शेजाऱ्याचा डामाडुमा– सद्यस्थिती आणि काही रंजक-रोचक - नेपाळ भाग १०

Submitted by अनिंद्य on 20 December, 2021 - 06:14

लेखमालेचे आधी प्रकाशित केलेले भाग येथे वाचता येतील:
शेजाऱ्याचा डामाडुमा - प्रस्तावना
https://www.maayboli.com/node/64140
शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळ भाग- १
https://www.maayboli.com/node/64175
शेजाऱ्याचा डामाडुमा -नेपाळी इतिहासाचा धावता आढावा - नेपाळ भाग २
https://www.maayboli.com/node/64259
शेजाऱ्याचा डामाडुमा -नेपाळच्या एकीकरणाचे पर्व - नेपाळ भाग ३
https://www.maayboli.com/node/80297
शेजाऱ्याचा डामाडुमा -एकीकृत नेपाळ आणि शाह राजवट - नेपाळ भाग ४
https://www.maayboli.com/node/80495
शेजाऱ्याचा डामाडुमा- सुगौली तह आणि सत्तेचा बदलता सारीपाट - नेपाळ भाग ५
https://www.maayboli.com/node/80624
शेजाऱ्याचा डामाडुमा - श्री तीन राणाज्यूं को सरकार - नेपाळ भाग ६
https://www.maayboli.com/node/80667
शेजाऱ्याचा डामाडुमा- राणा शासनाचे शतक- नेपाळ भाग ७
https://www.maayboli.com/node/80679
शेजाऱ्याचा डामाडुमा- पोलादी पडदा- नेपाळ भाग ८
https://www.maayboli.com/node/80695
शेजाऱ्याचा डामाडुमा- लोकशाहीची पहाट- नेपाळ भाग ९
https://www.maayboli.com/node/80726

* * *
शेजाऱ्याचा डामाडुमा– सद्यस्थिती आणि काही रंजक-रोचक - नेपाळ भाग १०

आशियात इतरत्र अनेक जागी आहे तसा नेपाळच्या लोकशाहीलाही अगदी स्थापनेपासूनच अस्थिरतेचा शाप आहे. १९५१ च्या पहिल्या लोकशाही सरकारपासून ते आज २०२१ पर्यंत काठमांडूमधील सिंघदरबारच्या भिंतींनी तब्बल ४९ वेळा पंतप्रधानपदाचे शपथ ग्रहण बघितले आहे. म्हणजे एका पंतप्रधानांचा कार्यकाळ साधारण १७ महिने! (भारतात ह्याच कालावधीत फक्त १५ व्यक्तीच पंतप्रधान झाल्या आहेत यावरून नेपाळमधील अस्थिर लोकशाहीची कल्पना यावी). राणा परिवाराच्या ज्या घराणेशाहीला विरोध म्हणून लोकशाही संघर्ष झाला त्याच्या अगदी विरुद्ध नेपाळमध्ये 'लोकशाही राजघराणी' स्थापन झालीत. परत काही मोजक्या कुटुंबाकडे सत्ता आणि जनता उपाशी. ही अनेकानेक लोकशाही सरकारे नेपाळी जनतेच्या अगदी दैनंदिन आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यातसुद्धा पुनःपुन्हा अपयशी ठरली आहेत.

लेखमालेच्या सुरवातीच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे नेपाळ एकजिनसी राष्ट्र नाही. साठ वेगवेगळ्या भाषा बोलणारे दोनशेच्या वर वेगवेगळ्या जातीसमाजाचे लोक, शेजारच्या तिबेट आणि भूतानमधून आलेले शरणार्थी आणि तराई भागात शतकानुशतकं वसलेले भारतीय वंशाचे मधेसी लोक असा नेपाळी समाजाचा बहुमुखी चेहरा आहे. समाजात फूट पाडणारा जातीयवाद आणि प्रचंड गरिबी आहे. जनतेचे वर्षानुवर्षाचे 'कंडिशनिंग' आहे, प्रतिकूल हवामान, भूकंपासारखी नैसर्गिक संकटे आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेली सरकारी यंत्रणा आणि गटातटाचे राजकारण करण्यात मश्गुल राजकारणी असे आजच्या नेपाळचे चित्र आहे. सर्वसामान्य नेपाळी माणसाचे जीवन खडतर होते ते आजही तसेच आहे.

विकासाचं म्हणाल तर जगातल्या अति-दरिद्री देशांच्या यादीत नेपाळचा क्रम अफगाणिस्तानच्या खालोखाल १८ वा आहे (GDP Per Capita $698). गेल्या ७० वर्षात भारतातील जयनगर ते नेपाळमधील जनकपूरधाम ही ५३ किलोमीटरची आणि बिहारमधील रकसौल ते नेपाळमधील सिरसीया नाक्यापर्यंतची एक ६ किमीची, अशा दोन जुनाट रेल्वेलाईन सोडता नेपाळमध्ये कोठेही रेल्वे नाही.

नेपाळच्या पूर्वपश्चिम पसरलेला १०२९ कि मी चा महिंद्रा महामार्ग आणि काठमांडूला बीरगंज येथे भारताला जोडणारा १९० कि मी चा त्रिभुवन महामार्ग हे भारत सरकारच्या मदतीने बांधण्यात आले. आजही जागोजागी रंग उडालेल्या पाट्यांवर 'भारत सरकारको सहयोगमा बनेला' लिहिलेले दिसते - पण ते तेव्हढेच. त्यानंतर नेपाळने स्वतः फार काही केलेले नाही. चीनने नेपाळ महामार्गाने जोडण्यासाठी काठमांडू ते कोडारी मार्ग बांधून दिला आहे. महामार्गाची सद्य अवस्था मात्र दयनीय आहे, पहिल्या काही वर्षातच ह्या वाटेची वाट लागली आहे.

शिक्षणाची तर फारच वाईट अवस्था. युनाइटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेतली वर्षे, त्यांची पुढे शिकण्याची शक्यता आणि त्यावर सरकार आणि अन्य लोकांचा होत असलेला खर्च असे सर्व मुद्दे लक्षात घेऊन एक HRD इंडेक्स काढते. २०१६च्या आकडेवारीनुसार सुमारे २०० देशांमध्ये ह्यात नेपाळचा क्रमांक १४५ वा आहे - म्हणजे अतीव मागास. (ह्यात शेजाऱ्यांमध्ये मोठ्या भावाची भूमिका वठवणाऱ्या आपल्या भारताची अवस्थाही फार काही भूषणावह नाही, आपण १३५व्या क्रमांकावर आहोत.)

प्रमुख रस्त्याची डागडुजी करणे, काठमांडू आणि पर्यटक येतात त्या शहरांची थोडीफार निगा राखणे यापलीकडे शासनतंत्राला नागरिकांची काही चिंता आहे असे दृश्य दुर्दैवाने कोठे दिसत नाही. शहरे बकाल होताहेत, प्रदूषण प्रचंड वाढले आहे, सर्व नियम धाब्यावर बसवून डोंगर फोडून केलेली बांधकामे आहेत. सार्वजनिक सुविधा आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दुर्गम गावांची आणि तेथिल नागरिकांची अवस्था अधिक दयनीय आहे. शेती फारशी पिकत नाही, पर्यटक सगळीकडे येतातच असे नाही आणि छोटेमोठे उद्योगधंदे आणि व्यापारातून फार काही रोजगार निर्माण झालेला नाही. सरकार नावाची काही यंत्रणाच देशाच्या दुर्गम भागात पोचलेली दिसत नाही. ह्या सर्व बाबींमुळे ९० च्या दशकापासून नेपाळच्या दुर्गम भागात माओवादी शक्तींसाठी पोषक अवस्था निर्माण झाली आहे. चीनचा नेपाळी माओवादी शक्तींना उघड पाठिंबा आहे, छुपी आर्थिक आणि शस्त्रांची मदतही आहे. त्यामुळे हे लोण नेपाळच्या अन्य भागात पसरायला जास्त वेळ लागला नाही. माओवादी आंदोलन चिरडण्यासाठी नेपाळी सरकारांनी लष्कराच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले त्यात सुक्याबरोबर ओले जळते तसे अनेक निर्दोष नागरिक मोठ्या प्रमाणात मारले गेले आहेत. एका निष्पक्ष अंदाजाप्रमाणे १९९६ ते २००६ या काळात माओवादी हिंसाचारात सुमारे किमान १३००० लोकांनी जीव गमावला आणि सुमारे दीड लाख लोक निर्वासित झाले आहेत. हे आकडे फार मोठे आहेत.

ह्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका फार महत्वाची होती आणि आहे. भारतीय सरकारांमध्ये नेपाळशी असलेल्या संबंधांबद्दल बरीच एकवाक्यता असली तरी सरकारपरत्वे त्यात वेळोवेळी फरक पडतो. नेपाळी राजेशाही, नेपाळी सैन्य आणि नेपाळी जनतेच्या आकांक्षा ह्या सूत्र-त्रयीवर भारताचे नेपाळ धोरण ठरत असे. अगदी २००० सालापर्यंत हे तीन घटक एकमेकांना काहीसे समतोल होते. माओवादी हिंसक आंदोलन आणि त्याला नेपाळच्या पहाडी भागात मिळणारा लक्षणीय पाठिंबा ह्यामुळे हा समतोल ढासळला. नेपाळच्या जवळपास अर्ध्या भूभागावर माओवाद्यांनी समांतर सरकारे स्थापन केली आणि नेपाळी सरकारांचे धाबे दणाणले. ह्या सर्व समस्यांमुळे नेपाळ सरकार अडचणीत आले असतांनाच आधीच्या भागात सांगितल्या प्रमाणे एका असामान्य घटनेने नेपाळला हादरवून सोडले - ती म्हणजे १ जून २००१ च्या उत्तररात्री काठमांडूच्या नारायणहिटी राजवाड्यात नेपाळ नरेश राजे बिरेंद्र, राणी ऐश्वर्या, त्यांचे दोन्ही वारस राजपुत्र, त्यांचा भाऊ, बहिणी, आत्या झाडून सर्व राजपरिवार एका नृशंस हत्याकांडाला बळी पडला….. हे हत्याकांड घडवले राजे बिरेंद्र यांचा घोषित वारस युवराज दिपेंद्रने स्वतः !!

DBEC5F28-FE34-40BF-A90F-773D30CF6357.jpeg
हत्याकांडाला बळी पडलेले राजे बिरेंद्र आणि परिवार.

ही घटना म्हणजे माओवाद्यांनी चीनच्या सहयोगाने घडवून आणलेले हत्याकांड असल्याची कुजबुज नेपाळभर होती पण नेमके सत्य काय ते असल्या विषयांमध्ये कधीच पुढे येत नाही, इथेही आले नाही. युवराज दिपेंद्रने सर्वांना ठार केल्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असा चौकशी समितीचा निष्कर्ष आला.

ही घटना घडली आणि नेपाळमधील माओवादी आंदोलनाला धार आली. जवळपास पूर्ण राजपरिवार ठार झाल्यामुळे नेपाळभर अस्थिरता आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले. एकूणच ही घटना म्हणजे नेपाळच्या इतिहासातील ‘कोट पर्वा’नंतरचा दुसरा मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरली. राजे बिरेंद्र यांचे फारसे लोकप्रिय नसलेले धाकटे भाऊ ज्ञानेंद्र यांचा राज्याभिषेक घडला. हे ज्ञानेंद्र म्हणजेच राजे त्रिभुवन यांचा भारतात पलायन करतांना मागे विसरलेला आणि चार वर्षे वय असतांना औटघटकेचे नरेशपद मिळालेला नातू बालनरेश ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव ! संपूर्ण राजपरिवाराची हत्या घडली तेंव्हा ते घटनास्थळी असूनही गोळीबारातून सुखरूप वाचले. त्यामुळे की काय हत्याकांड घडवण्यात ज्ञानेंद्र यांचा काहीतरी सहभाग असावा अशी कुजबुजही झाली.

ज्ञानेंद्र लोकप्रिय नव्हतेच पण त्यांचे राजकीय डावपेचसुद्धा चुकले. २००१ मध्ये ज्ञानेंद्र यांच्या राज्यारोहणानंतर नेपाळातील राजेशाही आणि मर्यादित लोकशाही व्यवस्था पूर्णपणे संपवून गणतंत्र आणि संपूर्ण लोकशाही पद्धतीचा आग्रह टिपेला पोहचला. १९९६ पासून नेपाळच्या भूभागावर होणाऱ्या जनतेच्या कत्तली आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती हाताळण्यात नेपाळी शासन कमी पडले होतेच, त्यात ज्ञानेन्द्रांच्या येण्याने फार काही फरक अपेक्षित नव्हता. पण त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या लष्कराने माओवाद्यांएवढेच किंबहुना अधिकच बळ वापरून नेपाळच्या सामान्य नागरिकांचे जगणे कठीण केले, अनेकदा निशस्त्र आंदोलकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे असंतोषाचा आगडोंब उसळला. त्यात बुडत्याचा पाय खोलात जातो तसे राजे ज्ञानेंद्र यांनी २००५ साली पंतप्रधानपदच रद्द करून सत्ता-सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेऊन थेट राजशासन आणले. माओवादी आंदोलनाला ग्रामीण भागात मिळणारे समर्थन आणि शहरी भागात होणारी राजेशाहीच्या पूर्ण उच्चाटनाच्या मागणीचा वाढता जोर अशा कचाट्यात ते सापडले. अखेर काठमांडूत निघणारे लाखो नेपाळी नागरिकांचे मोर्चे आणि त्यावर तुटून पडणारे सैन्य आणि पोलीस ह्या रोजच्या दृश्यामुळे त्यांची उरली सुरली पत त्यांनी गमावली आणि २००८ मध्ये त्यांना पदच्युत करून नेपाळ 'गणराज्य' घोषित होऊन २४० वर्षाची राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आली.

FA1F5BE1-ED5A-46D2-932B-563A1B6C5235.jpeg

आता 'पूर्ण' लोकशाहीचे स्वप्न साकार झाले तरी नेपाळच्या जनतेचे हाल काही संपले नाहीत. युनाइटेड कम्युनिस्ट पार्टी (माओवादी), नेपाळी काँग्रेस आणि त्यांचे वेगवेगळे फुटीर गट-तट, मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट कम्युनिस्ट पार्टी, मधेसी जनाधिकार फोरम, प्रजातंत्र पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांच्या कडबोळ्यांचे अस्थिर सरकार आणि त्यांचा राजकीय संगीत खुर्चीचा खेळ असेच दृश्य गेल्या दशकाहून अधिक काळ आहे.

नेपाळची सर्वमान्य नवीन राज्यघटना ठरवणे आणि तिचे योग्य क्रियान्वयन हा कळीचा मुद्दाच अजून सर्वपक्षीय राजकारण्यांना मिळून सोडवता आला नाही, ह्यातच सर्व आले. नेपाळी राजकीय नेते परिपक्वता दाखवतील आणि नेपाळला पुन्हा देशात राजकीय स्थिरता आणि समृद्धीचे दिवस येतील अशी नेपाळी जनतेची आशा आजही आहे. एक शेजारी आणि त्यातही लोकतंत्र असलेल्या भारताचे नागरिक म्हणून आपलीही तीच अपेक्षा, नाही का?

* * *

आता आपल्या ह्या शेजारी देशाबद्दल काही गमतीशीर माहिती:

• नेपाळ नाव घेतल्याबरोबर काय आठवते तर हिमालय आणि त्यातही माऊंट एव्हरेस्ट! जगातील सर्वोच्च हिमशिखर. पण हे एकच नव्हे तर जगातील पहिल्या १० हिमशिखरांपैकी ८ एकट्या नेपाळमध्ये आहेत. नेपाळी स्वतः एव्हरेस्टला ‘एव्हरेस्ट’ म्हणतच नाहीत. माऊंट एव्हरेस्ट नाव ब्रिटिशांनी दिलेले आहे - त्याचे नेपाळी नाव सगरमाथा / सागरमाथा. शेर्पा लोक त्याला चोमोलुंग्मा (जगन्माता) म्हणतात.

7E63871C-D699-4993-9A81-3574F5041064.jpeg

• नेपाळला “स्वातंत्र्यदिन' नाही, कारण तो कधीच परकीय अमलाखाली नसलेला आशियातील एकमेव देश आहे, नेपाळचे सर्वोच्च पद कायम नेपाळी वंशाच्या व्यक्तीनेच भूषवले आहे.

• नेपाळमध्ये शनिवारी कोठलेही सरकारी आदेश घोषित करत नाहीत. नवीन कामे सुरु करण्यासाठी, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी इतर दिवस निवडतात. ह्यामागे काय कारण आहे ते कुठलाही अधिकारी व्यक्ती सांगत नाही.

• काठमांडूच्या प्रख्यात पशुपतीनाथ मंदिराचे सर्व सेवक-पुजारी-पुरोहित हे कासारगोड, भटकळ, सिरसी, चिक्कमंगळूर ह्या केरळ-कर्नाटकच्या किनारी भागातून स्थलांतरित होऊन शेकडो वर्षांपूर्वी काठमांडूला स्थिरावलेल्या लोकांचे वंशज आहेत.

• तुळजा (तलेजू) भवानी ही नेपाळ नरेशांची कुलदेवता. योगायोगाने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अनेक राजकुलांची कुलदेवता तुळजाभवानी आहे. नुसते नावात नाही तर पूजा-पद्धती-चालीरीतीही ह्या तलेजू भवानीचे महाराष्ट्रात असलेल्या तुळजाभवानीशी बरेच साम्य आहे. उदा. नेपाळमध्ये अन्यत्र कुठे नसलेली घट बसवण्याची प्रथा.

• नेपाळ आणि भारताच्या कर्नाटक प्रांतामध्ये ऐतिहासिक संबंधाची एक विशेष कडी आहे - नेपाळमधील तिरहुत, सिमरौनगढ किंवा डोय ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अतिप्राचीन राज्याचे प्रमुख स्वतःला कर्नाटकातील चालुक्य सम्राटाचे प्रतिनिधी / वंशज म्हणवत. त्याचे २३० वर्षे टिकलेले स्वतंत्र राज्य, ते स्थापन करणारा नान्य देवा (न्यायदेव) नावाचा राजा, त्याचे तुळजा भवानीचे भक्त असणे अशा अनेक गोष्टी जुन्या नेपाळी हस्तलिखितात सापडतात.

• सध्या नेपाळ राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेला 'शीतल निवास' हा महाल भारतीय उच्चायुक्तांचे निवासस्थान होते. ते नेपाळ सरकारने आग्रहाने भारताकडून परत मागून घेतलेले आहे. आधी ब्रिटिश आणि नंतर भारतीय प्रतिनिधींची नेपाळमधील वट काय होती याची कल्पना येण्यासाठी एक छोटे उदाहरण पुरेसे आहे. आता थोडे दूरवर लैंचौर भागात बऱ्याच मोठ्या भूभागावर भारताचे नवीन राजदूतावास आहे आणि तेथे अन्य भारतीय कार्यालये एकाच जागी आणण्यात आली आहेत.

• भारत-नेपाळ मैत्री करारानुसार भारतीय भूमीतून नेपाळला जाणाऱ्या कुठल्याही देशाकडून आलेल्या मालावर भारतीय कस्टम ड्युटी इ. सोपस्कार करावे लागत नाहीत, हा सर्व माल ड्युटी फ्री असतो.

• IFS, IAS IPS अश्या भारतीय केंद्र सरकारकडून होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि नियुक्त्यांमध्ये नेपाळी नागरिकांसाठी काही राखीव जागा आहेत, फक्त काही विशिष्ट भारतीय राज्यात त्यांना नियुक्ती देण्यात येत नाही. भारतीयांना मात्र नेपाळी शासनातील कुठल्याही पदावर राहता येत नाही.

• राजेशाही संपुष्टात आल्यानंतर भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये जमीन विकत घेण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.

• १९६३ सालापासून एका अघोषित तहानुसार नेपाळला विकल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या व्यापारात भारतीय सैन्य आणि अन्य भारतीय संस्थांची एकाधिकारशाही (मोनोपोली) मान्य करण्यात आली आहे. ह्या तहाला नेपाळमधील झाडून सर्व राजकारण्यांचा पाठिंबा आणि नेपाळी सैन्यदलाच्या झाडून सर्व उच्चाधिकाऱ्यांचा विरोध आहे असे वेळोवेळी लक्षात येते.

• भारतीय सैन्याचे जे मोजकेच तळ भारताच्या हद्दीबाहेर आहेत त्यापैकी काही नेपाळ मध्ये आहेत. नेपाळमधील सुरखेत भागात असलेल्या भारतीय विमानदलाच्या तळाला ताबडतोब हलवावे अशी मागणी नेपाळमध्ये जोर धरून आहे, पण हे होण्याची शक्यता जवळपास नाही. भारतीय सैन्याला थेट तिबेटपर्यंत धडक देता येण्यासाठीच ह्या तळाचे प्रयोजन आहे.

• आशियात सर्वत्र राजकीय घराणेशाही दिसते, म्हणजे पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान होणे वगैरे. पण एकाच आई-वडिलांच्या तीन सुपुत्रांनी प्रत्येकी तीनदा नेपाळचे पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम आहे मातृका प्रसाद, बिश्वेश्वर प्रसाद आणि गिरीजा प्रसाद कोईराला ह्या सख्ख्या भावांच्या नावावर. गमतीचा भाग म्हणजे पहिले गैर-राणा पंतप्रधान असलेले मातृका प्रसाद कोईराला काही महिने आपल्याकडे, भारतात, बिहार काँग्रेसचे अध्यक्षही होते. प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला ही ह्याच प्रसिद्ध नेपाळी कोईराला कुटुंबाची एक सदस्य आहे.

• बोलण्या-लिहिण्यात 'पनौती' शब्द आपल्यापैकी अनेकांना आला असेल. त्याचा साधारण अर्थ ब्याद - अशुभ जागा किंवा व्यक्ती असा आहे. पण 'पनौती' नावाचे एक तीर्थस्थळ नेपाळला आहे, काठमांडू पासून जेमतेम ३५ किलोमीटर अंतरावर. ह्या देवळात जायला नेपाळी शाह नरेशांना नेहेमी बंदी. त्याचे कारण पनौती गावाची मालकी खुद्द नारायणाची / श्रीविष्णूची समजली जाते. ते गाव पहिल्या शाह नरेशाने, पृथ्वीनारायणाने, स्वतःच्या राज्याला जोडले. तेंव्हापासून 'खऱ्या' नारायणाच्या रागाला बळी पडू नये म्हणून श्रीविष्णू आणि नेपाळ नरेश (म्हणजे श्रीविष्णूचा भूतलावरील अवतार) दोहोंची प्रत्यक्ष भेट झाली नाही.

• काठमांडूच्या उत्तरेला ‘वृद्ध निळकंठ’ नावाच्या देवळात अशीच एक नागशय्येवर पहुडलेल्या श्रीविष्णूची १५ फुटी अप्रतिम सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्तीकडे साधी दृष्टी जरी टाकली तरी नेपाळ नरेश ताबडतोब मृत्यू पावेल अशीही एक समजूत आहे, अर्थातच आजवर कोठल्याही नेपाळ नरेशाने ह्या देवळाला भेट दिलेली नाही.
9C969B37-1452-43C3-8152-96CBF73EC7DD.jpeg

• नेपाळी मैथुनशिल्पांचे खजुराहो - हे आहे आपल्या भारतात. काशी-क्षेत्राशी असलेल्या शाह परिवाराच्या ऋणानुबंधांना उजाळा देण्यासाठी आणि निर्वासित अवस्थेत मनाला शांती मिळावी म्हणून नेपाळ नरेश रणबहादूर शाह देव ह्यांनी काशीत नेपाळी पद्धतीचे मंदिर १८०१ साली बांधले. पशुपतीनाथ आणि ललितागौरी देवीला समर्पित खास पॅगोडा शैलीतील हे काष्ठमंदिर आजही सुस्थितीत आहे. नेपाळी संस्कृतीचे हे बेट वाराणसीच्या नागरी शैलीतल्या हजारो मंदिरांच्या गर्दीत उठून दिसते. त्याची खास ओळख म्हणजे लिच्छवी-नेवार शैलीतील कलात्मक मैथुन शिल्पे, पण दगडात नाही तर लाकडी कोरीवकाम असलेल्या तुळया आणि खांबांमध्ये. प्रख्यात मणिकर्णिका घाटाच्या अगदी जवळ असलेल्या ह्या मंदिरात फारसे भारतीय यात्रेकरू जात नाहीत, विदेशी पर्यटक मात्र आवर्जून जाताना दिसतात.

6014E754-D80F-4959-942B-08D2C26EC57C.jpeg

• संपूर्ण दक्षिण आशियात टोयोटो कंपनीच्या गाड्या टॅक्सी म्हणून वापरणारा पहिला देश म्हणजे नेपाळ. काठमांडूला टोयोटाच्या टॅक्सी बघून भारतातल्या तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्नाने आपली (त्यावेळी भारतातील बहुदा एकमेव) टोयोटा गाडी वापरणे सोडून दिले होते.

• जुगाराला 'खेळ' म्हणून राजमान्यता देणारा आशियातील पहिला देश म्हणजे नेपाळ. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत झाली / होते.

• नेपाळच्या तराई भागात भोजपुरी भाषा सर्रास बोलली जाते आणि भारतात दार्जिलिंग आणि जवळपासच्या भागात नेपाळी भाषा. सध्या दार्जिलिंग भागात प्राथमिक शाळांपासून बंगाली भाषेची सक्ती करण्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

* * *
क्रमशः, पुढचा भाग शेवटचा !
(मालिकेतील काही चित्रे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती. आम्ही गेलो होतो (१९९५ च्या आसपास) तेव्हा चीन तर्फी बांधलेला रोड हा खूप चांगला होता पण भारतातर्फे बांधलेला अगदी खड्डेमय झाला होता. सध्या परिस्थिती काय आहे काय माहिती.
तुम्ही लिहील्याप्रमाणे टोयोटा टॅक्सीमध्ये बसायला मजा आलेली तेव्हा. त्यावेळेस आपल्याकडे मॉल्स चे आगमन नव्हते झालेले तेव्हा काठमंडू मधला मॉल आणि तिथे असलेली विविध इंपोर्टेड वस्तूंची दुकाने याचे फार आकर्षण वाटलेले.

@ Sharadg
@ धनि
@ कुमार१
@ हीरा

प्रतिसादाबद्दल आभार _/\_

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नेपाळमध्ये पुन्हा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली आहे, कोणत्याही पक्षाला किंवा युतीला बहुमत नाही !

मालिकेत लिहिल्याप्रमाणे १९९० पासून लोकशाही सरकारांकडे सत्तेच्या चाव्या हस्तांतरित होऊन आता ३२ वर्षे होत आली आहेत. या ३२ वर्षात नेपाळमध्ये ३२ लोकशाही सरकारे आली आणि गेलीत !!!

वर्षानुवर्षे असलेला राजकीय अस्थिरतेचा शाप सुटण्याची चिन्हे दृष्टीपथात नाहीत.

आज १ जून.

नेपाळच्या अर्वाचीन इतिहासात १ जून २००१ च्या रात्री काठमांडूच्या नारायणहिटी राजवाड्यात नेपाळ नरेश राजे बिरेंद्र, राणी ऐश्वर्या, त्यांचे दोन्ही वारस राजपुत्र, त्यांचा भाऊ, बहिणी, आत्या झाडून सर्व एका नृशंस हत्याकांडाला बळी पडले.

तेंव्हापासून आजतायागत १ जून ही तारीख आली की हे हत्याकांड युवराज दिपेंद्रने स्वतः घडवले की यामागे CIA की भारताचे RAW की चीनच्या गुप्तचर संस्था की नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे राजतंत्रविरोधी लोक की घरातलेच लोक होते याबद्दल अजूनही कुजबुज होते. घटनेवर प्रत्यक्षदर्शींची पुस्तके आली आहेत, वार्षिक वृत्तपत्रीय लेख येतात.

या घटनेने नेपाळचा इतिहास बदलला हे मात्र खरे.