अँब्युलन्स

Submitted by भास्कराचार्य on 16 November, 2021 - 12:40

एका मोठ्ठ्या कारखान्याच्या आवारात तो उभा होता. आसपास इमारतीच इमारती पसरल्या होत्या. नाही, फक्त इमारतीच नाही. शेकड्यांनी अ‍ॅम्ब्युलन्सेससुद्धा होत्या. अ‍ॅम्ब्युलन्सेसचाच कारखाना होता तो. पण बाकी त्याला काही म्हणजे काही सुधरत नव्हतं. गावाबाहेर माळरानावर तो आला होता. आसपास झाडोरा वगैरे अस्ताव्यस्त सुटला होता. नुसत्याच मंद उताराच्या टेकड्या त्याच्याकडे बघत बसल्या होत्या. आणि अश्यातच त्याला तो कारखाना दिसला होता.

कारखान्याला काटेरी तारांचं कुंपण होतं. सुरक्षेच्या भिंती वगैरे नव्हत्या. आतमध्ये मोकळ्या मैदानात शेकड्याने नाहीतर हजारांनी अ‍ॅम्ब्युलन्सेस पसरल्या होत्या. 'रुग्णवाहिका' असं ठसठशीत लाल अक्षरांत त्यांच्यावर रंगवलेलं दिसत होतं. लाल दिवेसुद्धा केकवर चेरी ठेवावी तसे दिसत होते. पण सगळ्या अ‍ॅम्बुलन्सेस काही एकसारख्या दिसत नव्हत्या. काहींचा आकार फारच मोठा होता. काही अगदी छोट्या होत्या. थोडं जवळ गेल्यावर त्याला दिसलं, की त्यांच्यावर 'फर्स्ट क्लास', 'सेकंड क्लास', 'थर्ड क्लास' असं लिहिलेलं होतं. भयंकर उन्हात त्याला अजून काही दिसत नव्हतं. ढग काही फार सावली वगैरे देत नव्हते. त्यांच्या सावल्या समुद्राच्या लाटांसारख्या खालच्या रानावरून पुढे जात होत्या. खालचा अ‍ॅम्ब्युलन्सेसचा सागर मात्र ढिम्म उभा होता. डोळ्यांना सहन न होणारा प्रकाश तिथून येऊन टोचत होता.

शेवटी तो न राहवून आवारात आला होता. सिक्युरीटी गार्ड त्याच्याकडे एकटक बघत राहिला होता. तो जवळ येऊन पोचल्यावर त्याने उगाच काहीतरी वहीत लिहिण्याचा आव आणला होता. ह्याने एक-दोन वेळा खिडकीवर टकटक केल्यावर त्याने ह्याच्याकडे डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघितलं.

"ही काय जागा आहे हो?"

"हैं जी?"

"ये कौन सी जगह है भैय्या?"

"ये तो गोरमेंट फैक्ट्री है | अ‍ॅम्ब्युलन्सेस बनाते हैं |"

"अंदर आ के देख सकता हूं क्या?"

"हां हां भाई, जितना देखना है देख लीजिये | वैसे अ‍ॅम्ब्युलन्स में कौनु देखने लायक चीज है नही | लेकिन अगर आप चाहें तो देख सकते हैं | ऐसी जगह पर कैसे किसी को रोक सकते हैं?"

आत आल्यावर त्याला कटींग मशिन्सचा आवाज जास्त तीव्रतेने जाणवला. वेल्डिंग मशिनच्या सुरसुर्‍या उडताना दिसत होत्या. भल्या मोठ्ठ्या पंख्यांच्या संथ पात्यांची घरघर ऐकू येत होती. त्या दिशेने तो निघाला. एक टेकाड ओलांडून गेल्यावर त्याला शेड्सची लांबलचक रांग दिसली. आणि पुढ्यात ह्या एवढ्या अ‍ॅम्ब्युलन्सेस. त्यांच्या पांढर्‍याशुभ्र रंगाकडे बघताना डोळे भाजून निघाल्यासारखं वाटत होतं. पण त्यातसुद्धा एकसंधपणा नव्हता. थर्ड क्लासमधल्या अ‍ॅम्बुलन्सेस अगदी पातळ कचकड्याच्या वाटत होत्या. त्यांचा पांढरा रंगसुद्धा चुनासफेदी केल्यासारखा दिसत होता. सेकंड क्लासमधल्या जरा बर्‍या होत्या. नेहमीची बॉडी वाटत होती. तोच दवाखान्याची विचित्र आठवण करून देणारा रंग. सगळ्यांवर स्थानिक सरकारचं नाव ठाशीव लिहिलेलं होतं. ठसठशीत ओले पेंटब्रशचे स्ट्रोक्स सलाईनच्या वासाने भरून गेले होते. फर्स्ट क्लासमधल्या अ‍ॅम्बुलन्सेस मात्र फार सुबक रंगवल्या होत्या. एकदोघांकडे बघता बघता तर त्याला अगदी संगमरवराचा भास झाला. त्यांच्यावर शांत हलक्या सोनेरी रंगाने नाजूक नक्षीकामही केलं होतं. त्यांचा आकार अगदी एखाद्या कॅराव्हॅनसारखा होता.

तिकडे शेड्समध्ये काम जोरात चालू होतं. असेम्ब्ली लाईन लागली होती. वेल्डर्स, पेंटर्स, व्हार्निश लावणारे, लोहार, इन्स्पेक्टर्स, मुकादम, वगैरे सगळे घामाघूम होऊन चटचट काम उरकत होते. बरेचसे जण नुसत्या बनियन लुंगीवर होते. त्याच्याकडे कोणीच दुसरी नजर टाकत नव्हतं. ठण ठण घण घण काम चालू होतं. तो गुपचूप पावलं उचलून पुढे जाऊ लागला. एका शेडपाशी एक मुकादम अ‍ॅम्ब्युलन्सेसवर त्यांचे क्लासेस लिहित होता.

"काय हो, हे क्लासेस कशाला लिहिताय तुम्ही असे?"

"प्रत्येक गोष्टीला क्लास असतोच साहेब. नवे आलाय काय?" असं म्हणून त्याने पानाची पिंक बाजूला टाकली.

"अहो पण म्हणून अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या गोष्टीलाही क्लास?!"

"साहेब, दवाखान्याला क्लास असतोय. मग अ‍ॅम्ब्युलन्सला क्लास असला तर कुठे बिघडलं? आता पूर्वी नाही का मोठा माणूस असेल, तर चंदनाच्या लाकडांवर जाळायचे. मिडीयम असेल तर सागबिग आणायचे. गरिबाला अशीच कुठलीतरी बाभळीबिभळीची रानातली लाकडं असायची. आतासुद्धा त्या दाहिन्या असतात त्यात डिझेल वापरायचं का पेट्रोल वापरायचं का आक्टेनने धूर काजळी काही न होता जाळायचं, असं करायचं आहे. ज्या क्लासचा जीव त्या क्लासचं समदं." म्हणून तो हसला.

तो अवाक् होऊन बघतच राहिला. मग गप्प बसून त्या अ‍ॅम्ब्युलन्सेसकडे जाऊ लागला. जवळ गेल्यावर त्याला लक्षात आलं, की त्याच्या पुढ्यातल्या अ‍ॅम्ब्युलन्सेस फारच वेगळ्या होत्या. कार्बन फायबरची वगैरे बॉडी आहे की काय, असंही त्याला वाटून गेलं. काहीतरी भयंकर महाग वाटत होतं. पण फक्त त्यामुळेच नाहीतर त्यांच्यावरच्या कलाकुसरीमुळेही ह्या एलियन वाटत होत्या. एकीवर नेहमीच्या शब्दांशिवाय नाजूक नारिंगी बॉर्डरी करून त्यांच्यामध्ये सुंदर अक्षरांत संस्कृत मंत्र लिहिले होते. तसाच नारिंगी-लाल सूर्योदयाचा देखावा करून त्या साक्षीने वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण मंत्रघोष करत होते, असं दाखवलं होतं. आरोग्याच्या देवतांना आवाहन वगैरे करणारे मंत्र असावेत, असं त्याला वाटलं. दुसर्‍या एका अ‍ॅम्ब्युलन्सवर हिरवी नक्षी होती आणि कुराणातल्या आयता कलाकुसरीत दडवल्या होत्या. मदिनाचा हिरवा घुमट हलक्या हाताने रंगवून त्यापुढे झुकलेले लोक त्यावर दाखवले होते. अश्याच एका अ‍ॅम्ब्युलन्सवर बायबलमधले देखावे, हात पसरवून उभा असलेला येशू, आणि मंत्रही त्याला लांबून दिसले. ह्या जन्मातले मायकेल अँजेलोच जणू इथे ह्या माळरानावर कामात गढून गेले होते.

तो थोडं पुढे आला. इथे तर आतापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स होती. हिच्यावर अनेक सांस्कृतिक देखावे वगैरे होते. शेकोटीभोवती रिंगण करून लोक गरब्यामध्ये नाचतात तसे डीजेच्या तालावर नाचत होते. एका टेबलावर भरपूर फराळाचे पदार्थ मांडले होते. आनंदी स्त्रीपुरूष त्यांचा आस्वाद घेण्यात आणि गप्पागोष्टींमध्ये मग्न दाखवले होते. मागे नोकर लगबगीने इकडून तिकडे जात होते. त्याला चित्रकाराची कमाल वाटली. समुद्रातल्या एका यॉटवर उभं असलेलं आणि प्रेमात रममाण झालेलं जोडपंही त्याला दिसलं. पुढे पाहतो तर शेअर बाजाराची बिल्डींगसुद्धा होती. आता मात्र अनावर होऊन त्याने कुतूहलाने आत पाऊल टाकलं. ते दृश्य पाहून तो दिग्मूढ झाला.

आतमध्ये एखादा फाईव्हस्टार हॉटेलमधला स्वीट असावा तसं वातावरण होतं. बसायला सोफे, खिडक्यांना मलमलीचे पडदे टांगले होते. पाऊल रूतेल असा गालिचा पसरला होता. मोठा फ्रिज ठेवला होता. आतमध्ये वायफायची सुविधा असल्याचंही त्याला दिसलं. भलंमोठं स्वयंपाकघर होतं. सार्‍या विधींची आलिशान सोय होती. वॉशिंग मशिन होतं. फ्लॅट स्क्रीन टीव्ही होता. साऊंड सिस्टीमही होती. एवढंच नाही, तर आतमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड होता. शेअर बाजारात असतो तसा. त्याने तो कुतूहलाने चालू केला, तर तो बॅटरीवर चालत होता. त्यावर लाईव्ह ट्रेडिंगच्या सोयीसाठी कंपन्यांची नावं आणि भाव सटासट जाऊ लागले. जवळच मोठं टेबल आणि लाईव्ह कॉन्फरन्सिंगसुद्धा होतं. अजूनही १-२ उपकरणं होती ती तर त्याने कधी पाहिलीही नव्हती. कोणासाठी हे बनवत असतील, असा विचार करत तो बाहेर आला. तेव्हा मघाचा मुकादम समोरच आला.

"हे आमचं बेष्ट मॉडेल बघा!" तो अभिमानाने म्हणाला. "ह्याला आम्ही म्हणतो, महाराजा!"

"ह्यांना नावंसुद्धा आहेत?"

"मग काय तर!"

"आणि त्या दुसर्‍यांचं?"

"काय भरपूर नावं आहेत. लक्ष्मी आहे, टायगर आहे, बादशाह आहे."

"अच्छा अस्सं होय. कोणासाठी बनवताय तुम्ही हे सगळं?"

"प्च!" करून त्या मुकादमाने तो प्रश्नच झाडून टाकला, आणि तो पुन्हा स्वतःच्या कामाला निघून गेला.

तो मुकाट बाहेर आला. तेव्हा सूर्य हळूहळू झुकायला लागला होता. संध्याकाळचं वारं थोडं सुटायला लागलं होतं. थोडंफार इकडेतिकडे करून शेवटी त्याला तिकडून निघावंसं वाटलं. आता अ‍ॅम्ब्युलन्सचा समुद्र डोळ्यांना त्रास देत नव्हता. आता ती सगळी सुसज्ज सेना वाटायला लागली होती. एकेक करून त्यातल्या काही बाहेरही निघत होत्या. गेटपाशी एक मॅनेजर म्हणावा असा माणूस ड्रायव्हर्सना काही सांगत होता. त्याचे हातवारे ओळखीचे वाटत होते. सिक्युरीटी गार्ड स्वतःच्या बाईकवर बसून निघत होता. हे सगळं पाहून तो हळूहळू गेटकडे जायला लागला. ड्रायव्हर्स अ‍ॅम्ब्युलन्सकडे निघाले होते.

तो मॅनेजर वळून गेटबाहेर बघायला लागल्यावर त्याला एकदम लक्षात आल्यासारखं झालं. आणि त्याने चालण्याचा वेग वाढवला. पण तेवढ्यात त्याला लक्षात आलं, की त्या निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्स भरधाव वेगाने मॅनेजरच्या दिशेने सुटल्यात. त्यांचा आवाज आता भलतीच घरघर करत होता. एखाद्या हिंस्र जनावराच्या घशातून निघावा तसा. पण त्याला तिकडे त्याची काही कल्पनाच नसल्यासारखा तो उभा होता. आपला भाऊ आता चिरडला जाणार हे पाहून तो एकदम धावत जीव खाऊन ओरडायला लागला.

"मंदार! मंदार! अरे मागे बघ! त्या अ‍ॅम्ब्युलन्सेस येतायत बघ!" पण त्याची किंकाळी एकदम भेसूरपणे घशातच विरली. आणि तो इतक्या जोराने जागा झाला, की त्याने पलंगावरून सरळ खाली लोटांगण घातलं.

श्वास जोरात लागला होता, तो नेहमीसारखा होईपर्यंत आणि आजूबाजूची जाण येईपर्यंत काही सेकंद गेले. मग त्याने खडबडून जागं होत फोनकडे बघितलं. तर आठ वाजले होते. आजकाल सहसा त्याला इतक्या उशीरापर्यंत झोप कधीच लागत नव्हती. त्याचा नंबर सोशल मीडीयावर फिरल्यानंतर सकाळ झाली रे झाली, की फोन खणखणायला लागायचा. 'तिकीटासाठी दाही दिशा' असं लोकांचं झालं होतं. लॉकडाऊनमध्ये पूर्वी तर कितीतरी करुण कहाण्यांचा सडा रोज सकाळी त्याच्या पायापाशी पडल्यासारखा व्हायचा. 'मला माझ्या आईकडे जाऊ द्या' म्हणून रडणार्‍या त्या बाई, चपलेसकट सगळं चोरीला गेलेला तो मुलगा, मुलीच्या जिवाच्या भीतीने पुण्याहून चालत निघालेलं ते जोडपं, पोलिसांच्या हातापाया पडून निघणारे लोक ... हे सगळं त्याच्या घशाशी दाटून यायचं. आता रेल्वेने गाड्या सुरू केल्यापासून परिस्थिती जरा तरी सुधारली होती, पण तरी स्टेशनच्या पार्किंग लॉटमध्ये कुत्र्यांसारखे झोपलेले ते लोक काही कमी होत नव्हते. बरं त्यातून स्वतःच्या आईवडलांची, भावाची, बहिणीची काळजी त्याला होतीच. त्याच्या सध्याच्या कामामध्ये त्याला त्यांना भेटता येणं शक्य नव्हतंच.

पटकन उठून त्याने सकाळची कामं आवरायला घेतली. लवकरच रोजच्यासारखं त्याला बाहेर पडायचं होतं. कलेक्टर ऑफिसात जाऊन याद्या करायच्या होत्या. याद्यांमधली काही नावं शोधून काढायची होती. त्यांच्या मालकांनी त्यांना वेठबिगारीसारखं जुंपून ठेवलं असेल तर त्यांना तिथून बाहेर काढायचं होतं. प्रत्येक वेळी असे एखाद-दोन तरी निघायचेच. त्यांचा ३-४ महिन्यांचा पगार वगैरे विसरून त्यांना फक्त घरी जायची इच्छा असायची. पण तेही नियतीनं किती मुश्किल करून ठेवलं होतं. रात्री ११-१२ वाजतासुद्धा त्याला ही कामं करायला लागत होती. स्वतःच्या एक्सपोझरविषयी तर त्याने चिंता करणं केव्हाच सोडलं होतं. पण ह्या गुंडांशी भांडायचं, त्यांना 'कलेक्टरला सांगेन' वगैरे धमक्या द्यायच्या, हाही ताण काही कमी नव्हता. त्यातून जेवणाचं काम कमी झालं असलं, तरी पूर्णपणे संपलं नव्हतंच. त्याला असे बरेच लोक माहिती होते जे दुपारी ४ पर्यंत त्याची टीम पोचेपर्यंत भुकेलेच असायचे. सोशल सिक्युरीटीचं जाळं किती घट्ट म्हटलं तरी अनेक लोक त्यातून सुटलेलेच होते. ४ मुलांच्या बापाने गळफास लावून घेतल्याची बातमी रोजची वाटावी इतकी परिस्थिती निष्ठुर झालेली होती.

शेवटी तो बाहेर पडला, तेव्हा १० वाजून गेलेच होते. झोपून उठल्यानंतरचा मोकळा नि:श्वाससुद्धा त्याने गाडीत बसल्यावर टाकला. खरं तर आताशा गाडीमध्येच त्याला जास्त मोकळं वाटायचं. घरी जाऊन झोपणं म्हणजे एखादं काम असल्यासारखं झालं होतं. त्यातून ही चित्रविचित्र स्वप्नं त्याला पडत होती. तीसुद्धा त्याला जागं करून निघूनच जायची, आणि असा मोकळा श्वास बाहेर पडल्यावर घेतला, की आठवायची. भावाकडे शिंगं रोखून निघालेल्या त्या अ‍ॅम्ब्युलन्सेस त्याच्याकडे आता बघून फूत्कार सोडतायत, असं त्याला वाटलं. तेवढ्यात बाजूने एक अ‍ॅम्ब्युलन्स भेसूर आवाज करत गेलीच. तो तिच्या दिशेने असा काही बघत राहिला, की त्याच्या मैत्रिणीला काहीतरी वेगळं जाणवलं.

"काय रे, सब ठीक?"

"हो, तीच स्वप्नं गं एकेक."

"काय यार मलाही असंच होतं काहीतरी. पण तुझी स्वप्नं म्हणजे भाऽरी अजब असतात. एकदा लिहून काढली पाहिजेत."

ह्यावर तो काहीतरी म्हणणार होता, तेवढ्यात तिनेच एकदम -

"आज पॅकेज जाहिर झालंय पाहिलंस का?"

"नाही गं. व्हॉट्सअ‍ॅपवर आलं होतं काहीतरी, पण मी काही ते बघत बसलो नाही."

"वीस लाख कोटींचं पॅकेज म्हणतायत. म्हणजे असणार त्याच्या दहा टक्केच. पण सांगायला काय काहीही सांगतील."

"हं.." तो पुन्हा गप्प झाला.

सगळीकडे ऊन नुसतं तंगड्या ताणून पसरलं होतं. समोरून येणार्‍या माणसांचे घामट चेहरे लकाकत होते. ड्रायव्हरच्या चेहर्‍यावरून बर्फ वितळून व्हावं तसं पाणी ओघळत होतं. पण तरी माणसं भर उन्हाची राबत होती. पुढे दोन-तीन जण कुदळ-फावडी घेऊन उभी होती. त्यांनी खोदून काहीतरी वर काढलं होतं आणि ती हसत त्यांच्या हातातल्या त्या पुडक्यांकडे बघत होती. गाडी त्यांच्या जवळ गेली, आणि तो आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिला. ती करकरीत नोटांची बंडलं होती. माणसांच्या घामाच्या लकाकीत त्यांची चमक मिसळल्यासारखी वाटत होती. ड्रायव्हरनेही थबकून गाडी थांबवली. तेवढ्यात त्याचं लक्ष बाजूच्या पिंपळाकडे गेलं. त्याच्यावर एक माणूस चढला होता. फांदीच्या बेचक्यात काही बंडलं आकाशातून पडल्यासारखी वाटत होती, ती तो खेचत होता. खाली बहुधा त्याची बायको आणि मुलगा फाटक्या कपड्यांत उभे होते. तो मुलगा आनंदाने जागीच खिळून राहिला होता. एकदम एक बंडल खाली पडलं, तशी त्याने त्याच्यावर झडप घातली आणि तो जनावरासारखा ते चावून फाडायलाच लागला. त्याच्या आईच्या हातात एक बंडल पडलं, तशी ती आनंदाने नाचायला लागली. तेव्हढ्यात त्या माणसाचा तोल गेला, आणि तो धपकन खालीच पडला. निपचित पडूनच राहिला. पण त्याची बायको आणि मुलगा त्यांच्या हर्षभरात नाचतच होते. तो पटकन गाडीतून खाली उतरला, आणि त्या माणसापर्यंत गेला. पण त्याने काहीच हालचाल केली नाही. त्याने हाका मारून आजूबाजूच्यांचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला, पण कोणीच काही केलं नाही. त्याला एकदम जाणवलं, की आसपासच्या प्रत्येक माणसाच्या हातात बंडल आहे. अगदी पानं वेचणार्‍यांच्या धडुत्यातूनही नोटा डोकावत होत्या. क्षणभर त्याला आपण ड्रोनसारखे हवेत उडून बघतोय आणि आसपासच्या प्रत्येक माणसाला बंडलं काढताना बघतोय, असं दृश्य दिसायला लागलं. अगदी गच्चीवर वाळत घातलेल्या पापडांवरही बंडलं वाळत पडली होती. सगळे जण फार हसतमुख आणि आनंदी वाटत होते. त्याला कोणीतरी ओरडून म्हटलं, "ओ साहेब, तुमच्या धान्याची गरज नाही आता आम्हाला. हे पहा पैसाच पैसा! तुम्हीपण घ्या. फार राबलायत आमच्यासाठी!" त्याने मान खाली घातली, आणि त्याला जाणवलं, की गरम गरम झळा येणार्‍या मातीखाली तश्याच गरम अगदी आत्ताच छापलेल्या असाव्यात अश्या नोटा दिसतायत. आनंदून तोही इकडेतिकडे करत त्या सगळ्या जमिनीकडे बघायला लागला, आणि पटकन गाडीवरच आपटला.

"सॉरी सॉरी बरं का सायेब. ते ट्रॉपिकमध्ये तो सायकलवाला एकदम मधे आला म्हणून ब्रेक मारला पटकन." ड्रायव्हर त्याला म्हणाला. हा एकदम ताठ होऊन सीटला मागे टेकून त्याच्याकडे शून्य नजरेने बघतच राहिला.

तोवर ते येऊन पोहचले होते. पोतराज वस्ती, लमाण वस्ती, गोसावी वस्ती, अश्या अनेक वस्त्या त्याला ह्याच काळात पहिल्यांदा जाणवल्या होत्या. पूर्वी तो 'समबडी एल्स'स प्रॉब्लेम' असायचा. फुगे विकणारे, फुलं विकणारे, रिमोटची कव्हरं, मोबाईल चार्जर, मोबाईल कव्हरं विकणारे, देवादिकांचे फोटो विकणारे, झालंच तर नंदीबैलवाले, वासुदेव वगैरे अनंत प्रकारचे लोक त्याला भेटले होते, असहायपणे रस्त्यावर बसलेले दिसले होते. पोलिसांच्या भीतीने कुठेकुठे जाऊन माणसं लपायची, आणि खाण्यासाठी बिळातल्या उंदरासारखी पटकन बाहेर पडून जे मिळेल ते घ्यायला लागायची. पोलिसही वैयक्तिक पातळीवर खरं तर चांगलंच वागायचे. पण सरकारी पातळीवर संस्थात्मक ढिसाळपणा खूप होता. मुळात लॉकडाऊन वगैरे निर्णयही २ महिने 'काहीच होत नाही' अश्या भ्रमात राहून मग अचानक एका दिवशी घेतलेला होता. बाळाचे पाय तिथे पाळण्यातच दिसले होते. त्यामुळे हे सगळं असंच चालणार अश्याच प्रकारे सगळं होतं. नंतर ह्या लोकांना परत जायला म्हणून तिकीटं काढणं, बसची सोय करणं, वगैरे सगळंही अनेक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेतलं होतं. तिथे पुन्हा तिकीटांची किंमत सोयीने दुप्पट केली होती. राष्ट्रीय पातळीवर ह्याचे पैसे केंद्र देणार की राज्य देणार, वगैरे कलगीतुरा भरपूर रंगला होता, पण इथे प्रत्यक्ष तिकीटं अनेकांनी स्वतःच्या पैशातून काढली होती.

ह्या सगळ्यात त्याने भरपूर कष्ट घेतले होते. सुरवातीचे २ महिने भरपगारी असलं तरी लॉकडाऊनच्या नियमांमुळे त्याला काम फार नव्हतं. नंतर तो ते सांभाळून हे सगळं हिरीरीने करत होता. त्याच्या शरीरावर आणि मनावर ताण भरपूर होता. कधीतरी ओक्साबोक्शी रडावंसं वाटायचं. तेव्हापासूनच ही स्वप्नं वगैरे सुरू झालं होतं. आईवडील, भाऊ, बहीण सगळ्यांचीच त्याला आठवणही यायची. सगळ्या कामामध्ये दिवस निघून गेला, की रात्री त्याला दाटून येण्याइतकीही शक्ती उरायची नाही, पण त्या सगळ्या भावनांची, भीतीची बीजं कुठेतरी मनात पडली होती. आपण काहीच करू शकत नाही, ह्या विचाराने रात्री धड झोप लागायची नाही, आणि लागली तर विचित्र लागायची.

काथ्याचे दोर तयार करणारे, गारूडी, डोंबारी, देहविक्रय अश्या प्रकारची कामं करणार्‍यांच्या वस्तीत आज तो आणि त्याची मैत्रीण गेले होते. ह्या वस्त्यांमध्येही त्यांना तर्‍हेतर्‍हेचे अनुभव आले होते. तिथल्या कुठल्या तरी संस्थांचे लोक नेहमी नावांच्या याद्या वगैरे बनवून वाटपाला मदत करायचे. एकदा एक माणूस आला, त्याचं नावच यादीमध्ये नव्हतं. त्याच्या मैत्रिणीने विचारलं, तर संस्थेचा माणूस म्हणाला, "ते 'आमच्यातले' नाहीत" म्हणून. इतक्या अस्मानीमध्येही काही लोकांच्या मनात ह्या अश्या गोष्टी यायच्याच. अगदी शिकलेसवरलेले पांढरपेशे लोकही 'का हो, तुम्ही तसल्या बायकांना कशाला मदत करता? बघा हं, डोक्यावर बसायची एखादी' म्हणून सवाल करायचे. काहींनी वर असं म्हणून 'तसल्या' बायकांशी सलगी करण्याचे मांडे मनातल्या मनात खाल्लेलेही त्याला त्यांच्या डोळ्यात दिसले होते.

वाटप करून झालं, तेव्हा दुपार टळूनही गेली होती. लोकांच्या लाचार अवस्थेमुळे त्याला स्वतःचीही चीडच येत असे. अन्नाची पाकिटंही दुरून किंवा खाली ठेवून द्यायची. झुंडी जमा झाल्या, की त्यांच्यावर ओरडायला लागतच असे. आता स्टेशनवर ते पोहचले होते, तिथेही तसंच. याद्यांमध्ये नावं नसलेले लोक आले, की त्यांच्या अंगावर आरडाओरडा व्हायचा. शेवटी हीही माणसंच आणि तीही. त्यांच्या गावांची नावं वगैरे लिहून घ्यायची, त्यांना ती धड सांगताही येत नसत. सगळ्या कल्लोळात कसंबसं काहीतरी लिहायचं. बसचं तिकीट काढून देतो, गाडीत बसवून देतो असं सांगून भामटे लोकांना घेऊन यायचे आणि त्यांना आसपास सोडून देऊन पसार व्हायचे. अश्या कितीतरी लोकांना तर आपल्या बाबतीत काय घडलंय ते धड कळायचंही नाही. त्यांना संस्थेची माणसं म्हणजे त्या भामट्यांचीच माणसं वाटायची, आणि ते त्यांच्या मागे मागे करायचे. एक तर आई आणि छोटं सहा महिन्याचं बाळ असे दोघे फसवले जाऊन शेवटी स्टेशनसमोरच रस्त्यावर राहत होते. नुसते हताश बसून राहिलेले, घाबरलेले, स्फुंदून रडणारे असे किती तरी लोक तिथेच राहत होते. ह्या सगळ्यांचं आयुष्य कधी सुरळीत होईल का? ह्या प्रश्नाला कोणाकडेच उत्तर नव्हतं. आपापल्या परीने त्यांच्यातला प्रत्येक जण हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होता.

ही अशी सगळी कामं त्या दिवसापुरती संपवून ते शेवटी रात्रीच्या सुमारास घरी यायला निघाले. गाडीने त्याच्या मैत्रिणीला घरी सोडून तो पुढे निघाला. त्याचे डोळे तसे मिटलेलेच होते. मध्येच कुठे तरी गाडीचा वेग एकदम कमी झाला, तेव्हा तो भानावर आला. त्याने बाहेर पाहिलं, तर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारे काही प्राणीप्रेमी रस्त्याच्या मधोमध उभे होते. बहुधा बाजूच्या सोसायटीमधले काही लोकही रस्त्यावर उभे राहून तावातावाने त्यांच्याशी वाद घालत होते. एक आलेली मुलगी बहुधा उत्तर भारतीय असावी. ती सोसायटीमधल्या एका काकूंशी जोरजोरात ओरडून बोलत होती. त्या काकूंच्या बोलीवरून त्या दक्षिणेकडच्या वाटत होत्या, पण त्यांच्या बोलण्यात मधूनच मराठी शब्दही घुसत होते, ह्याची त्याला मौज वाटली. "तुम को काना डालना है तो डालो, लेकिन यहाँ खडे रहो और सब उचल के ले के जावो" असं त्या मुलीला त्या सुनावत होत्या. गाडी त्यांना ओलांडून पुढे निघाली, तेव्हा जमलेले कुत्रेही गाड्यांवर आणि सगळ्यांवरच भुंकायला लागले होते. अचानक कुत्र्यांची संख्या त्याला फारच वाढल्यासारखी वाटली. अचानक गल्ल्यागल्ल्यांमधून वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे कुत्रे जमा होऊ लागले होते. ते आता एकमेकांवरच गुरगुरायला लागले होते. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात त्याला घाम फुटल्याचं त्याला जाणवलं. सगळा भुंकाळ्यांचा आवाज धारदार ब्लेडच्या पात्यांसारखा काचत होता. मध्येच त्याला वाटायला लागलं, की कुत्र्यांच्या आता गँग्ज तयार होतायत. त्याला हेही लक्षात आलं, की आता तो हळूहळू ह्या सार्‍याने वेढला जात होता. आणि त्या सर्व गोंगाटातून त्याला एकदम त्याच्या आईच्या हाकांचा आवाज ऐकू येऊ लागला. तो ओरडून तिला ओ देऊ पाहत होता, पण त्याचा आवाज बहुधा तिच्यापर्यंत पोहचतच नव्हता. त्याला मात्र तिच्या हाका व्यवस्थित मोठमोठ्याने ऐकू येत होत्या. तो मोठमोठ्याने ओरडायला लागला, पण त्याच्या घशाला शेवटी कोरड पडली. जीव खंतावून बाहेर पडायला लागेल, अशी अस्वस्थ भावना त्याला झाली. तेवढ्यात त्याच्या ड्रायव्हरने त्याला जोरजोरात हलवलं, आणि धाडदिशी तो जागा झाला.

गाडीतून बाहेर पडल्यावर तो कसाबसा दारूड्यासारखा धडपडतच दारापाशी आला. इथेही एक माणूस मोठमोठ्याने फोनवर बोलत होता, आणि 'इन्होने मेरे को तंग किया' वगैरे काहीतरी गार्‍हाणं ऐकवत मधूनच आजूबाजूला जमलेल्या लोकांवर धावून जात होता. तेही मोठमोठ्याने 'जा ना मग इथून, कशाला थांबलायेस' वगैरे काहीतरी ओरडत होते. कोणाचं तरी त्याच्याकडे लक्ष गेलं, आणि 'अरे हे बघ ना काय चालू आहे' करत तो त्याच्याकडे आला, पण त्याच्याकडे लक्ष न देता नुसता हात हलवून तो चटचट पुढे गेला. कुलपाशी थोडी झटापट करून तो आत घुसला, आणि त्याने गटगट पाणी प्यायला सुरवात केली. अर्धी बाटली एका घोटात पिऊनच तो थांबला. मग त्याला जरा मळमळ कमी झाल्यासारखी वाटली.

खरंतर काही खाण्याची त्याला इच्छा होत नव्हती. पण काहीतरी खाणं त्याला भाग होतं. चांगला इंद्रायणी भात शिजायला लागल्यावर त्याला जरा बरं वाटायला लागलं. "जेवताना शांतपणे जेवावं रे" त्याला आठवलं. त्यामुळे मनात घाई पण हाताने हळू असा तो खाऊ लागला. त्या घाईने त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. अगदी फोनही त्याने हातात घेतला नाही. जेवण आटपून मग उद्याची तयारी मनात करत तो फोनकडे बघायला लागला. शेकडो मेसेज जमा झाले होते. त्यातले अगदी उद्या हवे असलेले त्याने बघितले, काही जुजबी उत्तरं वगैरे लिहिली. त्याच्या स्वतःच्या कामाचं सटरफटर काहीतरी बघितलं. आणि शेवटी मास्क न चढवताच गच्चीवर जाऊन उभा राहिला.

शहर त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हतं. गल्ल्यांमध्ये सगळीकडे तुरळक तरी माणसं होतीच. शेतामध्ये गव्हाच्या कापलेल्या धाटांसारखी ती खुजी दिसत होती. सारं शांत वाटत असलं, तरी हवेतून नकळत पिसं उडत असावी, तशी जगण्याची कुजबूज त्याच्यापर्यंत येतच होती. सगळ्या दिव्यांमध्ये मध्येच त्याला स्मशानभूमीचा अंधारही दिसत होता. हवेत अजिबात गारठा नव्हता. त्याला अचानक सगळे कपडे काढून कुठेतरी नदीत उडी मारण्याची इच्छा झाली. पण असलं काही करणं त्याच्या स्वभावात नव्हतं. शेवटी चांगलीच रात्र झाली, तेव्हा तो पुन्हा खाली आला. कपडे बदलून त्याने बेडला पाठ लावली. अचानक त्याला जवळूनच कुठून तरी अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज जोरात ऐकू येऊ लागला.

(ही कथा माहेर मासिकाच्या फेब्रुवारी २०२१ अंकात प्रसिद्ध झाली होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! कल्लोळ आहे हा! सुंदर शब्दबद्ध केला आहेस असंतरी कसं म्हणू?
पुन्हा वाचायची आहे नीट, पण लगेच वाचायचा धीर होत नाहीये.

तुमचं नाव वाचून मी फार अपेक्षेनं गोष्ट वाचायला घेतली पण निराशा झाली. नुसतीच डिटेलमध्ये कोविडकाळाशी जुळतील अशी स्वप्नांची वर्णनं एकामागोमाग एक आली आहेत आणि त्यात लॉकडाऊनमधले काही वास्तवातील डिटेल्स गुंफले आहेत. फार परिणामकारक नाही वाटली. वाईट नाही पण कदाचित माझी अपेक्षा जास्त होती.

सर्वांना थँक्स!

मामी, तुमच्या मताचा नक्कीच आदर आहे. मी लिहिलेली ही पहिलीच कथा आहे तशी. ह्याआधी मी लेखच लिहिले आहेत. हळूहळू सरावाने त्यात अधिक परिणाम आणि नावीन्य साधायचा प्रयत्न करेन.

माहेरमध्ये वाचली होती. त्यावरचा अभिप्राय मायबोलीवरच नोंदवला होता हे आठवत़ंय. . त्या दिवसांत तर ही कथा अंगावर आली होती.

फार अस्वस्थ केलं या कथेने! आपत्तीत रस्त्यावर उतरुन मदतकार्य करणार्‍यांचे मनस्वास्थ्य हा बर्‍यापैकी दुर्लक्षित विषय. मदतकार्य करणार्‍या व्यक्तीच्या मनावरचे आघात आणि त्यातून येणारा कल्लोळ नीटच पोहोचला.

कथा वाचतोय असं वाटलं नाही. कुणाचंतरी अनुभवकथन वाचतोय असं वाटलं. कशातून गेलो आपण गेल्या दोन वर्षांत असा विचार करून उदास वाटलं एकदम. सत्य कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे अनुभवलं आपण सगळ्यांनीच Sad

सगळ्यांना खूप थँक्स!

आपत्तीत रस्त्यावर उतरुन मदतकार्य करणार्‍यांचे मनस्वास्थ्य हा बर्‍यापैकी दुर्लक्षित विषय. >>> खरं आहे, स्वाती२.

कशातून गेलो आपण गेल्या दोन वर्षांत असा विचार करून उदास वाटलं एकदम. >>> अगदी असंच वाटलं होतं लिहिताना, जिज्ञासा.