‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

Submitted by कुमार१ on 26 November, 2021 - 11:26

गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाण-घेवाण होते.

असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील सहा जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपान पर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ.
मग मी सर्वांना म्हणालो,
“तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” !

इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले,

मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” !

माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”.
..
वाचक मित्रहो,
असा हा आमच्या कुटुंबीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९ % खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानी मनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो.
तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? Happy

तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम तीन दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे.
…..

तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते.

तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतली नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर.

मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला.
तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता.

मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची :

सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”.

Passport_of_India_travel_restriction_note_to_the_Republic_of_South_Africa.jpg

याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते.
मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला. आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले.

हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर मेहरान नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून दोन दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो.

जेव्हा आपण भारतातून अन्य सधन देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते).

विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी-श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते.

परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली,

जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”.
ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली.

परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”.

पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणेच दिसतो. अशी भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही.

अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला.
आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले.

त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता.

मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे या परीक्षेमुळे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.

जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच् तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच.
असो.

लेखातील घटनेनंतर पुढील संपूर्ण आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी कायमचा बाद करून टाकलेला आहे. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील.
........................................................................................................................................................
लेखातील चित्र जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखक पत्रकार, संपादक अरविंद व्यं गोखलेच आहेत.
पुस्तकाचा विषय - साहित्य, संस्कृती आणि कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान

1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाच्या २२ किलर किलर्स स्क्वॉड्रन’ने कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या स्क्वॉड्रनला येत्या ८ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/fifty-years-of-india-pakistan-1971-...

भारतीय नौदलाचे अभिनंदन.!

पाकिस्तान वरील इन्ग्रजीत मी वाचलेली दोन सर्वोत्तम पुस्तके

पकिस्तान अ हार्ड कन्ट्री - अनातोल लेविन
पाकिस्तान आर्मी - स्टिफन कोहेन, यांची इतर सर्व पुस्तके देखील
शुजा नवाझ यांचे क्रॉस्ड स्वोर्ड पण वाचनीय आहे असे ऐकले आहे. मी अजून वाचलेले नाही

दुसर्‍या कुणी पुस्तकाचा विषय काढला असता तर
वाचू आनंदे
मला आवडलेले पुस्तक
या ठिकाणी या चर्चा कराव्यात अशी सूचना आली असती. Lol
आमची काही एक हरकत नसते आणि नाही.

कोक स्टुडिओ. व जुनून. सैयोनी गाणे. आय रेस्ट माय केस. ब्रिटिशांनी किती रेषा मारल्या तरी संगीत व कला ह्यांना ही ब्नंधने नाहीत. सप्त सूर तिथेही लागतात. जरा भडकलेली डोकी दोन्ही बाजूची शांत व बाजूला करून सौहार्द साधता येइल जे डिस्टो र्टेड पिक्चर दोन्ही कडे फिरवले जाते आहे ते बाजूला करून खरे चित्र बघा. अमन की आशा.

कोक स्टुडिओ. ...+१.
अजूनही बरेच आहे.पण धाग्याशी अवांतर होईल

यंदा 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाची पन्नाशी आहे. 16 डिसेंबर चा 'विजय दिवस' जवळ येत आहे. त्यानिमित्ताने तेव्हाच्या काही आठवणींना इथे उजाळा दिलेला आहे :
https://www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/india/vijay-diwas-1...

बांगलादेश निर्मिती नंतर पाकिस्तानची लोकसंख्या निम्म्याहून अधिकने कमी झाली.

मीरा:

मलाही पाकिस्तानी वेबसिरीज आणि त्यातला निसर्गसंपन्न पाकिस्तान पाहुन एक ट्रिप करावीशी वाटते >>

कोणत्या वेबसिरिज ज्यात निसर्गसंपन्न पाक दाखवलंय?

मला मोहेंजोदडोला भेट देऊन 'तू है मेरा ये संसार सारा' या गाण्यावर डान्स करायचा आहे. अगदी हृतिक नाचलाय तसाच सेम टू सेम.

**एका आजीकडून कळलं होतं की कराचीत मराठी शाळा होत्या मनात एक कुतूहल आहे ... अस्तित्वात आहेत का ह्या शाळा?
Submitted by मंजूताई on 27 November, 2021 - 09:13
>>>
कराची मधील एक मराठी ठसा.:
नारायण जगन्नाथ वैद्य सरकारी प्रशाला (स्थापना 1855)

https://en.m.wikipedia.org/wiki/NJV_Government_Higher_Secondary_School

राष्ट्रात क्षत्रतुव असते जगात खूप देशा मध्ये आहे.
पण सामान्य जनता एकमेकांचा द्वेष करते ह्याचे भारत पाकिस्तान हे एकमेव उदाहरण असावे.
चीन शी भारताचे संबंध चांगले नाहीत भारताला धोका पाकिस्तान पेक्षा चीन कडून जास्त आहे .
पण चिनी लोकांना ना भारता विषयी माहिती आहे ना त्यांना भारतीय लोकांचा द्वेष आहे.
ना भारतीय लोक चिनी लोकांना शत्रू समजत ना त्यांचा द्वेष करत
धार्मिक कारण मुळे भारत पाकिस्तान एकमेकाचे शत्रू आहेत ना सीमा वादा मुळे.

उजाड पाकिस्तान >>> चांगले स्फुट.
....
एक चांगला लेख :
स्वतंत्र बांगलादेशची पन्नाशी : भारतानेच घातले बारसे, पण आता संबंध बरे नाहीत फारसे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/5658

या धाग्यात पासपोर्ट-व्हिसा इत्यादींची माहितीपूर्ण चर्चा झालेली आहे. यासंदर्भात इंग्लंड मधील हा एक नवा दावा.

एका व्यक्तीने आपल्या पासपोर्ट मध्ये लिंगनिरपेक्ष असा उल्लेख (जेंडर न्यूट्रल) करावा अशी मागणी केली होती. परंतु इंग्लंडच्या कायद्यानुसार व्यक्तीचे लिंग या सदरात पुरुष किंवा स्त्री लिहिणे हे सक्तीचे आहे. या व्यतिरिक्त काही लिहून त्यांचा पासपोर्ट दिला जात नाही.
या नियमाविरुद्ध संबंधित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात गेली होती. परंतु तिथे तिच्या विरोधात निकाल लागलेला आहे.

वास्तविक लिंगनिरपेक्ष अशी नोंद करून अनेक देशांमध्ये पासपोर्ट दिले जातात. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका कॅनडा, जर्मनी इत्यादींचा समावेश आहे. न्यायालयाचा वरील निर्णय दुर्दैवी असल्याचे फिर्यादीच्या वकिलाने म्हटले आहे. आता ते युरोपीय मानवाधिकार न्यायालयाकडे दावा दाखल करतील.

https://www.bbc.com/news/uk-59667786

<< आपल्या पासपोर्ट मध्ये लिंगनिरपेक्ष असा उल्लेख (जेंडर न्यूट्रल) करावा अशी मागणी केली होती. परंतु इंग्लंडच्या कायद्यानुसार व्यक्तीचे लिंग या सदरात... >>

यात दुर्दैवी निर्णय काय आहे? Sex identity आणि gender identity या भिन्न गोष्टी आहेत. सरकारला sex जाणून घ्यायचे आहे, gender नाही. (आता सरकारला sex जाणून घेण्यात उद्देश काय? असा प्रश्न पडेल, म्हणजे मला तरी पडला. मग विचार केला की जर कुणी विमानात जळून गेला/गेली तर नक्की कोण? स्त्री की पुरुष ते ठरवण्यासाठी कदाचित विचारत असतील, नक्की मला पण माहीत नाही.)

अवांतर:
ही UK गव्हर्नमेंटची लिंक सापडली. कायद्याच्या दृष्टीकोनातून sex, gender identity and sexual orientation हा फारच रोचक विषय दिसतोय.

अतिअवांतर: माझ्या मते gender identity हा पूर्णत: वैयक्तिक आणि खाजगी प्रश्न आहे, सर्व सरकारी कामातून तो काढून टाकला पाहिजे. लग्नाच्या दाखल्यावर पण अ चा विवाह ब सोबत झाला, इतकेच लिहावे.

अमेरिकेतील एका न्यायालयानेही लिंगनिररपेक्ष जेंडर न्युट्रल पारपत्राची मागणी फेटाळल्याचे दिसते.
भारतात पारपत्रावर ट्रान्सजेंडर हे तिसरे लिंग नोंदवायचा पर्याय आहे. पण त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागते. पाकिस्तानातही हेच असावे. हे लिंगनिरपेक्षतेपेक्षा वेगळे आहे.

जेंडर आयडेंटिटी - लिंगभाव हा खाजगी प्रश्न नाही. आपण काय म्हणून ओळखले जावे यात इतरांशी संबंधाचा भाग आहे.
सेक्स ओरिएंटेशन लैंगिक कल हा मात्र खाजगी प्रश्न आहे.

उ बो , भरत
उपयुक्त पूरक माहितीबद्दल आभार.

मी मध्ये जे काही फॉर्म भरले(कंपनीज चे, काही इतर रजिस्ट्रेशन चे वगैरे) सगळ्यात लिंग मेल-फिमेल-डोन्ट वॉन्ट टू डिस्कलोज असे सगळे पर्याय होते.

भरत,
अमेरिकेतील एका न्यायालयानेही लिंगनिररपेक्ष जेंडर न्युट्रल पारपत्राची मागणी फेटाळल्याचे दिसते.

>>>

अमेरिकेतील पहिले लिंगभावनिरपेक्ष पारपत्र ऑक्टोबर २०२१ मध्ये देण्यात आले. संबंधित व्यक्ती 66 वर्षीय असून तिने 2015 पासून न्यायालयात दाद मागणे चालू केले होते. आता संबंधिताच्या पारपत्रावर लिंग या सदरात फुली मारण्याची (X) परवानगी मिळालेली आहे.

https://www.reuters.com/world/us/us-issues-first-passport-with-x-gender-...

रच्याकने,
sex = लिंग
आणि
gender = लिंगभाव

अशी माझी समजूत आहे.
यात काही सुधारणा हवी असल्यास जरूर सांगावे.

<< U.S. issues first passport with 'X' gender marker >>
<< बातमीनुसार pulled out my new passport, and saw the 'X' stamped boldly under 'sex,' >>

सगळा गोंधळ आहे. sex आणि gender ला एकच समजताहेत.
sex म्हणजे जन्म झाल्यावर पुल्लिंग्/स्त्रीलिंग यानुसार डॉक्टर ठरवतात ते. X आणि Y क्रोमोसोम्सनुसार ठरते ते sex. याचा उद्देश म्हणजे पुनरुत्पादन कोणामध्ये होईल ते ठरते. (अर्थात विकीपिडियानुसार ०.०२% जणांचे sex ठरवता येत नाही. याला Non-binary म्हणता येईल पण ते gender नाही.) Chromosomes cannot be changed. Gonads can be removed, but not replaced.

याउलट gender म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःला काय वाटते ते. उदा. Transgender. पुरुषाचे शरीर आहे, त्याला स्वतःला वाटणे की तो स्त्री आहे किंवा स्त्री + पुरुष आहे किंवा स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही वगैरे. त्यामुळे gender आणि sex भिन्न आहेत, एखाद्या पुरुषाला कितीही वाटले की तो स्त्री आहे, तर तो फार तर Sex reassignment therapy (strictly speaking, sex change is incorrect.) करू शकेल, पण कुठल्याही परिस्थितीत पुनरुत्पादन करू शकणार नाही.

पासपोर्टवर sex साठी पर्याय हवा: Male, Female, Non-binary (मुळात पासपोर्टवर sex हा रकाना हवाच कशाला? हा माझा प्रश्न आहे, पण ते जाऊ दे.)
एखाद्याचे gender काय आहे, ती व्यक्ती crossdressing करते की नाही, याच्याशी सरकारला पासपोर्टसाठी तरी काही देणेघेणे असू नये.

>>>>>> gender identity हा पूर्णत: वैयक्तिक आणि खाजगी प्रश्न आहे>>>
>>>> जेंडर आयडेंटिटी - लिंगभाव हा खाजगी प्रश्न नाही.>>>

विमानतळ आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे कुठल्या प्रकारची असावीत हा मुद्दा उपस्थित होतो. ‘न्युट्रल’ अशी सोय अजून सगळीकडे नाही
‘न्युट्रल’ अशा स्वच्छतागृहांबाबत काही वाद-विवाद झालेले दिसून येतात.
https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/tackling-transgen...

नागरिकत्व आणि गुंतागुंत

संगीता व अनिता या दोन मुली 33 वर्षांपूर्वी अज्ञान असताना पाकिस्तानातून भारतात आल्या. त्यांच्या आई-वडिलांना भारताचे नागरिकत्व आठ वर्षात मिळाले. पुढे या मुलींनी सज्ञान झाल्यावर भारतीय नागरिकांशीच विवाह केले. परंतु अद्यापही त्या मुलींना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.
ते मिळण्यासाठी पाकिस्तानने काहीतरी अहवाल पाठवणे अपेक्षित आहे, जो त्यांनी अद्याप पाठवलेला नाही.

https://www.opindia.com/2022/01/2-hindu-sisters-pakistan-indian-citizens...

1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे हुकूमशहा झिया उल हक तेव्हाच्या ऱ्होडेशियात भेटले होते. तेव्हाचा दोघांमधला एक रोचक संवाद नुकताच वाचला. तो असा :

भेटीच्या सुरुवातीसच झिया इंदिराजींना म्हणाले,
“मॅडम, वृत्तपत्रात जे काही छापून येतं, ते तुम्ही सगळं खरं मानू नका बरं का”

त्यावर इंदिराजीं उत्तरल्या,
“अर्थातच नाही, तसही सगळी वृत्तपत्रे तुम्हाला लोकशहा आणि मला हुकूमशहा म्हणताहेत, नाही का ?”

या शाब्दिक टोल्यावर झियाना निरुत्तर होण्याखेरीज गत्यंतर नव्हते !

Pages