केवळ व्हॅलेंटाइन

Submitted by निशिकांत on 14 February, 2022 - 09:32

कुणी आणला, कुठून आला? प्रेमळ व्हॅलेंटाइन
तरुणाईला का आवडतो केवळ व्हॅलेंटाइन?

पूर्व तयारी झाली होती चुंबन दिवसाने
नंतर आले सोसाट्याचे वादळ व्हॅलेंटाइन

झपाटते का भूत एवढे प्रेमाचे या दिवशी!
पिशाच्च नांदे जिथे तोच हा पिंपळ व्हॅलेंटाइन

वेग एवढा झेप एवढी या गब्रुची असते!
तोडत येतो संस्कृतिचाही कातळ व्हॅलेंटाइन

"लव्ह यू" मधली काम वासना जोवर कायम आहे
तिचिया गाली आण्त राहिल ओघळ व्हॅलेंटाइन

जे बसते! केलेले नसते त्या प्रेमासाठीही
दिवस कशाला हवा घालण्या गोंधळ व्हॅलेंटाइन

निस्पृह नांदे खेड्यांमधुनी प्रेम आपसामधले
इथे वाहणारा दिसला का खळखळ व्हॅलेंटाइन?

व्हॅलेंटाइन बुरा चांगला वर्तनातुनी ठरतो
प्रांजळ अथवा कधीच नसतो ओंगळ व्हॅलेंटाइन

आवडते "निशिकांत"ला तिच्या आठवात हरवाया
बघून अमुचे प्रेम कापतो चळचळ व्हॅलेंटाइन

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--लवंगलता
मात्रा--८+८+८+४=२८

Group content visibility: 
Public - accessible to all site users