पुढती पुढती सरकत आहे

Submitted by निशिकांत on 26 December, 2021 - 07:16

जसे जसे वय पुढती पुढती सरकत आहे
अंतर अपुल्या दोघांमधले वाढत आहे

नकात सांगू मदिरा नसुनी सरबत आहे
डोळ्यामध्ये नशा केवढी उतरत आहे!

तारुण्याच्या सुवर्णकाळी वाटायाचे
जणू लागली लॉटरीतली सोडत आहे

या जन्माची नको जळमटे पुढच्या जन्मी
हिशोब सारे मरण्याआधी चुकवत आहे

काय भरवसा पोरंचा? मी हयात असुनी
आत्मपिंडदानाच्या विधिला उरकत आहे

काष्ट विकोनी स्मशानात जो धंदा करतो
दुसर्‍यांच्या मरणात पाहतो बरकत आहे

भक्ती नगदी, उधार का फलप्राप्ती आहे>
कधी वाटते भक्तांची ही फसगत आहे

मनाप्रमाणे जगणार्‍या या कलंदराला
ना पापाची ना नर्काची दहशत आहे

खळगी भरण्यासाठी धडपड करणार्‍यांना
स्वप्न गुलाबी बघावया ना फुरसत आहे

कांही गोष्टीअवघड असती शोधायाला
माझ्यापासुन मीच अताशा हरवत आहे

आप्तेष्टांना घाई झाली, मरण्याआधी

पुरावयाला कोण कबर तो खोदत आहे?

लग्नाविन नांदले परंतू सायंकाळी
कुणीच अपुले उरले नाही! बोचत आहे

ती गेल्याचे "निशिकांता"ने पत्करले पण
आठवणींना तिच्या विसरणे कसरत आहे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users