सुधारस

Submitted by सांज on 31 January, 2022 - 23:00

सुधारस

गार बोचर्‍या थंडीत थोडंसं कोवळं उन्ह, गारठलेल्या आपल्या अंगावर पडावं आणि मन एकदम आनंदुन जावं तशा असतात काही कविता. सुखद, आल्हाददायक. तर काही एखाद्या निवांत संध्याकाळी डवरलेल्या बहाव्याखाली बसून प्यायलेल्या कॉफी सारख्या, शिशिर आणि वसंताच्या सीमारेषेवरच्या. काही असतात जुन्या वाड्यातल्या तुळशी वृंदावनासमोर तेवणार्‍या दिव्यासारख्या, आर्त आणि दैवी. या तिन्ही प्रकारच्या कवितांचा टच्च अनुभव एकाच ठिकाणी देणार्‍याही काही कविता असतात. अशा कवितांना म्हणायचं ‘वैभव जोशींच्या कविता’. त्या म्हणजे साक्षात सुधारस!

वैभव जोशी हे नाव मराठी माणसांसाठी आता नवं नाही. अलिकडच्या स्वामी समर्थांवरील मालिकेच्या शीर्षकगीतामुळे तर ते आता अगदी घराघरात पोचले आहेत. पण, साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी ‘तिने बेचैन होताना..’ सारख्या गझलेमधून पहिल्यांदा भेटलेले, प्रचंड आवडलेले वैभव जोशी, मग ‘एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते..’ सारख्या ओळींमधून आणि कितीतरी अशक्य सुंदर कवितांमधून भेटतच राहिले.

नंतर हळू-हळू कवितांसोबत त्यांची गीतेही यायला लागली. मुरांबा मधलं ‘उमलले आभाळभर हे चांदणे माझे-तुझे..’ काय अप्रतिम शब्द! त्यानंतर आनंदी-गोपाळ हा तर मास्टर स्ट्रोकच. एकेक गाणं म्हणजे जणू जपून ठेवावा असा अस्सल शुभ्र टप्पोरा मोतीच. ‘माथी छाया पायी ऊन, प्रवास माझा उफराटा गं.. वाटा वाटा वाटा गं..’ किती अर्थगर्भ आणि तरीही तितकंच सुंदर आहे हे. वापरलेला एकेक शब्द तर देव्हार्‍यात वाहिलेल्या फुलासारखा निर्मळ आणि अनघ.. ‘..मम पाउली, तव चाहुली.. प्राणांस ये सय कान्हुली..’ कान्हुली.. काय सुंदर शब्द आहे हा. एखादी तुपाने थबथबलेली, पुरणाने टच्च भरलेली, मऊ लुसलुशीत पुरणपोळी असावी तशी ही सगळी गाणी आहेत. त्यातलं ‘तू आहेस ना..’ तर म्हणजे, ज्या लेखणीतून ते बाहेर आलं त्या लेखणीसमोर अक्षरश: नतमस्तक व्हावं इतकं अफाट सुंदर आहे.
‘..तुझी थोरवी
काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना..’
‘..तुला फक्त तू
जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी
वांझ पुरुषार्थ हा..’
स्त्रीत्व इतक्या अफाट सुंदर आणि प्रगल्भ शब्दात कोणी कधी मांडू शकलं असेल असं वाटत नाही.

लिहणं म्हणजे वाचकांशी लिपि/भाषेमार्फत साधलेला टेलिपथिक संवाद असतो असं म्हटलं जातं. आणि असा संवाद साधण्यात वैभव जोशींचा हातखंडा आहे. उर्दू असो, हिन्दी असो किंवा अस्खलित मराठी.. त्यांचे शब्द इतके उत्कट असतात की ते वाचणार्‍याच्या मनाचा ठाव घेतल्याविना राहत नाहीत. माझी एक ठाम श्रद्धा आहे, जे खरं-खुरं, आतून आलेलं, अस्सल असतं ना, ज्यात कसलाही अभिनिवेश नसतो असं मग ते काम असो, कला असो किंवा अजून काही, ते मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. जोशींच्या कविता इतक्या भिडण्यामागचं हेच गमक असावं. ते सगळं फार फार आतून आलेलं वाटतं.

लहान मुलाला गावाहून परतलेल्या आपल्या आजी-आजोबांच्या पिशवीची जितकी ओढ वाटते नं, काय गम्मत आणली असेल, खाऊ कोणता असेल वगैरे काठोकाठ भरलेली उत्सुकता मनात घेऊन ते त्या पिशवीत डोकावत राहतं तसं काहीसं आता वैभव जोशींची नवी गाणी/कविता पाहिल्यावर माझं होतं. सध्या निमित्त आहे महेश मांजरेकरांच्या पांघरूण सिनेमाचं. त्यातली गाणीही अशीच नितांत सुंदर आहेत. गाण्यांचा एल्बम फेब २०२० मध्येच रीलीज झाला पण नंतर कोविड मुळे सिनेमाचं प्रदर्शन लांबलं. तो आता पुढच्या आठवड्यात रीलीज होतोय. त्यानिमित्ताने गेली दोन वर्षं मी ही जी त्यातली गाणी वेड्यासारखी ऐकतेय त्यांच्याविषयी लिहावंसं वाटलं. ‘ही अनोखी गाठ कोणी बांधली..’, ‘इलुसा हा देह, किती खोल डोह..’ एकेक गाणी अशी आहेत की कानांत earplugs घालावे आणि हरवून जावं. शब्द आणि संगीत दोन्ही तितकेच सुंदर. केतकी माटेगावकरच्या सुरातलं ‘साहवेना अनुराग..’ तर म्हणजे epitome of resplendence..
‘..अधिऱ्या अधिऱ्या क्षणांचा अभिसार हा
अभिसारिकेस वाटे व्यभिचार का?..’
अभिसारिका.. पुन्हा एक खूप सुंदर शब्द. हे गाणं ऐकेपर्यंत हा शब्द मला माहित नव्हता. गाणं ऐकल्यावर आधी त्याचा अर्थ शोधला. प्रियकराला भेटायला जाणारी प्रेयसी म्हणजे अभिसारिका. त्यांचं प्रत्येक गाणं आणि त्यातलं काव्य ऐकल्यावर हे असं काहीतरी अनोखं, छान असं गवसतंच. संगीताला अनुरूप आणि त्या-त्या प्रसंगासाठी चपखल अशी गाणी लिहणं खरंतर सोपं काम नाही. पण हा माणूस ते इतकं लीलया करतो आणि नुसतंच करतो असं नाही तर आपल्या काव्यातून त्या संगीताला आणि कथाबीजाला एका नव्या उंचीवर नेतो. हे खूप दैवी आहे. सुधारसासारखं आहे. साधं पण नितांत सुंदर!

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy मोरा गोरा अंग लै ले गुलजारचे पहिले गाणे अभिसारिकेचे फार जुने पण फार प्रचलित उदाहरण आहे!!!!!! नाट्यशास्त्रातील अष्टनायिकातील एक अभिसारिका आहे.

लेख छान, चांगली ओळख.

सुंदर लिहिलेय
मला आधी पाकृ विभाग वाटलेले. धागा उघडल्यावर पहिले फोटो शोधू लागलो Happy

मला पण ते जुन्या काळी कसं कमी खर्चात गोड पदार्थ आई करायची टाइप असेल असं वाटलं काहीतरी नॉस्टाल्जिक लिखाण असेल पण हे वेगळे आहे. छान लेख. पांघरूण सिनेमाचे ट्रेलर पाहिले फ्रॉम द मेकर्स ऑफ काक स्पर्श नं हिरो व हिरवीण गोड आहेत. व सर्व जुने नेपथ्य.

अभिसारिका मृच्छ कटिक मध्ये पण आहे. उत्सव मधील रेखा- वसंत सेना पंचमीच्या दिवशी प्रियकराला भेटा यला जाते फुलांचा श्रिंगार करून. किंवा पहिल्या ओरिजिनल उमराव जान मध्ये पण रेखा फारुख शेख ला भेटा यला जाते. अभिसारिकेची वस्त्रे जांभळी असतात. पर्पल पॅशन

नवीन कला कार समजला तुमच्या लेखा मुळे ऐकते गाणी. स्पॉटिफाय वर सर्च करून.

धन्यवाद.

सुंदर लेख. साहवेना अनुराग.......... किती सुरेख रचना!
मला अनुराग शब्द खूपच आवडतो तसाही. पण वापरायला मिळत नाही फार !! Happy

सुंदर लेख
@ अमा
>>>>नवीन कलाकार समजला तुमच्या लेखा मुळे ऐकते गाणी. >>>
वैभव जोशी जुने मायबोलीकर... मायबोलीवर लेखणाची सुरुवात चारोळीने...त्यांच्या चारोळ्या मायबोलीकरांना खूप आवडल्या. पुढे सुंदर गझला, कविता लिहिल्या‌... पुर्वी त्यांनी मायबोलीवर महिन्याची सुंदर कविता निवडीचा उपक्रम राबवला...
मी प्राथमिक शाळेत असताना वार्षिक परीक्षेचा एक भाग म्हणून सार्वजनिक जीवन परिक्षा असायची खरंतर खेडेगावातील मुलांचे, गुरुजनांचे सार्वजनिक जेवण. बेत असायचा सुधारस, पुरी...जास्त वर्गणी लागत नसे. मुलं वर्ग फुलं, पताकांनी सजवत , फोटोंना हार घालत. मुली वर्ग शेणानं आदल्या दिवशी सारवत. दुस-या दिवशी रांगोळी काढत. स्वयंपाक गुरुजन आणि मुले मिळून बनवणं.
सुधारस शिर्षक वाचून असे काही तरी असावं असं वाटलं.

वैभव जोशींची मुलाखत
https://www.maayboli.com/node/43845

मायबोलीचे देणें... लेख वैभव जोशी
https://www.maayboli.com/node/21765

आज पहील्यांदा हा लेख वाचला. काय वर्णनातीत सुरेख लिहीले आहे.
>>>>>>>>>कान्हुली.. काय सुंदर शब्द आहे हा. एखादी तुपाने थबथबलेली, पुरणाने टच्च भरलेली, मऊ लुसलुशीत पुरणपोळी असावी तशी ही सगळी गाणी आहेत.
निव्वळ दंडवत घ्या.

छान लिहिलंय.
सुधारसासारख.. साधं पण नितांत सुंदर! >>>आवडल

दत्तात्रय साळुंके, लिंक्स साठी धन्यवाद!