गतवर्षीच्या अंधाराला
संपवायची करू तयारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी
आम जनांनी गेल्या वर्षी
खूप भोगली दिवाळखोरी
राजकारंणी बबेमानांनी
केली चोरी अन् शिरजोरी
भस्मासुर हा भस्म कराया
एक पेटवू या चिनगारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी
तेच चेहरे तेच पुढारी
पिढीदरपिढी तीच घराणी
देशधनावर ताव मारती
कुणाचीच नसते निगरानी
प्रस्थापित लोकांस उखडण्या
घ्या तरुणांनो आज सुपारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी
हट्ट करू या नवीन साली
पारदर्शिता रुजवायाचा
नकोत पडदे नि आडपडदे
निर्णय नसतो लपवायाचा
प्रकाश वाटा चालत राहू
हवे कशाला मार्ग भुयारी?
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी
चित्र उद्याचे कसे असावे?
आज आहे ते उद्या नसावे
इथे निरागस सर्व कळ्यांनी
ना चुरगळता मस्त फुलावे
दरवळात या तरुणाईच्या
जल्लोषाला मिळो भरारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी
रात्र असावी स्वप्न बघाया
दिन स्वप्नांना पूर्ण कराया
यत्न करोनी आपण अपुल्या
नशीब रेषा नव्या लिहाव्या
युध्द तुझे अन् जीतही तुझी
एल्गाराची फुंक तुतारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी
बदलासाठी तगमगणार्या सर्व तरूण आणि तरुणींना आणि इतरांनाही नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा.
निशिकांत देशपांडे, पुणे..
मो.क्र. ९८९०७ ९९०२३