जशी वयाने वाढलीस तू--( मुसलसल गझल )

Submitted by निशिकांत on 27 February, 2022 - 08:48

जन्मापूर्वी जरी जगाला नकोनकोशी जाहलीस तू
तुलाशोधाती मधाळ नजरा, जशी वयाने वाढलीस तू

दुर्गा, चंडी लाख म्हणू दे, कशास यावर भाळलीस तू?
भंपकतेच्या पिंजर्‍यात या स्वेच्छेने का अडकलीस तू?

शिव धनुष्य पेलेले तयाची मुकाट पत्नी जाहलीस तू
मनास मारुन जगावयाची प्रथा अशी का पाडलीस तू?

गरीब गाईची उपमा का तुला हिणवण्या उगाच द्यावी?
सुनिता विल्यम्स, कधी चावला बनून गगनी मिरवलीस तू

"लोक काय म्हणतील?" काळजी करावयाचा सोस केवढा!
तुला न कळले कधी रुढींच्या भोवर्‍यामधे हरवलीस तू

बलात्कारिले कुणी तिला तर, तिचीच का बदनामी व्हावी?
नाव सांगुनी नराधमाची, धिंड ना कधी काढलीस तू

सैन्यामध्ये दाखल झाल्या लढण्यासाठी अनेक महिला
जोहाराची प्रथा निरर्थक! कृतीमधूनी म्हणालीस तू

उशास स्वप्ने घेउन निजशी. कुटुंबातल्या सर्वांची पण
हक्क आपला बघावयाच्या स्वप्नांना पण विसरलीस तू

असे कसे "निशिकांत" जाहले गंधित जीवन तुझे एवढे?
तुझाच दरवळ सखे जीवनी! पूस उमलत्या पाकळीस तू

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटले.
मुसलसल म्हणजे एका विषयावर का?