निर्माल्याचा जुना जुना मकरंद केवढा सुंदर

Submitted by बेफ़िकीर on 14 February, 2022 - 03:18

नवी गझल - १४.०२.२०२२
=====

निर्माल्याचा जुना जुना मकरंद केवढा सुंदर
नवे न काही सुचणे हा आनंद केवढा सुंदर

त्यांच्या पूर्तीसाठी आता झुंजत नाही, बघता
हा इच्छांनी पुकारलेला बंद केवढा सुंदर

आतमधे येऊन निराशा पदरी पडण्यापेक्षा
तुमच्या हृदयाचा दरवाजा बंद केवढा सुंदर

तुला कळावे म्हणून मी आजन्म कशाला लढलो
तुला न ऐकू येणारा आक्रंद केवढा सुंदर

किती बिचारा थकला होता मला टिकवण्यासाठी
श्वास जरा झाला आताशा मंद...केवढा सुंदर

कुणीच नसते साथ द्यायला तेव्हा कोठे कळते
स्वतःत रमण्यामधील परमानंद केवढा सुंदर

'होता आले नाही' म्हणून हसू नका मित्रांनो
'बेफिकीर' म्हणवून घ्यायचा छंद केवढा सुंदर

=====

-'बेफिकीर'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला कळावे म्हणून मी आजन्म कशाला लढलो
तुला न ऐकू येणारा आक्रंद केवढा सुंदर

किती बिचारा थकला होता मला टिकवण्यासाठी
श्वास जरा झाला आताशा मंद...केवढा सुंदर

कुणीच नसते साथ द्यायला तेव्हा कोठे कळते
स्वतःत रमण्यामधील परमानंद केवढा सुंदर

'होता आले नाही' म्हणून हसू नका मित्रांनो
'बेफिकीर' म्हणवून घ्यायचा छंद केवढा सुंदर>>>>>> मला अख्खी जरी आवडली, तरी हे शेवटचे जास्त आवडले.

छान आहे. आवडली. फक्त एक ओळ थोडी खटकली.
'तुमच्या हृदयाचा दरवाजा बंद केवढा सुंदर' - बाकी ठिकाणी तू तुला असे एकेरी उल्लेख असताना इथे अनेकवचनी का बरं? त्या ऐवजी 'तुझ्या दिलाचा दरवाजा हा बंद केवढा सुंदर' हे चालेल का? की माझा संदर्भच चुकतो आहे?

आतमधे येऊन निराशा पदरी पडण्यापेक्षा
तुमच्या हृदयाचा दरवाजा बंद केवढा सुंदर

नविन कादंबरी लिहा म्हणजे सगळे दरवाजे उघडतील....

मस्त !