६५ वी कला

Submitted by शांत माणूस on 18 November, 2021 - 03:39

खूप लहान असताना गावी गेलो होतो. चुलते वगैरे गावी असायचे. एकदा काकाच्या ग्रुपबरोबर तालुक्याच्या गावी सायकलवर गेलो होतो. या ग्रुपला तालुक्याचे जुने थिएटर पाहून सिनेमा बघायची हुक्की आली. तेव्हां गावी मनोरंजनाचे एकच साधन होते. ग्रामपंचायतीच्या आवारातला टीव्ही. त्तालुक्याला भारतभर भ्रमण करून शिळे झालेले सिनेमे यायचे. सिनेमाचं नाव अमानुष होतं. हिरो कोण हे कुणालाच माहिती नव्हतं. पण पिक्चर बघायचा ही हौस दांडगी असल्याने हिय्या करून सगळे एकदाचे घुसले.

जाहिराती सुरू झाल्या.
सासू येणार असते. सुनेला काय करावं ते समजत नसते. मग नवरा तिला एव्हरेस्ट मसाले आणून देतो. सासू जेवायला बसताना मुलाखती घेणा-यांच्या नजरेने सुनेकडे बघते. थोड्याच वेळात लहान मुलं, दीर, नणंदा, सासरे बोटं चाखत जेवण फस्त करतात. सासू विचार करून पहिला घास घेते आणि तिच्या चेह-यावरचे भाव बदलत जातात. इतक्यात सासरा म्हणतो " अरे तुमने तो कहा था, आज आराम करूंगी, थक गयी हूं, तो खाना कब बनाया ?"

आणि मग नवरा बायकोला डोळा मारतो, बायको लाजते.
इथे जाहीरातीचे सार येते.

एव्हरेस्ट मसाले, रख्खे बडो का ख्याल
एव्हरेस्ट मसाले परिवार को इकट्ठा रख्खे
एव्हरेस्ट मसाले मां जैसा स्वाद !

काका चुलत चुलत्याला म्हणाला. "बघ लका, नाहीतर आपल्याकडं काय ? जात्यावरचा मसाला "

मग लाईफबॉयची जाहीरात आली. सुरेश ओबेराय जत्रेतल्या गोल गोल घोड्यावर फिरत असतो. मागे गाणे सुरू असते. "तंदुरूस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहां. तंदुरूस्ती है वहा... लाईफबॉय "
मग सुरेश ओबेराय ला त्याच साबणाने आपल्या शरीराचा खरारा करताना दाखवले जाते.
एक पिकल्या केसांचा म्हातारा येतो आणि म्हणतो " तंदुरूस्ती है वहा लाईफबॉय है जहा "

काकाचा मित्र म्हणाला "बघ लका, आपण कुठला वापरतो ? कपड्याला बी त्योच अन अंगाला बी दौंड स्पेशल काळा साबण "

या जाहीरातींचं लॉजिक काय हा प्रश्न पडण्याइतकं डोकं काकाला नव्हतं. ना त्याच्या ग्रुपला. त्यांचा दौंड स्पेशल काळा साबण महिनाभर चालायचा. त्याला फेस पण कमी यायचा. दगडावर ठेवला तरी तो वितळायचा नाही. आता जर हा साबण मार्केटमधे आणला तर हे त्याचे प्लस पॉईण्ट म्हणून सांगायला लागतील.

त्या काळी निरमाच्या जाहीरातीला पहिले पारितोषिक मिळाले होते. कारण या जाहिरातीत प्रॉडक्ट बद्दलच सांगितले होते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आशय प्रॉडक्टशी संबंधित असा क्रायटेरिया परीक्षकांनी लावल्याने निरमाला पारितोषिक मिळाले. पण त्यामुळे बाकीच्यांना काही फरक पडला नाही.

गोल्ड स्पॉटच्या जाहिरातीत कुठल्या तरी वॉटरस्पोर्ट्स (मुंबईत नव्हते तेव्हां) मधे घसरगुंडीवरून कमी कपड्यातली मुलगी घसरत येत असताना गोल्ड स्पॉटची बाटली दाखवायची आणि मग स्क्रीनवर सर्वत्र नारिंगी लाटा येत. सगळे पाण्यात बागडत असताना
रिफ्रेशिंग कोला - गोल्डस्पॉट अशी जाहिरात यायची.
या जाहिराती थोडं का होईना प्रॉडक्टबद्दल सांगत होत्या.

लिम्का आफ्टर लिम्का, लिम्का बिफोर लिम्का , लाईन एन लेमनी लिम्का लिम्का अशी एक जाहीरात यायची. यात लिम्का एव्हढा का घ्यायचा हे सांगितलेले नव्हते.
पण या सौम्य म्हणाव्या अशाच जाहिराती येत गेल्या.

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कॉन्फरन्स रूममधे मिटींग चालू आहे. आणि जो मुख्य आहे तो अचानक कोटाच्या खिशातून माणिकचंद गुटखाच्या पाकीटांची चळत काढून दाखवतो. त्या बरोबर सगळे खिशातून गुटखा काढून तोंडात टाकतात आणि मिटींगचा (तो)बो-या वाजतो. पंचलाईन येते
" उंचे लोग उंचे पसंद "
कॉर्पोरेट मिटींग मधे गुटखा काढून दाखवणारा हा उद्योग पती कोण हे ढूंढते रह जाओगे सारखं झालं आहे.

फेविकॉलच्या जाहीरातींनी मात्र जाहीरात ही ६४ वी कला कशी आहे हे बिंबवले. प्रॉडक्ट बद्दल थेट न सांगताही फेविकॉल आणि चिकटपणाचा संबंध असा काही जोडला की लोक आजही या जाहिरातींची आठवण काढत असतात. सावली चिकटून बसते ही हाईट होती. त्यांच्या सर्वच जाहीराती उच्च होत्या.

प्रेस्टीजने ब्लॅकमेल तंत्राचा वापर करत " जो बीवीसे करे प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करे इन्कार" अशी जाहीरात केली होती. आता ही जाहीरात आठवली कि त्या वेळी नवरे असलेल्यांचा केव्हढा चडफडाट झाला असेल याची कल्पना येते. त्या वेळी ही जाहीरात गर्भित इशारा न समजल्याने बायकोवर प्रेम असणारा नवरा प्रेस्टीज कुकरच घेतो या सरळमार्गाने ही जाहीरात पाहिली गेली होती. खाचाखोचा समजण्याचे वय नव्हते ते. यातला तो म्हातारा भलताच फेसम झाला होता.

अन्नू कपूर एका जाहीरातीत ग्लासातले स्वच्छ पाणी दाखवत म्हणतो " जल प्रकृती का एक वरदान है. जल बिना जीवन अधुरा है .." मोठं प्रवचन देत असताना सेव्ह वॉटरची जाहीरात असावी असे वाटत असतानाच तो अचानक म्हणतो "राजश्री पानमसाला, आप भी खाईये, औरों को भी खिलाईये " बेनाम चित्रपटात शेवटपर्यंत खलनायकाचा आवाज दाखवला आहे. पण तो कादरखानचा आहे आणि शेवटी तो प्रेमचोप्रा निघावा अशी गत झाली.

पण अन्नु कपूर राजश्री पानमसालाच्या सर्वच जाहीराती अशा होत्या. एक सोशल संदेश आणि शेवटी राजश्री पानमसाला.

थम्स अपच्या जाहीरातीत तर दरीत उडी मारणे, हेलिकॉप्टरमधून जंप करणे असे स्टंटस असतात. इतके या पेयासाठी वेडं होण्याचं कारण काय आहे ? त्यात शिलाजीत आहे की अमरत्वाचे औषध ? त्या पेक्षा स्वस्तात नबाब मलिकांच्या जावयाकडे सापडलेली एक प्रकारची हर्बल वनस्पती खाऊन निपचित का पडू नये ? अशा कित्येक मनोरंजक जाहीराती असतील.

तर अशी ही पासष्ठावी कला. ज्यात उत्पादनाबद्दल कमी आणि इतर गोष्टीच जास्त दाखवल्या जातात. तरीही उत्पादक अशा जाहीरात कंपन्यांवर भरपूर पैसा उधळतात. लोकही लॉजिक विचारत नाहीत.
तुम्हाला आठवणा-या अशा जाहीराती आणि त्याच्या लॉजिकची भर घाला.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीव्हीवरच्या जाहीरातीत लॉजिक असो वा नसो, मॅजिक हवे, जेणेकरून त्या प्रॉडक्टचे नाव लोकांच्या लक्षात राहील.
अन्यथा दारू, सिगारेट, फसफसणारी पेये या शरीराला घातकच असणार्‍या गोष्टींची काय डोंबलाच्या लॉजिकनुसार जाहीरात करणार. त्या जाहीराती अप्रामाणिकच कराव्या लागणार.
अन्यथा जसे ते म्युच्युअल फंडची जाहीरात करतात तसे सचिन तेंडुलकर येऊन बोलणार का, दारू सिगार रिस्की तो है, लेकीन जिंदगी मे मजा लेने चाहते हो तो रिस्क तो उठानाही पडेगा Happy

अमिताभ बच्चन या वयात पानमसाल्याची जाहीरात करतो हे पाहून खरचं वाईट वाटलं.
काय विचार करून त्याने ही जाहीरात स्वीकारली असेल ? फक्त पैसा Angry

छान धागा शां मा, अजय देवगनची पण एक गुटख्याची/पानमसाल्याची जाहिरात बघून तिडीक गेली होती. दुर्दैवाने हा फार
स्ट्रॉंग मिडिया आहे. जी गोष्ट टिव्हीवर बघतो ती विश्वासार्ह असेलच असे नाही ...त्याची ही प्रभावी जाहिरात, House Hippo Commercial - Don't believe what you see on television !!!!

काय विचार करून त्याने ही जाहीरात स्वीकारली असेल ? फक्त पैसा Angry
>>>>
अमिताभने मागे म्हटलेले की माझे खर्च एवढे आहेत की मला या वयातही काम करत राहावे लागते.
माणसाने आपले स्टेटस असे ऊंचावर नेऊन ठेवले की मग ते मेनटेन करायला ईतका पैसा लागत असावा..