मुखवटा कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 23 January, 2022 - 04:49

मुखवटा

हॉल मधील दिवे सत्यजितनि मंदावले आणि ते तसेच शांत बसून राहिले. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशात कोणत्यातरी विचारात गढून जायचे हि त्यांची जुनी सवय होती. आजचा दिवस त्यांचा आनंदात गेला होता. लग्नाच्या पंचविसाव्या वर्षानिमित्त त्यांनी आपल्या जवळचे मित्र मैत्रीण, नातेवाईक यांना पार्टी दिली होती. त्या कार्यक्रमाचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. किती सुरेख कार्यक्रम झाला आजचा.! पंचवीस वर्षाचा आपला प्रपंच .. आपले सोशल सर्कल ...शून्यातून आपण विश्व निर्माण केले म्हणून लोकांनी केलेले कौतुक, आपल्या कर्तुत्वाचा झालेला गौरव .. सर्वांनि केलेली भाषणे त्यांना आठवत होती. शालिनीचे सुद्धा कार्यक्रमात बरेच कौतुक झाले. कुणीतरी म्हणाल “ सत्यजितच्या या कर्तृत्वात शालिनीच्या प्रेमाची साथ होती. म्हणूनच हे कर्तृत्व सत्यजित सिद्ध करू शकला. Behind every great man, there is great woman हे शालिनीने शब्दश: सिद्ध केले आहे” टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. शालिनीच्या डोळ्यात आनंद आश्रू आले . घरी आल्यावर सत्याजीतनि सुद्धा तिचे भरभरून कौतुक केले. पण तिचे कौतुक करताना नेहमीचा उत्साह मात्र नव्हता.

रात्री कार्यक्रमाहून आल्यापासून सत्यजितना “ Behind every great man, there is great woman हे वाक्य आठवायचे आणि ते अस्वस्थ व्हायचे.आपल्या कर्तृत्वाला शालीनीची साथ? म्हणजे ती जर नसती तर आपण शून्य ?त्यांचा अंहकार दुखावला होता. गेली पंचवीस वर्षे आपला प्रपंच शालिनीने केला हे खरे आहे. पण प्रपंच म्हणजे काय ? घरातले किराणा सामान आणणे आणि दोन वेळचा स्वयपाक करणे यालाच प्रपंच म्हणायचे.? याला कर्तृत्व लागते ? तसही आपण प्रत्येक कामाला बाई ठेवली आहे. तरीही “मी प्रपंच केला, मी प्रपंच केला” म्हणून ओरडत असते. आपले कर्तृत्व आपण सिद्ध केले आहे. एका साध्या कंपनीत आपण कारकून होतो. काय तो पगार ! आणि ती बॉसची दादागिरी.! मनात आले नोकरी सोडून द्यायची आणि बिझनेस करायचा. त्यावेळी या बाईन विरोध केला होता. विरोध कसला आकांततांडव होता तो. आयुष्यभर मी काय हीच नोकरी करायची होती.? नोकरीत स्थेर्य असते, भाड्याच्या घरात आनंदात राहू शकतो म्हणाली. काय विचार होता. ! अरे प्रगती होत असेल आयुष्यात तर थोडे अस्थिर राहायला काय हरकत आहे? तुटपुंजा पगार, भाड्याचे घर असले काही आपल्याला नको होते. दिली नोकरी सोडून आणि हा ऑटोमोबाईलचा धंदा सुरु केला. सुरवातीला त्रास झाला आणि करोडो रुपये मिळवले. आणि आता या अलिशान बंगल्यात राहते आहे. मनगटात जोर पाहिजे जोर.! तो आहे माझ्या मनगटात आणि दाखवला मी. आणि श्रेय हिला!

खर तर शालिनीने साथ दिली असती तर अजुनी बरेच काही करत आले असते. पण हि बाई नेहमी विरोधात. आपण बिझनेस सुरु केला विरोध, नवीन शाखा सुरु केल्या विरोध. मुलांना परदेशात शिकायला पाठवले विरोध. शेती घेतली विरोध. फार्म हाउस बांधले विरोध. आणि सगळे सिद्ध झाल्यावर हिचे प्रेम!!. हे प्रेम बीम या सगळ्या गोष्टी फालतू आहेत फालतू ! अस काही नसतेच. कथा, कादंबरी पिक्चर यातून ठीक आहे ते. पण इतर वेळी भाकड गोष्टी आहेत या. आपण तरुणपणी सुद्धा या गोष्टींच्या मागे लागलो नाहि. वेळच नव्हता या गोष्टीसाठी. प्रेम म्हणजे आपल्या दृष्टीने दोघांच्यात under standing पाहिजे इतकच. पण या बाईने कधी समजून घेतलच नाही आपल्याला.

आणि आपली ती मुल. आज परदेशात आहेत. एक अमेरिकेत आणि दुसरा दुबईत. कुणाच्या जीवावर आहेत ती. परदेशात जाऊन शिक्षण घ्या म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे, शिक्षणाचा खर्च, सगळे आपणच केले ना ? आणि रोज रात्री आता फोन करतात आईला. बाबांना हॉलो सांगितय म्हणून सांग म्हणतात. दोन वाक्य बोलता येत नाहीत आपल्याशी.? इथे कुणाला गरज आहे म्हणा ? आता पादेशातील कोणती तरी पोरगी गटवतील. त्याची आई वैतागेल. पत्रिका, गोत्र गोंधळ घालेल. पुन्हा बाप आहेच त्यांच्या आईला पटवून द्यायला.

हे पत्रिका बित्रिका झुठ आहे सगळ. आपल्या लग्नाच्या वेळी बघितलीच होती कि. छत्तीस गुण जमले होते. आणि हा छत्तीसचा आकडा. हिच्यापेक्षा आपण प्रियंकाशी लग्न केले असते तर जास्ती चांगले झाले असते. किती आकर्षक होती प्रियांका? आणि किती गोड बोलायची? पाच वर्षे मैत्री होती आपली. प्रेमात पडली होती आपल्या. लग्नाचा विचारही केला होता दोघांनी. पण तिचा तो खडूस बाप. तुमच्या पगारात दोघांचे भागणार कसे म्हणाला? मूर्ख. आपल्या सासऱ्याचा मित्र असला पाहिजे. शेवटी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला होता. पण प्रियांका साधी होती. तिने धाडस नाही केले. आणि बापाच्या सांगण्यावरून एका सरकारी खात्यातील कारकुनाशी लग्न केले. परवा कळले कुणाकडून तरी नवरा हेडक्लार्क आहे म्हणून.हेडक्लार्क. शी: स्थेर्य पाहिजे म्हणे स्थेर्य.

किचन मध्ये खट्ट करून आवाज आला आणि सत्यजित आपल्या विचारातून भानावर आले. डोळे किलकिले करून किचनच्या दिशेने त्यांनी बघितले. शालिनी पाणी पिण्यासाठी उठली होती. त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. व शालीनिकडे बघून न बघिल्यासारखे केले. शालिनीचेहि सत्यजित कडे लक्ष होते. पण तिनेहि सत्यजित बसला आहे तिकडे दुर्क्षक्ष केले.

“कशाला बसला आहे कुणास ठाऊक.? शालिनीच्या मनात विचार आला. “बसला असेल आजच्या कार्यक्रमात स्व:ताची केलेली स्तुती आठवत. जवळ जाऊन का बसलात म्हणून चौकशी केली तर लगेच कॉफी मागेल. आणि स्वत: बद्दलच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारेल. पंचवीस वर्षे या माणसाने फालतू बडबड आणि त्या मोठ्या मोठ्या पुस्तकातले चऱ्हाट सांगण्याशिवाय दुसरे केले काय ? परवा कोण तो पीटर ड्रकंर का ड्रकरचे सांगत बसला होता. काय बोलत होतास कुणास ठाऊक.? आणि कुणाचे काय वाचले कि आपण कसे घडलो तेच सांगतो. बघेल तेव्हा स्वत:चा मोठेपणा. पण लोकांना कळत हो. कोण काय करत ते ? मी म्हणून या माणसाबरोबर प्रपंच केला. दोन दिवस परवा गावाला गेले तर साधा कुकर लावता आला नाही. बाहेरून पार्सल मागवल. त्याच्या आधी नक्की दारू ढोसली असणार. बाटली दिली फेकून पण बाटलीचे टोपण मला केराच्या बादलीत दिसल कि. नका पीत जाऊ इतकी तर मलाच शहाणपण सांगतो तू वाईन पीत जा म्हणून. का तर म्हणे ती अमक्या तमक्याची बायको पिते म्हणून. वाईन म्हणे. जरा देवाच कर रात्री. परमेश्वराची कृपा म्हणून इतक झाल काही तरी. तर म्हणे कामात देव असतो. दिवसभर मी काम करतो म्हणजे मी परेश्वराच्या सहवासात असतो. आपला शब्द तर कधी पडून देणार नाही. बर देव राहू दे निदान बायकोला फिरायला तरी घेऊन जा. अगदी युरोप नाही तर एखादा पिकनिक पौंइंट तरी. साध्या साध्या गोष्टीत आनद नाही. कधी एखादा गजरा सुद्धा घेऊन दिला नाही मला. एकदा वाद घातला तर तर म्हणे त्या पाच रुपायाच्या गजरयात कसलं काय काय प्रेम आहे ?

बोलायला तर एक नंबर आहे. त्याच्यावरच तर भाळले मी. म्हटलं साधी नोकरी आहे तरी चालेल. पण जर स्थिरता मिळेल आणि आनंदात राहू. सुखाचा संसार करू तर बिझनेसच खूळ डोक्यात घेतलं. आणि आता वेळ नाही. बायकोला राहू दे मुलांना तरी वेळ दिलाय का कधी या माणसान? ना कधी मुलांना बागेत घेऊन गेला, ना कधी शाळेत जाऊन मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. जरा छेडल कधी तर म्हणतो शालेय शिक्षणावर विश्वास नाही. अनुभवातून खर शिक्षण मिळत. आणि मुलांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतल तर याचे पैसे. मी पण शिकले आहे म्हटलं. केली असती एखादी नोकरी. पण मुलांना वळण कुणी लावले असते? रोजचा अभ्यास, रात्रीची रामरक्षा कुणी शिकवले असते ?पण हा बाबा कबुल करणार नाही. संस्कार म्हणे कर्तृत्वाने सिद्ध करायचे असतात. आई वडिलांनी इतक मोठ व्हायला पाहिजे कि मुलांना तेच संस्कार वाटायला पाहिजेत. मग ते आपोआप मोठे होतील. कोण बोलणार याच्यापुढे ? नुसती तोंडाची वाफ, पंचवीस वर्षे नुसती पिळवणूक केली या माणसाने. बाबांनी या स्थळाचा आग्रह धरला म्हणून मी हो म्हणाले. नाहीतर तोंडावरूनच त्या वेळी मला कळल होत हे काही सरळ पाणी दिसत नाही
बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेले कुत्रे भुंकत होते. शालिनी भानवर आली. या कुत्र्याचा त्रास सुद्धा याचाच. पंचवीस वर्षात चार कुत्री झाली. मला नाही आवडत हा प्राणी आणि हा मात्र टोमी टोमी म्हणून कुरवाळत असतो. बायकोपेक्षा कुत्र्यावर प्रेम.

रात्री उशिरा सत्यजित आणि शालिनीला डूलका लागला. सकाळ झाली. हॉल मध्ये झोपलेले सत्यजित उठून पेपर वाचत बसले होते. शालीनीही हॉल मध्ये आली.
“ गुड मॉर्निंग शालू” सत्यजितने हसतमुखाने विश केले.
“ गुड मॉर्निंग “ शालू म्हणाली.
“ आज नेहमी पेक्षा फ्रेश दिसते आहेस”
“ तर एका कर्तुत्ववान माणसाची बायको आहे ना मी” शालुने हसत उत्तर दिले.
“ येस. कालचा आपला कार्यक्रम मस्त झाला नाही शालू. खर सांगू, लोकांची स्तुती ऐकून मी थोडा मोटीव्हेट झालो. आता बघच पुढच्या दहा वर्षात अजुनी धंदा कसा वाढवतो ते”
इतक्यात फोनची बेल वाजते. सत्यजित फोन घेतात. फोनवर बोलता बोलता त्यांचा चेहरा आंनदतो. ते सारखे “ thank you” म्हणत आहेत. शालिनी त्यांच्यकडे बघत आहे. सत्यजित शालिनीला म्हणतात “ शालू,बेस्ट बिझनेसमनचे या वर्षीचे पारितोषक मला मिळाले आहे. चार दिवसात ते पारितोषक मला देतील”
शालू सत्यजितच्या जवळ जाते. प्रेमाने त्याला आलिंगन देते.
“ वा वा.अभिनंदन. म्हणजे साहेबांचा अजुनी एक कार्यक्रम आता. पण हा आनंद आपण चहा पिऊन साजरा करू या. थांब मी चहा करून आणते”
सत्यजित कुणाला तरी फोन करण्यात मग्न. शालिनी आत चहा करण्यासाठी गेली आहे. दोघेही आपल्या चेहऱ्यावर एक मुखवटा चढवतात आणि त्यांच्या दिवसाची सुरवात होते.

सतीश कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आधीच्या कंपनीतील बॉस आठवला...अतिशय workaholic, पाच कुत्री, बायकोबद्दल कधीही न बोलणे, दुसऱ्या टीम मधल्या एका Devorsee शी लगट...