प्रभावी भाषणासाठी...

Submitted by कुमार१ on 21 December, 2021 - 23:46

आपल्यातील काही जणांवर आपले व्यवसाय वगळता सार्वजनिक मंचावर छोटेमोठे भाषण देण्याचा प्रसंग कधीतरी येतो. अशा प्रसंगांमध्ये कौटुंबिक मेळावा, मित्रांचे संमेलन, सामाजिक उत्सव आणि विविध विशेष दिनांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. माझ्यावर अशी वेळ आतापर्यंत बरेचदा आलेली आहे. तेव्हा आपल्यासमोर उपस्थित असणारा श्रोतृवर्ग हा विविध वयोगटांतील आणि विभिन्न प्रकृतींचा असतो. अशा प्रसंगी थोड्या वेळात प्रभावी बोलणे ही एक कला आहे. ही कला मी प्रयत्नपूर्वक विकसित करीत राहिलो. त्यासाठी काही थोरामोठ्यांच्या भाषणांचा व त्यांच्या मेहनतीचा अभ्यास केला. माझ्यावर झालेले शालेय शिक्षकांचे संस्कारही यासाठी उपयोगी पडले. तसेच वक्तृत्वकलेसंबंधी काही पुस्तके वाचली. या अभ्यासातून माझ्यावर काही चांगल्या वक्त्यांच्या कृतींचा प्रभाव पडला. पुढे त्यात स्वानुभवाने काही भर घालता आली. या संदर्भातील काही रंजक व रोचक माहिती, अनुभव आणि किस्से आपल्या सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी हा लेख लिहितोय. माझ्याप्रमाणेच इथल्या वाचकांमध्येही काही हौशी वक्ते असू शकतील. त्यांनीदेखील आपापले असे अनुभव प्रतिसादांमध्ये जरूर लिहावेत.

१.
सुरुवात करतो नामवंत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या संदर्भातील एका प्रसंगाने. हा किस्सा रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे.
एकदा शिक्षणदिनाच्या निमित्ताने आकाशवाणीने पुलंना अवघ्या ४ मिनिटांचे भाषण देण्यासाठी बोलावले होते. पिंगे तेव्हा तिथले अधिकारी होते. त्यांचा अंदाज होता की, पुलं भाषणाच्या फार तर तासभर आधी येतील आणि उत्स्फूर्तपणे ते छोटेसे भाषण ठोकून देतील ! परंतु तसे अजिबात घडले नाही. पुलं पिंगे यांना दोन दिवस आधी भेटायला गेले. त्यांनी त्यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली. आधी या विषयावर कोण कोण व काय बोलून गेले आहे, त्याची सुद्धा चौकशी केली. मग भाषणाच्या तयारीसाठी २४ तास मागून घेतले. घरी गेल्यावर पुलंनी त्यावर पुरेसा अभ्यास करून अडीच पानी मजकूर तयार केला. दुसऱ्या दिवशी ते आकाशवाणीत गेले. तिथे त्यांनी आधी भाषणाची तालीम केली आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी तयार होऊन बसले. हे छोटेखानी भाषण त्यांनी बरोबर ३ मिनिटे ५९ सेकंदात बसवले होते.

एका लहानशा भाषणासाठी पुलंसारखा मुरब्बी साहित्यिक किती मेहनत घेतो हे वाचून मी थक्क झालो. श्रोत्यांना प्रेमात पाडणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे भाषण देण्यासाठी ते किती परिश्रम करीत हे यातून शिकता आले.

२.

दुसरा किस्सा आहे इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान आणि साहित्यिक विन्स्टन चर्चिल यांचा. ते पट्टीचे वक्ते होते पण त्यांनी कधीही उत्स्फूर्त भाषण केले नाही. ते भाषणाची पूर्वतयारी अगदी कसून करीत. आधी उत्तम मसुदा तयार करीत. तो झाला की स्वतःच्या बायकोला तो खणखणीत आवाजात पण संथपणे वाचून दाखवत. अगदी पाच मिनिटांचे औपचारिक भाषण असले तरी त्याच्या ६-७ तालमी ते घरी करीत. अंघोळीच्या वेळेस ते आपले भाषण स्वतःलाच मोठमोठ्याने म्हणून दाखवत. प्रत्यक्ष भाषणाचे वेळी मात्र ते भाषण वाचून दाखवत. त्यांचे कुठलेही भाषण १५ मिनिटांच्या आत संपणारे असे हेही एक विशेष. बोलण्याची मंदगती आणि थांबत थांबत बोलण्याची पद्धत ही त्यांची खास वैशिष्ट्ये. अशी दांडगी मेहनत केल्यानेच त्यांना वक्तृत्वात उत्तुंग यश मिळाले. त्यांच्या कित्येक भाषणांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्यांची तडाखेबंद विक्री झाली.

एकेकाळी आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या या मुत्सद्द्याची भाषण-पूर्वतयारी पाहून आपण स्तिमित होतो. लेखन असो वा भाषण, कठोर परिश्रमाला पर्याय नाही हेच त्यांच्याबद्दलच्या या माहितीतून मला शिकता आले.
वरील दोन नामवंत उदाहरणे दिल्यावर एक मुद्दा स्पष्ट करतो. आपण जरी या मंडळींसारखे व्यावसायिक वक्ते नसलो, तरीही त्यांचा तयारी व मेहनतीचा गुण आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. एखाद्या मर्यादित परिचित समूहात देखील जर आपण तयारीनिशी व परिपक्वतेने बोललो, तर त्याचेही वेगळेच समाधान मिळते. आपल्या छोट्याशा पण चांगल्या बोलण्याला मिळालेली श्रोत्यांची दाद आनंददायी व उत्साहवर्धक असते.
...
३.
आता वळतो एका मार्गदर्शक इंग्लिश पुस्तकाकडे. त्याचे नाव आहे Write better, Speak better. लेखकद्वयाची नावे आता आठवत नाहीत. ते रीडर्स डायजेस्टचे प्रकाशन आहे. एव्हाना ते दुर्मिळ झालेले असावे. एका शब्दात सांगायचे तर हे पुस्तक म्हणजे बावनकशी सोने आहे ! मी ते वयाच्या तिशीच्या आतच वाचले. पुस्तकाच्या शीर्षकात दोन कलांचा उल्लेख आहे. या कलांमध्ये मला आजपर्यंत जी काही थोडीफार गती मिळाली त्याबद्दल मी या पुस्तकाचा कायम ऋणी आहे. उत्तम लिहिणे व बोलणे यासंबंधी पुस्तकात मिश्कील शैलीत अमूल्य मार्गदर्शन आहे. (त्यापैकी लेखनकलेसंबंधी मी या संस्थळावर अन्यत्र प्रतिसादांमधून पूर्वी काही लिहिले आहे). पुस्तकातील बरेचसे आता विसरलो आहे, पण जे एक-दोन मुद्दे तेव्हापासून मी आत्मसात केले ते चांगलेच लक्षात आहेत.

पहिला मुद्दा आहे वक्त्याच्या आत्मविश्वासासंबंधी. लेखकाने एक काल्पनिक परिस्थिती वर्णिली आहे. त्यामध्ये एखाद्या सामान्य हौशी वक्त्यासाठी काही सूचना केली आहे. समजा, एखाद्या सार्वजनिक मंचावर भाषणांचा कार्यक्रम आहे. त्यांमध्ये एक जण सामान्य माणूस आहे आणि बाकीची सर्व तालेवार मंडळी आहेत-अगदी वक्तृत्व शिरोमणी वगैरे. त्यांच्यापैकी एखादा अगदी राष्ट्रप्रमुख सुद्धा असू शकेल ! अन्य मंडळी देखील उच्चपदस्थ मान्यवर आहेत. वरील सर्वांनाच क्रमाने बोलायचे आहे. आता इथे गोची होते ती त्यातल्या सामान्य माणसाची. समारंभ सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावर या सगळ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे प्रचंड दडपण येते. त्याच्यात क्षणभर कमालीचा न्यूनगंड येऊ शकतो. इथे या पुस्तकाचे लेखक त्याला बळ देतात. कसे, ते त्यांच्याच शब्दात लिहितो :

अशा वेळेस वरील वक्त्यांच्या समूहातील सामान्य माणसाने अजिबात बिचकू नये. मनात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. जगातील प्रत्येक माणसात कुठला ना कुठला गुण हा जबरदस्त असतो. हा जो गुण आहे तो बाजूच्या अन्य वक्त्यामध्ये बिलकुल नाही असे समजा. त्यांचे गुण त्यांच्यापाशी, पण ‘मी’ हा मीच आहे ही भावना पक्की करा. मग तुमची पाळी येईल तेव्हा निर्भिडपणे जे काय बोलायचं आहे ते मनापासून बोला. तुमचे भाषण सुद्धा लोक उचलून धरतील”

अशी भावना जर प्रत्येक होतकरू वक्त्याने मनात ठेवली तर त्याचा आत्मविश्वास नक्की उंचावेल. पुस्तकातील या सूचनेचा मला काही प्रसंगात चांगला उपयोग झाला आहे. वक्तृत्वासाठी लागणाऱ्या निर्भिडपणाची त्यामुळे सुरेख जोपासना करता आली.

आपले भाषण फुलवण्यासाठी आपण बरेचदा म्हणी, वाक्प्रचार आणि थोरामोठ्यांची अवतरणे इत्यादींचा वापर करतो. त्या संदर्भात पुस्तकात काही चांगल्या सूचना आहेत. शंभर वर्षे जुन्या म्हणी, घासून गुळगुळीत झालेले वाक्प्रचार, सुमार कोट्या, इत्यादी गोष्टी भाषणात कटाक्षाने टाळा, नव्हे गाळा, असे लेखकांचे आग्रही प्रतिपादन आहे. या स्वरूपाच्या गोष्टी आपण भाषणात अंतर्भूत केल्याने त्यावर श्रोत्यांकडून रटाळपणाचा शिक्का बसण्याचा धोका असतो. अन्य लोकांची अवतरणे अगदी गरज असली तरच आणि ते सुद्धा संपूर्ण भाषणात एखादेच वापरावे हेही चांगले.
ज्या सभांमध्ये वक्त्याला ‘माइक’ (microphone)चा वापर करून बोलायचे असते त्यासंदर्भात काही मौलिक सूचना या पुस्तकात आहेत. आता त्याबद्दल पाहू :

अ) माइक वापरून बोलताना एक घोडचूक अनेक जण करतात. आपले बोलणे सुरू करण्यापूर्वी समोरच्या माइकमध्ये जोराची फुंकर मारून आवाज उमटतो का, ते पाहतात. हे अत्यंत अयोग्य आहे. अनेक वक्त्यांनी अशाप्रकारे माइकमध्ये वारंवार फुंकर मारल्याने आपल्या तोंडातील बाष्प त्यात जाऊन साठते व लवकरच त्याच्यातील विद्युत यंत्रणा खराब होते. म्हणून ही सवय कटाक्षाने मोडली पाहिजे. त्याऐवजी माइक हातात घेतल्यावर श्रोत्यांकडे दूरवर पहात, “हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना सर्वांना ?” असे स्पष्टपणे विचारावे हे उत्तम. (माइक हातात घेणाऱ्या प्रत्येकाने अशी फुंकर मारून ठेवणे हे पुढच्या वक्त्याच्या अनारोग्याला निमंत्रण देत असते. सध्याच्या महासाथीच्या काळात तर हा मुद्दा अधोरेखित व्हावा).

आ) काही सभांमध्ये एखाद्या वक्त्याला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा असतो. अशा भाषणांमध्ये बहुतेकांकडून एक चूक सतत होत राहते. वक्त्याच्या समोर माइक असतो. पण वक्ता परिचय करून देताना सलग श्रोत्यांकडे न बघता मध्येमध्ये काटकोनात मान वळवून पाहुण्यांकडे बघत राहतो. यामुळे होते असे की, त्याचे निम्मेअधिक बोलणे माइकच्या कक्षेत येत नाही आणि श्रोत्यांना ऐकूच जात नाही. इथे वक्त्याने एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे. पाहुण्यांचे नाव, हुद्दा आणि परिचय हे सर्व सुस्पष्टपणे सांगताना तोंड पूर्णपणे माइकसमोर आणि नजर श्रोत्यांकडेच ठेवली पाहिजे. आपले सर्व बोलणे संपल्यावरच पाहुण्यांकडे मान वळवून त्यांना अभिवादन करावे.

भाषणाची पूर्वतयारी, त्याचा गाभा, प्रत्यक्ष संवादफेकीचे कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबी यासंबंधी कितीतरी चांगली माहिती या पुस्तकातून मला समजली. अशा या सुंदर पुस्तकाबद्दल लेखक आणि प्रकाशक यांना मनोमन वंदन !
...
४.
आता अजून एका पुस्तकाबद्दल. ‘सभेत कसे बोलावे’ हे माधव गडकरी यांचे छोटेखानी पुस्तक आहे. त्यातून काही मूलभूत गोष्टी शिकता आल्या. चांगल्या वक्तृत्वासाठी चौफेर वाचन व मननाची गरज लेखकाने अधोरेखित केली आहे. श्रोत्यांना आपला एखादा विचार पटवण्याची काही माध्यमे असतात. त्यापैकी विनोद हे सर्वात मोठे व उपयुक्त माध्यम असल्याची टिपणी त्यात आहे. महत्वाचे म्हणजे भाषणाची सुरुवात हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे लेखक सांगतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “जो वक्ता पहिल्या पाच मिनिटात सभा ताब्यात घेतो तो अर्धी लढाई जिंकतो”. या विवेचनातून मी भाषणाची सुरुवात नेहमी आकर्षक व प्रभावी होईल याकडे विशेष लक्ष दिले. वेळोवेळी त्याची पसंती श्रोत्यांकडून मिळाली.

आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा झालो’ या पुस्तकातील ‘मी वक्ता कसा झालो’ या लेखाबद्दल मी ऐकून आहे. परंतु अद्याप ते वाचलेले नाही.

आपल्या भाषणातील शब्दांचे सुस्पष्ट उच्चार हा या कलेतील एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी बोलण्याच्या बाबतीत काही जोडाक्षरे आणि पुढे विसर्ग असलेल्या काही अक्षरांचे उच्चार कष्टपूर्वक व्यवस्थित करावे लागतात. स्वतःचे उच्चारण सुधारण्यासाठी एक रोचक सूचना मी एका साप्ताहिकातील लेखात वाचली होती. ती आता लिहितो. त्या लेखकाने असे म्हटले होते की, पुढील वाक्य सर्व वक्त्यांनी रियाज केल्यासारखे रोज अनेक वेळा स्वतःशी मोठ्याने म्हणावे :

“पश्चिमेकडून जो माझा मित्र आला तो माझा जीवश्च कंठश्च मित्र होता”.

वरील वाक्य वारंवार म्हटल्याने आपल्या स्वरयंत्राच्या विविध भागांना नियमित व्यायाम होत राहतो. त्यातून आपले उच्चार सुस्पष्ट राहतात. पूर्वी मी हे वाक्य स्नानगृहात असताना नियमित रोज १० वेळा म्हणायचो. अलीकडे मात्र अंगात आळस भरला आहे. नव्या लेखनाचा विषय सुचणे असो किंवा भाषणाची मोठ्याने तयारी करणे असो, त्यासाठी स्नानगृह हे खरोखरच उत्तम ठिकाण आहे असा(चर्चिलप्रमाणेच) माझाही अनुभव ! तिथे आपल्याला मिळणारा खाजगी अवकाश आणि निवांत मनस्थिती या गोष्टी दोन्ही कलांच्या विकासाच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत.
....
५.
एखाद्या समूहातील संभाषण हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनापासूनच होते. शालेय शिक्षकांचे संस्कार त्या दृष्टीने अर्थात महत्त्वाचे ठरतात. या संदर्भात आमच्या एका शिक्षकांची आठवण सांगतो. शिकवण्याच्या ओघात त्यांनी एकदा एक महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली. बऱ्याचदा समूहात वावरताना समाजातील एखादा कटू, अप्रिय किंवा गडबडघोटाळ्याचा विषय निघतो. अशा वेळेस, जर त्याच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा आपण उल्लेख करणार असू तर त्या संदर्भात तारतम्य बाळगले पाहिजे असे त्यांचे मत होते. अशा वादग्रस्त घोटाळ्यासंदर्भात बोलताना कुठल्याही व्यक्तीचे थेट नाव घेऊ नका अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली. थेट नाव घेण्यापेक्षा त्या व्यक्तीचे अप्रत्यक्ष वर्णन करावे. ते जर हुबेहूब जमले तर तिचे नाव न घेताही श्रोत्यांना जे काही समजायचे ते बरोबर समजते !

नंतर मोठे झाल्यावर या शिक्षकांचा हा सल्ला अधिक उमजला. कोणावरही जर आपण पुराव्याविना काही जाहीर आरोप करत असू तर ते अत्यंत बिनबुडाचे ठरतात. उलट, जर का आपण नाव घेऊन कोणाबद्दल असे काही वावगे बोललो तर बदनामी केल्याचे किटाळ आपल्यावर येऊ शकते. त्यादृष्टीने आमच्या गुरुजींची ही शिकवण मौलिक होती. आज समाजात जेव्हा काही वाचाळवीर येता जाता काही व्यक्तींची नावे घेऊन खुशाल वाटेल ते बरळताना दिसतात तेव्हा आमच्या या शिक्षकांची वारंवार आठवण होत राहते.
...
६.
वयाची चाळिशी उलटल्यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी मिळून एक ‘वाट्टेल ते’ या स्वरूपाचा भाषणकट्टा चालवला होता. त्याच्या संयोजनाची जबाबदारी मी आपण होऊन स्वीकारली होती. त्यासंबंधी एक स्वतंत्र लेख, ‘कथा एका कट्ट्याची’ यापूर्वीच इथे (https://www.maayboli.com/node/63779) लिहिला आहे. त्या उपक्रमातूनही भाषणासंबंधी बरेच काही शिकता आले. त्यात आम्हा मित्रांपैकी क्रमाने प्रत्येक जण काही दिवसांच्या अंतराने सर्वांसमोर बोलत असे. या उपक्रमातून आपल्या अन्य सहकारी मित्रांच्या बोलण्याची लकब, देहबोली, संवादक्षमता, आवाजातील चढ-उतार आणि विनोदनिर्मिती अशा गुणांचे निरीक्षण मला जवळून करता आले. त्यातून स्वतःच्या वक्‍तृत्वविकासाला चांगली चालना मिळाली.

उत्स्फूर्त ( किंवा आयत्या वेळी विषय समजल्यानंतर) बोलणे ही देखील एक वेगळी कला आहे. त्यासाठी संबंधित भाषणाची 'तयारी' हा भाग उद्भवत नाही. परंतु, एकंदरीत आपल्या आयुष्यातील वाचन, चिंतन, मनन आणि बहुश्रुतता या शिदोरीवर ते करता येते. जशी या गोष्टींची बैठक असेल त्यानुसार ते वठते.

७.
प्रत्यक्ष गुरु, पुस्तकरूपी ज्ञान आणि अन्य वक्त्यांचे निरीक्षण या सर्व प्रकारांनी आपण आपली वक्तृत्वकला घडवत जातो. वयानुसार जसे आपण या कलेत मुरत जातो तशी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. वरील सर्वांपेक्षाही आपला सर्वोत्तम गुरु असतो तो म्हणजे स्वानुभव ! भाषणादरम्यान आपल्या हातून घडलेल्या चुका आपल्याला नंतर जाणवतात. अन्य वक्त्यांकडून वारंवार घडणाऱ्या चुकांचेही निरीक्षण होत राहते. विविध सभांमध्ये काही मूलभूत शिष्टाचार पाळले जातात किंवा नाही, हेही नजरेत भरते. अशा निरनिराळ्या चुका आपल्या पुढच्या भाषणात होणार नाहीत याची आपण खबरदारी घेऊ लागतो. समाजात काही सभांमध्ये वक्त्यांची ठराविक रटाळ छापील वाक्ये, बोलण्याच्या पद्धती आणि वेळखाऊपणा हे वर्षानुवर्ष चालू असलेले दिसते व ते खटकते. अशा काहींचा आता आढावा घेतो.

समजा, एखाद्या सभेत सात-आठ जण ओळीने बोलणार आहेत. सुरुवातीच्या दोन-तीन वक्त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे ते म्हणजे, आपल्याला नेमून दिलेली वेळ आपण पाळावीच. जर आपण त्या वेळेचे उल्लंघन करत राहिलो तर आपण तळाच्या क्रमांकाच्या वक्त्यांवर अन्याय करीत असतो. पण वास्तवात बहुतेकदा हे वरचे श्रोते वेळमर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे बिचाऱ्या तळातील वक्त्यांची बोलण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकदा श्रोते कंटाळलेले असतात ! श्रोत्यांच्या कंटाळलेपणाचे भान तळाच्या वक्त्यांनी (नाइलाजास्तव) बाळगणे गरजेचे आहे. पण इथेही तसे होत नाही. जेव्हा असा तळाच्या क्रमांकावरील वक्ता बोलायला उठतो तेव्हा उगाचच वेळ खाणारी काही रटाळ वाक्ये कशी बोलली जातात त्याची ही जंत्री :

“माझ्या आधीच्या दिग्गज वक्त्यांनी सगळे काही बोलून ठेवल्याने खरंतर मला आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही..”

• “श्रोतेहो, तुम्ही सगळे आता कंटाळले असाल व चहापानासाठी/ घरी जायला उत्सुक असाल. तेव्हा मी काय तुमचा फार वेळ घेत नाही”... (असे म्हणून पुढे भाषणाचे रटाळ लांबण लावणे ! ).

• भाषण सुरू करताना व्यासपीठावरील सर्वांची नावे त्यांच्या हुद्दा व बिरुदांसकट सर्व वक्त्यांनी पुन्हा पुन्हा घेत बसणे, हे तर श्रोत्यांसाठी महाकंटाळवाणे.
....आणि शेवटी...

• आभार प्रदर्शन करणाऱ्याच्या तोंडचे ठराविक नकोसे वाक्य,
“तुम्ही जरी आता खूप कंटाळला असलात तरी आभार प्रदर्शनाचे ‘गोड काम’ माझ्याकडे आलेले आहे आणि मी ते अगदी थोडक्यात(?) करणार आहे ......”

असे अजून काही नमुने विस्तारभयास्तव टाळतो.
माझ्या मते वर नमुना म्हणून दिलेली घासून गुळगुळीत झालेली व वेळखाऊ वाक्ये तळाच्या वक्त्यांनी टाळावीत. आपल्याला जो काही निसटता वेळ मिळाला आहे त्यात स्वतःच्या मोजक्याच महत्वाच्या मुद्यांना हात घालावा आणि भाषण नेटके ठेवावे. श्रोत्यांचा उत्साह टिकून असेपर्यंतच वक्त्यांच्या भाषणाला अर्थ राहतो. त्या मर्यादेनंतर तो श्रोत्यांवर झालेला नकोसा भडीमार असतो !

असा हा माझा हौशी वक्तृत्वकलेचा आतापर्यंतचा अभ्यास व प्रवास. त्यातील काही रोचक अनुभव तुमच्यासमोर मांडले. प्रतिसादांमधून आपणही आपले अनुभव जरूर लिहा. लेख आणि प्रतिसाद यांच्याद्वारे झालेल्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आपल्या सर्वांचाच मनोविकास घडावा ही सदिच्छा !
....................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. पुल, चर्चिल एवढी मेहनत घ्यायचे भाषणाला हे अजिबातच माहीत नव्हते, आश्चर्य वाटले वाचून.
शाळेतच सभाधीटपणा थोडाफार आला. नंतर एका कंपनीत काम करत असताना त्यांनी एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कार्यशाळेत सगळ्या नव्या एम्प्लॉईजना पाठवले, त्याचा फायदा झाला. त्यामुळे पुढे शे दीडशे लोकांसमोर तांत्रिकी सेमीनार्स घेणे, कंपनी गेट टु गेदरचे संचालन करणे, कधी कुठे छोटेसे उत्स्फूर्त भाषण ठोकणे वगैरेला मदत झाली.
पण मोठ्या समुदायापुढे भाषण देण्याचा अनुभव अजिबात नाही. आलीच वेळ तर किती परिश्रम घ्यावे लागतील कल्पना आली.

मस्त, रोचक, माहितीपुर्ण आणि उपयुक्त लेख.

नव्या लेखनाचा विषय सुचणे असो किंवा भाषणाची मोठ्याने तयारी करणे असो, त्यासाठी स्नानगृह हे खरोखरच उत्तम ठिकाण आहे >>> हे स्नानगृह तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. अंगातल्या सर्व कला ईथे बिनधास्त नि:संकोच बाहेर पडतात Happy

तळातील वक्त्यांची बोलण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकदा श्रोते कंटाळलेले असतात !>>>>> हो, आणि त्यातही जे प्रमुख वक्ते असतात त्यांची भाषणे आधी असतात, तुलनेत दुय्यम वक्ते नंतर असतात. याऊलट एखादा फिल्मफेअर अ‍ॅवार्ड बघाल तर जे मोठे स्टार असतात त्यांचे परफॉर्मन्स नंतर असतात, आणि जो सुपर्रस्टार असेल तो शो स्टॉपर असतो. त्यामुळे अखेरपर्यंत पब्लिकचा ईंटरेस्ट टिकून असतो.

चांगला विषय आणि लेख. मी सभाधीट नसल्याने स्टेजवर बोलणे शक्य तिथे टाळतो. सांगण्यासारख्या दोन गमती आहेत.
शाळॆत असताना एकदा शिक्षकदिनाच्या दिवशी भाषण द्यायचे ठरवले. सहावी ते दहावीमधील काही मुलांनी नावे दिली होती. मी आधल्या दिवशी आईने एका फुलस्केप पानावर लिहिलेले भाषण पाठ करून गेलो सकाळी. माझा चौथा नंबर होता भाषणाचा. दुसऱ्या मुलाचे भाषण चालू असतानाच माझे पाय थरथरा कापायला लागले. मग म्हटले आज काय आपल्याला भाषण देता येणार नाही. लगेच तिथे बसलेल्या पर्यवेक्षकांकडे गेलो आणि मला दाढदुखीचा भयंकर त्रास होत असल्याची थाप मारली तोंड वगैरे वेंगाडून. त्यांनीही लगेच घरी जायची परवानगी दिली. मग मी दप्तर घेऊन थेट घरी Happy
दुसरा प्रसंग थेट अलीकडचा आहे. स्पर्धा परीक्षा देणारे सगळेच्या सगळेच ias/ips व्हायच्या उद्देशानेच परीक्षा देतात पण प्रत्यक्षात अनारक्षित पब्लिकला १५०-२०० रँकनंतर भेटेल त्या अलाइड सर्विसमध्ये जावे लागते. बहुतेक मंडळी ट्रेनिंग पिरिअड आणि सुरुवातीच्या एखाद वर्षापर्यंत पुढचे अटेम्प्ट देतात पण मोजकीच मंडळी त्यात यशस्वी होतात. आमची साडेतीनेक वर्षे डोकेफोड/@@तोड मेहनतीनंतर सगळी हौस फीटल्याने आम्ही त्या फ़ंदात नाही पडलो परत. तर हे सांगयचा उद्देश हाच की निकालानंतर टॉप रँकसारखे ग्लॅमर नसले तरी चार-दोन ठिकाणी नाव छापून येत आणि काही ठिकाणी भाषण द्यायलाबी जावे लागते. आता नगरसाईड्ला नेहमीचे मोजके मराठीत बोलून विषय संपायचा पण पुण्यात जिथे शिकलो ते कॉलेज आणि अजूनही काही ठिकाणी जायची वेळ आली. इथे बरेच कॉस्मोपॉलिटन वातावरण असल्याने इंग्रजीतच बोलावे लागणार होते. दहावी नंतर मी इंग्रजीवर बरीच मेहनत घेतली होती आणि बाहेर शिकून आल्याने बोलण्याचा काही प्रश्न नव्हता पण मला सौथ मुंबई/ दिल्लीच्या पोरांची असते तशी चकचकीत इंग्रजी कधी नाही जमली. माझा एक मित्र कर्वेनगरच्या कमिन्स इंजिनीरिंग कॉलेजला मास्तर असल्याने मला हा-नको करत तिथे जायचा योग आला शेवटी. सगळे कॉलेज नाही पण माझ्या ब्रँचच्या तिन्ही वर्षाच्या बऱ्याच मुली हॉलमध्ये समोर बसल्या होत्या. एवढ्या पोरी पाहून असेल किंवा अजून काही दोन-तीन वाक्यांनंतर मला फेफरे भरल्याची जाणीव झाली. त्यामुळे बोलबच्चन टाकून इम्प्रेस करणे लांब पण नॉर्मलही इंग्रजी जमेल का अशी शंका आली. पण मी लगेच सावरून मोठ्याने मराठीत बोलू की इंग्रजीत हे इंग्रजीतच सर्वांना विचारले. अपेक्षेप्रमाणे मराठी उत्तर आल्याने माझाही जीव भांड्यात पडला. नंतर नेहमीचे काहीतरी बोलून कार्यक्रम सम्पवून पुष्पगुच्छ घेतला आणि मित्राला घेऊन शेजारच्या रुद्राला येउन बसलो जेवायला. सुदैवाने पुन्हा फार ठिकाणी भाषणे द्यायचा योग नाही आला परत.

माहितीपूर्ण आणि मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल वरील सर्व वाचकांचे आभार !

* शे दीडशे लोकांसमोर तांत्रिकी सेमीनार्स घेणे >>> छान, हे नक्कीच उपयुक्त असते.
..
* पुस्तक ऍमेझॉन वर दिसते आहे >>
माहितीबद्दल धन्यवाद .
तिथे जाऊन बघितले. जाड बांधणीच्या त्या पुस्तकाची किंमतही दणकून आहे !

* स्नानगृह तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. अंगातल्या सर्व कला ईथे बिनधास्त नि:संकोच बाहेर पडतात
Happy अ- ग दी !
..
* मी सभाधीट नसल्याने स्टेजवर बोलणे शक्य तिथे टाळतो >>>
मनातील भीती काढून टाका. दणकून बोलायला लागायचे !
जरा वेळाने एक भन्नाट किस्सा सांगतो

आभार !
......
*मी सभाधीट नसल्याने स्टेजवर बोलणे शक्य तिथे टाळतो >>> असे कोणीही मनात आणू नका !
यासंदर्भात श्रीराम लागूंचा किस्सा वाचलेला आठवतो.

त्यांनी आयुष्यात प्रथम जेव्हा छोट्याशा नाटकात रंगभूमीवर पाऊल ठेवले तेव्हा ते अक्षरशः घाबरून गेले होते व रंगमंच सोडून पळाले होते ! तसेच यापुढे, “कधीही नाटकात काम करणार नाही”, असेही ते बोलून गेले होते !!

बाकी पुढचा त्यांचा इतिहास सर्वज्ञात आहेच.

उत्तम लेख!
लेख वाचतांना ' सभेत कसे बोलावे ' हेच पुस्तक आठवले. शाळेत असतांना वाचले होते.
लेखात त्याचा संदर्भ आहेच.
शालेय स्पर्धा आणि पदवी/ पदव्युत्तर सेमिनार सोडले तर परत कुठे व्यासपीठावर बोलण्याचा फारसा प्रसंग आला नाही.
पण शाळेत असतांनाचा सभाधीटपणा नंतर जाणवला नाही. कदाचित शाळेत सगळेच परिचित असल्याने आत्मविश्वास जास्त असावा.

पश्चिमेकडून जो माझा मित्र आला तो माझा जीवश्च कंठश्च मित्र होता”.>>> हे खूप रोचक आहे.
शाळेनंतर भाषण दिलेले आठवत नाही पण पहिले पाच
मिनिटे प्रचंड भीती वाटायची नंतर भान विसरून व्यवस्थित भाषण केलं जायचं. मला एकटीने बोलायला खूपच आवडते , समोरच्याने फक्त ऐकायचं पण ती संधीच मिळत नाही म्हणून मी काहीबाही लिहिते. Wink Happy
भाषणाचा उत्कृष्ट नमुना म्हणून मला स्वामी विवेकानंद यांचे शिकागोच्या धर्मपरिषदेतील भाषण आठवले.
लेख खूप आवडला. Happy

मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल वरील सर्व वाचकांचे आभार !

* शाळेत सगळेच परिचित असल्याने आत्मविश्वास जास्त असावा. >> +११

* मला एकटीने बोलायला खूपच आवडते , समोरच्याने फक्त ऐकायचं पण ती संधीच मिळत नाही >> Happy
छान !

रच्याक ने,
* मला एकटीने बोलायला खूपच आवडते ... ती संधीच मिळत नाही >>>

हे नाही पटलं बुवा !
अहो, मातृभाषेला मातृ भाषा का म्हणतात ते माहित आहे ना !
प्रत्येक घरात बोलायचे काम कोण करीत असतं ?
Happy Happy

समोरच्याने फक्त ऐकायचं पण ती संधीच मिळत नाही म्हणून मी काहीबाही लिहिते. >> Happy न ऐकणार्‍यांना आमचे धन्यवाद दे! त्यांच्यामुळे चांगलं वाचायला मिळालं.
चांगला लेख, सर. सभाधीटपणा बद्दल थेट नसला तरी दि किंग्ज स्पीच नावाचा एक चांगला सिनेमा स्पीच थेरपी व स्पिकींग बद्दल आहे. संग्रहार्थ इथे उल्लेख करते. त्याला बरीच बक्षीसे मिळाली आहेत.

कुमार सर Lol
सी, थँक्यू Happy
किंग स्पीच >>>नोटेड.

सुंदर लेख...
माझा अनुभव...
प्राथमिक शाळेत तिसरीत असेल. शाळा जिल्हा परिषदेची. नाव जीवन शिक्षण विद्यामंदिर xxxx. खरच या शाळा जीवन शिक्षण द्यायच्या...
गांधी जयंती...
शाळेत शिक्षक हुशार विद्यार्थ्यांना भाषण लिहून देत नसत. माझा एक मित्र अभ्यासात साधारणच होता. त्याला शिक्षकांनी भाषण लिहून दिले. तो भाषण पाठ झाले आहे का बरोबर हे पाहण्यासाठी माझ्याकडे आला. माझ्या हातात भाषण लिहिलेला पेपर दिला. त्याच्याकडून ते तीन चार वेळा म्हणून घेता घेता माझेच पाठ झाले.
भाषणाच्या वेळी मी त्याच्या आधी उठलो आणि भाषण करून आलो. पुढे काही दिवस आमची कट्टी.

२) इयत्ता आठवी...
शाळेला देणगी देणारे पुढारी xxxxxxx शाळेत आले‌ . शाळा रयत शिक्षण संस्थेची. खेड्यातली मुलं कशी फर्डा इंग्रजी बोलतात म्हणून हेडसर म्हणाले तू इंग्रजीत कर्मवीर भाऊराव पाटीलां विषयी भाषण कर. ( हेडसर इंग्रजी शिकवायचे ) . शेवटचं समारोपाचं वाक्य ऐनवेळी आठवलं नाही.

पुढे म्हैसूर येथील Administrative College मध्ये आमच्या विभागाचे भारतीय पातळीवर Train the Trainers आणि Designing of Training असे training होते. एका सत्रात आम्हाला Synergy हा विषय बोलण्यासाठी मिळाला. रात्री व्यवस्थीत तयारी केली. माझे भाषण प्रथमच व्हिडिओ शूट झाले. अणि Evaluation...Most natural speaker असे आले...

या नंतर २००-३०० लोकांसमोर बोलण्याचे योग आले. विषय - IS Audit, IS Security, Data Analysis.
संस्था - Colleges, Institute of Chartered Accountants, Sir Sorabji Pochkhawala Bankers Training College
माझ्या कार्यक्षेत्रात...Jammu, Chennai, Rajkot, Mumbai.

वरील सर्व प्रतिसाद सुंदर ! धन्यवाद.

१. दि किंग्ज स्पीच >>>
वा, छान माहिती. युट्युबवर त्याची फक्त अडीच मिनिटांची झलक आहे ती आता पाहतो.
....
२. माझे भाषण प्रथमच व्हिडिओ शूट झाले. अणि Evaluation...Most natural speaker असे आले..
>>
अरे वा, मस्तच. अभिनंदन !
सर्व अनुभव छान

लेख आवडलाच, ५.तर अत्यंत महत्वपूर्ण !
पुलंचा किस्सा खूप काही शिकवून गेला... पुन्हा एकदा (for the nth time) पुल फार्फार आवडले. Happy

मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल वरील सर्व वाचकांचे आभार !
.....
. पुन्हा एकदा (for the nth time) पुल फार्फार आवडले
>>> अ ग दी !
पुलंचे काही प्रसंगोपात विनोद आणि कोट्या आज कालबाह्य झालेल्या आहेत हे कबूल. परंतु, जर आपण आपल्या आवडीचे ‘निवडक पुलं’ आजही पुन्हा वाचायला घेतले तर एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे, अशा पुनर्वाचनातून आपल्याला ‘पुलंच्या आतले पुलं’ अधिकाधिक समजत जातात !

प्रस्तुत लेख हा भाषण या विषयावरचा असल्याने तो लिहिताना मला पुलंनी आचार्य अत्रे यांच्यावर लिहिलेल्या लेखाचे वाचन करणे भागच होते. फार सुंदर लेख आहे तो.
त्याबद्दल वेगळा परिच्छेद जरा वेळाने लिहितो.

एका लहानशा भाषणासाठी पुलंसारखा मुरब्बी साहित्यिक किती मेहनत घेतो हे वाचून मी थक्क झालो
>>> मॅनिप्युलेशन ... लोकांना हेच वाटले असेल किती उत्फुर्त भाषण आहे...आता कळेल.. ये तो चीटिंग है...

‘अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या’ हा पुलंनी आचार्य अत्र्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती लिहिलेला लेख सुंदर आहे. किंबहुना ती
एका विनोदाच्या राजाने दुसऱ्या विनोदसम्राटाला दिलेली सुंदर दाद आहे !

लेखात अत्र्यांच्या बोलण्यातील दांडगेपणाचे पुलंनी छान वर्णन केले आहे. अत्रे एक ‘अजस्त्र वाङमयीन यंत्र’ असल्याचे ते लिहितात. अत्र्यांनी विनोदाचा शस्त्र म्हणून छान उपयोग केला तसेच विनोदासाठी लागणारा हजरजबाबीपणा हा गुणही त्यांच्याकडे जबरदस्त होता. अत्र्यांची निवडणुकीतील भाषणे म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच असायची.

अत्र्यांचे विनोद ऐकताना प्रेक्षक कधीच गालात वगैरे हसले नाहीत; प्रेक्षागृहामध्ये श्रोत्यांच्या हास्याचा प्रचंड स्फोटच व्हायचा ! अत्र्यांच्या व्याख्यानातून आबालवृद्ध उदंड तकवा घेऊन जातात असे पुढे त्यात लिहिले आहे. (इथे पुलंनी वापरलेला कवा हा शब्द प्रचंड आवडला).

आणखी एक रोचक विषय आणि लेख.
शाळेत असताना एकदा वक्तृत्व स्पर्थेत भाग घेतला होता. ती स्पर्धा हॉलमध्ये शाळेतल्या सगळ्या मुलाशिक्षकांसमोर होती. तेव्हा हाफ पँटीत पाय थरथर कापत होते. पण भाषण केलं. एका शिक्षिकेने ओठ मुडपून नकारा र्थीमान हलवल्याचे दिसले.
मग दहावीत असताना शिक्षकदिनी शिक्षक होऊन वर्ग घ्यायचे असत तेव्हा संस्कृतचा क्लास घेतला होता. पण ते वक्तृत्व म्हणता येणार नाही. शेवटच्या बाकापर्यंत पोचणारा आवाज नाही हे कळलं.
कॉलेजात पुन्हा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. यावेळी उत्स्फूर्त. टर्न यायच्या दोन मिनिटे आधी हातात विषयाची चिठी. तेव्हा बोलताना तोंडातून थुंकी उडत होती . पण जे सांगायचं ते सांगता आलं कारण माझ्या भाषणातल्या एका मुद्द्याची परी क्षकांच्या मनोगतात नोंद होती ( टीकात्मक का होईना)
मग एकदा कथाकथन केलं. ते चांगलं झालं नसलं तरी आधीपेक्षा बरी कामगिरी होती.

चर्चांच्या अनौपचारिक कार्यक्रमांचं संचालन केलं. पण हे स्टेजवरून नव्हे.
ऑफिसात एकदा एजंट लोकांच्या मीटिंगमध्ये बोलायची वेळ आली. कागदावर नोंद काढून मुद्दे टिपणं केली नाहीत. दीड तासाच्या बस प्रवा सात वाचून आणि मनात तयारी केली. इथे पहिल्यांदा मा इकवर बोलायचा अनुभव घेतला. तेव्हा सगळा वेळ एक पाय पुढल्या टेबलच्या
फूट रेस्ट चर ठेवून पोझिशन न बदलता बोलल्याने जागेवर जाऊन बसताच पाठीत कळ आली.

काय बोलायचं यावरच विचार करण्याइतपत प्रगती झाली. आवाजची फेक, उच्चार यांवर काम करण्यापर्यंत पोचलो नाही.

घरी सभेत कसे बोलावे, हे पुस्तक होते. लेखक प्रा भीमराव कुलकर्णी. ते इतकं रंजक होतं की त्याची अनेक पारायणं केली.
शे क्सपियरचं थडगं अमेरिकेत पाहिल्याचा पुलंचा विनोद त्या पुस्तकात काय बोलू नये या गोष्टींत श्रेय न देता वापरला होता. तो पुलंचा वि नोद आहे, हे नंतर कळलं.

चार-चौघात बोलायला मला प्रचंड घाबरायला होत असे. हे अगदी आतापर्यंत. मग २००८ साली पथिक (www.pathik.org) केलं. तिथे मला लोकासमोर कसं बोलावं ह्याचं बाळकडू मिळालं. आमच्या प्रमाणपत्रदानाच्या दिवशी होणार्‍या कार्यक्रमात मी सूत्रसंचालन केलं जे सर्वांना आवडलं. तिथे माझा हुरुप वाढला. आता 'मी उद्योजक' (www.meudyojak.com) चा सभासद झाल्यापासुन लोकंसमोर बोलण्याची भिती पार चेप्ली गेलीये

वरील सर्वांच्या प्रतिसादातून उत्तम स्वानुभव आणि पूरक माहिती येत आहे.
सर्वांचे आभार !
..
१. एखाद्या ठिकाणी अचानक बोलावे लागले तर..... >>छान दुवा.

२. काय बोलायचं यावरच विचार करण्याइतपत प्रगती झाली. >>> छान, अशीच प्रगती होत राहते.

३. http://www.pathik.org/ >> छान व उपयुक्त

चांगला विषय आणि लेख.
वक्ता दशसहस्रेषु !
माइक वरून बोलताना तो तोंडापासून किती अंतरावर ठेवायचा याची पण नीट सवय करायला लागते

Pages