मी खरा कळलोच नाही

Submitted by निशिकांत on 2 January, 2022 - 06:39

आत असते काय चालू? पोच नाही
आरशाला मी खरा कळलोच नाही

केवढी गर्दी दुतर्फा रोमिओंची!
जो हवा वाटे मनाला, तोच नाही

केवढ्या मूर्तीच मूर्ती स्थापिलेल्या
देव म्हणतो मंदिरी रमलोच नाही

भूल थापा देउनी निवडून आलो
अन् पुन्हा जनतेमधे गेलोच नाही

शब्द फसवे, चोपडे शोधू कशाला?
सत्त्य ते सांगावया संकोच नाही

ध्येय जर गाठायचे तर घे भरारी
देव कोणा देत यश घरपोच नाही

माय आली घेउनी चारा परंतू
मोकळ्या घरट्यात दिसली चोच नाही

प्रेम दडलेले तिच्या रागात होते
आग पाखडण्यात दिसली खोच नाही

पांडुरंगाला शरण गेल्या क्षणाला
जीवनी "निशिकांत" उरली बोच नाही

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मंजुघोषा
लगावली--गालगागा X ३
 

Group content visibility: 
Public - accessible to all site users