भ्रष्टकर्म नोहे जाणिजे सत्कर्म

Submitted by ASHOK BHEKE on 4 January, 2022 - 09:45

भ्रष्टकर्म नोहे जाणिजे सत्कर्म*
परवा एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात जाणे झाले आणि आलो आहे तर सहज शनिवारवाड्याकडे गेली दोन वर्षे फिरलो नव्हतो म्हणून मुद्दामच वाकडे वळण घेऊन शनिवारवाड्यावर दाखल झालो. शनिवारवाडा गेलो का डोळे भरून पाहावा, असं नेहमीच वाटतं. तीनशे एक वर्षे झाली अजून बाह्यबाजू आहे तशीच आहे. आतमध्ये प्रवेश करताना रुपये २५ तिकीट काढून जावे लागते. माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. पांच रुपये जाणार, रांगेत उभे असणारे यामुळे चिंतेत होते. टोकन देणारा सुट्टे पैसे द्या म्हणून ओरडत होता. सुट्टे नक्कीच त्याकडे होते. पण त्याची द्यायची मानसिकता नव्हती. गर्दी होती पांच रुपयावर पाणी सोडून रांग पुढे सरकत होती. पण एक माणूस असा होता की, त्याला हे पटेनासे झाले. रांगेतल्या दहावीस जणांचे जरी ५ रुपये त्या टोकन देणाऱ्याच्या खिश्यात जमा झाले होते. त्याने त्याला खडसावून पांच रुपये परत कर, नाहीतर आतापर्यंत तुझ्याकडे जमा झालेले जितके पांच रुपये एका बुक्कीत बाहेर काढील. त्यावर टोकनवाल्याचे सगे सोबती जमा झाले. पांच रुपये मागणाराला दमदाटी करू लागले. तो देखील इरसाल नमुना होता. दमदाटीला घाबरत नव्हता. पैसे देतोस की नाही....? नाहीतर तुझ्यासहीत हे तुझ्या साथीदारांना देखील पाणी पाजील....! लक्षात ठेव. अस्सल दम कसा द्यावा, हे कळले. गर्दीत जाऊ दे, जाऊ दे नारा लागला होता. पण तो माणूस काही केल्या ऐकत नव्हता. मला तर हा पारशी बावाजी असावा, असेच वाटले. खमीस आणि लेंगा म्हणजे मराठा गडी होता. कमाविलेले शरीर दिसत होते. अंगापिंडाने दणकट होता. त्याला जबरदस्तीने पुढे ढकलण्याची देखील त्या सग्यासोबत्यामध्ये हट्टीकट्टी जवान मंडळी असूनही धमक नव्हती. काहीवेळानंतर रांगेतले मात्र त्याच्या बाजूची कड घेत एकदा जिरवू द्या, या लुटारू टोळीची त्याचा हेका पाहून मजा पाहत बसले होते. कोणी काही बोलत नव्हते. टोकन देणारांचा हिशोब कसा घेतला जात असावा, ना धड कागदी चिट्टी ना बारकोड. काहीच नाही. कुणाच्या तरी खिश्यात जाणारा हा पैसा हळूहळू सर्वांच्या लक्षात आले होते. सरतेशेवटी पांच रुपये त्याला परत दिले. पण पुढच्या रांगेतल्या सर्वांचे देखील गपगुमान परत देऊ लागले. एक इरसाल नमुना कळत नकळत लढला पण सर्वांच्या फायद्याचा ठरला. कोणत्या मातीतला होता ठाऊक नाही पण शिवरायांचा मावळा नक्कीच होता. त्याने *भ्रष्टकर्म नोहे जाणिजे सत्कर्म* या गुणाचे दर्शन मात्र झाले होते. आम्हीमात्र वाडवडीलांकडून मिळालेली संयम राखण्याची, दु:ख पचविण्याची देणगी इमानेइतबारे निभावीत आलो आहोत. यापुढील पिढी जतन करील की नाही, या माणसाकडे पाहिले तर वाटत नाही त्याला त्याच्या हक्काचे परत मिळालेले पांच रुपये घेऊन मार्गी लागला. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशा घटना कैद होत असतात. असे इरसाल नमुने त्यांच्या खवचटस्वभावामुळे अविस्मरणीय अनुभव देत आपल्यावर मनोराज्य गाजवितात.
बेस्ट बस मध्ये सुट्ट्या पैश्यावरुन नेहमीच भांडणे बघायला मिळायची. त्यावर कंडक्टर तिकिटाच्या मागे लिहून देत डेपो मध्ये या. कोणी ते चार आणे आठ आणे, पुन्हा परत मागायला जात नसत. पण एक नमुना होता. त्याला ज्या कंडक्टरने लिहून दिलेले तिकीट जवळजवळ तीन महिने जतन करून ठेवले होते. एके दिवशी डेपोच्या बाजूला काही कामानिमित्त गेला असताना सहज त्या डेपोत घुसला. ते तिकीट काढले आणि खिडकीवर पैसे मागू लागला. निरीक्षक चौकशी करू लागला. त्या दिवशी आगाऊ रक्कम कोणी जमा केली आहे का ? कुणाच्या खात्यावर टी रक्कम नव्हती. हे तिकीट कोणत्या कंडक्टरकडून अदा झाले. त्याचे नांव निघाले. त्याने तर अशी रक्कम जमा केलीच नव्हती. काहीतरी ३५ पैसे होते. कोणी ३५ पैश्यासाठी फिरकणार नाही. या हेतूने कंडक्टरने ते खिश्यात घातले होते. परंतु आज अचानक या इरसाल नमुन्याने त्याच्या प्रामाणिकपणावर गदा आणली होती. नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. निलंबन नव्हे तर जागीच बडतर्फ केले जाणार होते. त्याचे वय झाले होते अनुभवी माणूस होता. तासभर पैश्यासाठी खोळंबून ३५ पैसे परत घेण्यासाठी उभे असलेल्या त्या इसमाने जाणले आणि खिडकीवर दिलेले तिकीट पुन्हा परत घेतले. आपल्या ३५ पैश्यामुळे एक माणूस नोकरीला मुकणार होता. नको असे हे पातक म्हणून आल्या पावली माघारी निघाला. जाता जाता बेस्ट बसच्या कंडक्टरला प्रामाणिकपणाने नोकरी करा, असा मधुर संदेश देत वेदना देऊन गेला. तो इरसाल नमुना म्हणजे एक रत्न होते. भ्रष्टतेच्या मार्गावरचा पहारेकरी होता. अशी माणसे ठिकठिकाणी भेटत असतात. नवनवे अनुभव पदरात टाकून जातात. हि माणसं असे करू शकतात तेव्हा आपण यात कोठेच सामील नसतो. हीच चोरटेपणाची छटा आपल्या चेहऱ्यावर घेऊन फिरत असतो.
एका पक्षाने मोर्चा आयोजित केला होता. मोर्चाला गर्दी व्हावी म्हणून गावोगावची कार्यकर्ती मंडळीना माणसे आणण्यासाठी रक्कम देऊ केली होती. शेतमजुरी सोडून यायचे म्हणजे जितकी शेतमजुरी तितके द्यायचे ठरले होते. म्हणजे तेव्हा ४०० रुपये पुरुषांना आणि महिलांना २५० रुपये मेहनताना मिळत होता. मोर्चा झाला. कार्यकर्ता जे भांडखोर, बलदंड शेतमजूर होते. त्यांना पैसे देऊन पसार झाला. दिनदुबळे असेच राहिले. त्यामध्ये एक मध्यमवयीन महिला होती. हातावर पोट होतं. त्याच पैश्यातून तिच्या घरची चुल पेटणार होती. कार्यकर्ता पसार झाल्याने अनेक मजूर घरी परतले. पण ती त्या कार्यकर्त्याच्या घरी गेली तो नव्हता घरी. तिने तेथेच ठिय्या ठोकला. घरी आलेली बाई म्हणजे आपल्या नवऱ्याने नक्कीच गंडविले असणार...! हे त्या कार्यकर्त्याच्या बायकोच्या लक्षात आले. नवरा लवकर घरी येणार नाही आणि त्या बाईला पैश्यासाठी घराच्या अंगणात बसविणे योग्य नाही म्हणून तिची विचारपूस करून तिचा मेहनताना सन्मानाने देऊ केला. दुबळे हात असले तरी कोठेही पोहचू शकतात. समाजाला फसवीत सभ्यतेचा बुरखा पांघरणाऱ्या कार्यकर्त्यांना रणरागिणी धडा शिकवू शकतात.
अनेक माणसं भेटतात. सोज्वळ असतात तर काही डांबरट असतात. सोज्वळ माणसाला समाज किमंत देत असतो. पण हि डांबरट देखील समाजातल्या भ्रष्टकर्मावर सत्कर्माचे मोहर लावून जातात. दैव योगाने घडून आलेले चमत्कार पाहिले की, त्यांची किमंत कळून येते. या हृदयीचे हृदयी चपखलपणे बसते. प्रत्येकाला असे गोड अनुभव येत असतात. एखादा दारुडा रस्त्यावर काही वेडे वाकडे बरळत असतो. कुणाचे तरी वाभाडे काढीत असतो. लोक त्याच्याकडे पाहून बेवडा म्हणून दुर्लक्ष करतात. पण त्याच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द खरा असतो. धुंदीत खोटे न बोलता तो सत्याला हात घालीत असतो. समाजाला सत्याला हात घालणारे नको असतात. भ्रष्ट कारभाराला उत्तेजन देणारा समाज आहे. खरं सांगायचं झालं तर उमटणारी अक्षर कितीही सत्याचे प्रदर्शन अथवा संस्कारी असली तरी वाचनानंतर येरे माझ्या मागल्या... हा प्रत्यंतर नेहमीच दिसून येतो.

अशोक भेके
घोडपदेव समूह

Group content visibility: 
Use group defaults

असे लोक देखील नाटकीच असतात. 35 पैसे , 5 रु यासाठी बोलून खाज भागवून घेतात.

घराचे रजिस्ट्रेशन , नोकरी , ट्रान्सफर यासाठी हयांनीच हजारो दिलेले असतात