चांदणे कोठेतरी हरवून गेले..

Submitted by _आदित्य_ on 6 January, 2022 - 14:55

दिवस ते हातातूनी निसटून गेले..
चांदणे कोठेतरी हरवून गेले !

मी जयांच्या जीवनातील चंद्र होतो,
लोक ते भोळे मला विसरून गेले !

शोधता पावित्र्य कोठे सापडेना..
काय झाले? जग कसे बदलून गेले?

शब्द ते होते कुणाचे कोण जाणे?
आसवांनी जे मला भिजवून गेले..

एवढे घाईत होते सांजवारे...
की मनातील दीपही विझवून गेले !

वाट मी बघतो परी काही सुचेना..
काव्यही बहुदा मला फसवून गेले !!

.....................

Group content visibility: 
Use group defaults