स्पायह्यूमन

Submitted by Kavita Datar on 19 January, 2022 - 02:12

"श्रेया ! अगं उठ ना !! सात वाजून गेलेत. तुला कॉलेजला नाही जायचं का?"
मम्मा च्या आवाजाने श्रेया जागी झाली.
"Shit यार !! अलार्म कसा नाही झाला ? की मलाच ऐकायला आला नाही??"
स्वतःशीच बोलत तिने मोबाईल उचलला. काही हालचाल दिसत नसलेला मोबाईलचा ब्लॅक स्क्रीन पाहून ती वैतागली. "हे काय ? रात्री झोपताना तर चांगला 79% चार्ज होता. आता पूर्ण डिस्चार्ज ??"
चार्जर शोधून तिने मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये शिरली.

आवरून श्रेया बाहेर आली तरी, मोबाईल अजिबात चार्ज झाला नव्हता. त्याचा स्क्रीन पूर्णपणे डेड झाला होता. ती चांगलीच अस्वस्थ झाली.
"रिपेअरला टाकावा लागणार बहुतेक.."
ती मनाशी म्हणाली.

कॉलेज जवळच्याच एका मोबाईल शॉप मध्ये तिने मोबाईल रिपेअर करायला दिला. लगेच दुसऱ्या दिवशी मोबाइल रिपेयर होऊन तिला मिळाला. व्यवस्थित चालू होऊन मोबाईल परत मिळाल्या मुळे श्रेया रिलॅक्स झाली. जेमतेम पाच इंचाच्या मोबाइलने आपलं आयुष्य किती व्यापून घेतलं आहे, याची जाणीव होऊन तिला गंमत वाटली.

तिने समीरला कॉल केला,
"हाय !!"
"अगं कुठे आहेस श्रेया ? मी काल तुला दहा पंधरा तरी कॉल्स केले असतील."
"अरे माझा सेलफोन आऊट ऑफ ऑर्डर होता. बोल, आज कुठे भेटायचं ??"
"ऐक ना, आई पप्पा दोन दिवस नात्यातल्या एका लग्नाला गेलेत. घरीच ये ना. मस्त पास्ता बनवतो तुझ्यासाठी. डिनर करूया सोबत."
"येते संध्याकाळी सात पर्यंत."

श्रेया जशी काही हवेत तरंगत घरी आली.
"मम्मा, निलू कडे जातेय, दहाच्या आत नक्की परत येईन." घरी येताच तिने जाहीर केले. नीलू ला फोन करून आपला प्लान सांगायला मात्र ती विसरली नाही. न जाणो ममाने खात्री करून घेण्यासाठी तिला फोन केला तर... तिचं गुपित इतक्यात तिला उघड करायचं नव्हतं.

समीरला आवडणारा ब्लॅक अँड रेड वन पीस तिने अंगावर चढवला. डार्क रेड लीपस्टिक, आय लाइनर लावून लाईट मेकअप केला. कर्ल केलेल्या, मोकळ्या सोडलेल्या केसांना पुन्हा एकदा कोंब करून तिने ओला बुक केली आणि ती अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरून खाली आली.

शहरातील पॉश लोकॅलिटी तील एका रो हाऊस समोर तिची टॅक्सी थांबली. मेन डोअर वरची बेल दाबताना तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिची वाटच बघत असल्यासारखं समीरने दार उघडलं.
"कसली मस्त दिसतेहेस.."
असं बोलून पटकन दार बंद करून, समीरने तिला जवळ घेतलं आणि तिला डायनिंग टेबलशी आणलं. तिथलं दृश्य पाहून श्रेया हरखून गेली. डायनिंग रूम मध्ये लाईट्स ऑफ करून पूर्ण अंधार केला होता. टेबलवर आकर्षक पद्धतीने कॅन्डल्स पेटवून ठेवल्या होत्या. त्याच्या बाजूला पास्ता, टॅकोज, पेस्ट्रीज नीट अरेंज करून ठेवले होते.

समीरने तिच्या साठी एक खुर्ची ओढून तिला बसवलं आणि जवळच्या खुर्चीवर बसत तिचे हात हातात घेऊन म्हणाला, "खास तुझ्यासाठी युट्युब वर बघून रेड पास्ता बनवलाय..." हसत-खेळत दोघांनी डिनर एन्जॉय केलं आणि हॉलमध्ये येऊन बसले.

आज जवळजवळ महिन्याभराच्या अंतराने दोघं भेटले होते. समीरने श्रेयाला मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकले. तिनंही त्याला प्रतिसाद देत त्याच्या ओठांना डीप किस केलं. साडेनऊ कधी वाजले दोघांनाही कळलं नाही.

"समीर मला जायला हवं. मम्मा ला दहाच्या आत यायचं कबूल केलंय."
"चल, मी तुला घरी सोडतो."
"ओके.. ए.. एक सेल्फी घेऊया ना..."
असे म्हणून श्रेयाने त्याच्या चेहर्‍याला आपला चेहरा भिडवून स्वतःच्या मोबाईल मध्ये दोन-तीन सेल्फी घेतले.

*********

दुसऱ्या दिवशी पहाटे अलार्म च्या आधीच श्रेयाला जाग आली. सहज म्हणून साईड टेबल वर ठेवलेला मोबाईल तिनं हातात घेतला. व्हाट्सअप ओपन करून मेसेज बघत असताना एका अनोळखी नंबर वरून आलेल्या मेसेज कडे तिचं लक्ष गेलं. तिने मेसेज ओपन केला.

मॅडम,
सोबत चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचे का?? तशी इच्छा नसल्यास फक्त रुपये 10000/- या गुगल पे नंबर वर पाठवा.

मेसेज सोबत असलेले फोटो तिने डाउनलोड केले आणि ती ताडकन अंथरुणात उठून बसली. ते काल रात्री तिने तिच्या मोबाईल वरून काढलेले समीर सोबत चे सेल्फी फोटोग्राफ्स होते.

श्रेयाला समजत नव्हतं, की तिच्या मोबाईल वरून तिनं च काढलेले तिचे आणि समीरचे सेल्फीज अजून तिनं समीर सोबत देखील शेअर केले नाहीत, मग ते या माणसाकडे कसे काय आले? नक्कीच तिचा फोन कोणीतरी हॅक केला आहे, हे कळायला तिला उशीर लागला नाही. आता एक तर या चेहरा नसलेल्या हॅकर ला दहा हजार देऊन मोकळं व्हायचं आणि फोन फॅक्टरी रिसेट करायचा किंवा त्याला शोधून काढायचं. हे दोन पर्याय तिच्यासमोर होते.

तिने समीरला कॉल करून सगळं काही सांगितलं. समीर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता आणि त्याच्या कॉलेजमधल्या इथिकल हॅकिंग अँड सायबर सेक्युरिटी क्लबचा मेंबर होता. त्यामुळे त्याच्या लगेच लक्षात आलं की कुठलेतरी स्पायवेअर टाकून श्रेयाचा मोबाईल कोणीतरी हॅक केलाय.

"श्रेया मला एक सांग, गेल्या दोन-तीन दिवसांत तू तुझा मोबाईल कोणाला काही कारणाने दिला होतास का?"
"अरे हो... कालच माझा मोबाईल मी कॉलेज जवळच्या मोबाईल शॉप मधून रिपेअर करून आणलाय."
"मोबाईल रिपेअर करणा-याचंच हे काम असणार.. दहा वाजता त्या मोबाईल शॉप वर पोहोच, मी तिथे येतो."
"ओके समीर, मी पोहोचते तिथे दहा वाजेपर्यंत."

दहा सव्वादहाच्या सुमारास श्रेया त्या मोबाइल शॉप वर पोहोचली. शॉपच्या बाहेरच तिला समीर आणि अंकित भेटले. अंकित एक सर्टिफाइड इथिकल हॅकर होता. तो समीरचा मित्र आणि त्याच्या कॉलेजच्या सायबर सेक्युरिटी क्लब मधला इन्स्ट्रक्टर होता.

तिघं मिळून त्या मोबाईल शॉप मध्ये आले.
"काल तुम्ही या मॅडमचा मोबाईल रिपेअर करून दिला होता..."
समीरने काउंटरवर बसलेल्या व्यक्तीला म्हटले.
"हो सर, परत काही प्रॉब्लेम आलाय का?"
"फारच मोठा प्रॉब्लेम आलाय. तो फोन कोणी रिपेयर केलाय?"
"रफिक..."
त्याने आवाज दिल्याबरोबर एक २४-२५ वर्षांचा व्यक्ती समोर आला.
"रफिक फोन रिपेरिंग चे काम एकटाच बघतो. तुमचा प्रॉब्लेम सांगा त्याला."
असे म्हणून तो इतर कस्टमर्स कडे वळला.
श्रेया, समीर आणि अंकित रफिक सोबत शॉप च्या आतल्या बाजूला आले. तिथं काही मोबाईल ओपन करून ठेवले होते.

"कुठलं स्पाय वेअर टाकलं तु या मॅडमच्या मोबाईल मध्ये?" समीरने रफिकला दरडावून विचारलं.
रफिक गडबडला.
"मैने ? मैने कुछ नही किया.."
"कुछ नही किया ? श्रेया मोबाईल अनलॉक करून माझ्याजवळ दे."
अंकित म्हणाला. श्रेयाने मोबाईल त्याच्या हातात दिला.
"ये देख वाय-फाय नाम का जो अँप मोबाइल मे है, वो तूने रिपेयर करने के बाद डाला है. हमे क्या उल्लू समज रखा है? चल मोबाईल दिखा तेरा.."
"दुकान मे क्यो सीन क्रीएट कर रहे हो सर? मैने कुछ नही किया है."
"मोबाईल देता है या दो चार जडा दु ? "
समीरने त्याला धमकावत, त्याची कॉलर पकडत म्हटलं. त्याने निमुटपणे त्याचा मोबाईल अंकित कडे दिला.

अंकित ने रफिकचा मोबाईल चेक केला, तेव्हा त्यात स्पायह्यूमन नावाचं स्पायवेअर ॲप आढळून आलं. त्यात श्रेयाचाच नाही तर इतरही काही मुलींचे फोन हॅक करून क्लोन केलेले दिसले. रिपेअर साठी आलेल्या, विशेषत: मुलींच्या मोबाईल फोन मध्ये रफीक स्पायह्यूमन नावाचे ॲप इंस्टॉल करायचा. हे ॲप दुसऱ्या नावाने त्या मुलींच्या मोबाईल मध्ये दिसायचे. कुठले तरी बिल्टइन अँप असणार असे वाटून बहुतेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असणार. या ॲपद्वारे रफिक त्या मुलींचे फोन हॅक करून क्लोन करून ठेवायचा. त्यामुळे त्या फोनवरचे इन्कमिंग, आउटटगोईंग कॉल्स, एसेमेस, व्हाट्सअप, फेसबुक, गुगल पे सारखे यूपीआय सगळं ऍक्सेस करून त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. या ॲपद्वारे एक दोघींच्या बँक अकाउंट मधून त्याने पैसे सुद्धा काढले होते.

स्पायह्यूमन हे ॲप हॅकर त्यांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर त्याचसोबत ज्याचा फोन हॅक करायचा आहे त्याच्या मोबाईल फोनवर इन्स्टॉल करतात. Victim च्या फोनवर ते सेक्युर्ड सर्विस किंवा वाय-फाय या नावाने ॲप्स च्या लिस्ट मध्ये दिसते. स्पायह्यूमन द्वारे हॅकर मोबाईल फोनचा पूर्ण ताबा घेऊ शकतात. म्हणजेच मोबाईल फोनचा क्लोन करू शकतात. विक्टिम चे लोकेशन, फोटो गॅलरी, एसेमेस, व्हाट्सअप, फेसबुक सगळे त्यांना ॲक्सेस करता येते. त्याद्वारे ब्लॅकमेल करणं, आर्थिक फसवणूक करणं आणि गोपनीयता भंग करणं हे उद्योग करतात. काही लोक त्याला बळी पडतात. मात्र श्रेया सारखे काही सजग, सतर्क लोक त्यांचे काळे कारनामे उघडकीस आणतात.

रफिकने फसवलेल्या इतरही काही मुलींना अंकितने गाठलं आणि रफिक विरुद्ध कंप्लेंट देण्यास तयार केलं. श्रेया तसेच इतर काही मुलींचे फोन आणि रफिकचा फोन पुरावा म्हणून सादर केला. रफिकला इंडियन आयटी 2000 ऍक्ट च्या कलम 66 आणि कलम 67 नुसार पाच वर्षांची जेल आणि एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.

आपला मोबाईल फोन,
[ ] विनाकारण वेगाने डिस्चार्ज होत असेल,
[ ] जास्त गरम होत असेल,
[ ] डेटाचा वापर तुम्ही न वापरताही जास्त होत असेल,
[ ] अनपेक्षित पॉपअप किंवा ब्राउझर हिस्टरी दाखवत असेल,
[ ] विनाकारण हँग होत असेल,
[ ] इन्कमिंग-आउटगोईंग कॉल्स च्या वेळेस बॅकग्राउंडला काही आवाज जाणवत असतील,
तर नक्कीच हॅक झाला आहे असे समजावे आणि फॅक्टरी रीसेट करावा.

काही पॉप्युलर ॲप्स देखील आपला मोबाईल फोन स्पाय करतात, म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

[ ] युवावर्गाने अंतरंग क्षणांचे फोटो मोबाईलवर ठेवू नयेत.
[ ] फार कोणावरही विश्वास ठेवून त्याला खाजगी माहिती, फोटो, पासवर्ड वगैरे शेअर करू नये.
[ ] आपला फोन कोणाच्याही हातात देऊ नये.
[ ] मोबाईल फोन पासवर्ड /पिन /पॅटर्न ने लॉक करावा.
[ ] रिपेअर करायला दिल्यास शक्य असल्यास इरेज करून द्यावा आणि रिपेअर होऊन आल्यावरही फॅक्टरी रीसेट करून वापरावा.

सजग, सतर्क आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजी चा आनंद घ्या.

©कविता दातार

Group content visibility: 
Use group defaults

एका जवळच्या व्यक्तीला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागलेले आहे. सायबर गुन्हे शाखेच्या अधिकार्यानी प्रचंड सहकार्य केले होते पण जो मनस्ताप व्हायचा तो झालाच.
माहिती शेयर केलीत म्हणून आभार