उद्याची काल मी स्वप्ने उशाला घेतली देवा
भविष्यातील जगण्याची तर्हा मी ठरवली देवा
तसा नव्हताच माझा प्राक्तनावर भरवसा केंव्हा
म्हणोनी वाट माझी मीच आहे निवडली देवा
असोनी पोरका, माया मिळाली खूप होती पण
मनाला माय वाटावी, दुजी ना भेटली देवा
पहाटे स्वप्न पडले विठ्ठला तू पावल्याचे अन्
मिठाई ठेवुनी चरणी तुझ्या, मी वाटली देवा
शपथ मी घेतली पण का तुला संशय असा येतो?
दिली सोडून केंव्हाची, खरोखर बाटली देवा
उडायाला निघाली सर्व पिल्ले उंच आकाशी
जरी ते मस्त! आई केवढी व्याकूळली देवा!
आभागी केवढा! माझा दिसे अंधार विझलेला
नसे काळोख म्हणुनी वाटते तेजाळले देवा
कृपेची का उधारी अन् हवी नगदीत का भक्ती?
आता काळाप्रमाणे दे नवी नियमावली देवा
तसा "निशिकांत" आहे बेरका आणिक कलंदर पण
तुझ्या वारीत त्याने नाळ तुजशी जोडली देवा
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--( लगागागा )X४