लता मंगेशकर - एक पर्व, एक कलाकार , एक व्यक्ती

Submitted by शांत प्राणी on 12 February, 2022 - 00:51

लता मंगेशकर

अनेकांनी अनेक वेळा या दोन शब्दांनी बनलेल्या व्यक्तीबद्दल भरभरून लिहीले आहे. गाण्यांबद्दल लिहीले आहे. मुलाखती घेतलेल्या आहेत. असंख्य व्हिडीओज बनलेले आहेत. तरीही या धाग्याचं प्रयोजन काय याचं उत्तर मला स्वतःलाही ठाऊक नाही. पण या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला काही न काही बोलायचे आहे ही गोष्ट खरी आहे.

भारतात आज टोकाचे व्यक्तीस्तोम , भक्ती किंवा मग टोकाचा राग किंवा द्वेष सरफेसवर दिसतो. यातून काही विचित्र म्हणी जन्माला आलेल्या आहेत. तुम्ही प्रेम करा किंवा द्वेष करा, पण तुम्ही त्याचा अनुल्लेख करू शकत नाही इत्यादी. या सर्वांमधे टोकाच्या भूमिका गृहीत धरलेल्या आहेत. पण बहुसंख्य लोकांच्या बाबतीत ते या दोन्ही गटात मोडत नाहीत.

त्यांच्यासाठी लता मंगेशकर भारतात आजवर जेव्हढे गायक होऊन गेले त्यातले सर्वोच्च नाव आहे. काहींना त्या चित्रपटसृष्टीत ज्या सात गायकांनी पार्श्वगायनाची नवीन पद्धत आणली त्यातल्या एक भक्कम खांब वाटतात. त्या माणूस होत्या. त्यांना मृत्यू अटळ नव्हता. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. माणूस म्हणून त्यांच्या काही चुकाही झाल्या. त्याबद्दल त्यांच्या मनात नाराजी सुद्धा आहे. पण प्रत्येक कलाकार हा सर्वगुणसंपन्न मनुष्य असायला पाहीजे ही त्यांची अट नाही. ते कलाकाराची कला बघतात. ते येता जाता लताची गाणी ऐकतात, गुणगुणतात. कधी कधी आवर्जून फक्त लताच्या रेकॉर्ड्स लावतात. त्या बरोबरच कधी आशा कधी रफी, किशोर ऐकत राहतात. जास्तच रसिक असेल तर मग तलतचा मखमली आवाज आणि मन्नाडेची शास्त्रीय गाणी त्यांची गाण्याची तहान तृप्त करतात. त्यांना किशोरी आमोणकर कळत नाही. गंगूबाई हनगल समजत नाहीत. भीमसेन जोशी अभंगवाणीद्वारे त्यांना माहिती असतात. रम्य ही स्वर्गाहुनी लिंका मुळे ते माहिती असतात. पंडीत अभिषेकी त्यांना महानंदा मुळे आणि दूरदर्शनमुळे माहिती असतात. पण बारकावे माहिती नसतात. पं. जसराज, अजित कडकडे हे कानावर पडले तर ते नाही म्हणत नाहीत. त्यांना शास्त्रीय संगीतावरचे शंकराभरणम सारखे सिनेमे दुसर्‍या भाषेत असूनही पहावेसे वाटतात. सागरसंगमम सारखा शास्त्रीय नृत्य या विषयावरचा सिनेमा त्यांनी पाहिलेला असतो. सूरसंगम हिंदीत पाहिलेला असतो. या लोकांनी सरगम सुपरहीट केलेला असतो. याच लोकांनी "जॉन जॉनी जनार्दन ता रा रम पम पम पम पम" किंवा " चार बारा मारेंगे, एक बारा गिनेंगे, दात तेरे तोडेंगे" " म म्मं मियां पम पम" " मन्नु भई मोटर चली पम पम पम पम " अशी गाणी हिट केलेली असतात. हे कशाला नाही म्हणत नाहीत. जे जे नवीन येईल त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. काही काळाने जबाबदारीच्या ओझ्याखाली पिचल्यावर मग नव्याचा स्विकार करेनासे होतात. जुन्याच दिवसात रमतात. ज्या दिवसाच्या आठवणी रम्य तेच हवे हवेसे वाटते. त्या दिवसांशी निगडीत जे जे सर्व ते ते चांगले वाटते. कठीण काळातले काहीच नकोसे वाटते.

या गटाचा प्रतिनिधी म्हणून मी लता मंगेशकरांकडे बघतो.
पूर्वी मेल सिंगर्सची गाणी जितकी जास्त लक्षात रहायची किंवा लक्ष देऊन ऐकायचो तितकी फिमेल सिंगर्सची गाणी नव्हतो ऐकत. कारण गुणगुणताना मेल सिंगर्सची गाणी ओठावर येत. असे नाही कि फिमेल सिंगर्सची गाणी आवडत नव्हती. त्यामुळे आशा. लता यांच्या गायकीकडे फारसे लक्ष जायचे नाही. माझ्या मागच्या पिढीत तर वाद चालायचे ते रफी ग्रेट कि किशोर.

हळू हळू रफी, मन्नाडे मुळे बारकावे समजू लागले. या दोघांनी मग लताकडे नेले. इथे मग एक कानसेनी शाळा सुरू झाली.
जिथे रफीचे शब्दाशी किंवा सूराशी खेळणे असेल तिथेच लता मंगेशकरांचे गाणे शब्द जसाच्या तसा पोहोचवण्याच्या कडक शिस्तीचे आहे हे समजत गेले. आशा भोसले बर्‍याचदा सूरांशी खेळते, शब्दांच्या उच्चारांशी खेळते. लताबाई क्वचितच असे करताना दिसतात. शब्द जसे आहेत तसे त्याच्या मूळच्या सौंदर्यासहीत पोहोचवले पाहीजेत हे हृदयनाथ मंगेशकरांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. त्यांच्या गुरू लताबाई राहिलेल्या आहेत. त्यामुळे मूळ शिकवण लताबाईंचीच असणार. त्यांची शब्दांची, अर्थाची समज सुद्धा बरेचदा इतरांच्या मुलाखतीतून कळते.

हिंदी चित्रपट संगीत किंवा पार्श्वगायन ही वेगळी कला आहे हे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांनी व्यवस्थित जाणले होते. हे दोन पार्श्वगायन कलेचे स्कूल्स आहेत. जिथे रफींनी प्रत्येक गायकासाठी वेगवेगळा आवाज लावण्याची किंवा त्याची ढब गाण्यात आणण्याची पद्धत सुरू केली तिथे लता मंगेशकरांनी गाण्याचा भाव घट्ट पकडून ठेवत स्वच्छ शब्दांचे उच्चार आणि जवळपास दैवी वाटावा असा आवाज लावत प्रत्येक नायिकेला पडद्यावर आश्वासक वाटायला लावले. निव्वळ या आवाजाने कित्येक नायिका गाण्यात आहेत त्या पेक्षा कितीतरी सुंदर वाटू लागल्या.
मोहम्मद रफी आणि लता ही माझ्यासारख्या काहींसाठी दैवते आहेत. तरीही अलंकारीक भाषेत किंवा त्यांची तुलना दैवी गोष्टींशी करण्याची इच्छा होत नाही. अलौकीक गोष्टींची पुटं त्यांच्या गायकीला, आवाजाला जोडण्याची इच्छा होत नाही. अशाने मग कुणाला लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी होताच येणार नाही. जे जे दैवी ते आपले नाही असे सामान्यांना वाटते. हे लोक खडतर परिस्थितीशी झगडून यशस्वी झाले आहेत.

लता मंगेशकर जेव्हां पार्श्वगायन क्षेत्रात आल्या तेव्हां हे क्षेत्र काही घरंदाज स्त्रियांसाठी नव्हते. या क्षेत्राकडे पाहण्याची सर्वसामान्य लोकांची दृष्टी अजिबातचाआंगली नव्हती. आपली मुलगी चित्रपटात पाठवायची तयारी नाही, मात्र मनोरंजन म्हणून "बघू, तरी काय दिवे लावलेत मंडळींनी" म्हणून जाणारे जसे होते, तसेच पिटातले प्रेक्षकही होते.

भारतात औरंगजेबाच्या काळात संगीत लुप्त झाले. त्याच्या दहशतीने खुल्या मैफिली बंद झाल्या. ते कोठे आणि तवायफांच्या बैठकीत जिवंत राहीले. पहाडात, लोकगीतात जिवंत राहीले. गावकुसाबाहेर ते तरले. कोठ्यांवर मात्र संगीत , कला यांचे उत्तम संवर्धन झाले. या जोडीला संगीताच्या घराण्यांनी गुरू शिष्य परंपरेने ते एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरीत झाले. यानंतरचा काळ धामधुमीचा, गुलामीचा होता. आणि मग पुन्हा संगीताला चांगले दिवस येऊ लागले. नाटक कंपन्या आल्या. ऊस्ताद मंडळींकडे लोक जाऊन शिकू लागले. त्याचे प्रदर्शन करू लागले. निव्वळ संगीत नाटके होऊ लागली. त्यांचीच छाप सुरूवातीच्या चित्रपट संगीतावर पडली. त्यात शास्त्रीय - क्लासिकल किंवा सेमी क्लासिकलचा वाटा मोठा होता.

कुंदनलाल सैगलने भावसंगीत आणले. पण गाण्याची शैली नाटकाचीच राहिली.
तिला आजचा जामानिमा देण्यात बर्मनदा, सी रामचंद्र, मदनमोहन, शंकर जयकिशन, अनिल विश्वास , रोशन , जयदेव इत्यादी सुरूवातीच्या संगीतकारांचा मोठा वाटा आहे. त्यांना तसे गायक मिळाले.

कुणीतरी विचारले की नूरजहा नसती तर लता मंगेशकर ही लता मंगेशकर झाली असती का ?
हा जर तरचा प्रश्न आहे. तरीही संगीतातले आजचे बदल बघता, त्यात होत असलेले बदल बघता नूरजहांच्या काळात सुद्धा लता झालीच असती. ती काळाची मागणी होती.
पाकिस्तान बनला तेव्हां उत्तम संगीतकार गायक तिकडे गेले. शास्त्रीय गायनाची एक परंपरा गेली. पाकिस्तानी संगीत पूर्वीपासून समृद्ध होते. पण तिथल्या चित्रपटांनी मान टाकली. त्याउलट भारतातली चित्रपटसृष्टी बहरली. इथल्या रसिकांचाही तीत वाटा आहे. पाकिस्तानात त्यामुळे संगीत मुशायरे, सूफी संगीत, कव्वाली, महफिली यातून जिवंत राहीले. भारतीय चित्रपटसंगीतात त्याची हजारो वेळा चोरी झालेली आहे. पाकिस्तानात चित्रपटसंगीत हा प्रकार चित्रपटांच्या दर्जाच्या किंवा मागणीच्या अभावी लोप पावला. नूरजहां सारख्या गायिकेलाही ती तगवता आली नाही.

"आयेगा आयेगा " अशा आणि त्या आधीच्या सुरूवातीच्या गाण्यात लतावर तत्कालीन फिमेल सिंगर्सच्या शैलीचा प्रभाव जाणवतो. पण लवकरच नव्या दमाच्या संगीतकारांच्या रचनांमुळे लता खुलून आली. रहें ना रहें हम या गाण्यात नूरजहांच्या शैलीच्या गायकीची आपण कल्पनाच करू शकत नाही. त्या गाण्यावर पूर्णपणे लताची छाप आहे. मुकेशच्या आवाजावर सुद्धा सुरूवातीला सहगलची छाप आहे. इतकेच काय एका गाण्यात रफी स्वतः पडद्यावर आहेत. ते गाणेही अगदीच सहगल किंवा सी आत्मा नाही तरी साधारण ज्याला रफी म्हणता येणार नाही अशा शैलीचे ते गाणे आहे.

बदल अपरिहार्य आहे. लता, रफी हे बदलाचे शिलेदार होते. फारशी स्पर्धा नव्हती. खूप पैसाही नव्हता. अगदी कलिपदेवच्या काळात क्रिकेट मधे पैसा नसल्याने आईबापाने आपल्या पोरांना क्रिकेट हे करीयर म्हणून निवडू न देण्याचा जमाना असावा तसे. हे गायक गुणवान होते. चित्रपटसृष्टीची, नायक, नायिकांची गरज होते. जॉय मुखर्जी, राजेंद्रकुमार सारखे कलाकार तर अ‍ॅग्रीमेंट मधे रफीचा आवाज असला पाहीजे ही अट घालत होते. त्यामुळे त्या काळात नवीन गायकांची डाळ शिजणे कठीणच होते. तरीही कुणी न कुणी असे येत गेले की त्यांची दखल घ्यावीच लागली. किशोर कुमारच्या आवाजाची दखल घ्यावीच लागली. पुढे शैलेंद्रसिंग आला. काही काळ सचिनसाठी गीत गाता चल गाणारे जसपाअल सिंग येऊन गेले.

८० चे दशक रफी, मुकेश आणि किशोरकुमार या तिघांनाही घेऊन गेले. त्या काळात या तिघांची भ्रष्ट नक्कल असलेले गायक आले. पण यांचे फार काळ चालले नाही. खर्‍या अर्थाने नवे गायक यायला सुरूवात झाली ती उदीत नारायण, अभिजीत यांच्या रूपाने. आता जुन्या गायकांची नक्कल करून चालत नव्हते.

मात्र तरीही लता मंगेशकर च्या आवाजाने चित्रपटसृष्टीला इतके झपाटलेले होते की जी नवीन गायिका येईल तिच्यात लताच्याच गायकीच रूप शोधलं जात होतं. लता आणि आशा या दोन्ही बहीणींना दीर्घ आयुष्य लाभले. उत्तम आरोग्य लाभले. त्याच सोबत त्या अनेक वर्षे गाणे गात राहिल्या. टी सिरीजच्या मधल्या काळात त्या काही काळ दूर झाल्या होत्या. त्याची कारणे वेगळी होती. पण हम आपके है कौन पासून (खरे तर राम लक्ष्मण यांच्या मैने प्यार किया पासूनच) लताने पुन्हा साठीच्या पुढच्या वयात आपल्या तरूण आवाजाने पुन्हा हिंदी चित्रपटसंगीत भारून टाकले. या काळातल्या हेमलता, आलका याग्निक, अनुराधा पौडवाल या गायिका लताच्याच आवाजाची प्रतिरूपं होत्या. वेगळा आवाज हा आशाचाच.

वृद्धापकाळाने लता बाईंनी गाणे बंद केले. आणि मग वेगळ्या धाटणीच्या सुनिधी चौहान, श्रेया घोषाल येत गेल्या. अजूनही येताहेत. या काळात संगीत क्षेत्राकडे करीयर म्हणून पाहणार्यांची संख्या वाढली. संगीत क्षेत्र म्हणजे चित्रपट असे समीकरण अपरिहार्यरित्या तयार झाले. त्यात ज्यांना संधी मिळत नाही त्यांच्यात नकारात्मक भावना निर्माण होतेय, तर ज्यांना संधी मिळते, शक्यता आहे त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. प्रत्येक क्षेत्रातप्रमाणे इथेही जम बसलेले आहेत. ते नव्यांना येऊ देणार नाहीत. तर इतर प्रभावी क्षेत्रातल्यांना घुसखोरीला वाव आहे. अशा सर्व घडामोडींचा सध्याचा काळ आहे. एक वर्ग आहे ज्याला कुठेच संधी नाही. त्याला आता प्रस्थापित प्रवाहाविरूद्ध मत बाळगावेसे वाटते. त्या मतातून आपला निषेध पोहोचावासा वाटतो. तरीही टॅलेण्टला संधी राहणारच आहे.

आजचे संगीत काही काळापूर्वी आवडत नव्हते. पण विशाल ददलानीने मिथुनला तोंडावर सुनावले होते "ज्या चित्रपटात तू काम केलेस त्या पेक्षा आजचे चित्रपट संगीत लाख दर्जेदार आहे. आजच्या इतके प्रयोग पूर्वी कधीही झालेले नाहीतः".

मुलीच्या संगीतशिक्षणाने असेल किंवा दृष्टीकोन बदलल्याने असेल, लताच्या अनुपस्थितीने असेल. आजचे चित्रपट संगीत ऐकताना लता रफी यांचे संकेत जुने झाल्याचे दिसते. आता नायक / नायिकांना साजेल असे आवाज दिसत नाहीत. त्यांची ढब उचलून व्हॉईल्स मॉड्युलेशन केले जात नाही. अनेकदा गाणी आधी तयार होतात आणि ती चित्रपटात नंतर येतात. काही वेळा तर गाणे चित्रपट संपल्यावर येते. सिच्युएशनल गाणे जवळपास बंद झाले आहे.

लता रफी आणत होते त्यानंतरचा आजचा हा बदलाचा काळ आहे. आमच्यासारख्यांना जुळवून घेणे अवघड आहे. गाण्यात एका सेकंदात हजार फ्रेम्स पाहण्याची सवय नाही. कर्कश्श आवाजाच्या फिमेल सिंगर्स हा कानाला धक्काच आहे. पण हळू हळू जुळवून घेतोय. मग या काळातल्या पिढीला आमचे गायक कसे वाटत असतील ?

मुलीला मुद्दाम जुनी गाणी ऐकवतो.
लताचा आवाज ऐकताच तिच्या चेहर्‍यावर येणारे आश्चर्याचे भाव पाहून लताभक्त या कॅटेगरीत न मोडणारा मी पण सुखावतो. तिला हे सर्व जादूसारखे वाटते. मी नाही असे गाऊ शकत असे ती म्हणते. मग तिला लता मंगेशकरचा संघर्ष सांगावा लागतो. ती सुद्धा हाडामांसाची आपल्यासारखी एक मुलगी होती यावर तिचा विश्वास बसत नाही. तिने लताला लता मंगेशकर म्हणूनच पाहिलेय. पण अलका याद्निक गायची थांबल्यानंतरच्या काळाची ती असून तिला लताची गाणी ऐकाविशी वाटतात.

ही गाणी गाताना कस लागतो असे ती कबूल करते यातच सर्व आलं. वो एक जमाना था ! लेकीन सच मे सुहाना था.
ही माणसं आता पुन्हा होणार नाहीत. असे प्रत्येक पिढीला वाटते. तरीही आजच्या पिढीने शिक्कामोर्तब केले आहे.

लता मंगेशकर हे नाव नव्या पिढीवर सुद्धा अनेक वर्षे सांगितिक राज्य करणार आहे.

मग लता मंगेशकर या नावाशी निगडीत अनेक वाद चालूच राहतील. अनेक नकारात्मक कहाण्या जिवंतच राहतील . रफी लता वाद, भालजींचे प्रकरण , लता आशा वाद, लता सुमन कल्याणपूर, वाणी जयराम प्रकरण या कहाण्या लता हे नाव जिवंत आहे तोवर राहतील. कारण याच गोष्टी तिला माणूसपण बहाल करत राहतील.

नाहीतर जिवंतपणीच देवी बनवून टाकले असते लोकांनी.
लताच्या कुठल्या एखाद्या गाण्याचा उल्लेख करणे म्हणजे इतर अनेक उत्तम गाण्यांवर अन्याय झाला असता. शिवाय पसंद अपनी अपनी. पण एक आहे , ही गाणी हेच तिचे स्मारक आहे जे कधीही कुणालाही उखडता येणारे नाही. ते तसेच राहू द्यावे.

लता मंगेशकर या दिग्गजाहून दिग्गज कलाकाराला ही विनम्र श्रद्धांजली !

ताजा कलम : संगीतकार म्हणूनही लता मंगेशकर यांनी योगदान दिलेले आहे. भालजींना आपल्या चित्रपटासाठी वेगळ्या धाटणीचे संगीत हवे होते. दुर्दैवाने त्यांच्या पसंतीचे सर्वच संगीतकार त्यांना वेळेला उपलब्ध नव्हते. नव्या कुणाला संधी द्यावी तर आपल्याला हवे तसे संगीत मिळेल का ही शंका होती. तेव्हां लता मंगेशकर यांनी मी प्रयत्न करते असे उत्तर दिले. भालजींना काळजी वाटली. कारण लता हे नाव तेव्हां सर्वोच्च स्थानी होते. संगीत देण्याचा प्रयोग फसला तर अपयशाचा ठपका बसला असता. त्यांच्या स्थानाला धक्का बसला असता.

मा भालजींनी त्यांना टोपणनावाने संगीत देण्याचा आग्रह केला. हुकूमच तो. नंतर अनेकांनी टोपण नावे सुचवली. त्यातून मग लताबाईंनी आपल्यासाठी आनंदघन हे नाव घेतले. गंमत म्हणजे त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. त्यांनी फक्त मराठी चित्रपटांनाच संगीत दिले.

एकदा साधी माणसं या चित्रपटासाठी लोहाराच्या ऐरणीवर काम चालू असताना लोहार गाणे म्हणतो असे गाणे हवे होते. त्या वेळी ना मोबाईल होते ना एसटीडी. ट्रंक डायलिंग सुविधा असायची. ट्रंककॉल बुक करावा लागायचा. जो आजही महाग वाटेल असे दर असायचे. या सिच्युएशनसाठी गीतकार जगदीश खेबूडकर यांनी गाणे लिहून दिले होते. त्यात त्यांनी लोहाराच्य़ा ऐरणीला लोहाराचा देव बनवले होते.

लताबाईंनी चाल दिली. अगदी मीटर मधे बसणारे शब्द होते.

"ऐरणीच्या देवा तुला, आगीन फुलं वाहू दे "
पण लताबाईंना आगीनफुलं हा शब्द काहीसा खटकत होता. हा शब्द कविता म्हणून सुंदर आहे. पण त्याचे बोलगाणे होताना काहीतरी मिसिंग होते. त्यांनी कोल्हापूर सांगली भागातल्या त्यांच्या शाळेत फोन बुक केला. सर्वांकडे फोन नसायचा. ते शिक्षक असल्याने शाळेत होते. शाळेच्या जवळ एक तार ऑफीस होते. तिथे फोन सुविधा होती. खेबुडकरांना बोलावा असे सांगून लताबाईंनी पुन्हा ट्रंक बुक केला.

खेबुडकर वर्ग सोडून आले.
लता बाईंनी विचारले कि तुमच्या गाण्यात बदल करायची परवानगी हवी आहे. मला आगीनफुलंच्या ऐवजी ठिणगी ठिणगी हा बदल योग्य वाटतोय. तत्काळ खेबुडकर उत्तरले " अहो मग विचारायचं काय त्यात ? खूपच योग्य बदल आहे. त्यात नाद आहे, प्रास आहे. कानाला गोड वाटेल". लताबाई हसल्या आणि हा बदल अस्तित्वात आला. खेबुडकरांनी हा किस्सा सांगताना सांगितले "एव्हढ्या मोठ्या गायिकेने माझ्यासारख्या मराठी शिक्षकाला ट्रंक कॉल करून विचारावं हेच माझ्यासाठी थोर होतं...
असे अनेक किस्से आहेत जे या व्यक्तीमत्वाला महान बनवतात.

(लिहीताना निसटून गेलेला किस्सा नंतर आठवल्याने भर घातली आहे. लेख मोठा झाला याबद्दल क्षमा असावी).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! छान लिहिलं आहे!
शेवटचा किस्साही आवडला.
दुसऱ्या एका धाग्यावर मला वाटतं फारएण्डनी 'रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा' या गाण्याबद्दल लिहिलं आहे की ज्ञानेश्वरांची ही रचना इतक्या सुंदर संगीताच्या रूपाने आपल्याला ऐकायला मिळाली ती हृदयनाथ आणि लता मंगेशकरांमुळे.
त्याचप्रमाणे, उत्तमोत्तम कविता,( उदाहरणार्थ कुसुमाग्रजांच्या वेडात मराठे, सरणार कधी रण, सावरकरांच्या ने मजसी ने, जयोस्तुते, हे हिंदुनरसिंहा प्रभो शिवाजी राजा, भा. रा. तांबे यांच्या तिन्हीसांजा, घन तमी शुक्र बघ राज्य करी इत्यादी) या दोघा बहीणभावंडांमुळे लोकप्रिय होऊन घराघरांत पोचल्या. आवर्जून कविता वाचणारे आणि समजून घेणारे कमी असतात, पण त्या अशा प्रकारे ऐकल्यावर आपोआप त्या कवितां मधला (अर्थातला) आनंदही अनेकांना अनुभवायला मिळाला.

छान .

लेख अतिशय भावला. सुरेख लिहिले आहे.
अलौकीक गोष्टींची पुटं त्यांच्या गायकीला, आवाजाला जोडण्याची इच्छा होत नाही. अशाने मग कुणाला लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी होताच येणार नाही. >>>सहमत.
लताबाईंबाबत 'झाले बहु , होतील बहु पण या सम हाच' , असे जरी असले तरी देवत्व बहाल करणे मलाही पटत नाही, अशाने त्यांच्या त्याग, समर्पण, गायनाबाबतची निष्ठा व संघर्षांकडे डोळेझाक होईल असे वाटते.
त्यांचे 'पायोजी मैने राम रतन' ऐकले दुसऱ्या कुणाचे ऐकवतच नाही. इतकं स्वच्छ, सुंदर, पवित्र आणि अकिल्मिष भजन गायलं आहे की बस्स !!!

लेख आवडला. वाचताना बरेचदा मनात 'हो, खरंय!' असे आले.
आधीचा आढावा छान आला आहे. शेवट आवरता घेतल्यासारखा वाटला. ऐरणीच्या देवाचा किस्साही छान.

लेख आवडला. लताचे शब्दोच्चार अगदी crystal clear म्हणावेत असे असतात. लताची श्रद्धांजली सिरीज मला फार आवडली होती.

मी आधी एका धाग्यावर माझ्या लता दीदी प्रेमाबद्धल लिहिले होते... माझ्या तीन आवडत्या गायिका - लतादीदी, श्रेया घोषाल आणि नेहा कक्कड...

लतादीदी गेल्यात तो दिवस खूप इमोशनल होता...
कांटो से खिच के ये आचल त्या दिवशी रिपीट वर ऐकत होतो ...
आदरांजली !!!

लेख आवडला !!!

छान झालाय लेख. वृत्तपत्रात द्या.

लेकीबाबत लिहिलेले वाचून तर अगदी अगदी झाले. सध्या आमच्याकडे रात्री लतादिदीच ऐकल्या जातात. शेवटचा किस्साही छान. त्या गाण्यात ठिणगी ठिणगी या शब्दातील रिदम मस्तच वाटतो. ऐकायलाही आणि गायलाही.

सर्वच प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

@वावे - खूप छान प्रतिसाद आहे. रुणुझुणू बद्दल अगदीच सहमत. हृदयनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे कवितेचं अंगभूत सौंदर्य खुलून येण्यासाठी ते वाद्यमेळा कमीत कमी वापरत, तसेच चाल काव्यावर, अर्थावर अतीक्रमण करणार नाही हे पाहता. उदा - ती गेली तेव्हां..

@अस्मिता - इतकं स्वच्छ, सुंदर, पवित्र आणि अकिल्मिष >>>> क्या बात है !!

@ गजानन - शेवट आवरता घेतल्यासारखा वाटला. >>> हो बरोबर आहे. माझ्याकडून मोठं काही लिहून होत नाही. एका बैठकीत झालं नाही तर मग नंतर ते होतच नाही. इथे काय लिहू नि काय नको असे झाले होते. त्यामुळे आवरते घेतले. नंतर पुन्हा कधीतरी योग्य वेळ पाहून बोलूच.

खुप खुप सुन्दर लेख.... काही लोक अमर असावेसे वाटतात... त्यातल्या एक लता दीदी....
मरण अटळ आहे माहिती असलं तरी अशा लोकांना येउ नये असं वाटतं.... "श्रद्धांजली" असा शब्द लिहवत नाही... कधीच लिहु शकणार नाही मी त्यांच्यासाठी.....
त्या गेल्या तो दिवस ...डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं...
गाणी तर सतत चालुच आहेत... अखंड... .. रोज एखादं नवीनच गाणं आठवतं... अरेच्चा..किती दिवसात हे ऐकलच नाहिये असं लक्षात येतं...
काल दिवसभर...."तुम आशा विश्वास हमारे...तुम धरती आकाश हमारे " चालु होतं.... ..स्वर्गीय केवळ....