मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - शब्दप्रभू गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)/ सामो

Submitted by सामो on 21 February, 2022 - 10:13

जेव्हा मराठी कविता कोणत्या सर्वाधिक आवडल्या हे आठवायला सुरुवात केली तेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मूडसच्या कविता आपल्याला आवडल्या असे लक्षात आले. माझे बालपणीचे, तरुणपणीचे दिवस समृद्ध करणार्‍या शब्दप्रभू गोविंदाग्रज यांच्या शब्दातच हा प्रवास मांडू इच्छिते. या ओळी आहेत त्यांच्या, 'विराम-चिन्हे' कवितेतील -

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!
.
आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.

लहानपणी पिंड पोसला गेलेला होता तो सुभाषिते आणि आदर्शवादी कवितांवरतीच. मग गोविंदग्रजांची, 'मोगऱ्याचा हार' घ्या किंवा 'केवढे हे क्रौर्य' ही ना वा टिळकांची करुणरसाने ओथंबलेली कविता घ्या. बालकविंनी तर लहानपण इतके रम्य बनवुन टाकले होते. 'ती फुलराणी', 'औदुंबर', 'आनंदी आनंद गडे' , 'संध्यारजनी' या निसर्गकवितांनी भारुन टाकण्याचे ते दिवस होते. बालसूर्याच्या नारिंगी सौम्य रंगांसारखे तेजाळ दिवस होते लहानपण. गोविंदाग्रजांच्या 'हुकमे हुकूम', 'चिंतातुर जंतू' कविता, वाचून खुदुखुदु हसायचे ते दिवस. 'हुकमे हुकूम' कवितेमध्ये गडकरी, वसंतऋतूतील एका चिमुकल्या आनंदी पक्ष्याची तुलना, कविशी करतात. कारण वसंताचे आगमन झाले की दोघांनाही प्रेरणा मिळते, कंठ फुटतो खरा परंतु त्यांच्यात एक ठळक फरक असतो जो की गडकरी अतिशय विनोदी धाटणीत व्यक्त करतात. पक्षी हा चार दिडक्यांकरता , किंवा कोणत्याही संपादकाच्या हुकमावरुन त्याचे गाणे म्हणत नाही याउलट कवि, खुशमस्कर्‍या असतो. आणि म्हणुनच - पक्ष्याला -
'गा' म्हटल्या जो गात नसे त्या सृष्टीचा कवि म्हणती
चिंतातुर जंतू तर अजरामर कविता आहे. काही जण सतत विनाकारण चिंताग्रस्त तर असतातच पण इतरांच्या स्वच्छंदतेसही, आपल्या काळजीने ग्रहण लावतात.
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी जास्त" || ५ ||
देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी |
ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी ! || ६ ||

बालपण ओसरल्यानंतर, पुढे काही वर्षातच,आपसुक प्रिय मैत्रिणीबरोबर पावले, पुस्तक प्रदर्शनांकडे पडू लागली.
गोविंदाग्रजांच्या भाषेत, 'अर्धविरामांनी' नटलेला हा काळ होता.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !

शांता शेळके, मंगेश पाडगावकर यांच्या कवितांची पुस्तके आपोआप उचलली जाउ लागली. गोविंदाग्रजांच्या 'गुलाबी कोडे', 'प्रेम आणि मरण', 'हलत्या पिंपळपानास' अशा कवितांची माधुरी चाखता येउ लागली. मनी अनामिक हूरहूर लागण्याचे 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुनी झुलायचे' असे मंगेश पाडगावकरांनी वर्णन केलेले मोठे रम्य, फुलपाखरी, स्वच्छंद तारूण्याचे दिवस आले. कुसुमाग्रजांचे' 'पृथ्वीचे प्रेमगीत' , कवि बी यांची 'दीपज्योतीस' अशा सुंदर सुंदर उपमा, उत्प्रेक्षांनी सजलेल्या कविता कळू लागण्याचे ते दिवस होते. 'गोविंदग्रजांच्या, भीमकबाळा' कवितेतील रुक्मिणी बनून मनोमन हरीची आराधना करण्याचे ते दिवस होते. आहाहा!!!
कधिं वाहिन ही काया माझी देवा तव पायां ?
कधीं सांठविन रुप मनोहर या नयनीं देवा ?
मिळेल केव्हां अभागिनीला प्रेमाचा ठेवा ?
नका करुं छळ याहुनि माझा अजुनी घननीळा ।
वाट बघूं किति घेउनि हातीं अश्रूंची माळा ?
किती आळवूं परोपरीनें ? कंठ किं हो सुकला ।
तरी यावया अजुनी माझा माधव कां चुकला ?
सर्वसाक्षि भगवंता ! आतां अंत नका पाहूं ।
---कीं विषपानें प्राण तरी हा पदकमला वाहूं ।
मीच अभागी; म्हणुनी आपण अजुनी नच आलां ।
ब्रह्म सगुण जें दुर्लभ सकळां; मिळे कसें मजला ?
रडतां यापरि अश्रुजलानें पदर भिजुनि जाई ।
ऊर भरुनि ये---शब्द न चाले---कवन विरुनि जाई ॥

तारुण्य येते आणि चटकन निघूनही जाते. आता आयुष्याच्या अगदी मध्य टप्प्यावरती, आवडणाऱ्या गोविंदाग्रजांच्या कवितांचे रंगच न्यारे आहेत. 'उद्गार चिन्हांचे' हे दिवस -

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !

या काळात, वेडा', 'राजहंस माझा निजला', 'चेंडु', 'एखाद्याचे नशीब'. 'घुंगुरवाळा' अशा कवितांची खोली कळू लागली. 'राजहंस माझा निजला' सारखी कविता वाचताना डोळ्यात अश्रू येउ लागले. 'घुंगुरवाळा' कवितेमधील वाळा घातलेले, इवलेसे पाय हलवणारे बाळ आपल्याच लेकरात पहाण्याचे मोठे स्वप्नपूर्तीचे दिवस होते ते. 'दैवाची निर्दयता' कवितेतील कुब्जेचे दु:ख समजून घेता येण्याचे ते दिवस होते कारण आयुष्याच्या भल्याबुऱ्या अनुभवांतून आलेले शहाणपण आता गाठीशी साठू लागलेले होते.
घडेना कार्य या लोकीं भाग्यावांचूनि कोणतें ।
हंसायातेंच न परी रडायातेंहि लागतें ॥
असावें लागतें भाग्य हंसायातें न काय तें ।
रडायातेंही जीवाचें या लोकीं भाग्य लागतें ॥

प्रगल्भ वयात, 'एका जुन्या श्लोकाची आठवण', 'सत्सुम-दाम', 'एकच मागणे', 'सुख-दु:ख' , 'घास', 'सगुण स्वरुप' या सर्व कवितांमधील सौंदर्य कळू लागले तर क्वचित 'लांडोर' , 'स्मशानातले गाणे' सारख्या कटू कवितांचेही मोल करता येऊ लागले होते , जे की तरुण्याच्या उन्मादात जमलेही नसते.
बाकी शिवरायांना जोजवणार 'पाच देवींचा पाळणा', 'महाराष्ट्रगीत' आदि कविता तर सदाबहार आहेत.
गोविंदग्रजांच्या, या सर्व कविता, पुढील साईटवरती जरुर वाचा - https://sahityachintan.com/books-library/marathi/vagvaijayanti/page1.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages