*जाणता राजा* भारता बाहेरचा पहिला प्रयोग

Submitted by उदय विरकुड on 1 March, 2022 - 23:47
Janata rajaa

१९९७ BMM अधिवेशनाची अजून एक खासियत होती. ती म्हणजे, जाणता राजा. लता दिदी संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या होत्याच, आणि त्याबरोबर बाबासाहेब पुरंदरे, माननीय अतिथी म्हणून येणार होते व ‘जाणता राजा’ सादर करणार होते. ह्या लेखात मी ह्या भव्य नाट्याचा, भारताबाहेरचा पहिला प्रयोग कसा जमून आला ह्याची आठवण सांगतो. आम्हा बॉस्टनवासियांच्या दृष्टीने ती आठवण खुपच अविस्मरणीय आहे, कारण, त्यामुळे आम्हाला बाबासाहेब पुरंदऱ्यांचा महिनाभर सहवास लाभला.

अधिवेशनाच्या कार्यकारण मंडळांनी, बाबासाहेबांशी संपर्क साधून, जाणता राजाचा प्रयोग अधिवेशनात करण्याचा प्राथमिक विचार, साधारण १९९६ च्या अखेरीस मांडला. माझ्याकडे सर्व कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. मी भारतात सुट्टी घेऊन अधिवेशनाच्या कामाकरता आलो. माझी बाबासाहेबांबरोबर पहिली भेट २० डिसेंबर १९९६ ला कल्याणला झाली. ते तिथे कार्यक्रमासाठी आले होते. मी लोकलने कल्याणला पोहचलो. रिक्शातून कार्यालय गाठलं. सकाळी अकराची वेळ ठरली होती. एका प्रशस्त खाजगी पटांगणात बैठक मांडली होती. समोर डोंगर व घनदाट जंगल. छान ऊन पडलं होत व मंद वारा वाहत होता.

बाबासाहेबांबरोबर त्यांचे personal assistant प्रतापराव होते. बाबासाहेब मी येताच म्हणाले, “या उदयराव, या बसा”. त्यांची, ती सगळ्यांना, नावापुढे राव व राजे लावण्याची लकब तुम्हाला थेट शिवकालातच नेते. त्यांच्या प्रतिभाशील व्यक्तिमत्वाने व लोभस बोलण्याने मी पहिल्या भेटीतच भारावून गेलो होतो.

चहा आला. चर्चा सुरू झाली. बाबासाहेब म्हणाले, “आम्हाला आनंद आहे की आपणांस ‘जाणता राजा’ चा प्रयोग बॉस्टन अधिवेशनात करायचा आहे. आणि ह्या अधिवेशनाचे मुख्य विषयसूत्र, शिवाजी महाराज असल्यामुळे हा प्रयोग तेथे घडवून आणणे योग्यही आहे”. मग थोडे थांबले, मिश्किल हसले, व पुढे म्हणाले, “आणि हे सगळं तुमच्या budget मधे ही बसवायचं आहे”. पण मग लगेच त्यांच्या डोळ्यात एक चमक आली, व ते निर्धाराने म्हणाले “उदयराव, आपण नक्की करायचं. महाराजांची कीर्ति भारताबाहेर नेण्यास आम्हालाही आवडेल”.

मग ठरलं, व आम्ही प्रयोगाचा बारकाईने विचार करायला सुरवात केली. खर सांगायचं तर, मी जाणता राजाचा प्रयोग, यापूर्वी पाहिला नव्हता, पण त्याची भव्यता मात्र ऐकली होती. बाबासाहेब निर्धाराने प्रयोगाची आव्हाने सांगत गेले, व त्याच्यावर तोडगेही सुचवत गेले. आणि मला तेव्हां जाणवलं की हा किती मोठ्या निर्मितीचा विडा बॉस्टनने उचलला आहे.
(बाबासाहेब आणि प्रतापराव यांच्यासोबत लेखक)
uday-virkud-babasaheb-purandare.jpg

बाबासाहेब, माझ्याकडे बघून, पण आपल्याशीच बोलल्यासारखे बोलत होते व प्रतापरावराव त्याची नोंद करत होते. “जाणता राजा चा प्रयोग आपण मैदानात करतो, तो आता आपल्याला ४० फुट बाय ३० फुटी स्टेजवर करायचा आहे.” ह्या शिवभक्ताचा निर्धार, मी अवाक होऊन ऐकत होतो. पुढे म्हणाले, “प्रतापराव, आपल्याला हत्ती घोडे तर आणता येणार नाहीत, म्हणजे आपल्याला देखाव्यांत काही बदल करायला लागतील. त्यासाठी music अन् script मधे बदल करावा लागेल. ते सगळं पुन्हा record करायला हवं.”

पण पात्रांचं काय? आमच्या budget मधे त्यांचे १५-२० मुख्य कलाकार व तंत्रज्ञ बसत होते. पण जाणता राजाच्या प्रयोगात ५० ते १०० सहकलाकार असतात. महाराजांचा जन्म सोहळा, युद्ध, राज्याभिषेक, इत्यादी प्रसंगांची भव्यता जिवंत करण्यासाठी ५० एक मंडळींची आवश्यकता होती. माझ्याकडे बघून आदेशार्थी म्हणाले, “उदयराव, ही जबाबदारी तुमची. बॉस्टनचे पन्नास एक कलाकार जमवाल”? मी थोडंस घाबरत, होकारार्थी नुसती मान डोलावली. मग पुढे तेच म्हणाले, “तुम्ही चिंता करू नका. मी व प्रतापराव पंधरा वीस दिवस आधी येऊ व बॉस्टनच्या कलाकारांची जय्यत तयारी करून घेऊ. काही पोशाख व साहित्य आम्ही घेऊन येऊ, काही गोष्टींची जमवाजमव तुम्हाला करावी लागेल. त्याची यादी पाठवून देऊ.” मग थोडा वेळ थांबून म्हणाले, “आपल्याला, स्टेजवर तीन मजली ऊंच किल्ल्याचा देखावा करायचा आहे. आणि मध्यभागी १० फुट ऊंच भवानी माता”. एक तासभर प्रयोगास लागणाऱ्या गोष्टी समजावून सांगत होते. मी व प्रतापराव ते टिपून घेत होतो. त्यांच्या उत्साहाने मी भारावलो. माझ्यातला मावळा जागा झाला व मीही मनातल्या मनांत, ‘हर हर महादेव’ ललकारुन त्यांच्या निर्धाराला साथ दिली. झालं, ठरलं.

‘जाणता राजा’चा भारताबाहेरचा पहिला प्रयोग, July 1997 Boston BMM अधिवेशनाच्या रंगमंचावर होणार होता. सगळी बॉस्टनची मंडळी कामाला लागली. ह्या प्रयोगाच्या सिद्धतेसाठी अनेकांचा हातभार लागला होता. सगळ्यांची नावं तर घेता येणार नाहीत, पण नक्की म्हणेन की team work मुळे हा प्रयोग बॉस्टनला शक्य झाला.

महिनाभर आधी बाबासाहेब व प्रतापराव आले. आमच्या काही मित्रांकडे त्यांचं वास्तव्य होत. रोज सायंकाळी एका community hall वर तालमी असायच्या. पन्नास ते साठ पडद्यापुढचे व मागचे कलाकार. सगळे, म्हणजे ३ महिन्याच्या बाळापासून ते ७० वर्षीय आजी आजोबांपर्यत, सगळे अगदी वेळेवर उत्साहात यायचे. त्यात इथे वाढलेली आमची मुलेही होती, अन् भारतातून काहींचे आलेले आई वडीलही होते. कोणी छोट्या शिवबाचं काम करणार होतं, तर कोणी मंत्रिमंडळात, कोणी राण्या तर कोणी सख्या तर कोणी बारश्याला आलेल्या सवाष्णी, कोणी मोगल तर कोणी अंग्रेज, व बाकी सगळे मावळे, सरदार व महाराजांचे साथीदार. कोणी costume ची जमवाजमव करी, तर कोणी स्टेजवर लागणऱ्या साहित्याची. किल्ल्याचं नेपथ्य मात्र आर्किटेक्ट कै. किशोर पाठाऱ्यांनी अप्रतिम सांभाळलं. मायबोली’चे संस्थापक, अजय गल्लेवाले, यांचा अधिवेशनातील भव्य किल्ल्याचा देखावा साकारण्यात सक्रिय सहभाग होता. सगळी मंडळी तो संपूर्ण महिना शिवकालात रमून गेली होती.

बाबासाहेबांचे वय तेव्हां पंचाहत्तरीचे. पण त्यांचा उत्साह आणि धडाडी आम्हा सगळ्यांहून अधिक. त्यांच्या वक्तशीरपणाचं कौतुक करावं तेवढं कमी. तालमीसाठी ते सगळ्यांच्या आधी हजर असायचे. रोज सायंकाळी सहा ते दहा तालीम. रंगमंचावर प्रवेश कुठून करायचा, कसं चालायचं, कसं वागायचं, प्रत्येकाची जागा, हावभाव इत्यादी सगळं त्यांनी प्रत्येक प्रवेशास साजेसं चोख बसवलं. काही गोष्टी खास शिकवल्या. मुजरा कसा करायचा, तलवार कशी धरायची, कशी चालवायची, कुर्निसात व मुजरा ह्यातला फरक, अश्या अनेक बारीक गोष्टी समजावुन सांगायचे. प्रत्येक प्रसंग rehearsal करताना तो अगदी तुमच्या समोर जिवंत करायचे. आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो होतो. बाबासाहेबांचा महिनाभर जवळचा सहवास, हे आमचं भाग्य होतंच. पण ती एक प्रकारे शिवकालात काही काळ रमण्याची नशा होती, असंही म्हणता येईल.

संमेलनाचा दिवस उजाडला. Opening ceremony ला, लता दीदींच्या भाषणानंतर, जाणता राजाचा पहिला भाग. हो, जाणता राजा बॉस्टन संमेलनात दोन भागांत होणार होता. दुसरा भाग दोन दिवसांनी closing ceremony ला. जाणता राजा सुरू करण्याआधी, बाबासाहेब आपल्या भाषणात गमतीत असे म्हणालेही, “हा जाणता राजाचा पहिला प्रयोग आहे, की ज्याचं मध्यंतर दोन दिवस लांब असणार आहे”.

पहिला भाग अगदी उच्च प्रतीचा झाला. खूप भव्य, खुपच रंगला. सगळे प्रेक्षक दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट बघायला लागले. आणि दुसरा भाग closing ceremony ला ठेवल्यामुळे कोणीही मंडळी आता लवकर संमेलन सोडून पळणार नव्हती. काहींनी तर आपली विमानाची तिकिटं बदलली, नाहीतर त्यांचा दुसरा भाग चुकला असता.

दोन दिवसांचं मध्यंतर संपलं. दुसरा भाग सुरू झाला. अधिवेशन छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचा कळस गाठून संपणार होतं. राज्याभिषेकाचा प्रवेश सुरू होता. मी विंगेत मदत करत होतो. बाबासाहेब माझ्या जवळ उभे होते, व एकामागून एक पथक महाराजांना नजराणा देण्यासाठी स्टेजवर पाठवत होते. त्यात काही जवळच्याच मुलखातले राजे होते, काही महाराजांचे सरदार, काही नवाब, तर काही फिरंग. सगळ्यात शेवटी, रयतीतले अनेक मावळे व शेतकरी, महाराजांना मुजरा करीत एकीकडुन दुसरीकडे जाणार असा देखावा. माझा चार वर्षांचा मुलगा सिद्धार्थ जवळ होता. त्याच्याकडे बघून बाबासाहेबांनी मला विचारलं, “ह्याला नेऊ का”? मी लगेच म्हणालो, “नक्की”. बाबासाहेबानी सिद्धार्थचा हात धरला, आपल्या सहाय्यकाला सांगितलं, “ह्याला पटकन् छोट्या मावळ्याचा पोशाख करा”, व स्वतः शेतकऱ्याची पगडी चढवली. हातात काठी व खांद्यावर घोंगडं. सिद्धार्थचा हात धरुन त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. महाराजांसमोर दोघे चालत गेले व दोघांनी महाराजांना मुजरा केला.

मला असं वाटलं, छोट्या मावळ्याला समोर नेण्यात, त्यांना कदाचित असं उत्स्फुर्त दाखवायचं होतं की, … ‘हे जाणत्या राजा, तू साकार केलेल्या स्वराज्याचं स्वप्न जपायला पुढच्या अनेक पिढ्या तयार आहेत’…

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात अधिवेशनाची सांगता झाली.

या अविस्मरणीय संमेलनास आता २५ वर्षे होतील. तरी ह्या आठवणी आमच्या मनात अजून खास जागा धरून आहेत.

शिवजयंतीच्या व मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, ‘जाणत्या राजा’ला, व शिवरायांवर अफाट प्रेम करणाऱ्या, शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे ह्यांना, ह्या मावळ्याचा हा मानाचा मुजरा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन _/\_
खूप छान आठवणी. जाणता राजा भारताबाहेर करणे सोपे नाही, इतकं मोठं आव्हान तुम्ही उचललं त्याबद्दल अभिनंदन.

खूप छान लिहिलंय.
जाणता राजा भारताबाहेर करणे सोपे नाही, इतकं मोठं आव्हान तुम्ही उचललं त्याबद्दल अभिनंदन.
हे नुसते वाचतांना देखील अंगावर रोमांच उभे राहिले.

≤<<<बाबासाहेबांना विनम्र अभिवादन _/\_
खूप छान आठवणी. जाणता राजा भारताबाहेर करणे सोपे नाही, इतकं मोठं आव्हान तुम्ही उचललं त्याबद्दल अभिनंदन.>>>+101

खूप छान लिहिलंय. > +१

तुमचे दोन्ही अनुभव व त्याबद्दलचे लेख (लता बद्दलचा आणि हा) जबरी आहेत. पुरंदर्‍यांचे व्याख्यान किंवा कधी अगदी मोकळेपणाने बोलल्यासारख्या गप्पा २-३ वेळा ऐकल्या आहेत. जबरदस्त अनुभव असायचा.

<<<व स्वतः शेतकऱ्याची पगडी चढवली. हातात काठी व खांद्यावर घोंगडं. सिद्धार्थचा हात धरुन त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. महाराजांसमोर दोघे चालत गेले व दोघांनी महाराजांना मुजरा केला.>>>
पाणीच आले पटकन डोळ्यात..

अप्रतिम !! खूप छान शब्दबद्ध केले आहे , तिथे उपस्थित असल्याचा फील आला .....
छोट्या मुलाला घेऊन जाण्याचा आणि त्याचा अर्थ तुम्ही उलगडून सांगितलेला खूपच भावला !

खूपच छान..
जाणता राजा आम्हीही पाहिलेय हे आमचेही भाग्यच

खूपच छान..
जाणता राजा आम्हीही पाहिलेय हे आमचेही भाग्यच

लेख वाचताना कै किशोर पाठारे यांचं नाव शोधत होतेच, कारण त्यांच्याकडून ह्याबद्दल ऐकलं होतं. आमच्याइथे जवळ रहायचे.
किल्ल्याचं नेपथ्य मात्र आर्किटेक्ट कै. किशोर पाठाऱ्यांनी अप्रतिम सांभाळलं >>
ते जाण्यापूर्वी काही महिने आधी घरात आवराआवर करत होते. तेव्हा, जाणता राजाच्या वेळचे काही नेपथ्य \ फुटकळ सामान - टॉर्चच्या मशाली, तलवार आणि अजून काय काय, आणि एक लहान पेटी \ पेटारासुद्धा त्यांनी माझ्याकडे सांभाळायला , कधी नाटकासाठी लागल्यास वापरायला आणून दिले. ते अजून गराजमध्ये आहे. कुठे कुठे आठवणी जोडलेल्या असतात....

खूप छान लिहिलंय.
जाणता राजा भारताबाहेर करणे सोपे नाही, इतकं मोठं आव्हान तुम्ही उचललं त्याबद्दल अभिनंदन.
हे नुसते वाचतांना देखील अंगावर रोमांच उभे राहिले. >>> अगदी अगदी.

ते जाण्यापूर्वी काही महिने आधी घरात आवराआवर करत होते. तेव्हा, जाणता राजाच्या वेळचे काही नेपथ्य \ फुटकळ सामान - टॉर्चच्या मशाली, तलवार आणि अजून काय काय, आणि एक लहान पेटी \ पेटारासुद्धा त्यांनी माझ्याकडे सांभाळायला , कधी नाटकासाठी लागल्यास वापरायला आणून दिले. ते अजून गराजमध्ये आहे. कुठे कुठे आठवणी जोडलेल्या असतात.... >>> टचिंग.

700DD250-585C-4132-A96A-01DA96E1F848.jpeg