२ प्रेमी प्रेमाचे
इसवी सन २०१५
यश = स्वप्नील जोशी
प्रिया = गिरीजा ओक
यशचा बाप =अरुण बक्षी
पहिल्या सीनमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला
जाते, तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीशी प्रेमालाप करत असतो.
प्रिया हळवी आहे, मृदू आहे. हे दृश्य पाहून तिचा दिल दुखतो. ती तडकाफडकी बॅग भरून ते शहर सोडते आणि खुशी
नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाते.
कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्या इंपल्सेसवर जगता ना ! तुमच्या मनात आलं की बॅगा भरता आणि शहरं
सोडता..! जॉबचा किंवा पोटापाण्याचा वगैरे प्रश्नच कुठे
उपस्थित होतो !
आणि सगळी दुनिया आपलीच असताना तुम्ही कशासाठी डरता ?
तर खुशी मैत्रीण प्रियाचं सांत्वन करते की बरं झालं तुला
लवकर कळलं की तुझा बॉयफ्रेंड तुला फसवतोय ते..! अन्यथा काही जणांच्या बाबतीत ते म्हातारपणापर्यंत कळत नाही. त्यामानाने हे बरंच झालं.
प्रियाला हे पटतं. प्रिया तशी सूज्ञ आहे.
आपल्याच मस्तिष्कामध्ये काहीतरी बिघाड आहे..!
दुसऱ्या सीनमध्ये यश गाडीत बसून कुठेतरी
निघालाय आणि त्याचं पाकीट रस्त्यावर पडताना
प्रियाला दिसतं.
प्रिया यशचा पाठलाग करते.
आता यश एका अनाथाश्रमात पोचलाय.
कॅमेरा अनाथाश्रमाच्या संचालिकेच्या चेहऱ्यावर..!
संचालिका स्वगत म्हणतेय की 'मुलं एवढा
जल्लोष करतायत म्हणजे नक्कीच मिस्टर यश
आले असणार.!'
संचालिका यशला कसलीतरी ब्लू प्रिंट दाखवण्याची
तीव्र इच्छा व्यक्त करते.
पण यश म्हणतो की मी ते नंतर कधीतरी पाहतो.
कारण मला आत्ता ह्या अनाथ मुलांवर खूप खूप प्रेम करायचं आहे..!
मग लगेच तो एका रडणाऱ्या मुलीची समजूत
काढताना दिसतोय. तो तिला गोष्ट सांगतोय.
गोष्टीतून तमाम मुलांना आपोआपच मूल्यशिक्षण
वगैरेही मिळतंय. किंवा संस्कारांचा धबधबा वगैरे..!
बाकी ती गोष्ट एवढी फुसकी आहे की समजा माझ्या
लहानपणी कुणी सांगितली असती तर
तेव्हासुद्धा मी फिदीफिदी हसलो असतो.
परंतु हा सिनेमा आहे.
आणि शिवाय हा यशदादा गोड गोज्जुला गोज्जुला
आहे. त्यामुळे सगळ्या मुलांना यशच्या गळ्यात
झेपावून पाप्या वगैरे द्याव्या लागतात.
बाकी ह्या यशचा चेहरा साखरेच्या पाकात घोळून
काढल्यासारखा हरहमेश गोडच दिसतो.
त्याच्यावर माशा वगैरे कशा काय बसत नाहीत ?
प्रिया हे सगळं दुरून बघतेय. तर मग ओळख वगैरे.
शिवाय आता त्या मुलांवर खूप खूप प्रेम आणि
संस्कार वगैरे करून झालेलं आहे. आणि शेवटी
अनाथाश्रमात किती काळ थांबणार ना माणूस..!
म्हणून मग यश प्रियाला अंधेरीला सोडायला
निघतोय. यशने गाडीत 'नादान'जींची गझल
लावलीये. योगायोगाने नादानजी हे प्रियाचे फारच
आवडते शायर आहेत.
{ओह् कम्मॉन् ! असे दैवी योगायोग असतातच ना म्हणजे..!}
तर मग ती त्यांच्या समग्र गझलांचा आणि एकूणच
जीवनदृष्टीचा रसास्वाद दोनच वाक्यांमध्ये उकलून दाखवते.
आणि शेवटी व्याकुळपणे म्हणते की हे नादानजी गुप्त
का राहतात कळत नाही..! ते कधीच लोकांसमोर का बरं येत नाहीत..!
यावर यश लाजतोय..!
मग आता ह्याच्यामध्ये नादानजी कोण असावेत,
ह्यात काय ढेकळं सिक्रेट राहिलं?
अचानक प्रिया एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जातेय.
पण त्या जॉबसाठी पंचेचाळीसपेक्षा जास्त वयाच्या
स्त्रियांनाच बोलावलंय असं कळतं.
हा जॉब यश नावाच्या टोणग्याला सांभाळण्याचा
असतो.
कारण लगेच तिथे यश डोकं धरून आचके देत
कोसळताना दिसतो. ह्या सीनमध्ये आचके वगैरे
देण्याच्या निमित्ताने यश मुद्दाम एक फ्लॉवरपॉट टेबलावरून खाली पाडतो.. हे एक करावं लागतं. पाडापाडी केल्याशिवाय प्रसंगात पुरेसं नाट्य येत नाही. प्रिया तिथेच
दबा धरून उभी असते. ती भूमिकेत शिरून त्याला सावरते.
यशचा बाप कोट्याधीश बिझिनेसमन वगैरे
असल्यामुळे सगळीकडे सूट बूट घालून फिरणं
त्यास कंपल्सरी आहे.
पुढच्या सीनमध्ये हा बाप प्रियाच्या घरी येऊन
तिला गळ घालतो की तुम्ही हवा तेवढा पगार,
जगातील कोणतीही किंमत घ्या; पण यशला
सांभाळण्याचा हा जॉब स्वीकारा.
कारण यशला ब्रेनट्युमरचा ॲटॅक येतो तेव्हा
मोठ्यातला मोठा डॉक्टरही त्याला सांभाळू
शकत नाही; पण तुम्ही मात्र काल त्याला अगदी
सहजपणे शांत केलेत..! अगदी कमालच केलीत !
ह्या मूव्हीचे संवाद लिहिणारा बहुधा हिंदी भाषिक
आहे. आणि मराठी अनुवाद करणाऱ्याने हमखास
गुगल ट्रान्सलेटरचा शॉर्टकट स्वीकारलाय. त्यामुळे बऱ्यापैकी सुंदर घोटाळे झालेले आहेत.
उदाहरणार्थ एका सीनमध्ये यशचा बाप म्हणतो की, "डॉक्टरांनी उत्तर दिलंय."
हा मूळचा हिंदी वाक्प्रचार असणार की,
"डॉक्टरोंने जवाब दे दिया है"
(जवाब दे देना= मरीज की हालत बहोत खराब होना)
किंवा एके ठिकाणी प्रिया म्हणते की,'या कामासाठी
मी तुमच्याकडून पैसे घेतले तर मी स्वतःच्याच नजरेत पडेन'
('मैं अपनेही नजर में गिर जाऊंगी' यावरून आलेलं
असणार..!)
तर अनुवादाची अशी हमाली यामध्ये ठिकठिकाणी बिनधास्त पेरलेली आहे.
यश-प्रियाचे बॉन्डींग डेव्हलप होतेय हे दाखवण्यासाठी
डायरेक्टरने त्यांना लालेलाल बर्फगोळे आणि पाणीपुरी
खायला लावण्याचे शिवाय रेस्टॉरंटमधले काही बिनकामाचे सीन्स टाकले आहेत. जे दोघेही आपापल्या परीने जीवावर आल्यासारखे उरकतात.
यश मधूनच अत्यानंदाने किंचाळतो की पूर्वी मला
थोड्याशा आवाजाने ॲटॅक यायचा, पण आता मी
एकदम मुक्त झालोय वगैरे..
पण हा आव दोन मिनिटांच्या वर टिकत नाही..!
पुढच्याच सीनमध्ये त्याच्या तोंडून मृत्यूच्या
घनदाट छायेसंबंधी दर्दे शायऱ्या कम् अतिचिकट
डायलॉग ओघळायला लागतात..! थांबतच नाहीत..!
म्हणजे समजा एकदा प्रिया सहजच म्हणते की ''किती रम्य संध्याकाळ आहे ना !''
यावर यश लगेच म्हणतो की, ''होय, अगदी माझ्या
आयुष्यासारखी! ज्याचा सूर्यास्त कधीही होऊ शकतो..!''
किंवा नंतर एके ठिकाणी तो चाहत्यांना म्हणतो की, "मित्रांनो, आपलं जीवन मोठं असो वा छोटं. एक ना एक दिवस त्याला मृत्यूसोबत जावंच लागतं..!"
तर यश ही असली उघड वैश्विक गुपितं पटाकदिशी आपल्या झोळीत टाकत राहतो. आपण फक्त तयार रहायचं. शिवाय असलं ज्ञान झेलायचं म्हणजे आपली झोळीही मजबूतच पाहिजे.
काही सीनमध्ये यश खोकताना दिसतो. काहींमध्ये ओकताना दिसतो. काहींमध्ये हॉस्पिटलमध्ये धापा टाकत झोपलेला
दिसतो... काहींमध्ये डोक्याला रंगीबेरंगी फडकी बांधून
बिझनेस डील करताना दिसतो.
काहींमध्ये स्वतःच गुपचूप कसलेतरी इंजेक्शन टोचून घेताना
दिसतो.
साला ह्या ब्रेन ट्युमरची नेमकी लक्षणं काय काय
आहेत, ते एकदा बघायला पाहिजे..!
बाकी त्याला सांभाळणे हा प्रियाचा जॉब प्रोफाइल..!
सांभाळणे म्हणजे पळत पळत जाऊन, 'काय झालं यश? काय होतंय तुला यश?' असे उद्गार काढणे..!
गाणी वगैरे आहेतच म्हणजे. एका सीनमध्ये डान्सच्या
नावाखाली, प्रिया जिन्याच्या रेलिंगला टेकून चक्क पाठ
खाजवून घेतानाही दिसते.
आणि कारचा भीषण ॲक्सिडेंट होत असताना
त्याच कारमध्ये बसून कुणी केस सावरत असतं का?
प्रिया सावरते..!
कॅमेरा आपल्या चेहऱ्यावर आला की हसायचं
आणि जुल्फे कानांच्या मागे सरकवायची, असे तिला
सांगितले गेले आहे..!
शेवटी शेवटी तर ह्यांचं बजेट फारच ढासळलंय
बहुतेक. कारण यश फुल बाह्यांचा बनियन घालून
कु-हाड वगैरे घेऊन थेट लाकडंच फोडताना
दिसायला लागतो.
लाकडं फोडता फोडता आकाशाकडे बघून हंबरतो,
की मी प्रेमात पडायलाच नको होतं. मला तो अधिकारच नाही. कारण मी आता मरणार आहे ओ sss
तर हे असं आहे सगळं..! किंवा हे असलंच आहे सगळं..!
बाकी ह्यात कथा स्क्रिप्ट वगैरे काही भानगडी
नाहीयेत. त्याची काही गरजही नसते खरं तर.
मनाला येईल तशी कथा स्वतःच आपली वाट
शोधत जाते. ! प्रत्येक वळणावर अंदाधुंद डायलॉग्जच्या
लेंड्या टाकत सुटते..! टुकारपणाच्या सर्व सीमारेषा धडाधड ओलांडून जाते.!
त्यामुळे शेवटही तसा ओपन एंडेड आणि मुक्तच ठेवला आहे. अमूर्त किंवा तत्सम कलात्मक टाईपचा. तुम्हाला त्यातून जो अर्थ काढायचाय तो काढा. किंवा समजा नसेल काढायचा तर मग मरा. तुम्हाला कोण अडवणार !!
आई ग्ग
आई ग्ग
डबघाईला येणे या वाकप्रचाराला
डबघाईला येणे या वाकप्रचाराला एक नवीनच आयाम येथे प्राप्त झाला आहे. >>>>.
मस्तच लिहिले आहे.
दुनियादारी मधेही कँसर(?) असं व्हेग सांगून इतका गुटगुटीत आणि सुदृढ दिसला होता की ग्राईप वॉटरच्या बाटलीवर बाळाऐवजी याचा फोटो लावतील. इथेही हेच दिसतेय.
श्रद्धा
योग्य वेळी हा बाफ आला आहे.
योग्य वेळी हा बाफ आला आहे. व्हॅलेंटिन दिनाच्या शुभ मुहुर्तावर अनेक प्रेमी जोड्यांना हा सिनेमा बघता येईल आता.
सी, त्या लिंकबद्दल धन्यवाद.
सी, त्या लिंकबद्दल धन्यवाद. मी सुरवात केली. एकदम हहपुवा
नादानजींचा एक शेर पेश करत आहे ( https://www.youtube.com/watch?v=BxY-OmpzDK4 इथे १२.०२ ला)
विरहाचं दु:ख का करता मित्रांनो
आपली माणसं कधीच दूर जात नाहीत
आपणच आहोत ज्यांनी दगडात देवपण शोधलंय
पण प्रत्येक कोरीव दगडात देव मात्र नसतो
पुढे बघण्याची हिंमत नाही.
विरहाचं दु:ख का करता
विरहाचं दु:ख का करता मित्रांनो
आपली माणसं कधीच दूर जात नाहीत
आपणच आहोत ज्यांनी दगडात देवपण शोधलंय
पण प्रत्येक कोरीव दगडात देव मात्र नसतो
<<<<<
मी पण ऐकला हा शेर.
यमक वगैरे काही नाही शेराला.
'समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता..'
पेक्षाही सवाई आहे शेर.
(मी चार ओळी एकाखाली एक लिहिल्यात, तर नादानजी कवितानियमानुसार ही चारोळी होईल का?)
विरहाचं दु:ख का करता
विरहाचं दु:ख का करता मित्रांनो
आपली माणसं कधीच दूर जात नाहीत
आपणच आहोत ज्यांनी दगडात देवपण शोधलंय
पण प्रत्येक कोरीव दगडात देव मात्र नसतो
मामी,
व्वा.! अगदी अचूक शायरी टिपलीय तुम्ही.! लोकं खरंतर मूर्ख आहेत. अजून किती काळ मोनालिसाच्या गूढ हास्याचे देव्हारे माजवत बसणारायत कळत नाही.!
इथे आपल्या नादाजींनी जे एक अद्भुत शब्दशिल्प उभं केलंय, त्यापुढे मोनालिसाचे हास्य वगैरे म्हणजे एखादी क्षुद्र सरपटणारी अळीच म्हणायला पाहिजे..!
फक्त चारच ओळीत मानवी आयुष्याचं मूलभूत दु:ख असं चिमटीत पकडायचं म्हणजे सिंपली ग्रेट.!
विशेषतः शेवटची ओळ तर फारच जीव घुसमटून टाकणारी आहे..! वरवर पाहता असे वाटेल की शेवटची ओळ ऐनवेळी कायतरी घुसडायचं म्हणून घुसडलेली आहे..! पण ते तसं नाही. थोर कलाकृतींमधला दंश असा पटकन येत लक्षात नसतो. !आजपासून शंभर वर्षांनी कुणी हे वाचलं तर त्याला नक्की कळेल मी काय म्हणतो ते..! त्याला कळेल की असा किमान एकजण तरी होता २०२२ साली की ज्याला नादानजींचा डंगरेपणा, ओह् माफ करा, नादानजींचा कालजयीपणा समजला होता..! _/\_
कहर प्रतिसाद
कहर प्रतिसाद
श्रध्दा आणि farend यांच्या धमाकेदार चित्रपट परिक्षणानंतर पुन्हा एकदा खळखळून हसायला मिळालं
बर्म्युडा ट्रँगल ला तर फुटलोच
बाप रे असा सिनेमा आहे ! अवघड
बाप रे असा सिनेमा आहे ! अवघड आहे
मी चार ओळी एकाखाली एक
मी चार ओळी एकाखाली एक लिहिल्यात, तर नादानजी कवितानियमानुसार ही चारोळी होईल का? >>>
अशा रचनांच्या जागतिक रँकिंग मधे १. कोनाड्यात उभी व्हिंदमाता २. खडे हो बारूद के ढेर पे, और पी रहे हो पाइप यानंतर क्र. ३ वर ही जोरदार एण्ट्री! नादानजींची त्यानंतर.
पाचपाटील - यशजींच्या डोक्यावरच्या रूमालाचा उल्लेख न करता हे परीक्षण कसे पूर्ण होईल? मराठी पिक्चर्स मधे एकदम गिटार वाजवणारी तरूणाई दाखवताना त्यातील एखादा नग असा रूमाल बांधतो. त्यामुळे हा आता मधेच रॉक वगैरे सुरू करतो की काय अशी भीती वाटते. तो वरचा प्रसिद्ध शेर (विरहाचे दु:ख...) केवळ हीरॉइनला घरी सोडल्यावर जर असेल तर नंतर खरीच जुदाई वगैरे आली तर काय लेव्हलचा शेर येइल विचार करतोय.
प्रिया त्याला तुम्हालाही नादानजी आवडतात का विचारते तेव्हा त्याच्या चेहर्यावर "वाचलंय? हे हे हे, मीच लिहीलंय" भाव दिसले.
बाकी ते डॉक्टरांनी उत्तर दिले, मी "हा गेलो आणि हा आलो", नजरेत पडणे वगैरे श्र म्हणते तशी डबघाई मजेदार आहे. मी तर दंगच राहिलो.
मी पण ऐकला हा शेर.
मी पण ऐकला हा शेर.
यमक वगैरे काही नाही शेराला.
'समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता..'
पेक्षाही सवाई आहे शेर.
>>> मला याची आठवण आली
Roses are red
Violets are blue
Some poems rhyme
But this one doesn't
बापरे हे असे मुव्हीज कसे
बापरे हे असे मुव्हीज कसे कळतात तुम्हाला?
टायटलचा तरी काय अर्थ लागतोय 
एकूणातच सगळं गंडलेलं दिसतंय.
टायटलचा तरी काय अर्थ लागतोय
टायटलचा तरी काय अर्थ लागतोय
१ प्रेमा नावाच्या मुलीचे दोन प्रेमी, वर कुणीतरी लिहिलेच आहे.
२ दोन प्रेमी आहेत , ज्यांचे एकमेकांवर असलेल्या प्रेमावर प्रेम आहे
३ २ या आकड्याचे प्रेमी.
Roses are red
Roses are red

Violets are blue
Some poems rhyme
But this one doesn't> >
भन्नाट.
भन्नाट.
सिनेमा ३ मिनिटे पण सहन झाला नाही. बंद केला.
स्वप्नील चा आवाज वेगळाच होता
स्वप्नील चा आवाज वेगळाच होता आधी... फार बदलला आहे आता...
Roses are red
Roses are red

Violets are blue
Some poems rhyme
But this one doesn't
<<<<<<
आईग्ग
आईग्ग
स्वजोचा आवाज बारीक चिरका होता तेव्हा आता जरा बदललाय. 'आय यम डाईंग ' म्हणतो तेव्हा वाईट वाटायचं सोडून हसूच आलं . त्याचाच असावा बहुतेक डब आवाज.
एक गंमत लिहायची राहिली. ती
एक गंमत लिहायची राहिली. ती प्रिया शहर सोडून आल्यावर एका मैत्रिणीकडे येते. तेथे ती तिला म्हणते की अशी एक व्यक्ती आहे की जिला मी माझ्या मनातील सर्व सांगू शकते. त्यावर ती मैत्रिण लटके रागावल्यासारखे विचारते "कोण ती?" मग प्रिया म्हणते तूच.
या रोमहर्षक प्रसंगानंतर पुढचा सीन काय असेल असे तुम्हाला वाटते? हा असाच्या असा संवाद उलट्या क्रमाने ती मैत्रिण व प्रिया यांच्यात होतो.
"Just when I think you could not be any dumber, you do something like this and totally redeem yourself" - Dumb and Dumber.
हो ! यावरून एक जुना जोक आठवला
हो ! यावरून एक जुना जोक आठवला
ती दिवसभर माझ्यासोबतच असते, तिच्या शिवाय मला करमत नाही, ती फार सुंदर आहे, ओळखा पाहू कोण ? माझी सायकल !
'जिन्दगी नॉट आऊट ' किव्वा '
'जिन्दगी नॉट आऊट ' किव्वा ' लव यू जिन्दगी' नावाचा स्वजोचा सिनेमा होता. त्यातही त्याला आजार असलेला दाखवलाय. अमृता खानविलकर होती त्यात.
अफाट परीक्षण... पण गिरिजा
अफाट परीक्षण... पण गिरिजा मराठी बोलू शकते.. तिच्यासाठी दुसऱ्या कुणाला मराठी मध्ये का डबिंग करायला लावलं आहे ?
आणखी पुढे थोडा पाहिला.
आणखी पुढे थोडा पाहिला. त्याच्या डोक्यावरचा रूमाल पाहून This is where you explain the hat हा संवाद हटकून आठवतो. घरी, कार मधे, रेस्टॉ मधे हा सतत तो रूमाल लावून फिरतोय. कोणालाही खटकत नाहे.
ती सुरूवातीला शहर सोडून गेली, ती फार लांब गेलेली दिसत नाही. कारण तो सुरूवातीला तिला फसवणारा गरिबांचा इम्तियाज अली बॉयफ्रेण्ड यशच्याच घरी एक कंत्राट सही करायला घेउन येतो. परत यश समोर मी हिला कसे गंडवले याची फुशारकी मारतो.
मधे यश झोपलेला असताना प्रियाला एक रॅण्डम व प्रसंगाशी कसलाही संबंध नसलेला शेर असलेली वही सापडते. तीच शेर-ए-नादान आहे की काय अशी आपल्याला शंका येते पण तिला आलेली दिसत नाही. तो सीन जसा दिसतो त्यातून असे वाटते की यश त्या वहीला हेडफोन लावून काहीतरी ऐकत असतो. त्या वहीत प्रत्येक पानावर जेमतेम दोन ओळी बसतील इतक्या मोठ्या अक्षरात शेर लिहीलेला असतो. "नादान" चा उगम इथेच असावा.
मधे एका सीन मधे थांबलेल्या कारचे स्टिअरिंग उगाचच हलवत यश तिला सांगतो की आय अॅम बेटर!
पण मग लगेच यशला एक ब्रेन ट्यूमर झटका येतो. म्हणजे थकवा व खोकला येतो. त्याला सांभाळायला ठेवलेल्या प्रियाचा त्यावरचा इलाज म्हणजे "यश तू थोडावेळ झोप. तुला बरं वाटेल". ब्रेन ट्यूमरवरचा हा इलाज. मग पुढच्याच सीन ला यश हॉस्पिटल मधे दिसतो. "मोठ्यात मोठ्या" डॉक्टरला याच्या आजारावर इलाज सापडलेला नसतो हे आपल्याला सुरूवातीला सांगितले जाते. पण मीडियम लेव्हलचे डॉक्टर बहुधा सहज इलाज करतात. कारण ती डॉक्टर प्रियाला व यशला त्याच्याच सुधार होतोय असे सांगते. डॉक्टरचा इलाज चालत नाही व हिने नुसता आधार दिला तरी ज्याला बरे वाटते त्या प्रियाला डॉक्टरच धीर देते की काळजी करू नकोस. बहुधा एक दवा के लिए व एक दुआँ के लिए असे कॉम्बो दिसते.
गरिबांचा इम्तियाज अली
गरिबांचा इम्तियाज अली बॉयफ्रेण्ड>> अगदीच अचूक वर्णन!.. कसलंय ते !!... मला तर 'मेला' पिच्चरमधला आदिमानवच आठवला
यश त्या वहीला हेडफोन लावून काहीतरी ऐकत असतो.
हिने नुसता आधार दिला तरी ज्याला बरे वाटते त्या प्रियाला डॉक्टरच धीर देते की काळजी करू नकोस>>
हो ना! (साधा ब्रेनट्युमरच तर आहे!)
यशचा बाप संतापाच्या भरात उगाचच हात झाडत आचके देत असतो तो सीन पाहिलात काय?
आणि शेवटी ती डॉक्टर स्वतःच लाजत असते तो वाला सीन??
फारेन्ड
फारेन्ड
यश त्या वहीला हेडफोन लावून
यश त्या वहीला हेडफोन लावून काहीतरी ऐकत असतो>>>
हा सिन शोधून पहिलाच पाहिजे

खतरनाक आहे हे
हिने नुसता आधार दिला तरी
हिने नुसता आधार दिला तरी ज्याला बरे वाटते त्या प्रियाला डॉक्टरच धीर देते की काळजी करू नकोस>>

हो ना! (साधा ब्रेनट्युमरच तर आहे!)
<<<<<<<
हो ना! (साधा ब्रेनट्युमरच तर
हो ना! (साधा ब्रेनट्युमरच तर आहे!) >>>>>>>> ब्रेनटयुमर साधा असतो?
भन्नाट लिहिले आहे
भन्नाट लिहिले आहे
मराठीत डब करताना स्वप्नीलला दुसऱ्या कोणीतरी आवाज दिला आहे असे वाटते.
मूळ चित्रपट हा आहे….. तमन्ना जीने की…. https://youtu.be/SyGRBVt23uI
कुठल्याही गोष्टीचे ७ प्रकार
कुठल्याही गोष्टीचे ८ प्रकार असतात.
साधा
मसाला
घी साधा
घी मसाला
रवा साधा
घी रवा साधा
रवा मसाला
आणि घी रवा मसाला
Pages