
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
'ग्यानबाची मेख ' चा अर्थ काय?
'ग्यानबाची मेख ' चा अर्थ काय?
*ग्यानबाची मेख =
*ग्यानबाची मेख =
अतिशय कठीण प्रश्न; मर्म
(मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
...
वरील प्रसंगामध्ये एक खोच आहे.
एखादी गोष्ट परिणामकारकरीत्या मांडण्याला मेख मारणे असे म्हणतात
( conclude forcibly or effectually (a business or work).)
मेख म्हणजे खुंटी. ग्यानबा
मेख म्हणजे खुंटी. ग्यानबा म्हणजे ज्ञानोबा असणार - ज्ञानेश्वर.
दोन्ही एकत्र कसे आले असतील ?
आपट्यांना ग्यानबाची मेख माहीत नाही. पण तुकारामबोवांची मेख माहीत आहे. - न सुटणारे कोडे.
इथे असे आहे (https:/
इथे असे आहे (https://aisiakshare.com/node/4289) :
ग्यानबाची मेख म्हणजे ज्ञानेश्वरांचा खरा उपदेश, किंवा सार, जे आधारस्तंभ असून बळकटपणे आत पुरलेले आहे, लेचेपेचे तकलादू नाही आणि कोणाला सहसा उमगत नाही.
कोश संदर्भ अजून तरी मला मिळाला नाही.
गूढार्थ ?
गूढार्थ ?
कुमार सर +१
कुमार सर +१
मेख म्हणजे नेहमी 'गाभा' वाटलेला. तत्त्व/ सार जे वरवर समजेलच असे नाही. इंग्रजीत Nail on the head म्हणतो तसे काही.
* गूढार्थ ? >> हा पण एक
* गूढार्थ ? >> हा पण एक अर्थ आहेच.
* Nail on the head >> +१
ऐसी वरची चर्चा छान आहे.
ऐसी वरची चर्चा छान आहे.
मेखेवरील चर्चा रंगली आहे
मेखेवरील चर्चा रंगली आहे म्हणून मूळ कथनामधील तेंडुलकरांचे वाक्य जसेच्या तसे लिहितो म्हणजे उलगडा होईल :
“अशा छोट्या प्रसंगातूनही हे परदेशी चित्रपट काही ‘ग्यानबाची मेख’ मारून जातात, जी आपले चित्रपट उभ्या कथानकातूनही साधू शकत नाहीत ! असे का ?
मेख म्हणजे खांब. ग्यानबाची
मेख म्हणजे खांब. ग्यानबाची मेख म्हणजे नेवाशाचा पैसाचा खांब - ज्याला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.
बुद्ध : बोधीवृक्ष :: ज्ञानेश्वर : पैसाचा खांब
त्यावरून अवघड, कठीण, गूढ असा अर्थ लागणे या अर्थाने ग्यानबाची मेख हा शब्दप्रयोग वापरतात.
ओह!
ओह!
माझ्या आजवरच्या आकलनानुसार
माझ्या आजवरच्या आकलनानुसार ग्यानबाची मेख हा शब्दप्रयोग एखाद्या गोष्टीत कुठेतरी काहीतरी गोची आहे हे सांगण्यासाठी वापरला गेलेला आहे.
उदाहरणार्थ:
"तेथे खूप मोठ्ठा पुरस्कार मिळेल तुम्हाला, पण ग्यानबाची मेख अशी आहे की त्या संस्थेचे सदस्यत्व घ्यावे लागते व त्याची फी दहा हजार रुपये आहे"
(हे माझे आकलन, जे चुकीचे असेल असे वरचे प्रतिसाद वाचून वाटत आहे)
(मी असा कोणताही पुरस्कार मिळवलेला नाही वा दिलेला नाही, हे निव्वळ उदाहरण होते)
माझ्या आजवरच्या आकलनानुसार
माझ्या आजवरच्या आकलनानुसार ग्यानबाची मेख हा शब्दप्रयोग एखाद्या गोष्टीत कुठेतरी काहीतरी गोची आहे हे सांगण्यासाठी वापरला गेलेला आहे. >>> माझाही हाच समज आहे.
पाचर मारून ठेवलेली आहे या
पाचर मारून ठेवलेली आहे या अर्थानेच या शब्दाचा वापर अनुभवलेला आहे. मेख या शब्दाला
दुसरा अर्थ दुपारी सुचला होता.दुसरा समानार्थी शब्द खोच असा आहे. खाचाखोचा हा शब्द ग्यानबाची मेख च्या जवळ जातो असे माझ्या आकलनाप्रमाणे वाटते. कल्पना नाही.लपवलेला अर्थ / न सुटणारे कोडे या अर्थाने या
म्हणीचावाकप्रचाराचा वापर होतो. शब्दकोशात अन्य अर्थ आहेत.पण त्या अर्थाने कधी हा शब्द चालवलेला पाहण्यात नाही.
माझ्या अल्पमतीनुसार फारएन्ड
माझ्या अल्पमतीनुसार फारएन्ड आणि बेफिकीर म्हणतात तोच अर्थ अपेक्षित आहे फक्त गोची ऐवजी इंगित किंवा अंतःस्थ हेतू अस हवं
खंबाही तेच म्हणत आहेत बहुधा.
खंबाही तेच म्हणत आहेत बहुधा.
मला एक सूक्ष्म फरक वाटतो पाचर आणि यामधे. पाचर मारणे चा वापर मी सहसा एखाद्याने मुद्दाम आवर्जून अडवणूक करायला काहीतरी करण्याबद्दल वाचला आहे. उदा: कायदा किंवा नियमात अशी कलमे घालायची की काही लोकांना त्याचा फायदा होणार नाही.
मेख शब्द हा जनरल अडचणीबद्दल - जेथे कोणी आवर्जून काही केले असेलच असे नाही.
>>> उदा: कायदा किंवा नियमात
>>> उदा: कायदा किंवा नियमात अशी कलमे घालायची की काही लोकांना त्याचा फायदा होणार नाही.
मेख शब्द हा जनरल अडचणीबद्दल - जेथे कोणी आवर्जून काही केले असेलच असे नाही. <<<
प्रतिभावंतांच्या तऱ्हा
उत्तम चर्चा !
उत्तम चर्चा !
त्या शब्दाचे अनेक अर्थ आणि लपलेल्या छटा समजून आल्या.
वरील सर्व माबोवंतांना धन्यवाद !
छान चर्चा.
छान चर्चा.
मलापण 'ग्यानबाची मेख' चा अर्थ
मलापण 'ग्यानबाची मेख' चा अर्थ वर फारएण्ड आणि बेफि म्हणतायत तोच वाटतो. एखाद्या गोष्टीतला कळीचा मुद्दा, जो सहज लक्षात येत नाही.
मुंबई विद्यापीठाची संगीत
मुंबई विद्यापीठाची संगीत विषयातील पहिली पीएचडी मिळवणारे शास्त्रीय गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर यांच्या मुलाखतीतून ( https://www.youtube.com/watch?v=1757jrhVHG8) एक विशेष मुद्दा समजला.
बऱ्याच वेळा स्त्री गायक पुरुष गायकांना गायन शिकवत नाहीत असे ते म्हणालेत. याचे कारण म्हणजे स्त्री व पुरुषाची गाण्याची पट्टी वेगळी असते. पुरुष शिष्य जर गुरू स्त्रीसारख्या पट्टीत गायचा प्रयत्न करू लागला तर मग त्याचा आवाज खराब होतो. अर्थात ते स्वतः मात्र याला अपवाद आहेत.
त्यांनी सुरुवातीच्या काळात काही अन्य गुरु केल्यानंतर तब्बल 19 वर्षे डॉ. प्रभा अत्रे यांच्याकडे गुरुशिष्य पद्धतीने शिक्षण घेतलेले आहे. प्रभा यांची पट्टी जरी वेगळी असली तरी सरवडीकरांना आपण कोणत्या पट्टीत गायचे याचा चांगला सराव झालेला आहे.
( या मुद्द्याबाबत संगीत अभ्यासकांचे मत जाणून घेण्यास उत्सुक. एका जाणकारांनी असे सांगितले, की स्त्री गायिकेकडे फक्त काही विशिष्ट प्रकार, चिजा, इ. शिकण्यासाठी पुरुष गायक जातात).
छान चर्चा सुरू आहे.
छान चर्चा सुरू आहे.
मेख म्हणजे खांब. ग्यानबाची मेख म्हणजे नेवाशाचा पैसाचा खांब - ज्याला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. >>> मस्त अर्थ उलगडा. धन्यवाद माधव. माहिती नव्हतं हे.
प्रतिभावंत आणि व्यसने १.
प्रतिभावंत आणि व्यसने
१.
कविवर्य बा भ बोरकर यांना धूम्रपानाचे जबरदस्त व्यसन होते. त्याबद्दल एकदा कवी मनोहर नाईक त्यांना रागाने म्हणाले,
“तुमच्यासारख्या प्रतिभावंत, बुद्धिमान माणसाने सिगरेटच्या एवढ्या आहारी जाणं बरं नव्हे. त्याने तुमचे आयुष्य कमी होईल”.
त्यावर बोरकर उत्तरले,
“तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुमचा राग मला कळतो. मी सिगरेट सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण जमलं नाही. धूम्रपान माझ्या न्यूनगंडावरचा इलाज आहे. मला देवाने प्रभावी देहसंपदा दिली नाही. माझा रंगही उजळ नाही. शिक्षण बेताचं. प्रतिभेच्या वरदानामुळे मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे मला जाणवतं. पण हे वेगळेपण दृश्य नाही. माझी अंगलट लहानखोर आहे. त्यामुळे हे मला जाणवणारे उणेपण मी ऐटीत धूम्रपान करून झाकण्याचा प्रयत्न करतो; मी त्याचा गुलाम झालो आहे”.
. . .
२.
‘कोसला’च्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीमध्ये भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातील हा अंश :
‘कोसलाच्या लेखनादरम्यान माझी आवडती चारमिनार सिगरेट गावात मिळत नव्हती म्हणून मी पिवळा हत्ती सिगारेट सतत ओढत असे. यामुळेच मी कधीही तंबाखू विरुद्ध बोलत नाही कारण ते कृतघ्नपणाचे ठरेल. तंबाखूशिवाय मला असं लिहिताच आलं नसतं”.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलेली “ जिवलगा राहिले रे दूर घर माझे” या गाण्याची जन्मकथा रोचक आहे.
ते एका नवीन गाण्याच्या शोधात असताना एकदा पहाटे पाच वाजता खिडकीतून बाहेर पाहत होते, तेव्हा त्यांना समोरच्या गच्चीत एक माणूस बंदीश गाताना दिसला. ते एकदम चमकले कारण, तीच बंदिश त्यांनी स्वतःच्या वयाच्या चौथ्या वर्षी ऐकलेली होती. मग हेच सूर पकडून आता गाणे झाले पाहिजे असे त्यांच्या मनात पक्के झाले.
मग त्यांनी शांता शेळक्यांना बोलावले आणि गीत लिहायला सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या,
“अहो मी कवी आहे. तुमच्या चालीवर नाही लिहू शकणार. तुम्ही मला वृत्त, छंद असं काही दिलं तर मी कविता करेन". परंतु हृदयनाथांच्या डोक्यात ती चाल तर पक्की होती. मग शांताबाईंच्या सांगण्यानुसार त्यांनी त्यांना काही खोटे शब्द नमुन्यादाखल दिले. ते असे होते
“ जिवलगा जीवनाची संधी आली रे. . “
तसेच हे पण सांगितले की हा जो जिवलग आहे तो प्रियकर/ पती / मुलगा/ निसर्ग असा कोणीही नको. आणि गाण्यात ईश्वर किंवा देवा शब्द आणू नका.
मग शांताबाईंनी त्यांच्या शब्दांमधील बाकी सर्व शब्द वगळून फक्त जिवलगा हा शब्द पकडला आणि त्याला अनुसरून पुढचे गाणे लिहिले. शांताबाईंच्या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात
तूच एकला नाथ अनाथा . . .
या ओळी आहेत आणि त्या हृदयनाथांना पसंत नाहीत. पुढे गीत खूपच लोकप्रिय झालेले आहे पण हृदयनाथ म्हणतात,
“अजूनही मी तो जिवलग कोण, हे शोधतोच आहे !”
https://www.youtube.com/watch?v=GHtTdw7f9o0
शांताबाईंनी या गीताबद्दल जे
शांताबाईंनी या गीताबद्दल जे सांगितलं आहे, ते यापेक्षा खूप वेगळं आहे.
मागे शांताबाईं आणि हृदयनाथ यांच्याच संदर्भात मी लिहिलेलं एक वाक्य आठवलं -
हृदयनाथ जेव्हा चाली रचत नसतात, तेव्हा किस्से रचत असावेत.
अच्छा ! असे आहे तर . . .
अच्छा ! असे आहे तर . . .
शांताबाईंनी सांगितलं की
शांताबाईंनी सांगितलं की जिवलगा हा शब्द ही हृदयनाथांची भर आहे. त्या एका शब्दाने गाणे वेगळ्याच उंचीला पोचले.
शिवाय शांताबाई त्यांच्या पहिल्या चित्रपटगीत लेखनापासूनच चालीवर गीते लिहीत होत्या. जिवलगा तर फार नंतर आले.
>>>>>>अजूनही मी तो जिवलग कोण,
>>>>>>अजूनही मी तो जिवलग कोण, हे शोधतोच आहे !
क्या बात है!!
‘उत्सव’ची चाळीशी !
‘उत्सव’ची चाळीशी !
उत्सव या हिंदी कामुक चित्रपटाने यंदा चाळीशी पूर्ण केली. त्याचे दिग्दर्शक गिरीश कार्नाड यांनी त्या चित्रनिर्मितीच्या काही विशेष आठवणी पूर्वी लिहिल्यात. त्यातील हा अंश :
(80 च्या दशकातला हा चित्रपट मी तेव्हा केवळ रेखा आणि रेखासाठीच पाहिला होता आणि त्यातील तिच्या अदाकारींच्या काही आठवणी अजूनही मनात रेंगाळतात).
https://thewire.in/film/the-making-of-girish-karnads-utsav-a-film-ahead-...
जयंत उमराणीकर (आयपीएस) यांनी
जयंत उमराणीकर (आयपीएस) यांनी RAW या गुप्तहेर खात्यासाठी काम करताना सांगितलेले काही भन्नाट अनुभव इथे आहेत. https://www.youtube.com/watch?v=3Ph3jlfGn8I
त्यातले हे भारी :
१.
ते लहानपणीच रशियाई भाषा शिकले होते आणि त्याचा गुन्हा उकलताना कसा उपयोग झाला याची ही रोचक कथा :
चोपडा येथे सशस्त्र दरोडा पडल्यानंतर त्यांना बोलावण्यात आले होते. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की तिथे गावठी बॉम्ब वापरण्यात आला होता आणि त्यामुळे बरेच कागदाचे तुकडे विखरुन पडले होते.
मग त्यांनी ते सर्व कपटे गोळा केले आणि एकत्र जोडून त्यातून काही धागेद्वारे मिळतात का ते पाहायचे ठरवले. तेव्हा लक्षात आले की बॉम्बसाठी जो कागद वापरला होता तो रशियाई- इंग्लिश आणि रशियाई-हिंदी या शब्दकोशांची फाडलेली पाने होती .
आता त्यांचे कुतुहल चाळवले गेले. चोपड्यामध्ये रशियाई मजकुराची पाने कशी आली असावीत? मग चौकशीतून कळले की तेथील एका ठेकेदाराने पूर्वी बिहारमधील बोकारोत काम केलेले होते. तेथील पोलादाचा कारखाना रशियाच्या सहकार्याने उभारलेला आहे. त्याचे कामगार पण बोकारोचेच होते. तिकडे भरपूर रशियाई साहित्य वाटले जायचे. त्यातलेच कागद या कामगारांनी या बॉम्बसाठी वापरले होते.
अशा तऱ्हेने गुन्हेगारांचा शोध लागला. न्यायालयाने या कामाचे कौतुक केले होते.
…
२.
पाकिस्तान बरोबरच्या भारतीय दूतावासाच्या धोरणाला VW ( volkswagen) असे गमतीने म्हटले जाते. म्हणजेच,
V = (भारतीय) visa
W = (भारतीय) whisky
या दोन्ही गोष्टींना तिकडून भरपूर मागणी असते !
Pages