नक्की काय झालं? –(भाग -२)

Submitted by SharmilaR on 15 February, 2022 - 23:49

नक्की काय झालं? –(भाग -२)

(2)

“काही सुचतच नाहीय गं. संगीताच ऐकल्यापासून..”

“हो ना. खूपच मोठ्ठा धक्का आहे हा. हे काही खरंच वाटत नाही. अजूनही वाटतं, हे सगळं खोटं आहे. आत्ता डोळे उघडतील अन् हे वाईट स्वप्न असेल.. अजूनही थरथर कापायला होतंय. ”

“वाटलं होतं का, संगीता असं काही करेल म्हणून..? आपल्यासारखीच एक.. एक गोड मुलगी.. चांगला कमावता नवरा... घरी जाच करायला कुणी नाही..चांगला राजा राणी चा संसार. अजून काय हवं सुखी रहायला ..”

“कुणास ठाऊक नक्की काय झालंय..? तिने काही नोटही लिहिली नाही म्हणे... मला तर ती खूप दिवसात भेटलीही नव्हती..”

“मलाही. प्रत्यक्ष भेट नव्हती, पण कधीतरी माझा फोन व्हायचा तिला. उदासच असायची हल्ली ती ..”

“हो. मलाही तसं जाणवलं होतं अलीकडे फोनवरच. जरा एकटी एकटी पडल्यासारखी वाटायची. तरी मी फोन करायचे तिला बरेचदा.. ”

“पण एवढं टोक गाठण्या आधी .. काहीतरी बोलायचं तिने. आपण काहीतरी मदत केली असती. जरा भेटलो बोललो असतो..” संगळ्यांचेच डोळे सारखे सारखे भरून येत होते.

“ती तिच्या कोशातून बाहेर यायलाच तयार नसायची. आपण कितीही बोललं तरी तिची जेमतेम उत्तरं असायची. कधीतरी वाटायचं पण, आपण आपल्या कामातून एवढा वेळ काढून फोन करतोय तर...पूर्वी अशी नव्हती ती..”

“काय अर्थ आहे आपण एकमेकींच्या मैत्रिणी असण्याला? जर स्वत:चं एवढं कोंडून ठेवलेलं मन पण मोकळं करता येत नसेल तर?”

“मिनी च्या जन्मानंतर स्वत:हुन तिने नोकरी सोडली होती. मी तेव्हाच तिला म्हटलं होतं, एवढी वर्षे नोकरी करतेय तर एकदम घरी बसणं तुला जड जाईल.”

“हो ना. पण दिवसभर मिनीला बाहेर ठेवायची तिची तयारी नव्हती तेव्हा .. सुरवातीला वर्षभर काही वाटलं नाही तिला. मग म्हणायची, सगळ्यापासून खूप दूर गेल्यासारखं वाटतंय..”

“एवढी शिकून चांगली इंजिनियर झाली.. चांगली नोकरी होती.. मी म्हटलं होतं तिला, आता मिनी थोडी मोठी झालीय, शाळेत जातेय तर परत सुरू कर काहीतरी..”

“आता तिचा कॉन्फिडन्स कमी झाला होता.. त्यात संदीपचही घरात खूप लक्ष नव्हतं म्हणे..”

“तो त्याच्या कामांत असायचा. तिची खूप चिडचिड व्हायची..”

“संदीप बद्दल तिच्या खूपच तक्रारी असायच्या..पण जातांना निदान मिनीचा तरी विचार करायचा? तीनं तिचं जे काय असेल ते दु:ख्ख बघितलं. पण ती पोरगी तर कायमची आईला मुकली नं?.”

“संदीपला भेटायला जाऊया?”

“पण त्याला पकडलंय म्हणे..”

“संदीपला? का? हयात त्याची काय चूक?..”

“तिच्या घरच्यांनी पोलिस कम्पलेन्ट केलीय. संगीता स्वत: असं काही करूच शकत नाही म्हणताहेत..”

“म्हणून तो असं काही करेल? काहीतरीच काय? एवढा सुशिक्षित इंजिनियर ....नुसतं वाद असणं वेगळं ..ते सगळीकडेच असतात. पण.. हे असं काही तरी.. छे.. छे.. ”

“त्याचे आई वडील आलेत ना? त्यांना पण केवढा मोठा धक्का! एक तर संगीता अशी गेली.. त्यात मुलगा तुरुंगात.. त्यांना तरी भेटून येऊ..”

*****
“अरे यार!! काय होऊन बसलं हे.. पार हादरायला झालय.”

“हो ना. विश्वासच बसत नाही. काल भेटलो होतो आपण सगळे..”

“एकदम हे असं काय होऊन बसलं? सगळं छान चालू होतं.. काल संगीता जरा जास्तच चिडली होती पण..”

“एवढं काय चिडायचं तिने पण.. होतात कधी तरी एक दोन पेग जास्त..”

“पण ती संदीपला नको घेऊ म्हणत होती. तरी त्यानं ऐकलं नाही ह्याचा राग आला तिला.”

“ती सर्वांसमोर नको म्हणत होती, म्हणूनच तो आणखी घेत होता..”

“म्हणून एवढं चिडायचं पण त्यात? कधीतरीच भेटतात सगळे.. होतं कधी कमी जास्त.. ती ड्रायविंग करते म्हणून तर त्याला घरी जाण्याचं पण टेंशन नव्हतं. नाहीतर आपणही त्याला थांबवलं असतं..”

“मुळात हे प्रकरण एवढं होईल असं कुठे वाटलं होतं? सगळ्यांनीच तिचं चिडणं नेहमीप्रमाणे चेष्टेत घेतलं.”

“पण काल तिला राग आवरतच नव्हता. बघितलं ना सगळ्यांसमोरच किती चिडली होती ती संदीप वर?”

“पूर्वी अशी नव्हती ती.. हल्लीच जरा जास्त चिडायला लागली होती..”

“तिचा काही क्षणांचा राग झाला. पण त्याच्या आयुष्याची वाट लागली..”

“कदाचित कालचं तिचं चिडणं ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी असेल.. आधी काही झालं असेल..”

“आता पुढे काय? काय करायच आपण? संदीप लॉकअप मध्ये आहे. त्याच्यावर संशय आहे पोलिसांचा. तिच्या आई वडिलांनी कम्पलेट केली.”

“हो. त्याचे आईवडील आले आहेत. बघूया ते काय म्हणतात ते.. काहीतरी तर करावच लागेल. फुकाचं अडकवलं त्याला.”

*****

“काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही धीर धरा.” सानप काकू संदीपच्या आईला समजावत होत्या.

“काय होऊन बसलेय हो हे? आम्ही समजत होतो, सगळं छान चालू आहे.. आता संगीता अशी गेली. संदीप जेल मध्ये.. मिनीला तिच्या माहेरचे घेऊन गेले..एवढी गोड पोरगी. काय वाटत असेल तिला? आई नाही .. आता जवळ बाप नाही.. सगळंच उधवस्त झालय.”

“तुम्ही यायच्या आधीच संगीताचे आईवडील आले आणि घेऊन गेले मिनीला. आम्ही तरी काय करणार? शेवटी आम्ही परकी माणसं..” काकू म्हणाल्या.

“बिचारा माझा मुलगा.. काय अवस्थेत असेल तिकडे..?”

“आता ही दोघं गेलीत ना वकिलाकडे .. जमानतीवर सोडवून आणतील संदीपला. मग होईल हळू हळू सर्व ठीक.”

“तुम्हाला माहीत आहे, आम्ही इथे जरा कमीच यायचो. वाटायचं, त्यांच्या संसारात आमची लुडबूड नको वाटायला. संगीता खूपच डॉमिनेटिंग होती आणि हट्टीही. तिला सगळं तिच्या मनाप्रमाणे घडायला हवं असायचं. मग मला वाटायचं आमच्यामुळे उगाच भांडणं नको बाई तुमच्यात..तर हे या थराला गेलं. संदीप ही कधी काही बोलला नाही बिनसल्याचं..”

“अहो, भांडणं कुठे होत नाहीत.. त्यांचीही व्हायची तशी.. काल रात्री पण बऱ्याच उशिरा जरा आवाज येत होते.. पण.. आलेत बघा हे दोघं..”

संदीप चे बाबा आणि सानप काका घरात शिरले. काकूंनीच आत जाऊन पाणी आणलं.
“भेटले का हो वकील? काय म्हणताहेत? जमानत तरी होणार नं?” आईने विचारलं.

बाबा काहीच बोलले नाहीत. मग सानप काकाच म्हणाले,
“आत्ता सध्या जामीन नाकारलाय... अजून आठ दिवसांनी बघू..”

“अगबाई ! जामीन का नाकारला? म्हणजे अजून आठ दिवस तो तिथेच रहाणार?” काकूंनी विचारलं.

“हो. तिच्या माहेरच्यांनी तक्रार केलीय. तिने काही सुसाइड नोट पण नाही लिहिलेली. ते आत्महत्या नाहीच म्हणतात. हल्ली कायदे तर मुलींच्या बाजूने असतात नं .. आपलं कोण ऐकून घेणार?” बाबा थकलेल्या आवाजात म्हणाले.

“अहो, असं काय बोलताय? आत्महत्या नाही तर काय? घरात घुसून कोण फासावर देणार होतं तिला?”

“पोलिसांनी चौकशी केली.. बिल्डिंग च्या वॉचमन ने आणि आणखी काही लोकांनी त्याला थोडा वेळ बिल्डिंग बाहेर गाडी उभी करून घरी आलेलं बघितलं म्हणे..”
आता सगळेच सुन्न झाले.

“खोटा आळ घेताहेत हो ते लोकं. संदीप असं काही करणार नाही. तो घरी आला म्हणजे काय लगेच.. काहीही काय बोलायचं? एका चांगल्या घरातला मुलगा आहे तो.” आई रडत रडत म्हणाली,
“तुम्ही बघताय नं, तिच्या मैत्रिणी येऊंन गेल्या, त्याचे मित्र येऊंन गेले, कुणी तरी काही वाईट बोललं का त्याच्याबद्दल? कुणाला तरी काही शंका वाटली का? त्यांच्याकडे चौकशी करा म्हणावं.”

“ते त्यांचं काम करतील. आपण चांगला वकील दिलाय. तो त्याचं काम करेल. आता आपण फक्त प्रार्थना करायची देवाची.”, उसासून बाबा म्हणाले,
“आणि नक्की काय झालं हे फक्त दोघांनाच माहीत आहे. त्यापैकी संगीता हे जग सोडून गेली आणि संदीपचा आवाज किती ऐकला जाणार हे माहीत नाही.”

सगळे सुन्नपणे बसले होते. नक्की काय झालं असेल ह्याचा विचार करत……

***************
(समाप्त)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्र. खरंच कठीण आहे नक्की काय झालं ते कळणं.

डिटेक्टिव्ह मालिका - फॉरेन्सिक्स बघून एक सुचलं की मृत्यूची नक्की वेळ शोधता आली तर संदीपनेच ते केलं की नाही हे कळू शकेल.

हो.
इथे बंगळूरमध्ये दहाबारा वर्षांपूर्वी एक केस झाली होती. नवरा इन्फोसिसमधे नोकरी करत होता. बायकोचा खून त्यानेच पहाटे चारच्या सुमारास केला होता आणि मग तो साळसूदपणे मॉर्निंग वॉकला गेला. तिथे मित्रासोबत फिरताना त्याने बायकोचा फोन आल्याचं नाटक केलं. कुणीतरी जुनं सामान न्यायला आलेत असं बायको म्हणत्ये असं मित्राला सांगून घरी गेला. घरी बेल वाजवूनही बायकोने दार उघडलं नाही, गर्दी गोळा झाली. मग माझी किल्ली ऑफिसमध्ये आहे असं सांगून पार ऑफिसला जाऊन किल्ली आणली. मग बायकोचा खून झाल्याचं दिसलं. पण पोलिसांनी दोनचार दिवसांत केस सोडवली. एक तर पोस्टमार्टेम रिपोर्टवरून भरत म्हणाले तशी वेळ कळली, तेव्हा तर तो घरीच होता. शिवाय त्याला बागेत फिरताना फोनही आलेला नव्हता हे सिद्ध झालं आणि बाहेरचं कुणी सोसायटीत आलेलंच नव्हतं हेही सिद्ध झालं.

ही कथा आवडली. उकल केली असती तर जास्त आवडलं असतं. धागेदोरे नावाचा उमेश कामत आणि सई ताम्हणकरचा एक पिक्चर आहे त्याची आठवण झाली.

ही रहस्यकथा नसून नात्यात नक्की काय झालं अशी असावी. तो का परत आला होता हे आधी लिहिलंय(मुलीचे शाळेचे सामान आणायला)

आवडली गोष्ट,
बाहेरून बघणाऱ्या माणसाला केवळ अंतिम घटना दिसत असते,
आणि तो त्याने अनुभवलेले ठिपके जोडत आकृती पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे एकाला हे संदीपनेच केले असे वाटेल, एकाला संदीप जबाबदार वाटेल तर एकाला संगीता मानसिक दृष्टया आजारी होती वाटून संदीप ची कीव येईल.

कदाचित संदीप सुद्धा असेच ठिपके जोडायचा प्रयत्न करत असेल.

कदाचित तपस यंत्रणांनासुद्धा ठिपके जोडता येणार नाहीत आणि ते एका वर आरोप ठेऊन सिद्ध करतील, आरुषी तलवार केस याचे एक उदाहरण.

एक तर पोस्टमार्टेम रिपोर्टवरून भरत म्हणाले तशी वेळ कळली, तेव्हा तर तो घरीच होता. शिवाय त्याला बागेत फिरताना फोनही आलेला नव्हता हे सिद्ध झालं आणि बाहेरचं कुणी सोसायटीत आलेलंच नव्हतं हेही सिद्ध झालं.
>>>>>

कदाचित प्लानड मर्डर नसावा. अचानक झाला असावा मग लपवायला टेंशनमध्ये काहीतरी करावे म्हणून केले असावे.
किंवा पिक्चर बघायची बिलकुल आवड नसावी त्याला. अन्यथा ईतका बालिश प्लान केला नसता

प्रतिसादाबद्दल धन्यवाद भरत, वावे, पुणेकर, ऋन्मेष

ही कथा आवडली. उकल केली असती तर जास्त आवडलं असतं. धागेदोरे नावाचा उमेश कामत आणि सई ताम्हणकरचा एक पिक्चर आहे त्याची आठवण झाली.>> वावे, सिनेमा मी बघितला नाही. बघेन आता. ही कथा पुढे कुठल्याही दिशेने नेता येईल, पण मी इथेच संपवली. सध्या तरी कथा पुढे नेण्याचा विचार नाही.

अशी एखादी घटना घडते, तेव्हा त्यात एक वेग असतो, अविचार असतो. आणी नंतर रहातं, ते फक्त आवराआवरी करणं. कुठल्याही बाजूने ही कथा गेली तरी कुणाच्या तरी मनात किंतु कायम राहणारच आहे.
मला दाखवायची होती ती घटनेची पार्श्वभूमी. माणूस रागाच्या भरात काहीतरी (स्वत:ला/दुसऱ्यांना) करून जातो.. त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात.

फॉरेन्सिक्स बघून एक सुचलं की मृत्यूची नक्की वेळ शोधता आली तर संदीपनेच ते केलं की नाही हे कळू शकेल.>> अगदी मिनिटांमद्धे वेळ पिन पॉइंट करणं सोपं नसावं.

‘तलवार’ सिनेमा पूर्वीच बघितला होता, त्यात पोलिस तपासात खूपच सफाई दाखवली आहे. पण मध्यंतरी त्यावर डॉक्युमेंटरी च्या अंगाने जाणारी एक वेब सिरीज बघितली (तलवार मर्डर केस). डेड बॉडी उचलण्याची पद्धत पण भयानक होती.

कदाचित प्लानड मर्डर नसावा. अचानक झाला असावा मग लपवायला टेंशनमध्ये काहीतरी करावे म्हणून केले असावे.
किंवा पिक्चर बघायची बिलकुल आवड नसावी त्याला. अन्यथा ईतका बालिश प्लान केला नसता >> ऋन्मेष, ह्या वरून अनिल कपूरचा एक सिनेमा आठवला. (बहुतेक my wife’s murder)

मला दाखवायची होती ती घटनेची पार्श्वभूमी. माणूस रागाच्या भरात काहीतरी (स्वत:ला/दुसऱ्यांना) करून जातो.. त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात.
बरोबर आहे. छान जमली आहे कथा!
ऋन्मेष, शक्य आहे! सगळेच विजय साळगावकर नसतात.

अरे हा भाग दोन आहे...
मी वरचा वावे यांच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिला तेव्हा तो प्रतिसाद भाग एक वरचाच आहे समजून दिलेला..
आता वाचतो हा भाग Happy

छान आहे. आवडली. कथा ओपन ठेवली असली तरी मी आत्महत्या समजूनच चाललो.. भले त्याने खून नाही केला तरी खूनाचा आरोप आलाच. त्यातून सुटेन वा अडकेन तरी सर्वांच्या आयुष्याची वाताहात ही झालीच.

छान कथा.
तपासात काहीही निघाले तरी गेलेली व्यक्ती परत येणार नाही.
क्षणीक रागामुळे आयुष्यभराचे नुकसान होऊन जाते. कितीतरी उदाहरणे आहेत.

उकल न केल्यामुळे जास्त परिणामकारक झाली आहे...
आत्महत्या असो नाहितर खून... रागाच्या भरात केलेली एक कृती.... आणि अनेक आयुष्य उध्वस्त झाली....
अशा अनेक घटना घडत असतील आणि असे अनेक प्रश्ण कायम अनुत्तरीत राहात असतील... भयंकर वाटलं विचार करताना....

<तपासात काहीही निघाले तरी गेलेली व्यक्ती परत येणार नाही.> आत्महत्या आहे आणि खून नाही असं सिद्ध झालं तर नवर्‍याला कमी कठोर शिक्षा होईल. कदाचित आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप येईल.

छान कथा..!
मिनीसाठी वाईट वाटलं...!