वासांसि जीर्णानि

Submitted by गीतानंद on 18 November, 2021 - 18:24

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोsपराणि|
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही || (२.२२)

अन्वय : यथा जीर्णानि वासांसि विहाय नर: अपराणि नवानि गृण्हाति तथा देही जीर्णानि शरीराणि विहाय अन्यानि नवानि संयाति |

अर्थ : ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणे देहात असणारा आत्मा जीर्ण झालेले शरीर टाकून दुसऱ्या नवीन देहात प्रवेश करतो.

हा गीतेमधील एक सुप्रसिध्द, सर्वश्रुत श्लोक आहे. इंग्रजीत एक छान क्रियापद आहे... To philosophize. दुसऱ्यावर ओढवलेली दु:खद परिस्थिती philosophize करण्यासाठी बऱ्याचदा हा श्लोक वापरला जातो. कारण शेजारचं दार यमाने ठोठावलं की ते natural असतं पण तोच यम जेव्हा आपल्या दारी येऊन ठाण मांडतो तेव्हा तेच मरण लग्गेच special होतं. शेजारी वारला की त्याच्यामागे उरलेल्यांचं सांत्वन करण्यासाठी हे तत्वज्ञान नेहमीच वापरलं जातं. आत्मा अमर आहे देह नश्वर आहे. एक शरीर नष्ट झाले की आत्मा दुसरे नवीन शरीर धारण करतो. बऱ्याचदा माणसे स्वत:च्या जीवनशैलीचे समर्थन करण्यासाठीही या तत्त्वज्ञानाचा वापर करतात. शरीराची काळजी घ्यावी असं कुणी सांगितलं की शरीर नश्वर आहे... त्याला सांभाळून काय करायचं? हे गेलं तर दुसरं शरीर मिळेल. आत्मा काय अमरच आहे, वगैरे. मग एखादा मृत्यू अनुभवास येतो. अशावेळी लोकं लग्गेच त्यामागची कारणं, heart attack, kidney trouble, etc. शोधून आपल्याला ती नाहीत नं याची खात्री करून घेतात आणि आपल्याला काय तसं होत नाही म्हणून पुन्हा निवांतपणे रोजच्या उद्योगाला लागतात. समर्थ रामदास स्वामींनी किती योग्य म्हणून ठेवलंय “चिरंजीव हे सर्व हे मानीताती||” पण मरण अटळ आहे. त्या किनाऱ्याला कधी ना कधी तुम्हा–आम्हाला लागायचंच आहे. तेव्हा हे तत्त्वज्ञान नुसतं कोरडं तत्त्वज्ञान म्हणून न पाहता आचरणात आणता येतं का ते पाहू पण त्याआधी भगवद्गीतेची थोडी पार्श्वभूमी पाहू.

मूलत: महाभारत हा ग्रंथ ज्ञानमय आहे. महर्षि व्यास या सिध्दहस्त लेखकाने लिहिलेला हा ग्रंथ जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्षून जातो. तुम्ही-आम्ही या पृथ्वीतलावरील प्रत्येक मानव या ग्रंथांशी सहजी जोडला जाईल. प्रत्येकाला आपल्या अनुभवविश्वाशी संलग्न असा अनुभव या ग्रंथात मिळेल. जी कथा, जो अनुभव, जे जीवनाचं अंगं, जी मिती, जो आयाम महाभारतात नाही तो अस्तित्त्वातच नाही असे म्हटले जाते. जे महाभारतात नाही ते जाणून घेण्यास योग्यच नाही कारण त्याला अस्तित्त्वच नाही. इतका हा ग्रंथ सर्वव्यापी, सर्वसमावेषक आणि स्थल-कालातीत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या कोंदणात हीरा ठेवावा त्याप्रमाणे महाभारतरूपी कोंदणात मध्यभागी भगवद्गीता आहे.

महर्षि व्यास हे पहिले missionary म्हणजे धाडसी सेवाव्रती, जीवनव्रती होते. उपनिषदे आश्रमामध्ये, गुरुकुलामध्ये, गुहांमध्ये, जंगलांमध्ये, एकांतवासामध्ये बंदिस्त होती. उपनिषदातील ज्ञान सर्वसामान्य जनतेला उपलब्ध नव्हते. हे ज्ञान गीतेच्या माध्यमातून व्यासांनी लोकार्पण केले. पण व्यासांचा सांगण्याचा हेतु वेगळा आहे. उपनिषदातील तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी साधक साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे म्हणजेच साधकाजवळ विवेक, वैराग्य, शमदमादि षट्संपत्ती आणि मुमुक्षुत्व असावे लागते. गीतेला मात्र अशी कोणतीही अट नाही. आपल्या जीवनातील चारही आश्रमांत गीतेचे मार्गदर्शन आपल्याला अगदी तपशीलवार मिळते. श्रीकृष्णांनी कदाचित एखाद्या नेत्रकटाक्षाने किंवा थोडक्या शब्दामध्ये जे अर्जुनाला शिकविले ते श्री व्यासांनी संजयच्या मुखातून गीतेच्या सातशे श्लोकांच्याद्वारा आपल्याला दिले आहे. भगवान श्रीकृष्ण हे जगद्गुरू आहेत. त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान जगातील तमाम मानवतेसाठी उपयुक्त आहे. म्हणूनच स्वामी चिन्मयानंद गीतेला संपूर्ण विश्वाचे बायबल असे संबोधतात. विकासाच्या कोणत्याही पातळीच्या माणसाला पुढे जाण्यासाठी गीतेमधून साधन मिळते.

स्वत: भगवान श्रीकृष्णांनी पार्थाला बोध व्हावा म्हणून ही गीता सांगितली. पृथेचा म्हणजेच पृथ्वीचा मुलगा म्हणून पार्थ. पृथ्वी मृण्मय आहे. जोपर्यंत ज्ञान झाले नव्हते तोपर्यंत पार्थही मातीमोलच होता. मी देह अशी धारणा असल्यामुळे जन्माला येऊन मातीमाध्येच मिसळणार होता. परंतु भगवंत चिन्मय आहेत. चिन्मयाने मृण्मयाला केलेला बोध म्हणजे गीता. श्रीकृष्ण सदगुरू... यांच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु कोण असेल? आणि अर्जुन हा शिष्य. तो तर अतिशय सर्वसामान्य असं दुसरं टोक! अज्ञानाने झोप येते पण ज्ञानाने जाग येते. अज्ञानरुपी निद्रेत असलेल्या पार्थाला भगवंतांनी गीतोपदेश करून जागे केले.

गीतोपदेशाने अर्जुनात लक्षणीय परिवर्तन झाले. स्वत: भगवंत गुरू असल्यामुळे पहिल्या अध्यायातील अर्जुन आणि अठराव्या अध्यायातील अर्जुन यात पराकोटीचा बदल जाणवतो. म्हणजे गीता ऐकण्यापूर्वी आणि गीता ऐकल्यानंतर अश्या या अर्जुनाच्या before-after प्रतिमा फारच प्रेरणादायी आहेत. असे परिवर्तन आपल्या जीवनात सुध्दा निश्चित होवू शकते. अध्यात्मिक साधनेमध्ये परिवर्तन हा एक निकष आहे. गीतेतील तत्त्वज्ञानाचा उपयोग आजही अर्जुन-स्थितीत असलेल्या प्रत्येकाला सावरण्यासाठी करता येईल मात्र त्याने गीतेकडे अर्जुनाइतक्याच श्रध्देने व तळमळीने वळले पाहिजे.

महाभारतातील युध्द ही एक संकल्पना म्हणून लाक्षणिक अर्थाने तिचा विचार केला पाहिजे. तुमच्या-आमच्या आयुष्यात युध्द रोजच चालू असते. बाह्यदृष्ट्या आपल्या मनस्थितीचा भोवतालच्या परिस्थितीशी झगडा चालू असतो आणि आंतरिकदृष्ट्या मनाचा बुध्दिशी झगडा चालू असतो. कधी परिस्थिती मनाला हवे तसे वागू देत नाही; कधी मनाला जे करावेसे वाटते ते बुध्दीला योग्य वाटत नाही. बुध्दी जो निर्णय देते तो मन स्वीकारत नाही. त्यामुळे अंतर्बाह्य सतत युध्द चालूच आहे. ‘रात्रंदिनी आम्हा युध्दाचा प्रसंग | आंतर्बाह्य जग आणि मन||’ किती खरं म्हणालेत तुकोबा. श्रीमद्भगवद्गीता हे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगण्यास युध्दक्षेत्रापेक्षा अधिक योग्य अशी दुसरी पार्श्वभूमी मिळालीच नसती. व्यासांनी प्रत्यक्ष वेदांत रणांगणावर, युध्दभूमीवर आणला. जे जे आपल्या रोजच्या जीवनाला उपयुक्त आहे ते सर्व त्यांनी गीतेमध्ये आणले. हा व्यवहार्य वेदांत आहे. म्हणजेच या वेदांताचे ज्ञान आपल्याला व्यवहारामध्ये सुध्दा उपयोगी पडते.

याचप्रमाणे कौरव पांडव यांच्याकडेही लाक्षणिक अर्थाने पाहता येईल. पांडव म्हणजे पाच सत्प्रवृत्ती तर कौरव म्हणजे शंभर दुष्प्रवृत्ती. या पाच सत्प्रवृत्तींचे शंभर दुष्प्रवृत्तींशी युध्द सुरू आहे. जीव मधोमध उभा आहे. एवढ्या दुष्प्रवृत्तींचा विनाश फक्त पाचच सत्प्रवृत्ती करू शकतील का? असा संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. परंतु इथे संख्या महत्त्वाची नाही तर गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे थोड्याश्या सत्प्रवृत्ती शंभर दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यास समर्थ आहेत. शेवटी पांडवांचाच विजय झाला हे लक्षात ठेवले पाहिजे.

ही झाली गीतेची पार्श्वभूमी आता अर्जुन युध्द का नाकारत होता त्याची कारणे बघू.

युध्द सुरु होण्याआधी अर्जुन व दुर्योधन हे दोघेही मदत मिळवण्यासाठी श्रीकृष्णाकडे गेले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, “ एकाला मी माझे सैन्य व माझी शस्त्रे देईन आणि शस्त्ररहित होऊन मी स्वत; दुसऱ्याकडे जाईन.” दुर्योधनाने विचार केला की युध्दामध्ये असा बिनकामाचा माणूस म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. त्यापेक्षा सैन्य आणि शस्त्र उपयोगी आहे. त्यामुळे श्रीकृष्णांचे सैन्य व शस्त्रात्रे दुर्योधनाकडे आली आणि स्वत: भगवान अर्जुनाकडे गेले. भगवान श्रीकृष्ण हे पांडवांचे सर्वस्व होते. ते स्वत: तत्वज्ञ होते, सुहृद होते, पांडवांचे मार्गदर्शकही होते. पांडवांसाठी भगवान श्रीकृष्ण हे भाग्यकारक होते.

अर्जुन भगवंतांना म्हणाला, “आता तू काहीच करणार नाहीस असे म्हणतोस तर माझा रथ का हाकीनास?” श्रीकृष्णांनी मित्राचे म्हणणे मान्य केले आणि पार्थसारथी हे नाव त्यांना चिकटले. भगवान श्रीकृष्णांना नटवर म्हणतात ते काही उगीच नाही. त्यांनी आयुष्यात सर्वच भूमिका उत्तम वठविल्या. तसेच यावेळीही त्यांनी सारथ्याची सर्व कर्तव्ये जसे घोड्यांना खरारा करणे, त्यांच्या जखमा धुणे, रथाची डागडुजी करणे उत्तम प्रकारे पार पाडली. रथाच्या मागील बाजूस अर्जुन धनुष्यबाण घेऊन उभा असे आणि त्याच्या दोन गुडघ्यांमध्ये मस्तक येईल अश्या अंदाजाने भगवंत रथाच्या समोरील बाजूस बसत असत. आपण ज्याप्रमाणे रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्यास डावीकडे घे, उजवीकडे वळव, सरळ घे अश्या सूचना देत असतो त्याप्रमाणे अर्जुन स्वत:च्या गुडघ्याने भगवंतांच्या मस्तकाला स्पर्ष करून त्यांना रथ कुठल्या दिशेस हाकावा यासंबंधी सूचना देत असे. कारण युध्दाच्या धुमश्चक्रीमध्ये बोलणे शक्य नसे. द्वारकेचा राजा झाला म्हणून रथसारथ्य करणे हे कार्य भगवंतांना नीच वाटले नाही.

अशाचप्रकारे अर्जुनाने भगवंतांना दोन सैन्यांच्यामधोमध रथ नेऊन उभा करण्यास सांगितले. युध्द करण्यास प्रतिपक्षातून कोण कोण आले आहेत ते अर्जुनास जाणून घ्यावयाचे होते. ही आज्ञा शिरसावंद्य मानून भगवंतांनी रथ नेमका भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांसारख्या आदरणीय दिग्गजांसमोर नेऊन उभा केला आणि म्हणाले समवेतान् कुरून पश्य| (१.२५). पहिल्या अध्यायात भगवंतांचे एवढे एकच वाक्य! त्यांनी पश्य म्हटले पण भगवंतांना जे दाखवायचे होते ते अर्जुनाला पाहता आले नाही. युध्दामध्ये समोर केवळ शत्रू असतो. परंतु अर्जुनाने पाहिले काय? तर भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, काका, मामा चुलत भावंडे इत्यादी.

‘युध्दाचा परिणाम सर्वनाश आहे. आपलेच भाऊबंद मारले जाणार आहेत.’ अशा अर्थाचे एक पत्र धृतराष्ट्राने युध्दाच्या आदल्या दिवशी अर्जुनाला धाडले. त्या पत्रामुळे अर्जुनाची मनस्थिती विपरीत झाली. खरं म्हणजे प्रत्येक परिस्थितीत वास्तव बघितले पाहिजे. वास्तव समजले नाही तर मनाच्या कल्पना सुरु होतात. मनाने लावलेल्या अर्थानुसार आपण त्या परिस्थितीला सामोरे जातो. अर्जुनाने समोर उभ्या असलेल्या समस्त कुरुबांधवांकडे शत्रू याचअर्थी बघायला हवे होते. पण सामन्यत: आपल्याला केवळ अज्ञान नसते तर त्यातून निर्माण झालेले विपरीत ज्ञानही असते.

प्रथम स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि त्यातून मी देह हे विपरीत ज्ञान. अज्ञान म्हणजे निव्वळ कोरी पाटी असती तर सांगता आले असते की हे तुझे शत्रू आहेत पण त्यातून विपरीत ज्ञान निर्माण झाले. हे विपरीत ज्ञान म्हणजेच समोर दिसणारे कुरू शत्रू तर नाहीतच पण आप्तस्वकीय आहेत. त्यांना मारणे हे महत्पाप आहे आणि म्हणून युध्दच नको. आम्ही हे मोठे पाप करण्यास प्रवृत्त झालो आहोत असे अर्जुन म्हणतो. “अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् |” (१.४५) युध्द करणे हा जो क्षत्रियाचा स्वधर्म तोच त्यास पाप वाटू लागला. “न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च| (१.३२) आम्हाला युध्द नको, विजय नको. हे युध्द जिंकून जेव्हा मी राज्य मिळवीन तेव्हा माझे राज्यभोग हे रक्तलांछीत असतील तर मग ते राज्यभोग मी कसे भोगू शकणार? त्यापेक्षा मी भैक्ष्यवृत्ती म्हणजे संन्यासवृत्ती स्वीकारेन.” अगदी संन्यास स्वीकारून अर्जुन जर वनवासी झाला असता आणि त्याला कोठे एखादे श्वापद दिसले असते तर त्याची मूळ क्षात्रवृत्ती जागृत झालीच असती. त्या श्वापदाला मारण्यासाठी पाठीवरच्या बाणाकडे त्याचा हात गेलाच असता. पण त्यावेळी मागे बाण नसता. कृष्ण हे सर्व जाणून होता. पण अर्जुन सुसंस्कृत होता म्हणूनच असा विचार करत होता.

वस्तुत: अर्जुन सुसंस्कृत आर्यपुत्र होता. आर्य हा शब्द जातीवाचक नसून गुणवाचक आहे. ‘कर्तव्यम् आचरन् अकर्तव्यम् अनाचरन् |’ अशी आर्यांची व्याख्या आहे. जे करण्यास योग्य आहे ते आचरणारा आणि जी गोष्ट करायची नाही ती न करणारा. या संस्कारांमुळेच अर्जुन आपल्या स्वजनांना मारण्यास तयार नव्हता. पण ज्याच्यामागे अशी संस्कृती नाही तो बापाला तुरुंगात टाकून स्वयंघोषित राजा होऊ शकेल. इतिहासात याचे दाखले मिळतात. कंसाने आपल्या बापाला म्हणजे उग्रसेनाला तुरुंगात डांबले आणि स्वयंघोषित राजा झाला. औरंगजेबानेही हेच केले. मग अर्जुनाची समस्या नक्की काय होती?

जीवनात दोन प्रकारच्या समस्या असतात. १. तात्कालिक समस्या (Topical Problem) २. मूलभूत समस्या (Fundamental Problem). एक तात्कालिक समस्या सोडवली की आणखी १० समस्या उपटतात. हे न संपणारे आहे. तात्कालिक समस्या सोडविण्यामध्येच माणसाचे सर्व आयुष्य सरते. शाळेतील पहिला दिवस, नोकरीतील पहिला दिवस या तात्कालिक समस्या आहेत. जोपर्यंत मूलभूत समस्या सुटत नाही तोपर्यंत तात्कालिक समस्या कितीही प्रयत्न केला तरी सुटणार नाहीत. कोठलेही विज्ञान ही मूलभूत समस्या सोडवू शकत नाही. तात्कालिक समस्येचे मूळ मूलभूत समस्येमध्ये आहे. गीतेमध्ये मूलभूत समस्येचा विचार आहे. एकदा मूलभूत समस्या सोडवली की तात्कालिक समस्या या जेवणातील चटणी कोशिंबीर सारख्या वाटतात. समस्या जर वैध असेल तर निश्चितच समस्येचे समाधान होईल. खरंतर आपला स्वभाव आनंदमय असल्यामुळे सुखाची इच्छा ही समस्याच नाही. मूलभूत समस्या ही दु:खाची आहे. ही मूलभूत समस्या काहीतरी करून (प्रवृत्ती) किंवा करावयाचे टाळून (निवृत्ती) सुटणार नाही. इथे कर्माचा काही संबंध नाही. अर्जुनासाठी युध्द ही तात्कालिक समस्या होती आणि मूलभूत समस्या म्हणजे शोक. युध्द करूनही किंवा टाळूनही अर्जुनाला दु:खं होणं टळलं नसतं. रणांगणावर स्वजन बघून त्याला मोह उत्पन्न झाला. मोह म्हणजे जे आहे ते तसे न दिसता त्याठिकाणी भलतेच दिसणे. मोह अज्ञानामुळे होतो. हे अज्ञान कुठले? तर आपल्या स्वरूपाविषयीचे अज्ञान! या मोहाची परिणती अखेरीस शोकामध्ये होते.

सुख किंवा दु:ख येणे हे सदैव चालूच आहे. पण सुखाने सुखी होणे किंवा दु:खाने दु:खी होणे हे बरोबर नाही. सुख किंवा दु:ख हे येणारे जाणारे आहेत आणि आनित्य आहेत. (२/१४) “Happiness presents itself to man, wearing the crown of sorrow on its head. He who welcomes it must also welcome sorrow.” – स्वामी विवेकानंद. दु:खाचा कडेलोट झाला की मनामध्ये त्याचा विषाद होतो. शोक, खेद, खंत, विषाद हे सर्व दु:खाचे अतीरूप आहे. युध्द जिंकण्यासाठी कौरवांना मारणे हा उपाय होता. पण तो उपाय अर्जुन करू शकत नव्हता. दु:खाचे कारण माहिती आहे त्यावरचा उपाय माहिती आहे पण आपण काहीही करू शकत नाही अशी जेव्हा असहाय्य स्थिती मनामध्ये निर्माण होते तेव्हा मनाला विषाद होतो.

एकच परिस्थिती वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पध्दतीने अनुभवत असतात. गीतेमध्ये जर पाहिले तर अर्जुन घाबरलेला होता, शोकाकुल, विषादपूर्ण, बसकण मारून बसला होता. “सिदंति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति| वेपथुश्च शरीरे मी रोमहर्षश्च जायते||” (१.२९) “गांडीवं स्त्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते|” (१.३०) घशाला कोरड पडली आहे. शरीर थरथर कापत आहे. गांडीव धनुष्य गळून पडले आहे. माझे मन थाऱ्यावर नाही इत्यादी. आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण हासत आहेत. त्यांची प्रसन्न मुद्रा आहे. “तमुवाच हृषीकेश प्रहसन्निव भारत|” (२.१०)

मनाच्या विषादपूर्ण स्थितीमध्ये जर गीतेच्या विचाराचे बीज रोवले गेले तर मात्र त्याचा योग होतो. मन प्रसन्न असताना कोणी जर उपदेश केला तर तो मनाला रुचत नाही. पणsorry state of affairs मध्ये बुध्दी जी मनाला शिकवण देते ती टिकते. ज्ञानाच्या अधिकारासाठी वैराग्य असणे आवश्यक आहे. स्मशान वैराग्य क्षणिक असते. पण अध्यात्म असे सांगते की या स्मशान वैराग्याचा फायदा करून घ्या. मनाची ही अशी स्थिती पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. विरजण घातल्याने दुधाचे दही होते. लोणी मिळवण्यासाठी दुधाला विरजण लावावेच लागते. त्याप्रमाणे आपल्याला जर सत्यस्वरूप लोणी पाहिजे असेल तर सुखाला कधीतरी विरजण हे लागलेच पाहिजे.

अर्जुनाच्या मनाचे विश्लेषण चार प्रकारे करता येईल.
१. चेतावभंजन (nervous breakdown)
२. स्वजानाविषयी आसक्ति
३ नको त्या ठिकाणी दाखवलेली कर्तव्य बुध्दी
४. वैराग्याची भावना.

अर्जुनाची मन:स्थिती पाहता तो मानसिक रोगीच होता. पण एखाद्या उत्कृष्ठ मनोविकारतज्ज्ञाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याचे मनपरिवर्तन केले. ज्याप्रमाणे मानसशास्त्रीय उपचारात मनोरुग्णाला प्रथमत: बोलतं केलं जातं आणि संपूर्ण सहानुभूतीने त्याचं ऐकून घेतलं जातं त्याप्रमाणे पहिल्या अध्यायात भगवंत एक अक्षर बोलले नाहीत. अर्जुन प्रज्ञावाद करीत राहिला आणि भगवंत ऐकत राहिले. पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन रथामध्ये ठाण मांडून बसला आणि मी युध्द करणार नाही असे म्हणाला, “विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस:|” (१/४७)

दुसऱ्या अध्यायाच्या सुरवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्लैब्य म्हणाले. (२.३) क्लैब्य म्हणजे नपुंसक किंवा षंढ. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि अर्जुन परत विचार करू लागला. “मला षंढ म्हणणे हे बरोबर नाही. ज्यांच्या मांडीवर मी लहानपणी खेळलो, बागडलो, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, जे पूजनीय आहेत असे पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांच्यावर मी बाण कसे सोडू? (२.४) या पूज्य गुरुजनांना न मारता मी भैक्ष्यवृत्ती पत्करेन.(२.५) युध्द केल्याने आम्ही त्यांना जिंकावं की त्यांनी आम्हाला जिंकावं यातलं काय श्रेयस्कर आहे हे मला समजत नाही. पण या आप्तेजनांना मारून मला जगण्याची इच्छा नाही.(२.६) धर्म-अधर्माचा निर्णय करण्यास मी असमर्थ आहे तेव्हा तुम्हीच मला सांगा की खात्रीने कल्याणकारक काय आहे? असे म्हणत अर्जुन भगवंतांना शरण गेला (२.७) आणि आठव्या श्लोकात अखेरीस मूलभूत समस्या त्याच्या लक्षात आली. मी युध्द केले काय किंवा न केले काय तरी माझ्या इंद्रियांना हा जो दाह होत आहे तो पृथ्वीचे निष्कंटक आणि समृध्द राज्य मिळाले तरी नाहीसा होईल असे मला दिसत नाही.

दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकापासून भगवंत बोलू लागले. ते म्हणाले, “ज्यांचा शोक करू नये त्याचा तू शोक करतो आहेस आणि वर मोठमोठ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगतो आहेस.” ११ ते ३० या वीस श्लोकांमध्ये भगवंतांनी ज्ञानयोग सांगितला. आत्मा अचल, अविनाशी, अनंत, नित्य, अप्रमेय आहे आणि त्याच्याविरुद्ध देह विनाशी, विकारी, सांत, अनित्य असा आहे हेच निरनिराळ्या प्रकारे भगवंतांनी या वीस श्लोकांत समजावून सांगितले. त्यापैकीच हा बावीसावा श्लोक..

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे
मनुष्य घेतो दुसरी नवीन
तशीचि टाकुनी जुनी शरीरे |
आत्मा ही घेतो दुसरी निराळी ||२२|| (विनोबांची गीताई)

आता आपल्या मूळ श्लोकाकडे वळूया. आत्मा अविनाशी कसा? हा या २२व्या श्लोकाचा विषय आहे. सतराव्या श्लोकात आत्मा अविनाशी आहे असे भगवंत म्हणतात. त्याचेच स्पष्टीकरण येथे बावीसाव्या श्लोकात आहे...

शरीराचे वस्त्र बदलणे आणि आत्म्याचे शरीररूपी वस्त्र बदलणे हा या श्लोकाचा विषय! वस्त्राला प्रावरण असे म्हणतात. आत्म्याभोवती मूलत: पाच आवरणे किंवा कोश आहेत. अन्नमयकोश, प्राणमयकोश, मनोमयकोश, विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश. आपले वस्त्र म्हणजेच प्रावरण हे सहावे आवरण.

आपण वस्त्रे का बदलतो? जसे कार्यक्षेत्र असते त्याप्रमाणे आपण वेश धारण करतो. नाईट गाऊन घालून कोणीही ऑफीसला जात नाही आणि ऑफिसचे कपडे घालून टेनिस कोर्टवर खेळण्यास जात नाही. लग्न समारंभाला जाताना पोशाख वेगळा. त्याचप्रमाणे मयताच्या घरी भेटायला जाताना पोशाख वेगळा. योग्य ठिकाणी योग्य तोच पोशाख आपण परिधान करतो. काही वेळा वस्त्र जीर्ण झालेले नसूनही बदलले जाते. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतील. Fashion बदलली, वस्त्र आवडेनासे झाले किंवा शरीराचा आकार बदलला.

मग आत्माही हे शरीर रूपी वस्त्र का बदलतो? आणि वस्त्र किंवा शरीर जीर्ण झाले म्हणजे नक्की काय झाले? काही जण अगदी जीर्ण शीर्ण होईतोवर जगतात पण काही जण अकाली मृत्यू पावतात. त्यांचा देह जीर्ण झालेला नसतो. यावरून असे लक्षात येईल आपण जसे जीर्ण झाले या एकाच कारणाने वस्त्र बदलत नाही त्याचप्रमाणे आत्माही देह जीर्ण झाला या एकाच कारणाने देह बदलत नाही. वस्त्र बदलण्यासाठी आपल्याजवळ जशी अनेक कारणे आहेत तशी आत्म्यालाही देह बदलण्यासाठी आणखी कारणे असूच शकतील.

देह जीर्ण झाला म्हणजे काय झाले? देह जीर्ण झाला आणि आता तो बदलणे आवश्यक आहे असे दोन प्रकारे म्हणता येईल.
१.प्रारब्ध : प्रारब्ध संपले की आयुष्य संपले. प्रारब्ध जोपर्यंत संपलेले नाही तोपर्यंत एखादा माणूस जरी पाचव्या मजल्यावरून खाली पडला तरी लंगडत लंगडत का होईना जिवंत राहणार. पण प्रारब्ध संपले की बाथरूममध्ये पाय घसरून निजधामाला गेलेल्या माणसांची उदाहरणेही आपण बघतो. रामकृष्ण परमहंसांची पत्नी शारदादेवी यांची ही कथा. रामकृष्ण गेल्यानंतर शारादादेवींचेही कार्य संपले असे वाटेल पण म्हणून शारदादेवींना मृत्यू आला नाही. कारण त्यांचे प्रारब्ध संपलेले नव्हते. त्यांच्याच नात्यात एक अपंग मुलगी अनाथ होती. तिचा सांभाळ करण्यात मग त्यांनी उर्वरीत आयुष्य घालवले. त्यामुळे प्रारब्ध संपल्याशिवाय देह जीर्ण झाला असे होणार नाही.

२.पुरुषार्थ: जेव्हा हा देह आत्मोन्नतीसाठी निरुपयोगी होतो. आत्मोन्नतीची किंवा आत्मविकासाची एक विशीष्ट दिशा आहे. काही टप्पे आहेत. देह आत्मोन्नतीसाठी निरुपयोगी होणे म्हणजे तो देह म्हाताराच, जीर्ण, शीर्ण व्हायला पाहिजे असे नाही. आत्मोन्नतीला प्रारब्धाने काळाची मर्यादा घालून दिलेली आहे. ती आपण वाढवू शकत नाही. या प्रारब्धाच्या काळामध्येच आपल्याला आत्मोन्नती साधावयाची आहे. “या देहाचा नाही भरवसा कोणता दिवस येईल कैसा?”

त्यामुळे आत्माविकासासाठी आपण आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. जर असा उपयोग आपण करणार नसू तर जीवात्मा हा देह टाकून देतो. प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे दोन्हीही ज्या देहाकडून व्यवस्थित चालू आहेत ते तसेच चालू राहतील. पण जेव्हा प्रारब्ध संपेल किंवा हा देह आत्मविकासाला निरुपयोगी होईल तेव्हा हा देह तो जीवात्मा सोडून देईल आणि पुढचा नवीन देह धारण करेल. एक प्रारब्ध संपल्यानंतर संचितातील दुसरे प्रारब्ध (package) दिले जाते आणि अनुकूल नवीन देह मिळतो. पुरुषार्थाच्या दृष्टीने आपण जी प्रगती या जन्मी केली, त्या पुढील प्रगती त्या टप्प्यावरूनच पुढच्या जन्मात अपेक्षित आहे. पुढच्या जन्मात आत्मोन्नतीचा पुन्हा श्रीगणेशा करण्याची आवश्यकता नाही.

माणसाने वस्त्रे बदलली म्हणून माणूस बदलत नाही. गदिमा म्हणतात त्याप्रमाणे, “मुकी अंगडी बालपणीची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे.” वस्त्रे बदलतात पण आत माणूस तोच आहे. तसेच अनेक देह बदलूनही आत्मा तोच आहे. प्रत्येक देहामध्ये विशिष्ट प्रगति अपेक्षित असते ती या दिलेल्या देहामध्ये झाली की त्यानंतर हा देह निरुपयोगी ठरतो आणि आत्म्याचे देहांतर होते.

आध्यात्मिक साधनेमध्ये परवलीचा महत्वाचा शब्द जर कोणता असेल तर तो आहे परिवर्तन किंवा बदल. “काया पालटोनी गेली | का रे मन पालटेना || काळ पालटोनि गेला | धर्म का रे पालटेना ||” देह जुना झाला, म्हातारा झाला तर मनामध्येही काही परिवर्तन झाले पाहिजे. आयुष्याचा एवढा काळ गेला की स्वभावतही काहीतरी चांगला बदल झाला पाहिजे. आपला इच्छापूर्तीचा कार्यक्रम मात्र वर्षानुवर्षे चालू आहे. मनात जर परिवर्तन झाले नाही तर असे अनेक देह बदलून काहीही उपयोग नाही.

जीव हा ब्रह्मच आहे असे वेदांताचे प्रतिपादन आहे. या जीवाच्या ठिकाणी ब्रह्मत्व पावण्यासाठी अनेक जन्मांची आवश्यकता नाही. हे ब्रह्मपद याच जन्मामध्ये याच देही याच डोळा सुध्दा पाहता येईल परंतु या जीवाने अहंकाराची ओळख धरल्यामुळे या अहंकाराचे देहांतर चालू आहे. जीवाचे नाही. आत्म्याला हवा असलेला अनुभव जर हा देह देऊ शकत नसेल तर त्याच्यासाठी हा देह टाकाऊ आहे. आपल्याला येणाऱ्या अनुभवांतून मन आणि बुध्दी यामध्ये काहीतरी उत्क्रांती झाल्याची भावना हवी. मन आणि बुध्दीने प्रत्येक अनुभवातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. मन परिपक्व होत आहे आणि बुध्दीमध्ये समज वाढते आहे असे जर असेल तर आत्म्याला देहांतराची गरज नाही. प्रगती होणार नाही असे जर आत्म्याला वाटत असेल तर लगेच तो देहांतर करायला तयार होतो.

स्वामी चिन्मयानंद आपल्या भाष्यामध्ये म्हणतात ऐन तारुण्यात होणाऱ्या मृत्यूची घटना पाहून या श्लोकाच्या सत्यासत्यतेवर अनेक टीकाकार आक्षेप घेतात. ती व्यक्ती तरुण आहे आणि तिचे शरीर अद्याप जीर्ण झालेले नाही हे फक्त त्या व्यक्तीला बाह्यत: पाहणाऱ्याचे मत असू शकेल. परंतु त्या विशिष्ट जीवात्म्याच्या उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास ते शरीर आता निरुपयोगी ठरलेले आहे हे जाणवेल. त्यामुळे आपण संयम ठेवून उगीच टीका करण्याच्या भानगडीत पडू नये.

तसेही आपण आपल्याच कल्पनेच्या जगात वावरत असतो. वास्तव आपल्याला कुठे आणि कितीसे ठाऊक असते? समुद्रकिनारी क्षितिजावर असलेल्या सूर्यबिंबाचे छायाचित्र पाहून ठरवता येईल का की ते चित्र सूर्यास्ताचे आहे की सूर्योदयाचे?ते छायाचित्र काढताना ज्यांनी तो अनुभव घेतला त्यांनाच ते माहित. काही लोक दरवर्षी गाडी बदलतात, घर बदलतात. एखादा माणूस तरुणपणी आत्महत्या करतो. एखादा आजारपणाला कंटाळून आपले जीवन संपवितो. प्रेमभंग झाला म्हणून तो किंवा ती जीवनाचा त्याग करतात. या सर्व उदाहरणांमध्ये बाह्रेरून बघणारा काय बरोबर किंवा काय चूक हे सांगू शकेल का? काही कारणाने घर बदलणाऱ्याला सध्याचे घर अपुरे पडत असेल किंवा नवीन गाडीची आवश्यकता असेलही. आपण टीका करून मोकळे होतो. आत्महत्या करणाऱ्या माणसाची मनोवस्था आपल्याला कशी समजणार? कल्पना आणि वास्तव यात फरक आहे. आपण फक्त कल्पना करतो आणि त्याप्रमाणे एखाद्या घटनेचे मोजमापन करून मोकळे होते. परंतु त्यामागील सत्य फक्त ती व्यक्तीच जाणत असते. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. याचप्रमाणे शरीराची जीर्णावस्था त्याच्या वयावरून ठरवायची नसते किंवा त्याच्या शारीरिक स्थितीवरूनही नाही. वासांसि जीर्णानि | नवानि गृह्णाति | हे मानवी तर्काने न सुटणारे मोठे गूढ आहे.

स्वामी चिन्मयानंद पुढे म्हणतात आधीच्या बाराव्या श्लोकात पुनर्जन्माचा जो सिध्दांत भगवंतांनी सांगितला तोच या श्लोकात अधिक जोर देऊन सांगितला आहे. मी तू व हे सर्व राजे पूर्वी कधीही नव्हते असे नाही आणि सर्वजण यापुढे असणार नाहीत असेही नाही. (२/१२) जीर्ण वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण केल्याप्रमाणे या अहंकारी जीवाचे देहांतर करणे यामध्ये पुनर्जन्म किंवा पूर्वजन्म याचाच सिध्दांत मांडला आहे.

जे मृत्यूला घाबरतात त्यांना मूळात काहीच कळलेले नाही असे म्हणावे लागेल. ‘मी देह’ असे मानतात म्हणून ते मृत्यूला घाबरतात. तोच मानव जर ‘मी अमका तमका’ हे म्हणायला विसरला तर ते विसरल्यामुळे विसरा अंती विश्रांती आहे. या देहप्राप्तीचा हेतु ज्यांना कळलेला आहे ते मृत्यूला घाबरत नाहीत. रात्रीची गाढ झोप हा रोज येणारा मृत्यूच आहे. काही जणांचा मृत्यू झोपेमध्येही होतो. क्लेश आणि वेदना तेव्हाच होतात जेव्हा मन कोठल्यातरी विषयामध्ये आसक्त असते. तेव्हा हे मनच देह सोडू देत नाही. देह आणि मन आपल्याला मिळालेले आहे. आपण देह नाही किंवा मन नाही. हे जाणले तर स्वामी चिन्मयानंद म्हणतात त्याप्रमाणे मृत्यू जेव्हा आपल्या देहाला येतो तेव्हा आपल्याला काही त्रास होत नाही. ज्याप्रमाणे वेषांतर करताना कोठलेही क्लेश नसतात. आपण आनंदाने वेषांतर करतो त्याप्रमाणे देहांतर होतानाही त्रास होणे शक्य नाही. जीर्ण वस्त्र काढल्यानंतर आपण नग्न रहात नाही त्याप्रमाणे देह सोडल्यानंतर जीवात्मा प्रारब्धाप्रमाणे नवे उपकरण म्हणजेच देह शोधून काढतो आणि त्यात राहून नवीन अनुभव घेऊ लागतो. सूक्ष्म देह उघडा पडत नाही. कृतकर्माचे भोग भोगण्यासाठी विविध देह मिळत राहतात.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. ज्या ब्रह्मपदप्राप्तीकरीता मानव देह मिळाला होता ते ब्रह्मपद त्यांनी बावीसाव्या वर्षीच प्राप्त केले. ते ब्रह्मरूपाशी एकरूप झाले. त्यांचा सूक्ष्मदेह कारणदेहासकट नष्ट झाला. त्यामुळे ‘नवानि संयाति’ नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या अहंकाराचे मरण स्वत:च्या उघड्या डोळ्यांनी बघितले. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा | तो झाला सोहळा अनुपम्य ||’ ते सदेह वैकुंठाला गेले त्यामुळे ‘नवानि संयाति’चा प्रश्नच नाही.

जैसी जीर्ण वस्त्रे सांडिजे | मग नूतन आणिके वेढिजे | तैसे देहांताराते स्वीकारिजे | चैतन्यनाथ ||(ज्ञानेश्वरी २.४४)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा, पण खालील दोन विधानांत मला विरोधाभास वाटला. किंवा मला समजले नाही. त्याच विश्लेषण कराल का?

१] समर्थ रामदास स्वामींनी किती योग्य म्हणून ठेवलंय “चिरंजीव हे सर्व हे मानीताती||” पण मरण अटळ आहे.

२] सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे
मनुष्य घेतो दुसरी नवीन
तशीचि टाकुनी जुनी शरीरे |
आत्मा ही घेतो दुसरी निराळी ||२२|| (विनोबांची गीताई)

१] खरंतर आपला स्वभाव आनंदमय असल्यामुळे सुखाची इच्छा ही समस्याच नाही.

२] ज्ञानाच्या अधिकारासाठी वैराग्य असणे आवश्यक आहे. स्मशान वैराग्य क्षणिक असते. पण अध्यात्म असे सांगते की या स्मशान वैराग्याचा फायदा करून घ्या.

हे खूप सुंदर लिहिलंय ...