कसे ओठांस टाळावे---

Submitted by जीजी on 26 February, 2022 - 06:08

कसे ओठांस टाळावे---

मला वय लागले सतरा, तिचे सरलेय सोळावे
कसे हृदयास जाळावे, कसे ओठांस टाळावे

फुलाचे वागणे असले, असे भ्रमरास छळणारे
कधी अवचित बिलगावे, कधी अलवार उमलावे

तिच्या हृदयातले अक्षर, जरी येई न ओठावर
तिच्या डोळ्यातले पुस्तक, तरी मी रोज चाळावे

तिच्या वेणीतला गजरा, किती बेभान दरवळतो
असे वाटे हृदय माझे, तिच्या केसात माळावे

किती मंजुळ मधुर असते, जगी संगीत प्रेमाचे
जसे अलगूज कान्हाचे, खुळ्या राधेस भाळावे

नको हिरवा नको भगवा, मला दे रंग प्रेमाचा
तुझ्या रंगात रंगूनी, तुझ्या रक्तात मिसळावे

मला तू कर गडे मिसरा, तुझ्या कातील गझलेचा
कधी सानीत बरसावे, कधी ऊलात उसळावे
जीजी

Group content visibility: 
Public - accessible to all site users