शालजोडीतून ज्यांना मारले
नेमके त्यांनाच नाही बोचले
लालचीने पाहुनी झुडुपातले
सोडले का आपुल्या हातातले?
बंद दाराआड का जगती असे?
वाटती शेजारचे कैदेतले
पाहता गडगंज पैसा, मग्रुरी
निश्चये असतील ते सत्तेतले
वेळ तुमच्यावर उद्या येईल ही!
का हसावे पाहुनी जात्यातले?
वर्ज्य झाले बोलणे अन् भेटणे
एकटेपण भोगतो गर्दीतले
संपला महिमा गुरूंचा तो जुना
बायजूच्या* शिक्षकांचे फावले
आड दृष्टीच्या असो सृष्टी जगी
जे दिसे खिडकीतुनी ते आपले
लागले थोडे कळायाला सखे
गूज आता ऐकतो मौनातले
आज शिकवा बालकांनाही कसे?
ओळखावे चेहरे बुरख्यातले
पाहिजे होते तसे जगलो कुठे?
शल्य हे "निशिकांत"चे जगण्यातले
* नवीन शैक्षणिक पोर्टल ज्याची जाहिरात टीव्हीवर नट शाहरुख खान करतो.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मेनका
लगावली--गालगागाX२+गालगा