दुःखाला दुःखाची जागा दाखवून ये

Submitted by सुप्रिया जाधव. on 16 December, 2021 - 04:12

नकोस देऊ जखम भळभळू, साकळून ये
समोर त्याच्या येताना तू सावरून ये

उंचावरून कोसळल्यावर कसे वाटते ?
पाण्याच्या थेंबा थेंबाला विचारून ये

प्रश्न विचारू नकोस पडतिल शंभर शकले
आयुष्याला पाठीवरती वागवून ये

कपाळमोक्षातली व्यथा समजेल तुलाही
किनाऱ्यावरी लाटेसमान आदळून ये

आपुलकीने वागवू नये प्रत्येकाला
दुःखाला दुःखाची जागा दाखवून ये

सुप्रिया जाधव, लाखे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>प्रश्न विचारू नकोस पडतिल शंभर शकले
आयुष्याला पाठीवरती वागवून ये

चपखल उपमा आहे!!

छान. त्यातला नुसता एक स्पेस बार इकडचा तिकडे केला तर अर्थ बदलतो. पहा कसा तो:

नकोस देऊ जखम भळभळू, साकळू नये
समोर त्याच्या येताना तू सावरू नये

उंचावरून कोसळल्यावर कसे वाटते ?
पाण्याच्या थेंबा थेंबाला विचारू नये

प्रश्न विचारू नकोस पडतिल शंभर शकले
आयुष्याला पाठीवरती वागवू नये

कपाळमोक्षातली व्यथा समजेल तुलाही
किनाऱ्यावरी लाटेसमान आदळू नये

आपुलकीने वागवून ये प्रत्येकाला
दुःखाला दुःखाची जागा दाखवू नये