वेदनेच्या मैफिलीचा स्वर टिकाऊ होत नाही
जीवनाबाबत कसा हा नियम लागू होत नाही?
पोट भरण्याचीच मोठी मजबुरी, पदभ्रष्ट करते
हौस म्हणुनी कोणतीही स्त्री विकाऊ होत नाही
मानतो मी एकलव्याला स्वयंभू व्यक्तिरेखा
मांडुनी प्रतिमा गुरूची, तो शिकाऊ होत नाही
छेडती रस्त्यात स्त्रीला, गप्प सारे, पण कुणीही
सोडवाया जानकीला, का जटायू होत नाही
खेचण्याचा व्यर्थ केला यत्न पण पळतो पुढे तो
सुरकुत्यांचे राज्य आले, काळ काबू होत नाही
शौर्यगाथा सांगणे सोडून टीव्ही पाहिल्याने
वाढवायाला शिवाजी, मा जिजाऊ होत नाही
पाळले जाते शुचित्वाला इथे, पण मजबुरीने
कोण संधी लाभता पटकन लुटारू होत नाही?
ना चकोराला शशीचा वाटतो हल्ली भरवसा
दूरचा निष्ठूर सखया, का दयाळू होत नाही ?
कर जरा "निशिकांत" मैत्री वेदनांच्या वास्तवाशी
मृगजळामागे पळाल्याने सुखायू होत नाही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--व्योमगंगा
लगावली--गालगागा X ४