येथे जुळता मिती .....
दुपारचे जेवण आटोपुन आदी झोपायला गेला. उन्हाळ्याचे दिवस... पंख्याची गरम हवा आणि डोळ्यांवर नियंत्रणात नसलेली झोप. पंख्याच्या खटखट आवाजाव्यतिरिक्त निरव शांतता. जाम्भया देत जो उताणा पडलो तो कधी घोरू लागला कळालंच नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
घराच्या मागील शिवारात मधुमालतीची वेल फुललेली. सुगंध असा कि बेधुंद होऊन जावं. मनावरील मळभ दूर होऊन विलक्षण प्रसन्नता क्षणात यावी असाच भरगच्च सुगंध दरवळुन वातावरण प्रसन्न झालेलं. याच सुगंधावर आकर्षित झालेली एक व्यक्ती, झुडुपामागून फुले काढण्याचा प्रयत्न करतेय. चेहरा अजूनही झुडुपाआडचं. पणं हाताचे आढेवेढे घेऊन, वेलीच्या फांद्या खेचून सावरुन फुलांना काढण्याचा प्रयत्न करतोय.
मी (आदीने) जवळ जाऊन त्याला थोडी फुले काढून दिली. मला त्याची ओळख अजूनही पटली नव्हती. मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, कोणं आपणं? इथे कसें आलात?
कोण मी?.... (समोरुन)
"हा आवाज तर ओळखीचा वाटतोय" आदी मनातल्या मनातच विचार करू लागला. डोळे काहीसे तणावपुर्ण करत तो आणखी जवळ गेला. समोर तोच होता. शांत मुद्रेने हसत माझ्याकडे पाहत,
"काय रे, मला नाही ओळखलंस?, मी आदी"... (समोरून)
मी दचकलोच. माझी नजर समोरच्याच्या चेहऱ्यावर स्थिरावली. मनात वावटळ उठावे तशीच अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण झाला.
अरे हा तर माझ्यासारखाच... नव्हे, मीचं ...
आ ... वासून एकटक संभ्रमावस्थेत उभा असतानाच डोक्यात विचारचक्र चालूच होते. समोर मी आहे तर "मी" कोण?
कसं शक्य आहे.... नाही, नाही... मी झोपेत तर नाही ना...
मला भास तर होत नाही ना...
पणं मग आवाज तर तोच, चेहराही तोच...
समोरून आदी फक्त हसत होता.... शांतपणे....
मी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो, पणं निष्फळ.... कंठातुन आवाज काही निघत नव्हता.
मी मागे वळून जाऊ पाहू लागलो..... पाय थरथरत होते, हात थरथरत होते, मेंदुला मुंग्या माराव्यात आणि डोक्यातून कळ उठावी त्यासरशी डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली.... आता मी पडणारच..... धाड ....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदी अंथरुणातच पडल्याच्या भासाने धडपडत जागा झाला. चेहरा घामाने लथपथलेला. पंख्याची खटखट अजूनही चालूच होती. हृदयाची धडधड वाढली होती. फुलांचा सुगंध अजूनही श्वासातून हरवला नव्हता. हातानेच त्याने स्वतःला चाचपले.... तो तर जागेवरच होता. हाताचा सुगंध घेतला... आणि....
पुन्हा डोक्यात झंजावात... मधुमालतीच्या फुलांचा सुगंध अजूनही ताजाच होता.
म्हणजे... म्हणजे... मी झोपलो नव्हतो?... मी कुठे होतो?.... अरे, आता तर उठलो, मग हे....
आणि हे काय, पायाला काय लागलंय, रक्त ओघळतंय... नाही नाही....
माझा विश्वासच बसत नाही... काय घडतंय, काय झालं नक्की?...
ताडकन उठून मी मागच्या शिवाराकडे धावत सुटलो.
मधुमालतीच्या फुलांचा सुगंध बेफाम मनाला हर्षित करत होता. जवळच मातीमध्ये कुणी पडल्याच्या खुणा स्पष्टच दिसत होत्या. काही वेलींवरचे फुलं, कुणी काढल्याचे स्पष्टच दिसत होते.
आता तर डोके सुन्न होऊ लागले होते... कसं शक्य आहे.... मी तर झोपलो होतो, मग हे ... इथे...
आणि कोण पडलं?... कोण बोललं?....
आदीच डोकं ठप्प झालं. तो शुन्यातच उभा होता... त्या फुलांनी बहरलेल्या वेलींकडे पाहत....
आणि मधुमालती मात्र प्रसन्न फुलली होती... जणू आदीवर हसत आहे... तीच एक साक्षीदार.... खरं काय नि खोटं काय ... तीच निर्णय देऊ शकणारी ... पणं तरीही ती अबोल....
छान!
छान!
धन्यवाद @ @Shraddha
धन्यवाद @ @Shraddha