तिला उमगले नाही !

Submitted by _आदित्य_ on 18 November, 2021 - 00:06

तिच्या हाती डवरल्या अबोलीचे फुल..
माझ्या हाती कोमेजल्या कवितेची धूळ !

तिचे डोळे जणू निळ्या चांदण्याचे पाणी..
माझे डोळे गाती तिच्या स्मरणाची गाणी !!

तिच्या गाली गुलाबाचे लडिवाळ हसू..
माझ्या गाली विरहाचा ओघळता आसू !

तिचे मन ओथंबून वाहणारा झरा..
माझे मन तहानल्या आशेचा किनारा !!

तिच्यासाठी मी एखाद्या स्वप्नभासापरी..
माझ्यासाठी ती अगदी खऱ्याहून खरी !

तिच्या देही बहरल्या वसंताचा ऋतू...
माझ्या देही तिच्यासाठी प्रीत जाई उतू !!

तिची वाट अनोळखी प्रदेशात जाते..
माझी वाट आपोआप तिच्या वाटी नेते !!

तिचा देव दगडाचा, देवळात राही..
माझा देव तीच, तिला उमगले नाही !!

...........................................

Group content visibility: 
Use group defaults

जुनी कविता आहे फार...
आज सहज कविता चाळत असताना दिसली..
काही चुका असतील तर सांभाळून घ्या! Happy