शोधायला गेले एक, अन.....

Submitted by कुमार१ on 4 February, 2022 - 00:39

अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत. अन्य काहींच्या बाबतीत शोधाची कथा अजून वेगळी आणि विस्मयकारक आहे. एखाद्या विशिष्ट आजारावर गुणकारी औषधाचा शोध चालू असायचा. त्यासाठी अभ्यास करून एखादे रसायन शोधले जायचे. पण प्रत्यक्षात जेव्हा त्याचे रुग्णावर प्रयोग सुरू व्हायचे, तेव्हा त्या औषधाचा भलताच व अनपेक्षित गुणधर्म दिसून यायचा. मग मूळ आजार राहिला बाजूलाच आणि ते औषध एका नव्याच आरोग्य समस्येसाठी प्रस्थापित होऊन बसले. औषधांच्या इतिहासात डोकावता अशा सुमारे डझनभर औषधांची शोधकथा रंजक आहे. त्यातील काहींचा आढावा या लेखात घेतो. त्यापैकी काही औषधे 19 आणि 20 व्या शतकापर्यंत वापरात होती. परंतु पुढे त्यांना अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने ती आज वापरात नाहीत. तर अन्य काही औषधे आजही वापरली जातात.

या लेखात खालील औषधांची शोधकथा पाहू :
• पोटॅशियम ब्रोमाइड
• लिथियम
पेनिसिलिन
• मेप्रोबामेट
• डायझेपाम (काम्पोज)
• सिल्डेनाफिल (वायाग्रा)

१. पोटॅशियम ब्रोमाइड
एकोणिसाव्या शतकात प्रौढांमधील फीट्स येण्याच्या विकारावरील (अपस्मार) औषधाचे शोध जोमाने सुरू होते. फीट्स येण्याची नक्की कारणेही अस्पष्ट होती. तत्कालीन बहुतेक डॉक्टरांनी एक मजेशीर गृहीतक मांडले होते ते म्हणजे, अतिरिक्त हस्तमैथुन आणि फीट्स येणे यांचा घनिष्ठ संबंध असतो ! लैंगिक उर्मी कमी करण्यासाठी ब्रोमाइडचा वापर प्रचलित होता. म्हणून Charles Lockock यांनी अपस्माराचे रुग्णांना हे औषध द्यायला सुरुवात केली. त्याच्या प्रभावामुळे फीट्सचे प्रमाण कमी झाले. त्याचबरोबर या औषधाने रुग्णास गुंगी येते हेही लक्षात आले. मग त्यातून पुढे या औषधाचा चिंताशामक म्हणून वापर सुरू झाला. पुढे बरीच वर्ष तो सुरू होता. परंतु या औषधाची मर्यादित परिणामकारकता आणि दुष्परिणाम यांचा विचार करता त्याहून अधिक योग्य औषधांचा शोध लवकरच लागला. परिणामी हे औषध कालबाह्य झाले.

२. लिथियम
मुळात या धातूचा शोध १८१७मध्ये लागला. नंतर १८६०च्या दरम्यान लिथियम कार्बोनेटचे प्रयोगशाळेत विविध प्रयोग करत असताना असे लक्षात आले की, त्याच्या प्रभावामुळे यूरिक ॲसिडचे खडे विरघळतात. या ऍसिडच्या अधिक्याने होणारा गाऊट हा प्राचीन आजार माहित होताच. मग या रुग्णांसाठी त्यांचा वापर सुरू झाला. दरम्यान विविध मनोविकारांच्या उपचारांचा अभ्यास चालू होता. त्यातून एक गृहीतक असे मांडले गेले की यूरिक ॲसिडचे अधिक्याने मेंदूवर परिणाम होतो आणि त्यातूनच मनोविकार निर्माण होतात.
मग १९४०मध्ये लिथियमचे काही मनोविकारांसाठी (mania) प्रयोग केले गेले. परंतु लिथियमचे शरीरात दुष्परिणामही बर्यापैकी असतात. ते समजण्यासाठी रक्तातील लिथियमची पातळी समजणे आवश्यक होते. 1960 च्या दरम्यान लिथियमची पातळी मोजण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. त्यानुसार लिथियमचा शरीरासाठी सुरक्षित डोस ठरवता आला. तेव्हापासून ‘बायपोलर’ या मनोविकारांसाठी लिथियम हे औषध प्रस्थापित झाले. आजही त्याचा काही प्रमाणात वापर होतो. अशातऱ्हेने गाऊटच्या सांधेदुखीसाठी योजलेले औषध शेवटी विशिष्ट मानसोपचारांच्या यादीत जाऊन बसले.

३. ‘पेनिसिलिन’
जिवाणूनाशक औषधांचा शोध घेण्याचे काम अगदी प्राचीन काळापासून चालू होते. असे संशोधन प्रयोग सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळांत होत असत. त्यासाठी निरनिराळे सूक्ष्मजीव culture च्या रुपात वाढवावे लागत. बऱ्याचदा अशी cultures डिशमध्ये पडून राहिली की त्यावर बुरशीचा थर चढे. त्यातून एक गंमत होई. एकदा का अशी बुरशी चढली की त्यानंतर तिथली जीवाणूंची वाढ बंद होई. हे काहीसे आश्चर्यकारक वाटे. सन १८७१मध्ये Joseph Lister यांनाही असा एक अनुभव आला. ते रुग्णांच्या लघवीच्या नमुन्यांचे निरीक्षण करीत होते. टेबलावर बराच काळ पडून राहिलेल्या नमुन्यांत बुरशी चढू लागे आणि मग त्यांच्यात पुढे जीवाणूंची वाढ होत नसे. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी या बुरशीचा (mold) अभ्यास सुरु केला. त्यातील एका प्रकाराला त्यांनी Penicillium असे नाव दिले. ‘Penicillus’ चा शब्दशः अर्थ ‘रंगकामाचा ब्रश’ असा आहे. त्याच्या दिसण्यावरून तसे नाव पडले. मग त्याचे प्रयोग काही सुट्या मानवी पेशींवर केले गेले. त्याकाळी घोडे हे वाहतुकीचे एक महत्वाचे साधन होते. त्या घोड्यांना बऱ्याच जखमा होत. त्यावर बुरशी चोपडणे हा एक घरगुती उपचार तेव्हा रूढ होता. पुढे लुई पाश्चर आणि अन्य बऱ्याच संशोधकांनी असे प्रयोग करून Penicillium ला जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मत मांडले. इथपर्यंतचे संशोधन हे डॉ. फ्लेमिंग यांच्यासाठी पायाभूत व मार्गदर्शक ठरले.
डॉ. फ्लेमिंग हे १९२०च्या दशकात लंडनमधील एका रुग्णालयात सूक्ष्मजीव विभागात काम करीत होते. त्यांच्या टेबलावर जीवाणू culture केलेल्या डिशेस कायम पडलेल्या असत. एकदा ते सुटी घेऊन स्कॉटलंडला गेले होते. तिथून परतल्यावर ते कामावर रुजू झाले. त्यांचे सगळे टेबल पसाऱ्याने भरले होते. मग त्यांनी एक डिश कामासाठी उचलली. त्यात त्यांनी Staphylococcus हे जंतू वाढवलेले होते. आता ते बघतात तर त्या डिशमध्ये बऱ्यापैकी बुरशी लागली होती. त्यांना त्याचे कुतूहल वाटले. मग त्यांनी त्या डिशचे सूक्ष्मदर्शकाखाली बारकाईने निरीक्षण केले. हाच तो “युरेका’’ चा क्षण होता ! त्यांना असे दिसले की डिशच्या ज्या भागात बुरशी होती त्याच्या भोवताली जंतू बिलकूल दिसत नव्हते. अन्यत्र मात्र ते झुंडीने होते. याचा अर्थ स्पष्ट होता. त्या बुराशीतून जे काही बाहेर पडत होते त्यामुळे त्याच्या बाजूचे जंतू मरत होते. मग फ्लेमिंगनी या कामाचा ध्यास घेतला. त्यांनी त्या बुरशीस वेगळे काढून तिचे culture केले आणि त्यातून तो रासायनिक पदार्थ वेगळा केला. मग या पदार्थाचे नामकरण त्याच्या जननीस अनुसरून ‘पेनिसिलिन’ असे झाले.

४ व ५. मेप्रोबामेट व डायझेपाम
जिवाणूनाशक म्हणून पेनिसिलीनचा वापर सुरू झाल्यानंतर लक्षात आले की ते औषध काही ठराविक प्रकारच्याच जिवाणूंचा नाश करते. मग अन्य प्रकारच्या जीवाणू संसर्गासाठी वेगळ्या औषधांचा शोध सुरू झाला. त्यावेळेस असा गुणधर्म असणारे phenoxetol हे एकच रसायन विचाराधीन होते. मग त्याचा कसून अभ्यास सुरू झाला. त्याची पहिली पायरी म्हणजे प्राण्यांवर प्रयोग. त्यातून एक आश्चर्यकारक निरीक्षण समोर आले. या औषधाच्या प्रभावाने प्राण्यांना गुंगी आल्यासारखे होई आणि त्यांचे ताणलेले स्नायू शिथील (relaxed) पडत. 1950 मध्ये या औषधाचे पृथक्करण करून त्यापासून एक सुधारित असे मेप्रोबामेट औषध बनवले गेले. पुढे मानवी प्रयोगांती असे सिद्ध झाले की हे औषध ताणतणाव कमी करते आणि स्नायूंनाही आराम देते. या संशोधनावरून लक्षात येईल की इथे तर अगदी ‘शोधायला गेले एक’ हा प्रकार झालाय. वेगळ्या प्रकारच्या जिवाणूनाशकाच्या शोधाच्या प्रयत्नात चक्क एक तणावमुक्तीचे औषध सापडून गेले !

नंतर या औषधाच्या सुधारित स्वरूपासाठी प्रयत्न चालू झाले. त्यात एका संशोधकाला थोडे यश आले. त्याने ते औषध तात्पुरता शोध म्हणून प्रयोगशाळेच्या फडताळात ठेवून दिले. दरम्यान त्याचे अन्य काही प्रकल्प चालू असल्याने तो याबद्दल विसरून गेला. पुढे 1957 मध्ये त्या प्रयोगशाळेची साफसफाई चालू असताना अचानक ते बाजूला ठेवून दिलेले औषध सापडले. आता त्याच्यावर अधिक काम करून त्यापासून डायझेपाम हे औषध विकसित झाले. 1960-70च्या दशकात हे औषध तुफान लोकप्रिय झाले आणि संबंधित औषध उद्योगाला त्यातून अभूतपूर्व नफा झाला. आजही हे औषध वापरात आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये ‘काम्पोज’ या व्यापारी या नावाने परिचित असलेले हेच ते औषध.

६• सिल्डेनाफिल (वायाग्रा)
या औषधाची कथा ही तर या लेखाचा कळसाध्याय शोभावी अशी आहे. या रसायनाचा शोध 1989मध्ये लागला. त्याच्या प्राण्यांवरील प्रयोगादरम्यान लक्षात आले की, त्याच्या प्रभावाने रक्तवाहिन्या रुंदावतात (dilate). या निरीक्षणावरून फायझर औषधउद्योगाने हे औषध करोनरी हृदयविकार आणि उच्चरक्तदाब यांच्या उपचारासाठी विकसित करण्याचे ठरवले. त्यानुसार रुग्णप्रयोग सुरू झाले. त्यात असे लक्षात आले की ज्या आजारांसाठी ही चाचणी चालू आहे त्याचे निष्कर्ष असमाधानकारक आहेत. पण त्याचबरोबर या रुग्णांमध्ये एक अजब प्रकार आढळला. असे पुरुष रुग्ण जेव्हा संशोधन कक्षात तपासणीसाठी येत, तेव्हा ते पलंगावर पडताक्षणी पटकन पोटावर झोपणे पसंत करीत ! ही गोष्ट एका चाणाक्ष परिचारिकेच्या लक्षात आली. मग तिने या रुग्णांची बारकाईने चौकशी केली तेव्हा त्याचे कारण उमगले. या रुग्णांना चांगल्यापैकी लिंग ताठरता येत होती आणि ती बराच काळ टिकत असे. त्यामुळे लज्जित होऊन ते पटकन पोटावर झोपत असत.

या मुद्द्यावर अधिक अभ्यास करता हे समजले की, या औषधामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांऐवजी पुरुष लिंगाच्या रक्तवाहिन्याच चांगल्यापैकी रुंदावत आहेत. परिणामी मूळ संशोधनाची दिशा पूर्णपणे बदलण्यात आली. ज्या पुरुषांना संभोगसमयी लिंग ताठरतेची दुर्बलता येते त्यांच्यावर याचे नव्याने प्रयोग सुरू झाले. त्या प्रयोगांना यश येऊन 1996 पर्यंत हे औषध पुरुषांच्या लैंगिक दुर्बलतेवरील ( Erectile Dysfunction) एक उपाय म्हणून प्रस्थापित झाले.
....
सन 1857 ते 1996 या दीर्घ कालखंडात आधुनिक वैद्यकात योगायोगाने शोधल्या गेलेल्या काही औषधांच्या कथा आपण पाहिल्या. विज्ञानामध्ये अशा प्रकारच्या शोधाला “serendipity” हे वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. या शब्दाची व्युत्पत्ती मोठी रंजक आहे.
‘serendip’ याचा अरबी भाषेतील अर्थ म्हणजे श्रीलंका(सिंहलद्वीप) ! पर्शियन भाषेत एक परीकथा आहे. सेरेंदीपचे तीन राजपुत्र सतत भ्रमण करीत असत. त्यांचे भ्रमण हे कुठल्याही विशिष्ट हेतूने नसायचे. परंतु त्या दरम्यान त्यांना विविध गोष्टींचे शोध निव्वळ योगायोगाने लागत. त्यामध्ये त्यांच्या कष्टापेक्षा चातुर्याचा भाग अधिक असे. या कथेतून आलेला तो शब्द पुढे भाषेत रूढ झाला.

अनेक प्रकारचे वैज्ञानिक शोध आणि नव्या उत्पादनांच्या कल्पना याप्रकारे उगम पावतात. त्याचाच एक भाग म्हणजे वैद्यकातील काही औषधांचे शोध. काही निवडक औषधांच्या वर सादर केलेल्या शोधकथा वाचकांना रंजक वाटतील अशी आशा आहे.
कुठल्याही क्षेत्रातील अशा प्रकारच्या शोधांबद्दल वाचकांनी प्रतिसादांमध्ये जरूर लिहावे.
…………………………………………………………………………………………………………………

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> 16 वर्षाच्या मुलीने तिच्या अशा वेदनांपासून सुटका होण्यासाठी केवळ मैत्रिणींच्या सल्ल्याने अशा गोळ्या घेतल्या. जेमतेम आठवडाभर गोळ्या घेतल्यानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊन तिच्या मेंदूत रक्तगुठळी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला.>>>
बापरे, हे धक्कादायक आहे.

घातक आणि बेकायदा ‘ड्रग्स’च्या व्यसनांमधून होणारे गंभीर दुष्परिणाम आणि मृत्यू हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. सध्या जगातील काही देशांमध्ये दोन प्रकारच्या अशा नव्या ‘ड्रग्स’ने धुमाकूळ घातला असून त्यांना Zombie drugs
असे किळसवाणे नाव दिलेले आहे.
त्यांची थोडक्यात माहिती :
१. Xylazine : हे औषध मुळात प्राण्यांच्या वापरासाठीच अधिकृत मान्यताप्राप्त आहे. त्याचा गुणधर्म गुंगी आणणे आणि स्नायू शिथिल करण्याचा आहे. या औषधात हिरोईन आणि अन्य काही ड्रग्ज मिसळून सध्या ते बेकायदा विकले जात आहे.
त्यामुळे युके आणि अमेरिकेतील अनेक तरुण त्याच्या दुष्परिणामांना बळी पडलेले आहेत आणि त्यातून काही मृत्यूही घडलेत (https://www.ndtv.com/webstories/feature/what-is-zombie-drug-gripping-the...)

२. Kush : या ड्रगमध्ये मानवी हाडांची पावडर आणि Fentanyl &cannabis ही गुंगी आणणारी रसायने मिसळली आहेत. याच्या सेवनातूनही मेंदूवर गंभीर दुष्परिणाम झालेत आणि काही मृत्यू घडलेत. सध्या सिएरा लिओन या देशात या गंभीर मुद्द्यावरून आणीबाणी जाहीर केलेली आहे.
https://www.bbc.com/news/world-africa-68742694

वाणसामानाच्या दुकानात मर्यादित औषधांची विक्री
आधुनिक वैद्यकातील ज्या औषधांना डॉक्टरांची चिठ्ठी लागत नाही अशी काही औषधे भारतातील सामान्य/वाणसामानाच्या दुकानांमध्ये विक्रीस ठेवण्यासंबंधीचे धोरण सरकार आखत आहे. यासंबंधी एका उच्चस्तरीय समितीचा विचारविनिमय चालू आहे.

अशा औषधांमध्ये जठाराम्लविरोधी, तापशामक आणि सर्दी खोकल्याची सामान्य औषधे इ.चा समावेश आहे. ही योजना विशेषता ग्रामीण भागाला नजरेसमोर ठेवून आखलेली आहे.

https://www.hindustantimes.com/business/forget-chemists-in-a-first-govt-...

Pages