कल्पना दुधाळ यांच्या ताज्या दोन कविता
या पिढीच्या अग्रगण्य कवींमध्ये कल्पना दुधाळ यांचा समावेश होतो. घरच्या शेतीत राबणारी, प्रपंचाचा गाडा
कुशलतेने हाकणारी (आणि त्यात यत्किंचीतही कमीपणा न मानणारी) एक कर्तव्यदक्ष गृहिणी ही त्यांची ओळख. निसर्ग
आणि कृषि-संस्कृती यांच्याकडे आत्मीयतेने आणि सजग नजरेने पहाताना त्यांची सृजनशीलता आणि अस्वस्थता यांचा
एक मनोहारी मिलाफ घडून आला. सपासप खुरपे चालवणारे त्यांचे हात दुसरीकडे उच्च दर्जाची कविता प्रसवू लागले.
कुणाच्याही प्रभावाखाली न येणारी, त्यांची स्वतंत्र प्रज्ञेची कविता साक्षेपी वाचक नावाजू लागले यात नवल नाही.
असे अनेकदा आढळते की कवि अथवा लेखक, कळत नकळत, आपल्या शैलीच्या प्रेमात पडतो आणि त्या
चाकोरीबाहेर पडण्यास कचरू लागतो. मला जाणवलेले कल्पना दुधाळ यांच्या कवितेचे एक ठळक वैशिष्टय असे की
आपली अशी एक शैली जोपासण्याचा मोह त्यांनी कटाक्षाने टाळला आहे. त्यांची प्रत्येक साहित्य-कृती (अधून मधून त्या
ललित लेखनही करतात) स्वयंभू आणि स्वतंत्र असते. ‘जे न देखे रवी’ अशी त्यांची नजर कशातून काय टिपत जाईल आणि
त्यातून काय आविष्कृत होईल याचा अंदाज वाचकाला येत नाही. पुनर्प्रत्ययाऐवजी नव-प्रत्ययाचा आनंद त्यांची प्रत्येक
कृती देते.
या वर्षीच्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दोन कविता – ‘चकवा’ (मौज) आणि ‘एकत्र कुटुंब’
(अक्षरलिपी) मला अतिशय आवडल्या.
‘एकत्र कुटुंब’ नेहमीपेक्षा आकाराने मोठी आणि वेगळ्याच जातकुळीची असल्यामुळे की काय पण संपादकांनी
तिचा समावेश कविता-विभागात न करता तिला स्वतंत्र स्थान दिले आहे. माझ्या मते तीत काव्यगुण ओतप्रोत भरलेले
आहेत आणि या गुणी कवयित्रीच्या मोजक्या किंवा निवडक कवितात तिला स्थान मिळावे इतकी ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एकत्र कुटुंबात घट्ट रुतलेल्या आणि सृजनशीलतेचा कोंडमारा झालेल्या गृहिणीच्या अनुभवांचे आणि मनोवेदनांचे अत्यंत
प्रत्ययकारी चित्रण या कवितेत उमटले आहे. तिचा सूर तक्रारीचा किंवा बंडखोरीचा नाही पण हळूवारपणे, तरीही
धीटाईने टिपलेले असंख्य बारकावे, यातून तिच्या जगण्यातली कुचंबणा स्पष्ट होत जाते. ‘कुचम्बली तरी थांबली नाही’
अशी ही स्त्री आपल्या कवितेला मोकळी वाट करून देताना काही हातचे राखत नाही. त्यामुळेच ती आपल्या कवितेला
‘अवगुणी’ कविता म्हणते. ‘निबोलका जीव’, ‘खुस्पाट’, ‘कुटापर्यन्तच्या कटकटी’, ‘धीराचे बुडखे’ अशा अनेक अनवट पण
चपखल शब्दकळा आपल्या भेटीला येतात आणि त्यातून अर्थाचे निर्झर सहजगत्या उफाळून येतात पण ते पाणी बेछूटपणे
वाहत नाही तर ठेचाळत आणि अडखळत, तिथेच खिळून रहाते. “घर सोडून जायचंच आता, असं हजारदा ठरवतात ...
पण फक्त ठरवतात!” हा या कवितेचा शेवट चटका लावून जातो.
‘चकवा’ ही कविता अभिव्यक्तीच्या दृष्टीने पहाता, अगदी वेगळी आहे. तीत अनेक प्रतीकात्मक प्रतिमा ठासून
भरल्या आहेत. त्यांची पुनरावृती हीच त्या चकव्याचे व्ययच्छेदक लक्षण आहे कारण चकव्यात सापडलेला माणूस
पुन:पुन्हा त्याचं जागी येत असतो. ‘सरळसोट रेघा’ मग गिणगिणत नागमोड्या वळतात आणि पृथ्वी ‘आखूडखुजी’ भासू
लागते, ‘वाणमाऱ्या’ गवतातून ओळखीअनोळखी वास भेटत जातात आणि ‘पारुम्बी’ धरून ठेवावी लागते. पण ही काही
पहिलीच खेप नाही. यापूर्वीही आपण अशाच चकव्यात सापडलो होतो आणि कसेबसे सुटलो होतो. एकूण काय तर आपलं
जगणं म्हणजे चकव्यांची न संपणारी कथा आणि व्यथा असते.
या दोन्ही कवितातून मला No Exit चा प्रत्यय आला पण तो किती भिन्न प्रकारे मांडला आहे! कल्पना दुधाळ,
तुम्हाला Hats Off!!
- प्रभाकर (बापू) करंदीकर.
छान ओळख करून दिली आहे. काही
छान ओळख करून दिली आहे. काही ओळी देणे प्रताधिकार भंगात येत नसेल तर द्याव्यात.
रसग्रहणाला मुळ कवितेशिवाय मजा
रसग्रहणाला मुळ कवितेशिवाय मजा नाही...