नक्की काय झालं?
(1)
संदीपच्या खिशातला फोन परत व्हायब्रेट झाला. संदीप चांगलाच वैतागला. हे व्हेंडर्स पण नं! जरा त्यांना धीर नसतो. आज मिटिंग मध्ये असताना त्याचा फोन अखंड व्हायब्रेट होत होता. एखादा दिवसच असा उजाडतो.
आज सकाळपासून काहीच नीट होत नव्हतं. आज आधी सकाळी उठायला उशीर झाला. मग मीनी ची शाळेला तयार होण्याची कटकट. त्यात संगीताची ओरडा आरडी. त्यात मिनीची शाळेची बस चुकली. मग मिनीला गाडीत बसवून संदीप तिला शाळेत सोडायला निघाला तर बिल्डिंग च्या बाहेर गाडी काढल्यावर तिला आठवलं, क्राफ्ट पेपर्स घरीच राहिलेत. आणी ते तिला हवेच होते. मिनी आत्ता पहिलीत होती. टीचरचं वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य प्रमाणम. ऐकलंच पाहिजे. जसं काही क्राफ्ट पेपर्स नेले नसते तर मोठं आकाश कोसळणार होतं. पण नाही. क्राफ्ट पेपर्स शिवाय ती शाळेत जाणं शक्यच नव्हतं. मग तिला तसंच गाडीत ठेवून परत घरी जावं लागलं. तिचे ते पेपर्स शोधण्यात पाच दहा मिनिटे गेली. घरात संगीता चिडलेलीच होती. तेवढ्या पाच मिनिटात पण तिचं ओरडून बोलणं सुरूच होतं. अगदी डोकंच फिरलं होतं संदीपचं तेव्हा. मग मिनीला शाळेत सोडुन कंपनीत यायला उशीरच झाला. त्यात आजच्या मीटिंगची तयारी पण नीट करता आली नाही.
एक तर आधीच सोमवार म्हंटलं, की तसाच धावपळीचा असतो. त्यात आज हे सगळ एकत्र आलेलं. काल पार्टीमुळे रात्री झोपायला उशीर झाला. आणि त्यात रात्रभर संगीताची कटकट..तिने एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती सगळ्यांसमोर. कालच्या पार्टीची आठवणही संदीपला नकोशी वाटली. संदीप ने मीटिंगमध्ये परत लक्ष द्यायचा प्रयत्न केला. देशपांडे सर बोलत होते, ते पॉईंट्स तो नोटडाऊन करू लागला. सोमवारची ही मीटिंग महत्त्वाची असते. मागच्या आठवड्याच्या कामाचा रिव्यू आणि नवीन आठवड्याचे टार्गेट्स, काही नवीन असाइनमेंटस सगळं सोमवारच्या मीटिंगमध्ये ठरतं. परत परत व्हायब्रेट होणाऱ्या फोन कडे त्याने पुन्हा दुर्लक्ष केलं.
मध्येच कॉन्फरन्स रुमचं दार उघडून ऑफिसबॉय आत आला त्याने देशपांडे सरांच्या हातात एक चिठ्ठी दिली. खरं तर असं सहसा कधी होत नाही. मिटींग चालू असतांना बाहेरचा डिस्टर्बन्स कधी येत नाही. तशा स्ट्रीक्ट इन्सट्रक्शनसच आहेत सगळ्यांना. सगळ्यांचे फोन पण सायलेंटवर असतात. देशपांडे सरांनी नोट वाचली. त्यांचा चेहरा गंभीर झाला.
“संदीप तुझ्या घरी इमर्जन्सी आहे. तू बाहेर जाऊन चेक कर. आणि तू घरी जा लवकर. हवं तर बरोबर कुणाला तरी घेऊन जा.” त्यांनी संदीपला सांगितलं.
संदीप उठून बाहेर गेला. फोन चेक केला सतरा मिस कॉलस. बापरे! त्याने कॉल्स चेक केले. दोन कॉलस त्याच्या आई-बाबांचे होते. बाकी सगळे कॉल शेजारच्या सानप काकांचे होते. काय झालं एवढं? असा विचार करत त्याने सानप काकांना फोन लावला.
“हॅलो, काका मी संदीप बोलतोय. काय झालं?”
“संदीप अरे, किती वेळचा मी तुला गाठण्याचा प्रयत्न करतोय. संदीप, ताबडतोब घरी ये.” काका म्हणाले.
“झालं काय पण काका? लवकर सांगा.”
“अरे, संगीताला हॉस्पिटल मध्ये नेलय. तू लगेच घरी ये मग बोलू. मिनी शाळेतून आलीय. ती आता आमच्या घरी आहे. तू लवकर इथे ये.” पुढचं काहीच नं बोलता काकांनी फोन कट केला.
संगीता कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे वगैरे काहीच सांगितलं नव्हतं काकांनी.
सानप काका काकू संदीप च्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे. चार वर्षांपूर्वी बँकेतून रिटायर्ड झाले होते. काका काकू आता दिवसभर घरीच असायचे. अगदी समोरचाच फ्लॅट होता त्यांचा आणि काका-काकू दोघच राहायचे. संदीप संगीताशी त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. संगीताला एकटीला कुठे बाहेर वगैरे जायचं असलं, थोड्या वेळा करता, तर मिनी काका काकूंजवळ आनंदाने रहायची. मिनीला ही त्यांचा खूप लळा होता.
संगीता अचानक हॉस्पिटलमध्ये? काकांनी काहीच नीट सांगितलं नाही. म्हणजे मिनी स्कूलबसमधून आपली आपण घरी आलेली दिसतेय. कदाचित सानप काका गेले असतील तिला आणायला. संदीप ने पटकन आपल्या जागी येऊन लॅपटॉप बॅग मध्ये ठेवला. गाडीच्या किल्ल्या घेतल्या. आणि देशपांडे साहेबांच्या असिस्टंट कडे निरोप ठेवून तो घरी निघाला.
ट्रॅफिक मधून वाट काढत घरी जायला त्याला जवळपास तासभर लागला. आधीच रात्रीच्या जागरणाने डोकं भणभणत होतं. त्यात सकाळची ऑफिसची धावपळ.. आणि आता हा असा अचानक निरोप. काल पार्टीत पण जरा जास्तच झाली होती. तेवढ्या वरून केवढी ताडताड बोलत होती संगीता. तसंही तिला कटकट करायला काहीही कारण पुरतं. कधी कधी तर कारणही लागत नाही. त्याने परत कालचा विचार डोक्यातून झटकला.
संदीप बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पोचला तेव्हा पार्किंग च्या आवारात पोलिसांची गाडी उभी होती. पार्किंग मध्ये बरीच गर्दीही दिसत होती. लोक आपापसात कुजबुजत होते. तो उतरला तसा त्याला जायला गर्दीने आपोआपच वाट द्यायला सुरवात केली. तो फ्लॅट समोर पोहोचला तर तिथेही बरीच गर्दी जमली होती. त्याच्या घराचं दार उघडच होतं. दाराजवळच दोन पोलिस उभे होते. आतही काही लोक असावीत. तो दिसताच “आला.. आला..” म्हणून कुजबूज झाली. त्याला बघताच समोरच्या फ्लॅटमधून नाना काका पुढे झाले.
“संदीप, इकडे, इकडे ये.” त्यांनी संदीपला आवाज दिला.
काकांच्या घरातही बरीच गर्दी होती. आतून कुणी तरी त्याला प्यायला पाणी आणून दिलं. मिनी तिथे तर दिसत नव्हती.
“काय झालं? काका, ही एवढी गर्दी माझ्या घरात? पोलीस? मिनी कुठे आहे? आणि संगीता ला काय झालं? कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहे ती?” संदीप ने घाईघाईने विचारलं.
“सांगतो सगळं. आत चल.” काका म्हणाले.
काका काकूंनी संदीपला आत बेडरुम मध्ये नेलं.
“संदीप, बस. शांत रहा. आधी नीट ऐकून घे. सगळं सांगतो. संगीताला लाईफलाईन मध्ये नेलं आहे. मिनी खाली सुधीर कडे आहे.” काका म्हणाले.
“काय झालं तिला?” संदीप ने परत विचारलं
“आज सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे तुमची कामवाली सुरेखा आली. तिने तुमची बेल वाजवली. पण आतून संगीताने दार उघडलं नाही. मग तिला वाटलं संगीता जवळपास कुठेतरी गेली असेल कामाला. म्हणून ती किल्ली घ्यायला आमच्याकडे आली. आम्हालाही वाटलं, असेल, संगीता जवळपास कुठेतरी भाजी वगैरे आणायला गेली असेल. आणि सुरेखा बरेचदा किल्ली घेऊन जाते, तुमच्या घरी कुणी नसलं तर. म्हणून आज पण मी सुरेखाला किल्ली दिली.” काकू म्हणाल्या.
“मग?”
“सुरेखाने दार उघडलं. धुण्याचे कपडे घ्यायला ती आतल्या बाथरूममध्ये गेली. आणि बघते तर काय..” काकूंच्या अंगावर शहारे आले. त्यांना पुढे सांगवत नव्हतं.
“आतल्या बेडरूम मध्ये संगीता.. संगीता.. पंख्याला लटकलेली होती.” काकांनी कसंबस सांगितलं.
“कक् .. काय?”
“सुरेखा तिथूनच किंचाळत आमच्याकडे आली. तिला बोलताही येत नव्हतं. नुसती तिकडे बोट दाखवत होती. मग मी आणि काका इथून धावतच गेलो. संगीताने ओढणीने फास घेतला होता. आम्ही दोघंही घाबरलो. मग आधी तुला फोन केला. तू फोन उचलला नाही. मग मी खाली गेलो. नेमका खालचा सुधीर घरी सापडला. मग तो आला. तसही पोलिसांना कळवावं लागणार होतं. आम्हाला तर काही सुचत नव्हतं. मग सुधीरनेच पोलिसांना फोन केला. लगेच पोलीस आले. अॅम्बुलन्स आली. तेच लोकं संगीताला लाईफ लाईन मध्ये घेऊन गेले. पोस्टमार्टम करायला.” काकांनी सांगितलं.
“पोस्टमार्टम?..”
“डेड बॉडीचं. तुझ्या आईलाही कळवलंय मी इथे यायला. त्यांचा नंबर होता माझ्याकडे. तुझे आईबाबा इकडे यायला निघाले आहेत. संध्याकाळ पर्यंत येतील.” काकू म्हणाल्या.
संदीप तसाच सुन्नपणे बसून राहिला. बाहेरची कुजबुज वाढत होती.
“मिनी कुठे आहे काकू?”
“खाली. सुधीर घेऊन गेला तिला इथे गर्दी होती म्हणून. तिथे तन्वी आहे तिच्या बरोबर.” काकू म्हणाल्या.
संदीप चा फोन वाजला. आईचा होता.
“कुठे आहेस संदीप तू? काय झालं असं अचानक?” आईच्या आवाज कापत होता.
“माहीत नाही आई. मी आत्ताच आलो.” संदीप ला रडायला येत होतं.
“आम्ही तीन चार तासात पोचतोच आहे संदीप. तू धीर धर. मिनीला सांभाळ. संगीताच्या घरी कळवलं का?” फोन वर आता बाबा बोलत होते.
“सांगतो..”
“संदीप तुला बाहेर बोलवत आहेत पोलीस.” बाहेरून आवाज आला.
*****
(क्रमश:)
बापरे! पुढील भागाची उत्कंठा
बापरे! पुढील भागाची उत्कंठा आहे.
उत्कंठावर्धक लेखन छान.
उत्कंठावर्धक लेखन
छान.
बाप रे . छानच सुरुवात. काय
बाप रे . छानच सुरुवात. काय झाले असेल नक्की? सांसरिक लोकांचे तिढे. आता हे फार भयानक वाटतात.
भारी.. प्रसंग डोळ्यासमोर आला
भारी.. प्रसंग डोळ्यासमोर आला
भांडणे करावीत, कारण ती स्ट्रेस बस्टर असतात. पण त्यानंतर मिटवावीत, ताणू नये....
पण हे नक्की तसेच आहे की आणखी काही.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत
सुरुवात तर जबरदस्त झालीय...
सुरुवात तर जबरदस्त झालीय... पू भा प्र
नवरा जेव्हा पेपर घ्यायला परत
नवरा जेव्हा पेपर घ्यायला परत आला तेव्हा त्याने काहितरि केले असावे असा संशय आहे मला
सुसाट वेग... आवडेश!!!
सुसाट वेग...
आवडेश!!!
धन्यवाद वावे, कुमार, अमा,
धन्यवाद वावे, कुमार, अमा, ऋन्मेष, आबा, अमि.
उद्या टाकते पुढचा अंतीम भाग.
सांसरिक लोकांचे तिढे. आता हे फार भयानक वाटतात.>> खरं आहे. (आमच्या वेळी असं नव्हतं च्या कॅटेगरीत मी आहे..)
भांडणे करावीत, कारण ती स्ट्रेस बस्टर असतात. पण त्यानंतर मिटवावीत, ताणू नये....>> हल्ली संगळ्यांचीच ‘मी’ स्पेस वाढलीय.
नवरा जेव्हा पेपर घ्यायला परत आला तेव्हा त्याने काहितरि केले असावे असा संशय आहे मला .>> संशयाला वाव आहे.
बापरे, थरारक सुरवात आहे.
बापरे, थरारक सुरवात आहे.
थरारक सुरवात आहे.>>>+१
थरारक सुरवात आहे.>>>+१
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!!
कथावस्तू इंटरेस्टिंग वाटतेय,
कथावस्तू इंटरेस्टिंग वाटतेय,
पुढचा भाग जास्त गोष्ट कव्हर करेल असे वाटतंय
वाट पाहतोय
पुलेशु
पुलेशु
प्रतिसादाबद्दल धन्यवाद king
प्रतिसादाबद्दल धन्यवाद king of net, धनुडी, रूपाली, सिम्बा, च्रप्स .