घेउन येते ओला श्रावण

Submitted by निशिकांत on 2 December, 2021 - 09:20

(मुसलसल गझल)

नसताना ती शुष्क जीवनी रखरखलेपण
येते तेंव्हा घेउन येते ओला श्रावण

जरा तुझी चाहूल लागता आठवातुनी
रोमांचांना फुलावयाची आस विलक्षण

तुलाच ठावे अमाप माझ्या दु:खावरती
कसे करावे आनंदाचे प्रत्त्यारोपण

विशेषता अपुल्या नात्याची अशी असे की,
वीण असोनी जुनी, कुठेही नाही उसवण

तू आल्याने मीपण माझे निघून गेले
दुजा भाव गेला अन् उरले फक्त समर्पण

सर्व चांगले अनुभवलेले नोंद करू या
दु:ख भोगले त्याचे आता नको समिक्षण

अंतरात मी बघता दिसतो तुझाच वावर
अशक्य आहे करणे आता आत्मनिरिक्षण

कधीच नसते सत्वपरिक्षा प्रेमामध्ये
काकण हातीचे बघण्याला कशास दर्पण?

मनी कसा "निशिकांत" नांदतो वसंत अजुनी?
कलंदराला वावर्धक्याचे नसते दडपण

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users