प्रेमिका!

Submitted by अज्ञातवासी on 14 February, 2022 - 05:34

"काहीतरी सुंदर, काहीतरी गूढ.
त्याला समर्पित तू आणि मी...
तुझ्या डोळ्यात बघताना असं वाटायचं, की मी या कृष्णविवरात खेचला जाईन...
अक्षय्याकडे, अनंताकडे..."
"तू महान आहेस, अजेय आहेस. योद्धा आहेस... तुझ्या महानतेला सगळं जग सलाम करेल माझ्या प्रियतमा..."
तो किंचित हसला.
"तुझ्या उग्र मुद्रेवर हे किंचितच हसू शोभून दिसतं..."
"हो माझी प्रिया."
तीसुद्धा हसली.
"तू आजपर्यंत माझ्याकडे काही मागितलं नाही. आपलं नातं तर माझ्यासाठी सुद्धा एक कोडं आहे, ना कुणाला दाखवता येत, ना कुणाला सांगता येत... कधीतरी येतेस, हवेच्या मंद झुळूकीसारखी, आणि जातेस... ना येताना दिसत नाहीस, ना जाताना..."
"याचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करत नाही, असा होत नाही. लक्षात ठेव, मृत्यूनंतरसुद्धा मी तुझी सोबत करेन."
"हो, त्यासाठीच मी झगडतोय. दररोज माझ्या समोर फक्त तुझा दरबार असतो, आणि तुझ्या दरबारातला सगळ्यात महत्वाचा सरदार मी..."
"मृत्यू हे शाश्वत सत्य आहे प्रियतमा, आणि तू फक्त कारण. या जगात फक्त महान, शुद्ध लोकांनीच राहावं, यासाठीची दैवी योजना..."
"माझा दैवावर भरवसा नाही. माझा विश्वास फक्त तुझ्यावर आहे. सांग प्रिया, आजच्या दिवशी तुला काय हवय..."
"माझी पूजा कर, आणि ती पूजा मृत्यूनेच होऊ शकते..."
"म्हणजे?"
"तू आजपर्यंत जे केलस, त्यामुळे तू अमर होशील... त्या अशुद्ध रक्तियाना तू ठार केलंस, त्याबद्दल मी तू कायम माझा विशेष असशील..."
"पण आता वेळ झालीय, माझ्या दरबारात चलण्याची, जिथे तुझं सर्वात उच्च स्थान असेल..."
"प्रिया..." तो स्वतःशीच हसला...
...आणि हिटलरने स्वता:वर गोळी झाडली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूढकथा ...!
छान लिहिली आहे...!