बेटावर एकटेपणाच्या

Submitted by अनन्त्_यात्री on 16 November, 2021 - 02:07

बेटावर एकटेपणाच्या
धुमसे ज्वालामुखी स्मृतींचा
ढळलेली उल्का झळझळती,
अनाहूत
कोसळून विझे

आदिम इथली जमीन शापित
हवा भारली, पाणी मंत्रित
दिशा कुंठल्या, कातरवेळी
घनगंभीर
पडघम वाजे

का धुपला नि:संग किनारा?
का उसासतो जखमी वारा?
अदम्य आशेचा निर्झर का
क्षणैक उसळे,
पुन्हा थिजे?

ओथंबून बेटावर जेव्हा
झरे केशरी पुनवचांदवा
अपार करुणेच्या वृक्षाचे
बीज कोवळे
कुठून रुजे?

Group content visibility: 
Use group defaults

दिशा कुंठल्या, कातरवेळी
घनगंभीर
पडघम वाजे

अगदी मनातलं....
अदम्य आशेचा निर्झर का
क्षणैक उसळे,
पुन्हा थिजे?

असाच खेळ असतो...

आणि शेवटी अपार करुणा.‌..ती नाइलाजाने येऊ नये तर सहजसुलभ जागावी.‌..

खूप आवडली....

वा! फारच सुंदर.
' दिशा कुंठल्या कातरवेळी घनगंभीर पडघम वाजे '
अगदी ' झिणी झिणी बाजे बीन ' ची आठवण करून दिलीत. अर्थात संदर्भ वेगळे आहेत, वृत्तही वेगळे आहे..
बोरकरांच्या अशा सांजवेळेच्या काही कविता आहेत, दुरून ऐकू येणाऱ्या नादाच्या, सांजसावलीच्या चाहुलीच्या, कृतार्थतेच्या.
पण तुमच्या कवितेत शेवटी ' पुनव चांदवा ' आहे. नवसृजनाचा अंकुर आहे, करुणेचा कोंब आहे.
छान.