चंदनावर निजवले आहे मनाला

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 December, 2021 - 20:55

एक नवीन गझल...

आठवांनी सजवले आहे मनाला
चंदनावर निजवले आहे मनाला

घातले खेटे किती?.... गणतीच नाही
विनवण्यांनी झिजवले आहे मनाला

दृष्ट लागावी असे सौंदर्य नव्हते
विभ्रमांनी उजवले आहे मनाला

कोरडे होण्यास राजी होत नाही
भावनांनी भिजवले आहे मनाला

वावड्या, आरोपही संगीन झाले
वंचनांनी खिजवले आहे मनाला

दुःख किंवा सौख्य उमलून येत नाही
अनुभवांनी कुजवले आहे मनाला

कोडगे होण्याअधीची स्टेज आहे
जाणिवांनी थिजवले आहे मनाला

सुप्रिया जाधव, लाखे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users