्व दिवे शांत झाले होते. दुसऱ्या दिवशी आपल्याला इंटरव्ह्यूला बोलावले होते. त्याचा विचार करत झोप लागत होती. पण रात्री आई आण्णांच्या खोलीतून मला बोलण्याचा आवाज येत होता म्हणून जाग आली. आण्णांचा आवाज नेहमी प्रमाणे कठोर. आणि आईचा आवाज करूण, गदगदलेला. आपण त्यांच्या खोलीच्या दिशेने गेलो होतो. दार बंद नव्हते. थोडेसे किलकिले होते. त्यांचे बोलणे आपल्याला ऐकू येत होते.
“ हे तुमचे किती दिवस चालणार आहे? कामा निमित्त बाहेर जातो म्हणायचं आणि तिच्या कडे जाऊन राहायचे. रात्री दारू पिऊन घरी यायचं? प्रत्यय मोठा होत चालला आहे हे कळत तुम्हाला? त्याचे सगळीकडे लक्ष असत” आई रडत होती.
“ बंद कर तुझ थोबाड. बंद कर. तुझ्या त्या नालायक पोराची धमकी मला देऊ नकोस? कुणाच्या बापाला मी घाबरत नाही हे माहित आहे तुला? काही झाल तरी नलूला मी सोडणार नाही”
“ तीच नाव काढू नका माझ्याजवळ. आपला प्रपंच उध्वस्त केला त्या बयेन”
“ आपला प्रपंच?” आण्णा जोरात हसले. हा प्रपंच माझा कधीच नव्हता. कधीही. तुझ्या बरोबर कधीच सुखी नव्हतो. मी फक्त सुखी आहे ते नलू बरोबर. फक्त नलू. नलू हे माझ प्रेरणा स्थान आहे. मी जो मोठा लेखक झालो ते तिच्या मुळे. तू काय दिलस मला. बघेल तेव्हा रडक तोंड करून देवाच म्हणत बसलेली असतेस. शी: तू आणि तुझ दळभद्री कार्ट” आपल नाव निघाल्यावर आई चिडली होती.
“ त्यान काय केल? त्याचा का इतका राग करताय.? इतका गुणी मुलगा.पण कधी एक शब्द बोललात त्याच्याशी आज पर्यत ? “
“ मला नको होत तुझ्याकडून मुल. तरी तू त्याला जन्म दिलास. त्याला वाढवलस. त्याला पाडून टाक म्हणून सांगितल होत तुला. तू ऐकल नाहीस?”
“ वा रे वा. सगळ्या जगाला तत्त्वज्ञान शिकवणारे तुम्ही. बायकोशी मुलाशी कसे संबध ठेवलेत बघा. लेखक म्हणे लेखक” आईला फारशी कधी चिडलेली बघितली नव्हती. पण आपल्याला कधी कुणी काही बोलल तर तिला आवडायचं नाही. त्या दिवशी आई आण्णाशी असच चिडून बोलली.
लेखक म्हणे लेखक असा अण्णांचा उद्धार केल्यावर आण्णा रागाने वेडेपिसे झाले. आणि “काय म्हणालीस? काय म्हणालीस? अस म्हणत ते रागान बेभान झाले आणि काय होतंय हे कळायच्या आत त्यांनी आईच्या गालावर दोन थोबाडीत मारल्या.

ते दृश्य आजही प्रत्ययना आहे तस आठवत होत. त्याच्या न कळत त्यांच्या हाताच्या मुठी आवळल्या. आपला बाप जगाला निष्ठेचे धडे देत होता, बक्षिसे मिळवत होता आणि प्रत्यक्षात मात्र आपल्या घरात कसे वागत होता? मग आपण प्रामाणिक राहून सगळ हे जगाला सांगाव का? आणांचे खरे रूप जगापुढे उघडे करू या का? नाही हे केलंच पाहिजे. हे केलंच पाहिजे. उद्या आपली मुलाखत घेण्यासाठी लोक येणार आहेत. बोलू या आपण. पण आई जर असती तर तिने हे सांगितले असते? सांगू दिले असते? कोणते तरी एक पारितोषक आण्णाना मिळाले होते तेव्हा एका मुलाखतीत आईने सांगितलेले त्यांना आठवले. आईला प्रश्न विचारला होता “ लेखक सोडून आण्णा घरी कसे होते? घरच्या लोकांना ते वेळ कसा देत असत? एका मोठ्या लेखकाची पत्नी म्हणून तुम्हाला कस वाटत?”
“ मला अभिमान आहे त्यांचा. त्यांनी आयुष्यभर साहित्य सेवा केली. त्यांचे ध्येय आहे साहित्याच्या द्वारे समाज प्रबोधन. साहित्य हि त्यांची जीवन निष्ठा आहे. आणि जी निष्ठा त्यांनी साहित्याशी ठेवली होती तीच त्यांनी आपल्या कुटुंबाशी” आईचे हे उत्तर आपल्याला आवडले नव्हते. आईने आपल्याला सांगितले होते “ ते घरी कसेही असोत. लोक त्यांचा आदर करतात. लोकांच्या निष्ठेला तडा जाईल असे मी का काही बोलावे?”

दुसरे दिवशी पत्रकार आले. प्रत्ययच्या मनात विचारांचे वादळ होते. एकीकडे आपल्या वडिलांचा मुखवटा फाडून समाजाला दाखवावा असे त्यांना वाटत होते आणि दुसरीकडे आईचा फोटो दिसत होता. पत्रकारांच्या प्रश्नाने ते भानावर आले.
“ वडील म्हणून आण्णा कसे होते?” पत्रकारांनी प्रश्न विचारला. आणि प्रत्यय म्हणाले “ ते फक्त माझे वडील नव्हते. आपल्या पुस्तकांच्या रूपाने ते सर्वांच पालकत्व करत आहेत. समाज प्रबोधन करत आहेत. माझ्या वडिलांचा मला अभिमान वाटतो.”
आपल्या वडिलांना जो समाज आदर्श मानतो त्या आदर्शाचे असे वाभाडे काढून लोकांच्या श्रद्धा स्थानाला का धक्का द्यायचा? आणांच्या पुस्तकाने समाज सुधारत असेल तर त्यात आण्णा गेल्यावर मी कशाला पडायचं? प्रत्ययनि उत्तर दिल आणि स्वत:च्या न कळत त्यांनी आपल्या आईच्या फोटोकडे बघितले.
रात्रीची निरव शांतता. डोळ्यासमोर आण्णा आणि आईचा फोटो. वडिलांचा जयजयकार ....समाज प्रबोधन.. लोकांचे दैवत ... आईची करुणाष्टक..... प्रत्ययच्या डोळ्यासमोर सगळ येत होत. सर्व जग निद्रिस्त झाल होत पण रात्रीचा अंधार पांघरून प्रत्यय मात्र जागेच होते.

सतीश कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मार्च २०२२ म्हणजे आताच्याच अंकात प्रकाशित झाली आहे ना कथा? मग ती इतक्या लगेच ऑनलाइन प्रकाशित करायला नको होती. तसा नियम आहे का नाही, माहीत नाही. पण संकेत मात्र आहे. अनेक लेखक पाळताना दिसतात.

सुरेख कथा आहे.
>>>>>आईने आपल्याला सांगितले होते “ ते घरी कसेही असोत. लोक त्यांचा आदर करतात. लोकांच्या निष्ठेला तडा जाईल असे मी का काही बोलावे?”
_/\_ लोकांना अज्ञानातच सुखी राहू द्यावे. आणि तसेही लोकांना उदोउदो करायचा असतो, रडगाणी कोणालाच आवडत नाहीत.

छान कथा.
लोकांना अज्ञानातच सुखी राहू द्यावे. आणि तसेही लोकांना उदोउदो करायचा असतो, रडगाणी कोणालाच आवडत नाहीत.>>+१००