भूतकाळ तो वाचत असतो

Submitted by निशिकांत on 9 December, 2021 - 01:50

धूळ झटकुनी आठवणींची सदैव पाने चाळत असतो
वर्तमान ना भविष्य ज्याला,भूतकाळ तो वाचत असतो

नवे धुमारे, नवीन पाने फुटावयाचे मोसम गेले
भान ठेउनी ऋतुचक्राचे, आनंदाने वाळत असतो

रुढी प्रथांच्या ठिणग्यांचा का त्रास असावा नव्या पिढीला?
स्वतः ठरवुनी जगावयाचा हक्क मुलांचा मानत असतो

भांडीकुंडी, धुणी बायको करते, पण दारिद्र्य झाकण्या
घरात लक्ष्मी पाणी भरते असे जगाला सांगत असतो

नास्तिकवादी एकच मुद्दा धरून म्हणती "देव दाखवा"
दृष्टीला ना पडे तरीही फुलात दरवळ नांदत असतो

दु:खाचा लवलेश नसावा असे जरी का वाटत असते
हीच अपेक्षा पूर्ण न होता, दाह जिवाचा वाढत असतो

भरून आल्या मेघांचा अन् मोरांचा संबंध नसावा
आनंदी बळिराजा पाहुन मोर कदाचित नाचत असतो.

गर्भामध्ये माय पेलते ओझे ज्यांचे त्याच मुलांना
वयोपरत्वे ओझे होता, काटा ह्रदयी बोचत असतो

विसराळू "निशिकांत" एवढा! विसरुन गेला तुला विसरणे
आठवणींचा दोर आजही गळ्याभोवती काचत असतो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users