२ किलीमांजारो - प्रथम दिवसे

Submitted by वाट्टेल ते on 2 February, 2022 - 17:21

१७ डिसेंबर ला निघून १९ डिसेंबरला किलीमांजारो एअरपोर्टला उतरेपर्यंतचा प्रवास अगदी इतर कोणत्याही प्रवासासारखाच झाला. अदिस अबाबा एअरपोर्टला कधी नाही ते पायधूळ झाडली. प्रवासातल्या गंमती जमती नेहमीसारख्याच. IAD ला अरुण परांजपे भेटले. उपाध्ये आणि फॅमिली अदिस अबाबाला. त्यांच्या मुलाचे नावही मिहीर. नेहमीच्या सवयीने त्याला दिवसांतून १० वेळा हाक मारत राहू असे वाटले, तसे झाले नाही पण चिरंजीवांची मात्र पुष्कळच आठवण आली. किलीमांजारो एअरपोर्ट एकदम टुमदार आहे, खूपच आवडला. गुलमोहर, अशोकाची झाडे बघून एकदम मुंबईच्या घराची आठवण झाली. वाटेत सूर्यफूल, केळी, मका, जोडीला cattle वगैरे पुष्कळ दिसले. लाल चिऱ्यांची वाटावी अशी पण घरे दिसली आणि एकदम कोकणच आठवले. माणसे इथल्या आफ्रिकन अमेरिकनसारखी अवाढव्य व अति उंच पण नव्हती. सलून- बार्बरशॉप जरा जास्तच दिसत होती. बायकांचेही केस खूप बारीक दिसले. भडक कपडे त्यांना शोभत होतेच आणि बांधा एकदम आवडलाच. एकूण तालुका वगैरेचे ठिकाण असावे असे वाटत होते. एक दीड तास प्रवास करून मोशीमध्ये चन्या लॉजला पोहोचलो. स्वागताला कोकमाच्या चवीचे आणि रूपाचे जास्वंदाचे सरबत ( रेसिपी शोधली पाहिजे) प्यायला मिळाले. मध्ये रेस्टोरंटची जी open space होती तिथे पुढे २ दिवस आम्ही तासनतास पडीक होतो. चन्या लॉज मस्तच होते, काहीही न करता तिथे ५-१० दिवस असेच निरुद्देश आरामात रहायला आवडले असते. दिल्लीचा शेफ छान पंजाबी जेवण बनवत होता ज्याचा आम्ही सर्वांनी पुरेपूर आस्वाद घेतला. रेस्टोरंटच्या मागेच अचानक एक गोष्ट दिसली - किलीचे peak - आपण इथे ज्याच्यासाठी आलोय ती गोष्ट अशी अचानक दिसल्याने एकदम थ्रिल्लिंग वाटले.
1.jpg
२० तारखेला आरुषा नॅशनल पार्क सफारी केली. त्याचे वर्णन नंतर कधीतरी. तिथली मनांत रेंगाळलेली गोष्ट म्हणजे तिथे २ तास केलेले कनूईंग. स्वच्छ ऊन, आजूबाजूला डोंगर, क्वचित दिसणारे प्राणी व त्यांचे आवाज. त्या २ तासांना आयुष्यांतल्या काही अत्यंत सुंदर क्षणांत सामील केले आहे. अर्थातच इथे आनंदची फार आठवण आली.
२१ तारखेला तिथल्या लोकल मार्केटमध्ये टूरिस्टी visit आणि shopping. इथे आनंद सोबत नसल्याने बरे वाटले, कारण मी जो वेळ खाल्ला त्यावरून आमचे हमखास भांडण झाले असते. अरुण परांजपे आणि पराग वाकणकर वैतागले तरी बिचाऱ्यांना तसे सांगता आले नाही. मशीद आणि कृष्णाचे देऊळ लागून होते, अगदी मथुरा style. देवळाच्या आवारात पुष्कळ फुलझाडे होती पण अनंत आणि चाफा खासच, वेड लावणारे.
आणि आता डिसेंबर २२ - ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास त्या ट्रेकची सकाळ उजाडली. तोवर १५ किलोत सामान बसवण्याचा , शूज water प्रूफ आहेत\ नाहीत यावर बराच खल झाला होता. माझे rain jacket तितकेसे ठीक नसल्याने व बॅगपॅक न भिजण्याचा दृष्टीने मी poncho शाह टूर्स कडून भाड्याने घेतला. त्याच्या १ size fit all नुसार २-३ लोक त्यात अजून मावले असते. संपूर्ण ट्रेकमध्ये पावसाने जी आम्हाला सोबत दिली ते बघता poncho च सगळ्यात vital आणि सगळ्यात तापदायक होता. परांजप्यांचे शूज उत्तम असूनही David या आमच्या मुख्य guide ने त्यांना waterproofing वरून एकूण बरेच nervous करून ठेवले आणि बराचसा ट्रेक या सद्गृहस्थाने साध्या sneakers मध्ये केला.
सकाळी ९ ला वगैरे सामानासकट आम्हाला ८ जणांना गाडीत फिट बसवण्यात आले. दुसऱ्या गाडीत David, Walles , Focus आणि Joshua हे guides. २३ पोर्टर आणि १ शेफ आणि सर्व सामान. आदल्या दिवशी briefing पासून Pole Pole म्हणजे स्वाहिली मध्ये "हळू हळू" हा शब्द ऐकू येऊ लागला होता. संपूर्ण ट्रेक संपेपर्यंत मी दहाहजार वेळा तरी तो ऐकला. इथले सगळेच काम एकूण "इंडिअन स्टॅंडर्ड टाइमने" पोले पोले चालते. कसली घाई नाही, रेस नाही, सगळे काही आरामात-सुशेगात. वेळ आणि अंतर सुद्धा अंदाजपंचे. हीच इथली गम्मत आहे, तिच्याशी जुळवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पोले पोले हेच किलीमांजारोचे संपूर्ण सार आहे हे खरे पण त्याच्या अतिरेकामुळे माझ्या काही गोष्टी हुकल्या असे आता खेदाने म्हणावेसे वाटते ( त्याबद्दल क्रमश:). गाडीने २-३ तास प्रवास होता. मोशीमधून उत्तरेकडच्या रोंगाई गेटला जाणार होतो. हाईक करायचे जे अनेक रस्ते आहेत त्यात ७ दिवसांचा रोंगाई रूट आम्ही घेतला होता. वाटेत सर्व प्रकारच्या डेटाचे सुपर analyst आणि अत्यंत हौशी फोटोग्राफर ( read निलाद्री, परांजपे आणि थोडेसे उपाध्ये) यांच्या चर्चांकडे दुर्लक्ष करत मी दिशा, हवामान, पाऊस, बर्फ व फोटो काढणे वगैरे कसलीही फिकीर न करता आजूबाजूला बघत मस्त enjoy करत जात होते. ११:३० च्या दरम्यान गाडी थांबली, तिथे porters जेवणार आहेत असे सांगितले, ती एक epic जागा होती. अरुंद, चिखलाने भरलेला खाली उतरत गेलेला रस्ता कम बोळ , दोन्ही बाजूला दुकाने ( आणि भरपूर हेअर कटिंग सलून) , एक खास "हाटेल" , कशी कोण जाणे पण restrooms मात्र अतिशय स्वच्छ होती. Do not judge the book by its cover हा धडा पुन्हा घेतला. तिथे काही काळ रेंगाळून निघालो ते एकदम पार्क गेट लाच. पार्क चालू झालेले कळलेही नाही इतके साधे गेट होते. सुरुवातीला २ बाजूला शेती, कसली कसली लागवड. तिथे दुपारच्या जेवणाच्या वेळेस पोहोचलो, boxed picnic लंच म्हणजे mushy sandwich आणि फ्राईज, कपकेक, गोगोड फ्रुटी, शंकरपाळ्यासारखे पण जरा मोठे, चविष्ट फिंगर फूड, सफरचंद, केळं. डोंगरात जास्त खाल्ले पाहिजे म्हणून guide आग्रह करकरून खायला घालत होते. हे असेच चालले तर इतके जड खाऊन चालणार कसे हा प्रश्न. वजन वाढवूनच आपण इथून परत जाणार आणि त्यावर तू निश्चित कुठे गेली होतीस हे ऐकायला मिळेल असे वाटले. माझे २ extra पाय - walking sticks फिक्स केल्या, त्याचे bands घरी विसरल्याने Christmas ट्री ची हिरवी रिबीन एकाला आणि एक पिवळा नायलॉनचा दोर दुसऱ्याला त्यामुळे माझ्या walking sticks शंभरात ओळखू येतील अशा unique झाल्या.
2.jpg
पोले पोले चालायला सुरुवात झाली. rain forest, उंच झाडं, मधून खळाळत वाहणारं पाणी, अशा परिचयाच्या trail ने सुरुवात झाली. कोणताही ट्रेक अशाच प्रकारे चालू करण्यात मजा असते, निसर्गाचं हे रूप सगळ्यात सुखद, हवंहवंसं, प्रेमळ असतं. चालताना येणारा पायांचा आवाज, हवेची, पानांची सळसळ, पाण्याचा खळखळाट, उंच झाडांमधून झिरपणारं ऊन आणि जराशी अंधारलेली वर खाली जाणारी वाट, चिमुकले bridges. Picture perfect. हर जर्रा अपनी जगह पे आफताब !
3.jpg
कोणाशीही काही न बोलता असे चालणे सुरु झाले की मनांत मेहदी हसन, थोड्या मालिनीबाई , थोडे भीमसेन येऊच लागतात. तसे ते कुठे गेलेलेच नसतात. काही वेळाने नकळत - ना जेओ ना किंवा ओ सजना बरखा बहार आई वगैरे आठवतेच. आणि मग बोला फुलाला गाठ म्हणावी तशी पाऊस सुरुच झाला. मग तो मोठा poncho घालण्याचा एक सोहळा झाला. formula १ race ला काही क्षणांत tire वगैरे बदलतात त्याची आठवण ठेऊन मी बॅगच्या खाली अडकवलेला poncho क्षणात घातला. बहुतेक वेळा मी हे transition, record time मध्ये करत असावे असे वाटले, time record करायला हवा होता खरंच - पण कशासाठी ? तारीख, वेळ, काळ सगळे भान विसरून इथे फिरण्याचा मानस होता ना? poncho पिवळा होता, जर पांढरा असता तर रात्री निश्चित भुतासारखे काहीतरी दिसले असते. असेच poncho घातलेल्या अवस्थेत चालत चालत, मनातल्या मनात हरवत, पहिल्या मुक्कामी पोहोचलो - Simba Camp - किती उंचीवर, किती वेळ लागला - ही चिल्लर फिकीर कशाला ? खाली फोटोत बघा नाहीतर गुगला.
4.jpg
पोर्टर्सनी पिवळे तंबू उभे केलेच होते. आत शिरून कोरडे झालो खरे, पण पुढील ६ दिवस सतत पाऊस, गारठा, एक ओलेपण सतत बरोबर होते. पावसामुळे बरोबरच्या इतर लोकांचा कितीही निरुत्साह झाला तरी मी मनात अतिशय अतिशय आनंदात होते - मला पाऊस आवडतो. आजूबाजूला जरा हिरवळ होती त्यामुळे शूज काढून टाकले, हिरवळीवर मनसोक्त अनवाणी फिरले. ठरवल्याप्रमाणे stretching आणि सूर्यनमस्कार केले. आधी गरमागरम कॉफी आणि मग सूप, भात , स्ट्यू किंवा तत्सम खाऊन तंबूत परतलो. दीपशिखाबरोबर दुनियाभरच्या गप्पा मारताना उशिरा कधीतरी डोळा लागला. किलीमांजारो - प्रथम दिवसे अध्याय समाप्त !
क्रमश:..https://www.maayboli.com/node/80999

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>हर जर्रा अपनी जगह पे आफताब !
वाह वाह वाह वाह!! क्या बात है!! प्रसन्न प्रसन्न करुन टाकलत.

भारीच निसर्ग वेड्या व्यक्तीला असला ट्रेक म्हणजे पर्वणीच
पावसाने वैतागला नाहीत हे फार म्हणजे फार आवडले नैतर त्याबद्दल किरकिर करणारे खूप जण असतात (मीही त्यातलाच, खोटे कशाला बोला, व्हॅली च्या ट्रेकला सतत तीन दिवस पावसात भिजल्यावर ज्या काही शिव्या दिल्या आहेत त्या पावसाला कळल्या असाव्यात कारण आम्ही निघालो तिथून आणि लख्ख ऊन पडले Happy )