पहिले अध्यात्मिक पुस्तक

Submitted by सामो on 18 February, 2022 - 03:23

झाली असतील एक २५-२७ वर्षं. ही गोष्ट आहे माझ्या अध्यात्मिक साहित्य वाचनाच्या श्रीगणेशाची.

रोज भाजी आणायला जाताना, ऑफिसात जाताना त्या फाटक्या अंगाच्या भय्याकडे लक्षही जायचे नाही किंबहुना गेले तरी तो खिजगणतीतही नसायचा. मात्र एका रणरणत्या दुपारी, झाडाखाली सावलीत पथारी पसरुन तिच्यावरती बसलेल्या त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या इवल्या इवल्या पुस्तिकांकडे लक्ष गेले आणि मी थबकले. रंगीबेरंगी त्या पुस्तिका होत्या अध्यात्मिक पुस्तिका -गीता प्रेसच्या. हनुमान चालीसा, दुर्गाचालिसा, गणेश स्तोत्रे वगैरे. त्यांचे रंगच इतके चटखीले होते, आय हॅड टु स्टॉप इन माय ट्रॅक्स. हाकच मारली त्या पुस्तिकांनी. सगळी उत्तर प्रदेशिय साहित्याची बरं का. हिंदी भरणाच जास्त.
भैय्या डोळ्यात आशा आणुन बघत होता- ही बाई घेते का काही आज. आज तरी सुटतील का त्याला २ पैसे. २ पैसे म्हणजे अक्षरक्षः अडीच ते पाच रुपयांपर्यंतच्या त्या पुस्तिका. तेव्हा तर मी हनुमान चालिसाही वाचलेली नव्हती. दोझ वेअर द बेबी स्टेप्स. अध्यात्मिक पुस्तके व साहीत्य वाचण्याच्या १०००० पावलांच्या प्रवासातील पहीले पाऊल. ती हनुमान चालिसाही लाल रंगाच्या अक्षरांत बरं का. हातभर साईझच्या प्रत्येक पानावरती ४ श्लोक, मोठ्या व ठळक छापात आणि लगतच्या पानावरती हनुमान-राम-सीतेचे प्रसंगानुरुप, चटखीले चित्र.
पण मला त्या भैय्याच्या डोळ्यातली आशा अजुनही आठवते. मी २ पुस्तिका घेतल्यानंतरची कृतज्ञताही - गेले असतील का २ घास पोटी त्याच्या, पाठवता आले असतील का २ पैसे गावाकडे? कोण असेल त्याच्यावरती अवलंबुन - वृद्ध आई-वडिल, बायको-पोरं. असे कितीसे लोक घेत असतील त्याच्या पुस्तिका की इतक्या उन्हात प्रामाणिकपणे व सचोटीने तो विक्री करत असेल? काय भविष्य होतं त्याला? पुस्तक हातात देताना माझी निवड उत्तम आहे अशा संदर्भात काहीतरी पुटपुटला होता. पण तेव्हा ना या काही गोष्टी ध्यानीमनी आल्या, ना विचार केला गेला. एक मात्र नक्की झालं, ती हनुमान चालिसा पावली मला. परदेशी येताना ती २० पानांची, हातभर/वीतभर लहानशी पोथी मी घेउन आले. नंतर एका मैत्रिणीच्या बरोबर ती नजरेत भरली व तिने हक्काने मागुन घेतली. नंतर कित्येक अध्यात्मिक पुस्तके धो धो आली, भेट मिळाली, विकत घेतली. वाचन झाले. पण त्या भैय्याच्या डोळ्यातील कृतज्ञतेच्या रॅपरमध्ये बांधून आलेले ते पुस्तक तेवढे एकच. परत तो दिसलाही नाही मला.
काही लोक मनात घर करुन जातात.
आजही खूपदा मनातून त्या उत्तर/मध्य प्रदेशिय विक्रेत्याकरता आशीर्वाद, आशीर्वचनेच निघतात.
-------------------
अगदी मामुली प्रसंग आहे पण माझ्या मर्मबंधातला. बंडल वाटल्यास अ‍ॅडमिन यांनी उडवला तरी चालेल. पण व्यक्त करण्याकरता मला योग्य वाटला म्हणुन हा लेखनप्रपंच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे अनुभव
बरेच फेरीवाले वा छोटेमोठे विक्रेते आपल्या आठवणीत घर करून असतात. स्पेशली हॉस्टेलला राहताना वा कामानिमित्त परगावी असताना आपण अश्या विक्रेत्यांमध्येही भावनिक आधार शोधत असतो. या निमित्ताने ते सारे आठवले. कधीतरी फावल्या वेळी त्या आठवणी लिहून काढायला हव्यात. निदान चांगल्या तरी..

आवडलं.
भैया लोक कष्ट करून पैसे कमावतात. त्यात फारशी कमाई नसतेही तरीही त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करतात. ( भिकारी आढळत नाहीत. सरदारजी लोकही भीक मागत नाहीत.)

छान लिहिलाय अनुभव. नको उडवूस.

मला कुठेही बाहेर चहा घेताना बरेचदा एका टपरीवाल्याची आठवण येते. चेहरा वगैरे आठवत नाही. 26,27 वर्षांपूर्वीची घटना आहे. साधीच अगदी. पण ठळक लक्षात राहिलीय. कोकणात ला धोधो पाऊस. स्कुल बसची वाट बघत उभी होते. जिथे उभी होते तिथे फक्त मीच चढणार होते. पाऊस खूप होता म्हणून मी तिथं असणाऱ्या टपरीच्या शेड मध्ये उभी राहिले एक बाजूला. पाऊस खूप होता त्या दिवशी. अजून 5,6 लोकं तिथं आली आणि चहा मागवला त्यानी. अंधारून आलेलं. आणि त्या ओल्या वातावरणात तो उकळत्या चहाची वाफ बघूनही बर वाटत होतं. चहा मनातून हवा होता पण पैसे ही नव्हते. आणि त्या चहावल्याने सगळ्यांबरोबर मलाही तो छोटा ग्लास देऊ केला. मी नको म्हणलं तर म्हणला पैसं नगत , घे वाईच चा बाळ . आणि सकाळधरनं झड लागलीया पुटपुटत कामाला लागला. त्यांनतर आजपर्यंत अनेक ठिकाणी चहा प्यायला पण त्या चहाची आठवण बरेचदा येते.
हं आता दुसऱ्या दिवशी वगरे मी पैसे द्यायला हवे होते पण ते तेव्हा सुचलं नसेल बहुतेक.

सर्वांचे खूप आभार. वर्णिता बरं झालं नाही दिलेस पैसे त. त्या चहावाल्याचं समाधान हिराउन घेतलं असतस. खूपदा आपल्याला याचक होण्याचीही गरज असते - निव्वळ दात्याला समाधान मिळावे म्हणुन.
ऋन्मेष जरुर मांडा आपले अनुभव - या धाग्यावरच किंवा नव्या अपटु यु.
शरदजी आपल्याला भिकार्यांचा धर्म / जात कुठे माहीत असते . कदाचित सर्व जाती-धर्माचे लोक असतील त्यांच्यात. पण हो भैय्या लोक कष्टाळू असतात.

मस्त अनुभव.
एकदा रांगोळीचे जाळीदार ठसे विकणारा रस्त्यावर, प्लॅस्टिकचे पोते घालून मळक्या धोतरात बसलेला होता. मला इतकी दया आली, वाईट वाटलं की मी बरेच ठसे विकत घेतले व माझ्याकडे असलेले सगळे फाईव्ह स्टार चॉकलेट्स त्याला दिले. त्याला कळेचना ही मुलगी असे काय करतेय. मला त्या ठश्यांमधे काहीच रस नव्हता म्हणून ते नंतर वाटून टाकले.

नंतरही अशा बऱ्याच प्रसंगातून गेले आहे. एकदा रस्त्यावर सोळा सतरा वर्षांची मुलगी छत्र्या विकत होती. मला छत्र्या नको होत्या पण गाडी सिग्नलला उभी होती आणि तोपर्यंत ती आली तर मी दोन छत्र्या घ्यायच्या ठरवल्या आणि भाच्यांना देऊन टाकणार होते. प्रत्येक गाडीत तिने विचारले , बहुतेक जणं नाही म्हणाली एकानी घेतली पुन्हा आमच्या गाडीपाशी आली तर मला 'पाणी देता का ताई?' म्हणाली, छत्रीचं विचारलंच नाही, मी पाण्याची बॉटल दिली. तोपर्यंत सिग्नल सुटला. तीही निघून गेली. मला अजून आश्चर्य वाटतं तिने मला छत्री घेणार का हे सुद्धा का नाही विचारले, मी घेतल्याच असत्या पण राहून गेले.

छान लेख.

आमचे कार्पोरेट ऑफिस म्हणजे एक महाकाय संस्थान आहे. त्याचया दारा समो र मुंगी पण उभी राहु शकत नाही. फिरस्ते व्यापारी, अन्न विक्रेते आजिबात पर वानगी नाही. एक दिवस मी समोरच्या दुकानातून समोसा पाव, व काही चिल्लर स्नॅक्स घेउन चालत आले पाहिले तर दाराशेजारी सावलीत एक माणूस कापडावर काचेच्या छोट्या मुर्ती ठेवुन बसला होता. पक्षी व त्याची आई असे पेअर्स. गण पती व शिवजी. एका आरश्यावर ह्या दोन छोट्या मूर्ति.

मी ते पक्षी घेतले शिवजी व गणेश एका बारक्या आरश्याच्या पट्टीवर चिकटवलेले असे होते ते घेतले. मी तरी किती घेणार. त्याने ते खोक्यात कागद घालून नीट दिले. साधारण माझ्याच वयाचा असावा. मग मी थो डया इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. त्याचा मुलगा नुक ताच ग्रॅजुएट झाला होता व नोकरी शोधत होता. इथे मिळेल का असे मागे हात करून त्याने विचारले. मला अगदी हताश वाटले. पण सिकुरीटी कडे द्या कागद असे सांगितले. किती स्ट्रगल करून त्याने त्या मुलाला ग्रॅजुएट केले असेल. व आता कुठे असतील कोण जाणॅ .

पक्षी बिल्डिन्ग मधील मुलांना दिले गणेश मुर्ती होती घरी दोन चार वर्शे.

मग पाहिले तर त्याच्या कडे पाण्याची बाटली नव्हती. माज्याकडचे थोडे स्नॅक्स होते ते त्याला दिले बसल्या जागी खाउन घ्या सांगितले. तो माल सोडून तो कसा जाईल अन्न आणायला. आमच्या तिथे असे काही मिळत नाही. खरे तर समोसा पाव द्यायला हवे होते म्हणजे पोट भरीचे लंच झाले असते पण माझ्याकडे तेव ढेच होते जेवायला दुसरे काही मी नेले नव्हते. व पुढे नेहमीसारखा कामा चा डोंगर होता. कँटिन मध्ये जायला पण वेळ होत नाही.

पक्षी काहीतरी ऐशी रुपये व गणपती १२५ रु.

त्या माणसा मुळे मी एक प्रकारचा विनम्र पणा शिकले प्रत्येकाचा स्ट्रगल असतो. तो समजून घ्यायला हवा. आता त्या मुर्ती नाहीत पण हीच भावना मी फेसबुक वर शेअर केलेली. ती मेमरीज मध्ये येते व त्या माण साची आठवण येते. एका ह्युमन लेव्हल ला अचानक झालेले कनेक्षन होते ते.

हैद्राबाद साइडला असे इतरांशी बोलायची गप्पा करायची पद्धत आहे. मुंबई इतके तोडून जगत नाहीत एक मेकांशी. त्यामुळे मी अशी इंटर अ‍ॅक्षन मिस करते. इथे असे फार कोणाशी बोलायची सोय नाही. सेफ नाही ते.

छान किस्सा आहे अमा.
>>>>>एका ह्युमन लेव्हल ला अचानक झालेले कनेक्षन होते ते.
होय.

{बरेच फेरीवाले वा छोटेमोठे विक्रेते आपल्या आठवणीत घर करून असतात. स्पेशली हॉस्टेलला राहताना वा कामानिमित्त परगावी असताना आपण अश्या विक्रेत्यांमध्येही भावनिक आधार शोधत असतो.}
अगदी खरे आहे!
फार भावस्पर्शी लिहिलं आहेत मामी!
{खूपदा आपल्याला याचक होण्याचीही गरज असते - निव्वळ दात्याला समाधान मिळावे म्हणुन.}
अगदीच!

सर्वांचे आभार. सी बदल केलेला आहे. पाहीला आहेसच Happy
आता पाहीला मधला ही पहीहिला की दुसरा Sad
मला सवय आहे ग दीर्घ काढायची Happy

मस्त अनुभव लिहिला आहेस सामो.

खूप वर्षांपूर्वी आमच्या घरासमोरच्या रस्त्याच्या कडेला एका छोट्या कापडाच्या तुकड्यावर काही सेकंड हँड पुस्तकं ठेऊन एकजण विकत होता. जेमतेम ३० पुस्तकं असतील त्याच्याकडे. त्यात मला ६ अ‍ॅगथा ख्रिस्तीची पुस्तकं मिळाली. ६ रु. एक. फारच आनंद झाला होता मला. ती तेव्हाच फार उत्तम स्थितीत नव्हती आणि नंतर तर अजून खिळखिळी झाली. तरीही अगदी आता आतापर्यंत उगंच सेंटिमेंटल व्हॅल्यु म्हणून ती फाटकी पुस्तकं मी ठेवली होती.

कॉलेजात असताना एकदा सेंट्रल माटुंग्याच्या स्टेशनजवळच्या रस्त्यावरून आम्ही मैत्रीणी जात होतो. त्याकाळी सिनेमाच्या गाण्यांच्या अगदी पातळ कागदांच्या आणि घड्या घातलेल्या अश्या पुस्तिका मिळायच्या. त्या घेऊन एकजण विकायला बसला होता. मी तिथे जाऊन शोधाशोध करायला सुरवात करताच तो म्हणाला ' ताई, इथे नका थांबू. हा मटक्याचा अड्डा आहे. ' महान धक्कादायक होतं ते. घाबरून पळ काढला तिथून.

>>>>>>>> ' ताई, इथे नका थांबू. हा मटक्याचा अड्डा आहे. ' महान धक्कादायक होतं ते. घाबरून पळ काढला तिथून.
हाहाहा

सुंदर लेख आहे सामो.
प्रतिसादा मधील अनुभव ही हृदय स्पर्श करणारे आहेत, अशाच काही घडून गेलेल्या प्रसंगांची आठवण झाली.

खूपदा आपल्याला याचक होण्याचीही गरज असते - निव्वळ दात्याला समाधान मिळावे म्हणुन. >> हं,खरय

छान अनुभव सामो.
एकदा दिवाळीला मी म्हटलं , ‘आहेत पणत्या घरी. नवीन नकोत आणायला. तर सासूबाई म्हणल्या, ‘आपल्या करता नको असल्या तरी, विकणाऱ्याची दिवाळी व्हावी म्हणून आणायच्या असतात पणत्या.. आकाशकंदील वैगेरे.’ तेव्हा पासून दर दिवाळीला आणते मी सगळं. अगदी दिवाळीत घरी रहाणार नसले तरी.

छान आहे लेख आणि प्रतिसाद .. सकारात्मक आणि हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या माणुसकी वर..

मी बरीच वर्षे नविन कॅलेंडर भक्ती-शक्ती बागेच्या बाहेरील आंधळ्या विक्रेत्याकडून घेत होते. त्यात मला समाधान वाटत होते. गेले दोन वर्षांत कोरोनामुळे ती बाग बंद आहे. विक्रेते पण नाहीत तर एक चुटपुट वाटते.

>>>>विक्रेते पण नाहीत तर एक चुटपुट वाटते.
खरच कोरोनामुळे असे लहान विक्रेते पार बसले.

@मनमोहन धन्यवाद.
@शर्मिला - उत्तम विचार आहे.

नंतर कित्येक अध्यात्मिक पुस्तके धो धो आली, भेट मिळाली, विकत घेतली. वाचन झाले. पण त्या भैय्याच्या डोळ्यातील कृतज्ञतेच्या रॅपरमध्ये बांधून आलेले ते पुस्तक तेवढे एकच. परत तो दिसलाही नाही मला. काही लोक मनात घर करुन जातात.>>>
_/\_

अगं किती सुरेख लिहिले आहेस!
>>>खूपदा आपल्याला याचक होण्याचीही गरज असते - निव्वळ दात्याला समाधान मिळावे म्हणुन.
खरंय.

छानच..
सगळ्यांच्या अनुभवांनी या धाग्याचं मोल अजूनच वाढवलं..

Pages