भार झाले

Submitted by निशिकांत on 6 January, 2022 - 07:54

मीच मजला भार झाले
दु:ख आता फार झाले

मातृगर्भी वाढतांना
कैक मजवर वार झाले

पोरगी जन्मास येता
पुण्यही बेकार झाले

तोच जगती  भाग्यशाली
पुत्र ज्याला चार झाले

आवडे हसणे परंतू
आसवांची धार झाले

आदिशक्ती मी पुराणी
आज अबला नार झाले

टाळणे नजरा विषारी
जीवनाचे सार झाले

मी जरा फुलताच भुंगे
शोषणारे यार झाले

नोकरी धरता तिथे मी
काय गजबज बार झाले !

कोण आले मज लुटाया ?
किलकिले का दार झाले

शील रे "निशिकांत" विकण्या
चहुकडे बाजार झाले

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.न. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मनोरमा
लगावली--गालगागा X २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली. '--आर' असलेले मराठीत अनेक शब्द आहेत असं लक्षात आलं. त्यावरून मी एक काहीतरी लिहायचा प्रयत्न केला आहे याच वृत्तात. प्रयत्न आगाऊ वाटला तर कृपया क्षमा करा.

अरेरे! फार वाईट वाटले. मी कदाचित हे विसरून गेलो. कारण अधूनमधून त्यांच्या गझला इथे वरती येत असतात आणि फार सुंदर असतात. माझी अशी समजूत झाली होती की ते अजूनही लिहीत आहेत. Sad

>>>ते आता हयात नाहीत>>>>
फार हळहळलं मन....
नियमित विकांताचे लेख लिहायचे ते बंद झालं तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. वाटलं त्यांना फोन करावा पण केला नाही. कारण मागे एका मित्राला असाच तो गेल्यावर फोन केला. त्याच्या मुलाकडून कळलं तो नाही आता.
ते जिथे असतील तिथे त्यांना सादर प्रणाम.

ब-याचदा असं वाटतं कोणी माबोकर स्वर्गवासी होईल तेव्हा अशी काही तरी नोंद दु:खद बातमीच्या धाग्यावर व्हावी.

Sad कसे काय?

सुंदर!

निशीकांत' आता इहलोकात नाहीत>> oh.