गुन्हा

Submitted by रघू87 on 17 December, 2021 - 10:32

गुन्हा

नेहमीची लोकल
नेहमीचा डबा
जागेसाठी भांडाभांड
नेहमीचीच

एकमेकांची
आयबहीण काढणं
कधी रागात
कधी मस्करीत
मोठमोठ्याने
चालतं इथे

नजरा काही
किळसवाण्या
गर्दीत संधी
शोधत असतात
हे सार
खपत इथे

ह्या साऱ्यात
येतात कधी
दोनतीन पोरी
अल्लड वयाच्या
कोवळ्या मनाच्या
चुकून बहुदा

दाराकडेला
राहतात उभ्या
बोलता बोलता
त्यातलीच एक
जोरात हसते
निखळपणे

लगेच वळतात
नजरा, माना
आजूच्या बाजूच्या
अलिकडल्या
पलिकडल्या
क्षणार्धात

बघून डोळे
वटारलेले
प्रश्न पडला
पोरींना त्या
केला असा
कोणता गुन्हा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users