सोनल - भाग ७

Submitted by Kavita Datar on 21 November, 2021 - 09:25

त्यादिवशी शाळेला कसलीतरी सुट्टी होती. त्यामुळे सोनल निवांत उठली. सकाळचे सात वाजून गेले होते. अजयला सकाळी सहा वाजताच टॉयलेटला जायचं असायचं. तेव्हा तो सोनलला हाक द्यायचा. पण आज त्याच्या खोलीतून कसलाच आवाज येत नव्हता. स्वतःचं आवरुन ती त्याच्यापाशी आली. तो शांत झोपलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिने त्याला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. बेडच्या कडेला असलेला त्याचा हात खाली लोंबकळला. त्याचं शरीर थंड पडलं होत.
"अजय...ऊठ अजय... "
सोनल ओरडली. पण तो केव्हाच हे जग सोडून निघून गेला होता.

**********

सोनलने अपार्टमेंट मधल्या पाचव्या मजल्या वरील डॉक्टर जोशी यांना कॉल करून बोलावून घेतले. डॉक्टर जोशींनी स्टेथोस्कोप लावून, नाडी पाहून नकारार्थी मान हलवली. तिने लगेच स्वप्नाला फोन लावून अजय गेल्याचं कळवलं. अर्ध्या तासात स्वप्ना आणि शरद येऊन पोहोचले. त्यांना पाहून तिला बराच धीर आला.

तिने मेसेज टाकून अर्जुन ला ही बातमी कळवली आणि अजयच्या बहिणीला फोन लावला. दुःख व्यक्त करत अजयच्या बहिणीने, अजयच्या बाबांच्या हाती फोन दिला. त्यांना मोठाच धक्का बसलेला वाटत होता. फोनवर रडत ते म्हणाले,
"एवढं सगळं चांगलं असून सुद्धा, त्याच्या बेताल वागण्याने त्याचा जीव घेतला. सांभाळ पोरी स्वतःला... तुझ्यासाठी जीव तुटतो ग..."
बाबांची तब्येत फारशी बरी नसल्याने, ते प्रवास करू शकत नाहीत आणि त्यांना एकटे सोडून ती येऊ शकत नाही.असं बोलून, अजयच्या बहिणीने येण्यास असमर्थता व्यक्त केली.

मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यापासून, विद्युतदाहिनी मध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सगळी सूत्रं शरद ने वेगाने हलवली. सोनलने या सगळ्या विधीं पासून मुलांना मुद्दामच दूर ठेवलं. नील खूप लहान होता आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कोवळ्या बालमनावर परिणाम होण्याची शक्यता होती. अजयचे दिवसवार न करता, तिने त्या ऐवजी एका अनाथ आश्रमाला त्याच्या नावाने देणगी दिली आणि उदक शांती चा विधी तेवढा घरात करवून घेतला.

अजय गेल्याच्या संध्याकाळी अर्जुन सोबत तिचं फोनवर बोलणं झालं होतं. तो दहा बारा दिवसांनी तिला भेटायला मुंबईत येणार होता. चार दिवसांनंतर अदिती आणि अम्मा तिला भेटायला आल्या. अम्मांनी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिला भरून आलं.
"जेवढं शक्य होतं तेवढं सगळं केलं हो मी. आठवड्याभरात लिव्हर ट्रान्सप्लांट ठरलं होतं त्याचं. पण त्याआधीच तो गेला."
डोळे पुसत सोनल बोलली.
"प्रयत्न करणं फक्त आपल्या हातात असतं बेटा. बाकी देवाची इच्छा..."
अम्मांनी तिचं सांत्वन केलं.

दोन आठवड्यांनी अर्जुन मुंबईत आला. त्याच दिवशी संध्याकाळी तो तिला भेटायला आला. अर्जुनला पाहताच गेल्या काही महिन्यांपासून ओढवलेल्या या विचित्र आणि तणावपूर्ण परिस्थितीला एकटीने तोंड देणाऱ्या सोनल चा बांध फुटला. त्याच्या आश्वासक मिठीत तिच्या मनातले क्लेश, दुःख, तणाव सगळं वाहून गेलं. तिचं मन हलकं झालं.

घरी आल्यावर अम्मा, अदिती आणि नारायण सोबत अर्जुन, सोनल बद्दलच बोलत होता. तिने अजयच्या शेवटच्या दिवसांत केलेली त्याची सेवा, त्याला लिव्हर डोनेट करण्याचा घेतलेला निर्णय, हे सगळं त्यानं सांगितलं. अम्मा शांत होत्या. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

अर्जुन तीन दिवस मुंबईत होता. या तीन्ही दिवसांतील बहुतेक वेळ त्याने सोनल, तन्वी आणि नील सोबत व्यतीत केला. त्या तिघांना बाहेर जेवायला नेलं. मॉल मध्ये नेऊन मुलांना हवं ते घेऊन दिलं. मरीन ड्रायव्ह वर फिरायला नेलं. तीन दिवस कधी संपले कळलंही नाही. त्याच्या येण्याने तिचे आणि मुलांचे दिवस मजेत गेले.

दुबई ला निघण्याच्या आदल्या दिवशी अर्जुन अम्माला म्हणाला,
"अम्मा ! माझ्यावरचा राग अजून गेला नाही का ?"
"नाही रे...मी कुठे रागवले तुझ्यावर ?"
"मग माझ्यासोबत दुबईला केव्हा येते आहेस ?"
"आता मी एकटी नाही येणार..."
"मग ??"
"माझ्या सुनेला सुद्धा सोबत घेऊन येईन."
"मी खूपदा सांगितलंय...मला सोनल शिवाय कोणाशीही लग्न करणे शक्य नाही."
"मग सोनल सोबतच लग्न कर ना..."
"काय ? हे तू बोलते आहेस ??"
"होय... मीच बोलतेय... सोनल मला सून म्हणून चालेल... एवढेच नाही, तर ती मला खूप आवडली आहे."
"पण मी तिच्याशी लग्न केलं तरीही, आमच्या सोबत राहशील ना ?"
अर्जुन अजूनही साशंक होता. त्याला वाटलं अम्मा, ती किंवा सोनल या दोघीं मधून कोणा एकीची निवड करायला सांगेल. त्याला त्याची अम्मा देखील तेवढीच प्रिय होती.
"होय अर्जुन...मी तुमच्यासोबत राहीन. सोनल मोठी गुणाची मुलगी आहे. हे तिला भेटल्यावर मला कळलं. नाइलाजाने ती नवऱ्याला सोडून आली. पण छळ करणाऱ्या नवऱ्याची देखील शेवटी तिने कर्तव्य भावनेने सेवा केली. एवढेच नाही तर त्याला लिव्हर डोनेट करायला देखील तयार झाली. ती एक असाधारण स्त्री आहे. अशी स्त्री सून म्हणून मिळणं हे मी माझं भाग्य समजते."

अर्जुन ने अत्यानंदाने अम्माला मिठी मारली. अदिती आणि नारायण तो आनंद सोहळा पाहून सद्गदित झाले. ही आनंदाची बातमी कधी एकदा सोनलला सांगतो, असं अर्जुनला होऊन गेलं.

संध्याकाळ झाली होती. तन्वी, नील शेजारच्या बिल्डिंगमधल्या धृव च्या वाढदिवसाला गेले होते. डोअरबेल वाजली. तिनं आयहोल मधून पाहिलं. अर्जुन आला होता. तिने दार उघडलं. घाईने आत येऊन अर्जुनने दार बंद केलं आणि अत्यानंदाने तिच्या कमरेभोवती हात वेढून, तिला उचलून घेतलं.
"अरे काय करतो आहेस अर्जुन ? पडेन ना मी..."
ती हसतच बोलली.
"आज मी खूप खूप खुश आहे... विचार...का ??"
"का ??" तिनं हसून विचारलं.
"अम्मा आपल्या लग्नाला तयार झालीय सोनल...तिला तू पसंत आहेस..."
"खरच ??"
"हो...एवढंच नाही... तुझं खूप कौतुक करत होती ती..." "माझं कौतुक करण्यासारखं काय आहे ? पण फार बरं झालं... त्या तयार झाल्या..."
"केव्हा करायचं लग्न ?"
तिचा चेहरा दोन्ही हातांत घेऊन तिच्या डोळ्यांत पहात अर्जून ने विचारलं.
"तिच्या गालांवर चे अर्जुन चे हात हातात घेत सोनल म्हणाली,
"माझं ऐकशील ??"
"बोल ना..."
"इतक्यात आपण लग्न नको करायला..."
"का ? काय झालं ??"
"अर्जुन लोक काय म्हणतील ? याचा मी कधीच विचार केला नाही. पण मला थोडी उसंत हवी आहे. मुंबईत येऊन फक्त आठ महिने झालेयत. पण या अल्प काळात किती उलथापालथ झालीय आयुष्यात ?? विचार करून डोकं गरगरायला लागतं. चार-सहा महिने जाऊ दे... मग बघूया... चालेल ना ??"
अर्जुनचा उत्साह मावळला. पण थोडा विचार केल्यावर त्याला सोनलचं म्हणणं पटलं.
"काही हरकत नाही सोनल...Take your time... तुझ्यासाठी इतकी वर्षं वाट पाहिलीय... अजून चार-सहा महिने..."
"किती समजून घेतोस मला ??"
"सोनल....माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. लग्न कधीही झालं तरी त्यात काही फरक पडणार नाही. तु म्हणशील तेव्हाच आपण लग्न करू."

भावनावेगाने ती त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवरून फिरत होते. तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेऊन त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकले आणि तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेतलं. बेभान होऊन तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होता. त्याच्या प्रेमाच्या भरतीत वाहून जाण्याआधीच तिने स्वतःला मोठ्या संयमानं सावरलं. स्वतःच्या मर्यादांचं तिला भान आलं. त्याला आपल्यापासून दूर करत ती म्हणाली,
"नको...लग्नाआधी हे ठीक नाही.."
"I am sorry. Somehow I lost myself..."
तिचा निरोप घेऊन तो निघाला.

अजय ला जाऊन तीन महिने उलटले. सोनल आणि मुलांचं रुटीन पूर्वपदावर आलं. आठवड्यापूर्वीच ती पुण्याला जाऊन आली होती. अजयचे पीएफ, ग्राच्युएटी आणि इन्शुरन्स चे पैसे तिने शरद च्या सल्ल्याने मुलांच्या नांवे योग्य त्या प्रकारे गुंतवले. पुण्यातील त्यांचा फ्लॅट तिने ओळखीच्या इस्टेट ब्रोकर द्वारे अकरा महिन्यांच्या लीजवर भाड्याने दिला. या सगळ्या कामात तिला अजयचे वरिष्ठ जोग साहेबांची खूप मदत झाली.

आता सोनल बरीच स्थिरावली होती. अल्प कालावधीत घडून गेलेल्या आयुष्यातील घडामोडींकडे त्रयस्थपणे पाहायला शिकली होती. अर्जुन ची कमी तिला जाणवू लागली होती. तसा तो अजय गेल्यापासून महिन्या दोन महिन्यात वीकेण्डला मुंबईत तिला भेटायला यायचा. पण तेवढं तिला पुरेसं वाटत नव्हतं. एक दिवस त्याच्याशी व्हिडिओ कॉल वर बोलताना तिने लग्नाला तयार असल्याचं सांगितलं. हर्षभरित होऊन त्यानं व्हिडिओ कॉल वरच तिचं चुंबन घेतलं.

पुढच्या वीकेण्डला दोन-तीन दिवसांसाठी अर्जुन मुंबईत आला, तेव्हा सर्वांच्या संमतीने दोन महिन्यांनंतर ची तारीख ठरली. लग्न अगदी साधं, वैदिक पद्धतीने करायचं ठरलं. सोनलने स्वप्ना, शरद ला तिच्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला. तिच्या सोहम दादा ला तिने फोन करून अर्जुन बद्दल सांगितलं आणि लग्नाची तारीख कळवली.

दादा, बायको-मुलांना घेऊन लग्नाच्या पंधरा दिवस आधीच आला. दादा जेव्हा अर्जुनला भेटला, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्व आणि हुशारीमुळे खूप प्रभावित झाला.
"सोनल, तुझ्या बाबतीत आता मी पूर्ण निश्चिंत आहे. तन्वी, नील दोघांना बोर्डिंग स्कूल ला टाकायचं ठरवलं आहेस का??"
त्याने सोनलला विचारलं. ती काही बोलण्या अगोदरच अर्जुन म्हणाला,
"दादा ! तन्वी, नील आता सोनलचीच नाही तर माझी देखील मुलं आहेत. सोनल ला मी त्यांच्यासह स्वीकारलं आहे. ते दोघंही आमच्या सोबतच राहतील."

त्याचं बोलणं ऐकून दादा चे डोळे त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले. दिसायला उमदा आणि उच्चशिक्षित अर्जुन मनानेही तेव्हढाच सुंदर आहे, हे त्याला जाणवलं.

अर्जुन - सोनलचं लग्न साध्या समारंभात पार पडलं. अर्जुन कडची अम्मा, अदिती, नारायण आणि काही मित्रमंडळी लग्नाला हजर होती. सोनल कडून दादा आणि त्याचे कुटुंबीय, स्वप्ना, शरद एवढेच लोक होते. लग्नाच्या दिवशी तनवी आणि नील नवे कपडे घालून खुशीत मिरवत होते.

आज अर्जुन - सोनल, अम्मा आणि तन्वी, नील ला सोबत घेऊन दुबईला जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण केलं, त्यासोबतच त्यांच्या भविष्यातील सुखी संसाराच्या सुंदर स्वप्नांनी भरारी घेतली. विमानाच्या सीटवर बसलेली ती दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन, एकमेकांचं डोळ्यांत हरवले आणि अर्जुनच्या मनात शब्द उमटले.

तेरी आंखे दिखाती है...हमे सपनें सीतारो के...
तेरे होठों पे लिखा है...जो तुम बोले इशारों में...
...
लम्हा लम्हा दूरी यूं पिघलती है...
जाने किस आग मे ये शबनम जलती है...

(समाप्त)
©कविता दातार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults