वजनकाटावाला
---------------------
तो चौकात वळणावर बसायचा . वजनकाटा घेऊन.
पांढरा पायजमा ,पांढरा नेहरू शर्ट आणि पांढऱ्याच मिशा . सावळासा देह. वय झालेलं असूनही अंगाने तो चांगला होता . रोज सकाळी तो त्याच्या काट्याला नमस्कार करून स्वतःचं वजन बघायचा. म्हणजे धंदा चांगला होतो अशी त्याची श्रद्धा होती.
त्याचा वजनकाटा सर्वधर्मसमभाव मानणारा होता .
त्याच्याकडे लहान अवखळ पोरं , लुकड्या पोरी , मध्यम वजनाची मध्यमवयीन माणसं आणि जाड्याजुड्या बायका , सगळेच यायचे .
चौक बदलला . शेजारचं दारूचं दुकान मोठं झालं . चायनिजच्या नव्या गाड्या रस्ता अडवू लागल्या .
तो तसाच राहिला .
एके दिवशी लॉकडाउन पुकारण्यात आलं . पहिलं . कडक ! सगळं बंद !
त्याचा वजनकाटाही. त्याला कितीही नमस्कार केला तरी त्याचा काहीच उपयोग नव्हता आता . तो आणि त्याच्यासारखी माणसं अशा वेळी काय करतील ?... कोरोनाला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं ... आणि कोणालाच ... प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं .
रोज कमवायचा तेव्हा खायचा तो . अवघड परिस्थिती झाली . बाहेर पडायची चोरी . करायचं काय ? त्याच्याकडे बँक बॅलन्स थोडाच होता ? की वर्क फ्रॉम होम ? की घरी बसून पगार ? ...
म्हाताऱ्याची अन्नानदशा झाली . भीक मागायला लागला तो .
वजनकाटा मात्र तो उराशी बाळगून होता . पडलाझडला तरी - शेवटी पोटपाणी होतं ते त्याचं .
लॉकडाउनच्या ऑक्टोपससारख्या नांग्यांनी जीव गुदमरायला लागल्यावर काही जणांना काही लोकांच्या भुकेकंगालपणाची जाणीव झाली . ती अशी भुकेकंगाल माणसं होती की जी कायमची भिकारी नव्हती . पण वेळच अशी वाईट आली होती . पोट माणसाला सारं विसरायला लावतं ! लाचारी पत्करायला लावतं xxx !
मग अन्नदान सुरु झालं . थोडयाफार गरीब बिचाऱ्या जनतेची भूक तरी भागू लागली . थोडीफार. तोही रांगेत उभं राहू लागला . दोन टायमाला गिळू लागला . xxxx , जीवजाळ्या भुकेला बुस्टर डोसच जणू ! पण पुढे ? ...
अशा अवघड काळातही देशात अब्जाधीशांची संख्या एकेकाने वाढत होती ; तेव्हा त्याच्यासारख्या लोकांच्या फाटक्या पत्रावळींवरचं एकेक शीत कमी होत चाललं होतं .
परिस्थितीच्या पारड्यात त्याचं वजन कमीच होतं .
त्याची परिस्थिती आणखी बिघडत गेली . त्याच्या डोईवरचे केस आणखी राठ झाले. तो आणखी म्हातारा दिसू लागला . खंगला बिचारा .
एके दिवशी तो त्याच चौकात मरून पडला .
कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याला सहज उचलला , कारण त्यावेळी त्याचा देह वजनाला कापसासारखा हलका झाला होता .
बाजूला पडलेला वजनकाटा पोरका झाला होता . त्याचं आता कोणीच नव्हतं . तो धुळीने भरला होता , त्याचा काटाही तुटला होता , त्याची वाट लागली होती ... मालकासारखी अन भंजाळलेल्या विस्कळीत समाजासारखी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वजनकाटावाला
Submitted by बिपिनसांगळे on 19 January, 2022 - 22:24
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाप रे
बाप रे
कारुण्यमय शेवट..!
कारुण्यमय शेवट..!
नेहमीप्रमाणे संवेदनशीलतेने लिहिलेले लेखन..!
अरे अरे वाईट दुर्दैवी अंत.
अरे अरे वाईट दुर्दैवी अंत. भावपूर्ण श्रद्धांजली.
(No subject)
अर्रर्र!
अर्रर्र!
सर्व वाचकांचे आभार
सर्व वाचकांचे आभार
किशोरजी आभार
किशोरजी आभार
हि एक काल्पनिक कथा आहे
कथेबद्दल लिहावंसं वाटतं - पण
कथेबद्दल लिहावंसं वाटतं - पण -
कोणी आपल्या जोशात खरे
कोणी आपल्या कोषात बरे
सद्यस्थितीत काल्पनिक कथा
सद्यस्थितीत काल्पनिक कथा सुद्धा खरी असेल असेच वाटले.